lp06आज कोणीही कोणाचाही गुरू बनू शकतो. त्यासाठी वयाचं, बुद्धीचं, क्षमतेचं, विशिष्ट रूपाचं, साच्याचं बंधन नसावं. अशा गुरूंसाठी ठरवून असा एक दिवस असल्यामुळे त्यांच्यावर असलेल्या प्रेमात, आदरात भर पडते.

कोणत्याही क्षेत्रात तुम्ही काम करीत असलात तरी त्यात यशस्वीरीत्या काम करीत राहण्यासाठी गुरू असावाच. ती प्रत्यक्ष व्यक्तीच असायला हवी असा आग्रह नाही. इंटरनेटवरून असंख्य गोष्टी शिकता येतात. इतरांप्रमाणे इंटरनेट माझाही गुरु होता. मी या क्षेत्रात आलो तेव्हा मला विशिष्ट असा कोणीही गुरू नव्हता. कारण तेव्हा भारतात मोटर सायकल कस्टमाइज मॅन्युफॅक्चरिंग हे क्षेत्रच नव्हतं. त्यात करिअर करायचं असेल तर त्याची संपूर्ण माहिती, अभ्यास असणं गरजेचं होतं. त्यामुळे इंटरनेट माझ्यासाठी महत्त्वाचं ठरलं. विविध पुस्तकं वाचली. टीमवर्क करीत गेलो. या सगळ्या प्रक्रियेत इंटरनेट, पुस्तकं, सहकारी त्या वेळी माझे गुरू ठरले. कोणीही कोणाचाही गुरू बनू शकतो, हे मला तेव्हा पटलं. त्याला वयाचं, बुद्धीचं, क्षमतेचं, विशिष्ट रूपाचं, साच्याचं बंधन नसावं. समोर आलेल्या कोणत्याही व्यक्तीकडून मी काहीना काही शिकण्याचा प्रयत्न करीत असतो. आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्यासाराखं असतंच, असं मला वाटतं. त्यात आई-वडील हे तर आपले पहिले गुरू ठरतात.
मोटर सायकल कस्टमाइज मॅन्युफॅक्चरिंग या माझ्या क्षेत्रात विशिष्ट असा कोणी गुरू नाही. पण एक नाव जरूर घेईन; ज्यांचा मला नेहमीच आधार वाटतो. बाळकृष्ण तेंडुलकर. मेडिकल इंडस्ट्रीमध्ये त्यांची मोठी कंपनी आहे. त्यांनी आमच्याकडून २००९ मध्ये मोटार सायकल घेतली होती. त्यानंतर बिझनेस करण्यासाठी त्यांनी मला खूप चांगला सल्ला दिला. मार्गदर्शनही केलं. खऱ्या अर्थाने ते माझे बिझनेस मेंटॉर आहेत, असं मी आवर्जून सांगेन. व्यवसाय करताना विविध अडचणी, समस्या येत असतात. अशा अडचणी आल्या की त्यांना त्याबाबत विचारलं की ते लगेच त्यांचं काम बाजूला सारून मला मदत करायला येतात. योग्य ते मार्गदर्शन करतात. काय करायला हवं, काय नको, कोणत्या मार्गावर चालायला हवं, कोणती ऑफर स्वीकारावी, कोणती नाही, त्याचे फायदे-तोटे याची ते माहिती देतात. माझे बिझनेस मेंटॉर आहेत.
शिक्षक वेगवेगळ्या विषयांची माहिती देत असतात. तेव्हा वाटतं, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र असे विषय शिकून काय होणार आहे, या पुस्तकी ज्ञानाचा काय फायदा होणार आहे. पण आज ते सगळे विषय आयुष्यात वेगवेगळ्या वेळी उपयोगी पडतात याची आता जाणीव होतेय. करिअरमध्ये आता मी स्थिरावल्यानंतर माझ्या शाळेतले मुख्याध्यापक शाळेत येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधायला ये अशी विनंती करतात. करिअरबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सांगतात. मला वाटतं, आपल्या शिक्षकांनी आपल्याला मनापासून शिकवलेलं असतं. आयुष्यात करिअरच्या टप्प्यावर आवश्यक असलेलं शिक्षण त्यांनी दिलेलं असतं. त्यामुळे त्यांच्यासाठी आपल्याला काही करायची वेळ आली तर आपण ते जरूर करावं. मी आज जो काही उभा आहे तो त्यांच्यामुळेच आहे. म्हणून मीही माझ्या शाळेत ठरावीक दिवसांनी जातो. तिथल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो, मदत करतो, एखादी कार्यशाळा घेतो. मी याला गुरुदक्षिणा म्हणणार नाही. त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा मात्र प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये असावी असं वाटतं.
पूर्वीच्या गुरू-शिष्य या नात्याचं रूप वेगळं होतं. त्यात भावनिक जवळीक होती. आता ती फारशी बघायला मिळत नाही. पूर्वी शिष्य गुरूंकडे जाऊन राहायचे. विविध कला शिकून घ्यायचे. पूर्वीच्या काळातल्या गुरू-शिष्यांमध्ये मैत्री होती. आताही असते. पण आता त्याचं प्रमाण वाढलंय. गुरू-शिष्याचं नातं आता जास्त मैत्रीचं झालं आहे. पण म्हणून गुरूंप्रती असलेला आदर कमी झालाय असं नाही. काळानुरुप बदल झालेल्या गुरू-शिष्य परंपरेत आदराची भावना तशीच आहे. गुरू-शिष्य हे नातं वर्षभर साजरं केलं जात असतं. पण गुरूंसाठी विशिष्ट एक दिवस ठरवून दिला तर त्यांच्याबद्दल असलेल्या प्रेमात, आदरात किंचित भर पडते आणि तो दिवस खास होतो. त्यामुळे त्यांच्यासाठी एक दिवस असावाच.
शब्दांकन : चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com