lp06आजच्या टेक्नोसॅव्ही पिढीला प्रत्येक गोष्टीसाठी नेटची मदत लागते. ‘गुगलाय नम:’ असं म्हणत ही युवा पिढी आता इंटरनेटवरील नवनवीन पर्यायांनाच गुरू मानायला लागली आहे.

गुरू म्हटल्याक्षणी आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते ओघवत्या ज्ञानाचे स्रोत असणारे, आपल्यावर संस्कार करणारे, आपले जीवन प्रभावित करणारे एक दिव्य व्यक्तिमत्त्व. ‘गुरू’ची परिभाषा ‘शिक्षक’ या शब्दापेक्षा बरीच व्यापक आहे व त्याची समर्पक व्याख्या मिळणे तितकेच कठीण. कित्येक घरांमध्ये ‘ज्ञानेश्वरी’, ‘दासबोध’, ‘गुरुचरित्र’सारख्या ग्रंथांचे पिढय़ान्पिढय़ा पारायणे होत आहेत. कारण या गुरूंचे चरित्र किंवा शिकवण या साहित्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचते. किंबहुना म्हणूनच आपण या ग्रंथांना गुरुस्थानी मानतो. आजच्या टेक्नॉलॉजी युगात बऱ्याच गुरूंना समर्पित व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप्स आहेत, त्यांचे फेसबुक पेजेस, ट्विटर हँडल्स आहेत. सत्संग, प्रवचनेही लाइव्ह आणि ऑनलाइन होत आहेत. थोडक्यात काय तर,
गुरू-शिष्यांचे ‘कनेक्शन’ घडवून आणण्यात इंटरनेट हा महत्त्वाचा दुवा ठरतो आहे. पण इंटरनेटवरील माहिती-महासागराला कुणा व्यक्ती, समूह, विषय, प्रांत या कशालाच मर्यादा नाहीत. इंटरनेटच्या माध्यमातून मिळणारी माहिती ‘सर्वासाठी व सर्वकाही’ आहे. अशा या इंटरनेटचा आपण गुरू म्हणून विचार करू शकतो का?
परंपरेनुसार गंडा-बंधन करण्याअगोदर काही गुरू आपल्या शिष्याची परीक्षा घेतात. गुरू-शिष्यांमध्ये वयाचे अंतर जरी सदैव नसले तरी ज्ञानाचे अंतर असल्याने काही प्रकारचे ‘बॅरियर्स’ असू शकतात. गुरूंशी संवाद साधताना मनात संकोच असू शकतो. गुरूंसमोर वागताना शिष्याने मर्यादेत राहणे अपेक्षित असते, काही शिष्टाचार पाळायचे असतात. शिष्याने काही अटी नियमांचे पालन करणे अपेक्षित असते. पण इंटरनेट हा खऱ्या अर्थाने ‘कूल’ गुरू आहे. इंटरनेटबाबत शिष्य आपला गुरू स्वत: निवडतो असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. इंटरनेटच्या शिष्याला वय, व्यवसाय, धर्म, जात, वर्ण, भाषा, प्रांत, संस्कृती कशाचेच बंधन नाही. इंटरनेट आपल्या हाकेला ओ देण्यासाठी सदैव तत्पर असतो आणि आपल्या मनातले असंख्य प्रश्न, मग कधी कधी ते कितीही वाह्य़ात वाटले तरीही तो सहज हाताळतो. आपले शंकानिरसन करतो. त्यामुळे इंटरनेट निव्वळ गुरू नसून आपला सखादेखील आहे.
कुठलाही प्रश्न पडला की ‘अरे गुगल करून बघ’ हे कॉमन उत्तर झाले आहे. एखादा अनोळखी पत्ता असो, इंटरव्ह्य़ूमध्ये अपेक्षित प्रश्नाचे उत्तर असो, एखाद्या प्रवासाचे नियोजन किंवा एखाद्या पारंपरिक रेसिपीचे प्रात्यक्षिक. आपल्याला पडणाऱ्या असंख्य प्रश्नांचा मारा गुगल निमूटपणे सहन करतो. विचारले जाणारे प्रश्न काय काय असू शकतात याची कल्पना करणे कठीण. गुगल आपण प्रश्न करताच क्षणार्धात संबंधित उत्तरांची यादी आपल्यासमोर देतो. मग त्या यादीतील एकाहून अधिक उत्तरे चाळून आपल्याला हवी असलेली माहिती अचूक असल्याचे समाधान आपण करून घेतो. अर्थात गुगल हे ‘सर्च-इंजिन’चे एक उदाहरण आहे. सर्च-इंजिन्स ‘वेब-क्रॉव्लर’ या कोड किंवा प्रोग्रॉमच्या मदतीने विविध वेबसाइट्सवरील माहिती आपल्यासमोर सर्च-रिझल्ट, म्हणजेच आपल्या प्रश्नांची उत्तरे म्हणून प्रस्तुत करतात. बिंग, याहू, आस्क डॉट कॉम, एओएल ही काही अन्य लोकप्रिय सर्च-इंजिन्स आहेत.
विद्यार्थ्यांसाठी इंटरनेट म्हणजे वरदानच जणू. के.जी. ते पी.जी.पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आपले प्रॉजेक्ट्स, असाइनमेंट्स, प्रेझेंटेशन्स यासाठी इंटरनेटवर विकिपीडियासारख्या वेबसाइट्सचा आधार वाटतो. आपल्या आवडीचा विषय आपण इंटरनेटच्या मदतीने शिकू शकतो आणि त्यात प्रावीण्य मिळवू शकतो. इंटरनेटमुळे ज्ञानाच्या कक्षा खऱ्या अर्थाने रुंदावल्या आहेत. ‘मूक’ म्हणजेच मॅसिव ओपन ऑनलाइन कोर्स हा असाच एक इंटरनेटवरील शैक्षणिक (ई-लर्निग) मंच. दुरस्थ शिक्षण किंवा करस्पाँडन्स कोर्सचाच हा नवा आणि प्रगत अवतार. पुस्तकांच्या पलीकडे इंटरनेटवरील दृक्श्राव्य माध्यमातून ‘मूक’ आपल्याला शिक्षणाचा पर्याय देते. रेकॉर्ड केलेली लेक्चर्स, प्रात्यक्षिके, चाचण्या आणि परीक्षण अशा स्वरूपाचे व्हर्चुअल-लर्निग वातावरण आपण अनुभवू शकतो. शिक्षक-विद्यार्थी समुदायात व्हिडीओ कॉल, ग्रुप चॅटद्वारे चर्चा, शंका निरसन होऊ शकते. अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र, कला, समाजशास्त्र, व्यवस्थापन अशा अनेक विषयांतील कोर्स ‘मूक’ साइट्सवर उपलब्ध आहेत. काही कोर्सेस नि:शुल्क असतात तर काही वेळेस सर्टिफिकेशनसाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात. कौर्सेरा (www.coursera.org), एडएक्स (www.edx.org), एडय़ूकार्ट (edukart.com) ही काही ‘मूक’ साइट्सची उदाहरणे आहेत. मागील वर्षी भारत सरकारने ‘स्वयम’ या महत्त्वाकांक्षी देशी ‘मूक’ उपक्रमाची घोषणा केली आहे. याअंतर्गत देशातील विद्यार्थ्यांना आय.आय.टी, आय.आय.एम्.सारख्या नामांकित संस्थांचे अभ्यासक्रम नि:शुल्क शिकता येतील. आय.आय.टी. मुंबईने ‘मूक’अंतर्गत काही अभ्यासक्रम २०१४ सालीच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केले आहेत. सामाजिक व आर्थिक र्निबधामुळे शिक्षणापासून वंचित असणाऱ्यांना इंटरनेटचे गुरुकुल खुणावते आहे. ई-लर्निगमुळे इंटरनेट सुविधा असणाऱ्या प्रत्येकाला शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे.
पुस्तके हे ज्ञान मिळवण्याचे पारंपरिक साधन, पण डिजिटलायझेशनच्या जमान्यात पुस्तकांनीही ई-बुक्सचे स्वरूप घेतले आहे. वाचक परंपरा आणि सांस्कृतिक महत्त्व असलेले आपले मराठी दिवाळी अंकही बदलत्या काळाप्रमाणे ऑनलाइन रिलीज होऊ लागले आहेत. वेबसाइट्स, ब्लॉग्ज, फोरम्स, सोशियल नेटवर्किंग साइट्स हे इंटरनेटवर माहिती मिळण्याची काही प्रमुख ठिकाणे आहेत. इंटरनेटशी प्रथम ओळख बरेचदा सोशल नेटवर्किंग साइट्सच्या निमित्ताने होते. या सोशल नेटवर्किंग साइट्स निव्वळ विरंगुळा न ठरता आपल्याला आवश्यक किंवा आवडीच्या विषयातील माहिती मिळविण्यासाठी व्यासपीठ ठरू शकते. ठाण्यातील विख्यात बालरोगतज्ज्ञ डॉ. वैजयंती इंगावले या आपल्या फेसबुक पेजच्या माध्यमातून बालकांच्या आरोग्यविषयी महत्त्वाचा टिप्स वाचकांना देत असतात. युनाइटेड किंग्डमस्थित
डॉ. अमिता कुलकर्णी-पुरोहित हिमालयातील अतिदुर्गम भागातील ट्रेकिंगचे आपले अनुभव निसर्गप्रेमींसाठी फेसबुकवर शेअर करत असतात. ‘नेट-न्यूट्रॅलिटी’ या काही महिन्यांपूर्वी देशात सर्वत्र गाजलेल्या अभियानासाठी नेटिझन्सना एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण काम सपोर्ट-फोरम्सने केले. ब्लॉग्जच्या माध्यमातून नवोदित लेखक आपले विचार जगासमोर मांडतात. तसेच ब्लॉगिंग करून लाखो रुपये कमावणारेही जाणकार तज्ज्ञही आहेत जे तंत्रज्ञान, ऑटोमोबाइल्स, फॅशन, मोटिव्हेशनसारख्या अनेक विषयांवर आपल्या वाचक-चाहत्यांशी नित्यनेमाने संवाद साधतात.
इंटरनेटमुळे ग्राहकसाक्षरताही वाढू लागली आहे. ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर बाजारात नवीन आलेल्या वस्तूंची माहिती आणि त्यांचे ‘बेस्ट-डील’ म्हणजेच कमीत कमी किंमत समजते. एखादी वस्तू किंवा सेवेसाठी पैसे मोजण्याआधी रिव्ह्य़ू साइट्सवर बरेचजण हजेरी लावतात. लोकांचा बऱ्या-वाईट अनुभवांचा ग्राहक म्हणून आपल्या निर्णय प्रक्रियेवर निश्चित प्रभाव पडतो. इंटरनेट सव्‍‌र्हिसेस
(ई-सव्‍‌र्हिसेस) मुळे अवघड कामे सोपी झाली आहेत. इंटरनेट-बँकिंग हे याचेच उत्तम उदाहरण. पूर्वी बँकांची ‘कामे’ म्हणजे सर्वसामान्यांना दडपण यायचे. आता बँक स्टेट्मेंट, फिक्स-डिपॉझिट, प्रॉव्हिडंट फंड, बिलांचे देयक भरणे, डी.डी., मनी ट्रान्स्फर, मोबाइल बँकिंगसारख्या ऑनलाइन सुविधांची मांदियाळी ग्राहकांसमोर उपलब्ध आहे. कार्यालयासमोरील लांबच लांब रांगा हळूहळू दिसेनाशा होतील. ई-गव्हर्नन्समुळे माहिती व पारदर्शक सेवा यांचा मिलाफ शक्य झालाय.
मोबाइल फोन आणि इंटरनेट आता समीकरण झाले आहे. इंटरनेट किंवा डेटा प्लान नसलेले मोबाइल सापडणे आता दुर्मीळ झाले आहे. इंटरनेट वापरून आपल्याला उपयुक्त अ‍ॅप्लिकेशन्स ऊर्फ अ‍ॅप्स डाऊनलोड करता येतात. दिवसागणिक अ‍ॅप्सची संख्या वाढतेच आहे. बातम्या, हवामान वृत्त, शब्दकोश, प्रवास, आरोग्य, संगीत, क्रीडा, बँकिंग, पंचांग अशा अगणित विषयांशी संबंधित लाखो अ‍ॅप्स बाजारात आहेत. टेक्स्ट मेसेजेसची जागा आता व्हॉॅट्स अ‍ॅप, गुगल हँगआऊटसारख्या मेसेंजर अ‍ॅप्सनी घेतली आहे आणि ग्रुप्सच्या माध्यमातून समविचारी लोकांना एकत्रित येऊन वैचारिक देवाण-घेवाण करता येते.
गुरूंना अवगत ज्ञान पिढय़ान्पिढय़ा वृद्धिंगत होत आलेले असते. तावून-सुलाखून निघालेले असते. गुरू परंपरेतील प्रत्येक पातळीवर आणि कसोटीवर ते खरे उतरलेले असते. आणि म्हणूनच शिष्यास ते नि:शंक आणि नि:संकोचपणे आत्मसात करता येऊ शकते. पण इंटरनेटचा गुरू म्हणून स्वीकार करताना आपण एक सजग आणि जबाबदार शिष्य असणे नितांत गरजेचे आहे. कारण इंटरनेट व त्यावरील माहितीला काही मर्यादा आणि त्रुटी आहेत. म्हणूनच आपण सावध असायला हवे. इंटरनेटवर माहितीचे अक्षरश: भांडार जरी असले तरीही कुठलीही माहिती बरोबर किंवा खरी गृहित धरण्याअगोदर त्या माहितीची ‘ऑथेन्टिसिटी’ व ‘रिलाइयिबिलिटी’ तपासायला हवी. म्हणजेच कुठल्याही माहितीवर विसंबून निर्णय घेण्याअगोदर माहितीची सूत्रे आणि संदर्भ तपासायला हवीत. वर उल्लेख केलेल्या रिव्ह्य़ू साइट्सचेच उदाहरण घ्यायचे झाले तर त्यावर वाचवायास मिळणारी मते, अनुभव व त्यापासून एखाद्या कंपनी/ व्यक्तीला होणारा नफा किंवा तोटा ‘मॅनेज’ करण्यासाठी काही मंडळी कार्यरत असतात. ‘ऑनलाइन रेप्युटेशन मॅनेजमेंट’ हा याचाच एक भाग म्हणता येईल. त्यामुळे अशा रिव्ह्य़ूज विषयी आपण डोळस असायला हवे. ‘अमुक ठिकाणी आग लागली, तमुक ठिकाणी दंगल झाली’ अशा विद्युत वेगाने पसरणाऱ्या माहितीची ‘क्रेडिबिलिटी’ अर्थात विश्वसनीयता सुनिश्चित करणे जरुरी आहे. अफवांमुळे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. इंटरनेटवर मिळणारी माहिती कित्येकदा जुनी असते आणि बराच काळ त्या माहितीत सुधारणा झालेली नसते. एखाद्या लांब पल्ल्य़ाच्या गाडीचे जुने वेळापत्रक पाहून आपण उशिरा रेल्वे स्टेशनवर पोहोचलो तर काय प्रसंग ओढवेल? अशा माहितीचा ‘व्हॅलिडिटी’चा प्रश्न उपस्थित होतो. फुकट ते पौष्टिक म्हणून व्हॉट्स अ‍ॅपवर हल्ली, लोकल ट्रेन, शाळा, कॉलेज, जिम, ऑफिस, लंच टेबल, आडनाव बंधू, गल्ली मित्र इत्यादी ग्रूप्स असतात आणि त्यावर येणाऱ्या शेकडो असंबद्ध मेसेजेसचा पिंगा अविरत चालू असतो. यावर स्व-नियंत्रण नसावे का?
इंटरनेट सेवांसमोर उभे असलेले महत्त्वाचे आव्हान म्हणजे माहितीची सुरक्षा किंवा ‘इन्फर्मेशन सिक्युरिटी’. इंटरनेट-बँकिंगसारख्या सुविधांचा वापर करताना लॉगिन पासवर्डस, प्रोफाइल पासवर्डस, ट्रॅन्झ्ॉक्शन पासवर्डस यासारखी माहिती गोपनीय राहील याची आपण दक्षता घ्यायला हवी. सोशल नेटवर्किंग साइट्सवरील आपले फोटो, फोन नंबरसारखी वैयक्तिक आणि संवेदनशील माहिती आपण संरक्षित ठेवायला हवी. अलीकडेच आइसिस या दहशतवादी संघटनेने काही भारतीय तरुणांना इंटरनेटवरील प्रक्षोभक व्हिडीओज आणि सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून आपल्या जाळ्यात गोवले. असे भरकटणे टाळण्यासाठीच विवेकाने वागण्याची व यातील चांगले-वाईट फरक समजण्याची जबाबदारी आपली आहे. सायबर क्राइम्सना आळा घालण्यात ही सजगता नक्कीच फायदेशीर ठरेल.
गुरूच्या सद्गुणांचे शिष्याने अनुकरण करण्यात गैर नसते. परंतु पुढे जाऊन शिष्याने मिळवलेल्या ज्ञानातून स्वत:ची प्रतिभा दाखवणे व स्वतंत्र ओळख निर्माण करणे अपेक्षित असते. इंटरनेट गुरूला गुरुदक्षिणा द्यायची झाल्यास काय करता येईल बरे? शिष्याचा ‘यूजर ते काँट्रिब्युटर’ हा प्रवास होणे ही उत्तम गुरुदक्षिणा सिद्ध होऊ शकते. ‘काँट्रिब्युटर’ म्हणून जर आपल्याला काही नवीन, वाढीव, दर्जेदार माहितीची मोलाची भर इंटरनेटवर करता येऊ शकते. ‘गुरुपौर्णिमा’ म्हणजे आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हक्काचा दिवस. इंटरनेट जरी सजीव नसले तरीही इतर कुठल्याही तंत्रज्ञानाप्रमाणे इंटरनेटला घडविणाऱ्या, चालविणाऱ्या, नवनवीन संशोधन करणाऱ्या व्यक्तींविषयी आपण मनोमन कृतज्ञता नक्कीच व्यक्त करू शकतो.
संकेत पाटोळे – response.lokprabha@expressindia.com