गुरु-शिष्य ही परंपरा विविध माध्यमातून नेहमीच दिसते. मग तो चित्रपट असो किंवा मालिका, नाटक. साहित्यही यात मागे नाही. गुरु-शिष्य नात्यावर आधारित अशाच काही पुस्तकांचा आढावा.
जन्माला आल्यानंतर अपरिहार्यपणे आणि नैसर्गिकपणे जिव्हाळ्याची कौटुंबिक नाती जशी सहज मिळतात त्याचप्रमाणे आयुष्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात सामाजिक गरजेतून काही नाती, भावबंध जुळतात. मैत्रीचं नातं, गुरु-शिष्य हे नातं त्यापैकी एक. प्रत्येकाच्या आयुष्यातील या नात्यांचे महत्त्व, स्थान हे ज्याला-त्यालाच ठाऊक. या नात्यांची कधी सहज सरमिसळही होते, कधी मित्रमैत्रिणींत एखादा फिलॉसॉफर, मार्गदर्शक भेटतो तर कधी गुरु-शिष्य नात्याला मैत्रीचं स्वरूप येतं.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अर्थातच गुरु-शिष्य नात्याला उजाळा मिळतो. गुरुजनांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हक्काचा दिवस. त्यानिमित्ताने साहित्याच्या क्षेत्रात या नात्याचं वर्णन कसं केलं आहे हे पाहावंसं वाटलं आणि पूर्वी वाचलेल्या आणि कायमच आवडणाऱ्या पुस्तकांची नावं भर्रकन् सुचली. ‘तोत्तोचान’ या छोटय़ाशा जपानी पुस्तकाने संपूर्ण जगावर गारूड केलंय. याच्या लेखिका तेत्सुको कुरोयानागी यांच्या शालेय जीवनातील आठवणींचा हा समृद्ध खजिना. या पुस्तकातून भेटतात सोसाकु कोबायाशी नावाचे प्रेमळ, कल्पक, सृजनशील शिक्षक आणि त्यांनी कष्टाने आणि कल्पकतेने उभारलेली ‘तोमोई’ शाळा. प्रचलित शिक्षणपद्धतीला, संरचनेला पूर्णत: फाटा देत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल, त्यांच्यातील संवेदनशीलता कायम राहील, याची काळजी कोबायाशी यांनी घेतली होती. त्यांची ‘तोमोई’ ही शाळा म्हणजे दगडविटांची इमारत नव्हती तर जुन्या आगगाडीच्या सहा डब्यांचेच वर्ग केले होते. निसर्गाच्या सान्निध्यात ही शाळा भरायची. गणवेश, पुस्तकं, साचेबद्ध अभ्यास यांपेक्षा मुलांमधील कलागुणांना कसा वाव मिळेल याकडे कोबायाशी लक्ष द्यायचे. मग ही लहान मुलं कधी संगीत शिकायची, कधी शिबिराला जायची, नृत्य-नाटके बसवायची, अगदी स्वयंपाकही करायची.
कोबायाशी हे स्वत: निसर्गप्रेमी आणि संगीतप्रेमी होते. अतिशय कष्टप्रद परिस्थितीवर मात करत तोक्यो आणि पॅरिसमधील उत्तम संगीत विद्यालयांतून त्यांनी शिक्षण घेतले होते. हारुजी नाकामुरा यांच्या साई-काई विद्यालयात संगीत शिक्षक म्हणून काम करताना तेथील मुक्त शिक्षणपद्धतीचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि पुढे स्वत:चे ‘तोमोई विद्यालय’ स्थापन केल्यावर हीच मुक्त शिक्षणपद्धती त्यांनी सुरू ठेवली. या शाळेत संगीतशिक्षणाला विशेष महत्त्व होतं. शिवाय ‘युरिदमिक्स’ म्हणजे संगीत कवायत हे त्यातील एक महत्त्वाचं वैशिष्टय़ होतं. स्वित्र्झलडमधील प्रसिद्ध संगीतकार आणि संगीतशिक्षक डेल्क्रोझ यांनी १९०४ मध्ये हा प्रकार शोधून काढला आणि अल्पावधीत युरोप-अमेरिकेत लोकप्रिय झाला. या संगीतप्रकारामुळे शरीर आणि मनाला लयतालाची जाण होते. व्यक्तिमत्त्व लयबद्ध होतं. शरीर आणि आत्म्याची एकतानता साधणं, मुलांची प्रतिभा आणि कल्पनाशक्ती जागृत करणं, हे कोबायाशी यांना अभिप्रेत होतं. मुलांची निसर्गाप्रति असलेली स्वाभाविक ओढ आणि आतला आवाज दाबून टाकणाऱ्या समकालीन शिक्षणपद्धतीचा कोबायाशी यांना तिटकारा होता.
पुढे अमेरिकन विमानांतून झालेल्या बॉम्बहल्ल्यांमुळे ‘तोमोई विद्यालय’ बेचिराख झालं. आपल्या लाडक्या शाळेला जळताना शांतपणे पाहणाऱ्या या धीरोदात्त आणि ध्येयवेडय़ा शिक्षकाचे उद्गार होते, ‘आपली पुढली शाळा कशी असायला हवी रे?’ या पुस्तकातून भेटलेले कोबायाशी हे संवेदनशील, कल्पक, मुलांच्या क्षमतांची जाणीव असणारे, त्यांना फुलू देणारे शिक्षक होते हे प्रकर्षांने जाणवतं. त्यांचे अनेक विद्यार्थी आज जपान आणि जगात अन्यत्र अतिशय यशस्वी झालेत. या पुस्तकाच्या सोप्या परंतु प्रत्ययकारी निवेदनशैलीमुळे तोत्तोचान, कोबायाशी, तोमोई दीर्घकाळ मनात रेंगाळतात.
अशाच एका दुसऱ्या शिक्षकाची गोष्ट म्हणजे ‘टू सर, विथ लव्ह’. ई. आर. ब्रेथवेट हे ते शिक्षक. दुसऱ्या महायुद्घात रॉयल एअरफोर्समध्ये यशस्वी कामगिरी बजावलेल्या त्यांना युद्धानंतर नोकरी मिळवण्यासाठी लंडनमध्ये वणवण भटकावं लागलं. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर असूनही कातडीच्या काळ्या रंगामुळे त्यांना नकार पचवावे लागले. हताश झालेल्या त्यांना शेवटी लंडनमधील एका गलिच्छ, दरिद्री वसाहतीतील शाळेत शिक्षकाची नोकरी पत्करावी लागते आणि मग सुरू होतो त्यांचा विद्यार्थीप्रिय शिक्षक होण्याकडे प्रवास. लंडनमधील या शाळेत विद्यार्थी ज्या सामाजिक, आर्थिक पाश्र्वभूमीतून येतात, ते पाहता त्यांच्याकडून सभ्य, सुसंस्कृत वागण्याची अपेक्षा करणंच मूर्खपणाचं ठरेल. वयाने थोराड, वांड असलेल्या या मुलांना मुळात ‘विद्यार्थी’ का म्हणायचं तेच कळत नाही. ते उर्मट, बेफिकीर, अर्वाच्य बोलणारे, आयुष्यात ध्येय वगैरे काय असतं, याची अजिबात कल्पना नसलेले असतात. त्यात त्यांचीही चूक नसते. या पाश्र्वभूमीवर ब्रेथवेट यांचं कर्तृत्व साहजिकच उठून दिसतं. त्यांना या मुलांना सुजाण, सुसंस्कृत, संवेदनशील माणूस म्हणून घडवायचं असतं.
क्रमिक शिक्षणाची गोडी लावणं, अभ्यासाला असलेल्या पुस्तकांच्या मदतीने परस्परांना, जगाला समजावून घेणं, साहित्य-कला यांचा आस्वाद घ्यायला शिकवणं, त्याविषयी चर्चा करणं, हे सगळं ब्रेथवेट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कसं साध्य केलं, हे वाचणं रोचक ठरतं. ब्रेथवेट यांनी मुलांशी सुसंवाद केला, जाणीवपूर्वक वाढवत नेला. त्यांच्यातील रागाचे रूपांतर प्रेमात, बंडखोरीचे रूपांतर नेतृत्वाच्या दिशेने कसे जाईल, याची काळजी घेतली. मुलांची कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक पाश्र्वभूमी लक्षात घेत, प्रसंगी त्यांच्या आई-वडिलांशी बोलून मुलांमध्ये चांगले बदल घडवले. म्हणूनच आपल्या बिघडलेल्या किंवा बिघडू लागलेल्या मुलांना घडवणाऱ्या या सरांबद्दल पालकांच्या डोळ्यांत कृतज्ञता आणि आपुलकी तरळायची. हे सगळं करताना ‘मी केलं’ हा अहंकार त्यांच्यापाशी नव्हता तर रोज नव्याने येणाऱ्या अनुभवांतून मी शिकलो, हे ते मान्य करतात.
सैन्यदलात असूनही करडय़ा शिस्तीचा बडगा न उगारणारे, वर्णद्वेषाचे मानहानीकारक अनुभव घेऊनही मनात किंचित कटुता न ठेवणारे ब्रेथवेट हे समंजस, संवेदनशील शिक्षक असल्याचं कळतं. ‘‘करेक्शन डझ मच बट एनकरेजमेंट डझ मोअर’ या वाक्याची प्रचीती येते. वेगवेगळे शैक्षणिक प्रयोग करणाऱ्या शिक्षकांनी लिहिलेली अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक सिल्व्हिया वॉर्नर यांचं ‘टीचर.’ न्यूझीलंडमध्ये मावरी समाजाच्या लहान मुलांना शिकवण्यासाठी केलेल्या प्रयोगांचं, त्यातून आलेल्या अनुभवांचं शब्दचित्र म्हणजे हे पुस्तक. त्यांनी या पुस्तकातून आपल्याला ‘ऑरगॅनिक टीचिंग’ ही संकल्पना समजावून सांगितली आहे. मुलांना समजेल, त्यांना परिचित असेल, त्यांच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित अशा संकल्पना वापरून त्यांच्या क्षमता, अंतर्दृष्टी, कलागुण विकसित करणं वॉर्नरबाईंना अपेक्षित आहे. मावरी समाजाच्या लहान मुलांना इंग्रजीसारखी अपरिचित भाषा शिकवण्यासाठी वॉर्नरबाई त्यांना एक शब्द निवडायला सांगायच्या. तो शब्द कार्डपेपरवर लिहून मुलाकडे द्यायच्या. पुढचा संपूर्ण दिवस ते मूळ तो शब्द त्याच्या बोलण्यात, वाचनात, गोष्ट सांगण्यात वापरायचा. एका शब्दाच्या सहसंबंधाने येणारे अन्य शब्दही शिकता यायचे. या प्रयोगामुळे मुलांच्या भाषिक आकलनात भर पडली, शिवाय वाचन-लेखन कौशल्यांचा विकास झाला. साचेबद्घ शिक्षणापलीकडे विचार करू पाहणाऱ्या प्रयोगशील शिक्षकांसाठी हे पुस्तक उत्तम मार्गदर्शक ठरेल. स्कॉटिश शिक्षणतज्ज्ञ ए. एस. नील यांचं ‘समरहिल’ स्कूलसंबंधीचं पुस्तकही विचार करायला लावणारं आहे. विद्यार्थ्यांना कुठल्याही कृत्रिम बंधनात न अडकवता आपणहून शिकण्यास प्रवृत्त करणारं वातावरण निर्माण करावं, त्यात त्यांना कुठलाही विषय शिकण्याची सक्ती नसावी, शिस्तीचा बाऊ नसावा. या शाळेत शिकवणं, हेदेखील शिक्षकांसाठी सर्जनशील आव्हान आहे. शिक्षकाने एक उत्तम माणूस असावं त्याची लोकशाही मूल्यांशी कृतिशील बांधीलकी असावी. वर्गात येणाऱ्या प्रत्येकाला दर्जेदार अध्यापन मिळावं, त्याला गोडी लागावी, याकडे शिक्षकाने लक्ष द्यावं. क्रमिक शिक्षण आणि खेळ यांना शिक्षकाच्या लेखी समान दर्जा, महत्त्व असावं. नील यांनी शिक्षणाविषयी अतिशय मूलभूत असे काळाच्या पुढचे विचार मांडले. इतकेच नव्हे तर १९२१ साली समरहिल स्कूलची स्थापना करून मुक्त, स्वच्छंदी शिक्षणपद्धत जगात लोकप्रिय केली. आजच्या ज्ञानरचनावाद, होम स्कूलिंग यांसारख्या संकल्पनांच्या पाश्र्वभूमीवर ए. एस. नील यांच्या दूरदृष्टी ठळकपणे जाणवते.
आयुष्याच्या अंतिम टप्प्यावर असलेले एक शिक्षक, सोळा वर्षांनी भेटलेला त्यांचा विद्यार्थी आणि आठवडय़ातील दर मंगळवारी रंगत जाणारी अनौपचारिक व्याख्यानं, या एवढय़ा वर्णनावरूनच हे पुस्तक ‘टय़ूसडेज् विथ मॉरी’ असणार हे सुजाण वाचकांच्या लक्षात येईलच.
मॉरी श्वाट्र्झ हे प्राध्यापक Amyotrophic Lateral Sclerosis या दुर्धर आजाराने अनेक वर्षे अंथरुणाला खिळलेले आहेत. मिच अल्बम हा त्यांचा विद्यार्थी त्यांना सोळा वर्षांनी भेटतो. अंथरुणाला खिळलेले असले तरी मॉरीसरांची बुद्धी तरल आणि उत्साह दांडगा होता. मृत्यू आता कधीही गळामिठी मारेल त्याआधी आयुष्याचा जो काही अर्थ लागला तो जगाला उलगडून सांगावा, जाण्याआधी जे शहाणपण आलंय, ते सगळ्यांमध्ये लुटावं, असं मॉरी यांना वाटतं आणि त्यावेळी श्रोत्याच्या भूमिकेत असतो मिच आणि मग दर मंगळवारी हा क्लास भरतो. सलग चौदा मंगळवार सुरू असलेल्या या वाग्यज्ञातून जीवनाचे अंतरंग उलगडत जातात. जगण्याच्या प्रवासात जे उलगडलं, ते मॉरीसर सांगत जातात. समाजशास्त्राचे प्राध्यापक असलेले मॉरीसर संस्कृती, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, प्रेमाची आवश्यकता आणि प्रेमहीन आयुष्यातील रखरखीतपणा, मृत्यूची अपरिहार्यता, आयुष्याच्या एका टप्प्यावर येणारी अलिप्तता, प्रसारमाध्यमं आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे होणारे समाजावरील बरे-वाईट परिणाम यांसारख्या अनेक विषयांवर भरभरून आणि अधिकारवाणीने बोलतात. तत्त्वज्ञानाची बैठक असलेलं हे पुस्तक ओघवत्या शैलीमुळे आपलंसं होतं. मॉरीसरांची ही अत्यंत मौलिक व्याख्यानं आधी ध्वनिमुद्रित करून नंतर पुस्तकरूपाने जगासमोर मांडणाऱ्या मिच अल्बम यांनी मॉरीसरांना सर्वोत्तम गुरुदक्षिणा दिली आहे. गुरु-शिष्यातील हे तरल आणि वैचारिक बंध आपल्याला वाचक म्हणून समृद्ध करतात.
या पुस्तकांतून भेटलेले सगळे शिक्षक हे स्वत: चौकटीबाहेरचा विचार करणारे आणि विद्यार्थ्यांना तसा विचार करू देणारे आहेत. विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्याची त्यांना आस आहे. त्यांची प्रेम, स्वातंत्र्य, परस्परविश्वास या मूल्यांवर निष्ठा आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा सदैव विचार आणि त्याबाबतीतील कृतिशीलता आहे. अज्ञानरूपी अंधकार दूर करून प्रकाशरूपी ज्ञानाकडे नेतो तो ‘गुरु’, ही व्याख्या त्यांना लागू होते.
ओंकार पिंपळे – response.lokprabha@expressindia.com
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 31, 2015 1:15 am