04 March 2021

News Flash

मन नावाचा गुरू

नवनवीन प्रयोग करणे ही युवा पिढीची खासियत. इतरांनी सल्ले दिले तरी स्वत:ला काय हवं याचा शोध घेणारी तरुणाई त्यांच्या ‘आतला आवाज’रुपी गुरुचं जास्त ऐकते.

| July 31, 2015 01:14 am

lp06नवनवीन प्रयोग करणे ही युवा पिढीची खासियत. इतरांनी सल्ले दिले तरी स्वत:ला काय हवं याचा शोध घेणारी तरुणाई त्यांच्या ‘आतला आवाज’रुपी गुरुचं जास्त ऐकते.

समोर ही दरी.. बाजूने धबधबा कोसळतोय. त्याचा तो धोस्स. करत घुमणारा आवाज पाण्यात किती ताकद असते याची जाणीव करून देणारा.. खाली पाहिलं तर फक्त शुभ्र फेसाळ प्रवाह. त्या सरळसोट कडय़ावरूनच रॅपलिंग करत खाली उतरायचं होतं.. आपापलं. एकटय़ाने. इन्स्ट्रक्टरच्या सगळ्या सूचना देऊन झाल्या. त्या सगळ्या कानावरून गेल्या . एवढंच काय ते जाणवलं. पण खरी आत जाणीव होत होती ती वेढत जाणाऱ्या भीतीची आणि फुफाटत सांडणाऱ्या पाण्याची. डगमगत, चाचपत उतरायला सुरुवात केली खरी. पण एका क्षणी पाय घसरला. तोंडावर आपटलेच जवळजवळ.. आणि अशा टप्प्यावर होते की परतीचा मार्ग नव्हता. त्याक्षणी लख्ख जाणवलं. कोणीही नाहीये आत्ता तुझ्याबरोबर. तुझी तू.. पडलीस तरी आणि सावरलीस तरी. सगळं लक्ष आत खोल एकवटलं गेलं.. मनातल्या भीतीला पार बाजूला सारत कोणीतरी आतून आधार देतंय हे जाणवलं आणि हिय्या करून तो अवघड टप्पा पार केला.
या गोष्टीला आता काळ लोटला तरी ती ताजी असल्यासारखीच वाटते. कारण जाणवत राहतं, कोण होतं तेव्हा बरोबर? आपणच आपले. आणि आपला आतला आवाज.. आपला पहिला गुरू..!!! वाटाडय़ा, तत्त्वचिंतक आणि जिवाभावाचा पहिलावहिला मित्र..!!
कळायला लागल्यापासून, ‘मी’पणाची जाणीव व्हायला लागल्यापासून हा आतला आवाज आपली सोबत करतोय हे आपल्याला अस्पष्टसं कळत असतं.. आई, बाबा, शिक्षक, मित्र या सगळ्यांकडून शिकता शिकता या आतल्या गुरूचं अस्तित्व मोठं होत जाऊ तसं प्रकर्षांने जाणवायला लागतं.. सुरुवातीला आपण सगळेच अगदी कच्चं मडकं असतो म्हणा ना. मग बोलणी खाऊन खाऊन, ढीगभर सल्ले ऐकून, आपल्या पालकांनी पाहिलेल्या पावसाळ्याच्या गोष्टी ऐकून आपण इथवर येतो. पण त्यादरम्यानही कोणाला तरी मनापासून गुरू स्वीकारणं ही प्रोसेस सुरू झालेली असते. मग आपण गणितात कितीही पक्के असलो तरी आपलं भाषेशी सगळ्यात जास्त जमतं आणि इनडोअर गेम्सपेक्षा ट्रेकिंगला आणि भटकायला आपल्याला खूप आवडतंय. अशी खास दिलकी बात हा आतला गुरूच सगळ्यात आधी ओळखतो. तेव्हापासूनच नात्याची ही वीण अधिकाधिक घट्ट व्हायला लागते.
पटेल तेच स्वीकारणारी आणि स्वत:च्या आयुष्यातल्या माणसांबद्दल सडेतोड निश्चित मतं असणारी, अगदी कोणाकडून काय शिकायचं किंवा कोणाचं म्हणणं किती मनावर घ्यायचं हे स्वत: ठरवणारी आमची पिढी निर्णय घेताना या गुरूचं मत मात्र आवर्जून घेताना दिसते. आणि म्हणूनच ‘आय फॉलो मायसेल्फ’ हा अ‍ॅटिटय़ूड आत्ताच्या पिढीमध्ये दिसतो.
‘‘मला माझे केस थोडे विस्कटलेलेच आवडतात. कसा छान मेसी लुक येतो त्याला, काय हरकत आहे फ्रेश, बोल्ड रंग वापरायला. इट्स माय स्टाइल. कोणी सांगितलं दहावी, बारावीत एकदम चांगले मार्कस् मिळाले म्हणजे इंजिनीअर किंवा डॉक्टरच व्हायला हवं. मला मानसशास्त्रात जास्त रस आहे त्यापेक्षा. मी सरकारी नोकरीत लागण्यापेक्षा माझा व्यवसाय सुरू करेन. मग त्यासाठी थोडं थांबावं लागलं तरी चालेल किंवा अगदी पुढे जाऊन पाहिलं तर. मला नाही इतक्यात लग्न करायचं. आलेला मुलगा कितीही चांगला असला तरीही. नाही माझ्या मनाची आत्ता तयारी.’’ इथपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर ही जनरेशन नेक्स्ट सजग असते ती त्यांच्या सुस्पष्ट विचारांमुळेच. आणि या विचारापर्यंत येऊन पोहोचायला मदत करतो हा आतला आवाज.
आजच्या पिढीचं फेसबुक, हाईक, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटीमध्ये रमणं हा टीकेचा विषय ठरतं खरं. पण, तीच पिढी जेव्हा स्वत:चे निर्णय स्वत: घेताना, बाकी कशाचाही कितीही दबाव आला तरी या आतल्या गुरूचाच कौल घेते तेव्हा त्यांच्यातलं गुरू-शिष्याचं नातं अधिकाधिक गहिरं होत असतं. ‘‘या हल्लीच्या काटर्य़ाना शिंग फुटलीत अगदी. कोणाचं म्हणून ऐकायला नको.’’ ही बोलणी या पिढीला काही नवीन नाहीत. पण तरीही स्वत: अनुभवणं, त्यावर विचार करणं, स्वत:च्या चुकांमधून शिकणं आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे या आतल्या गुरूला मनापासून प्रतिसाद देणं हे या पिढीला सगळ्यांत जास्त भावतं. ‘कोणी म्हणतंय म्हणून करणं’ ते ‘मला योग्य वाटतंय म्हणून करणं’ इथपर्यंतचा हा सगळा प्रवास आहे. या सगळ्या प्रवासात स्वत:चा स्वत:शी साधला जाणारा संवाद आपल्याला आपल्या आतल्या गुरूपर्यंत घेऊन जातो. आपल्याला तो सगळ्यांत जास्त जवळचाही वाटतो. कारण आपण एखादी गोष्ट ‘का’ करावी याचं लॉजिकल उत्तर त्याच्याकडे असतं.
आपल्या आजूबाजूला कधी माणसं असतात तर कधी नसतात. कधी कधी विचारायला प्रत्येक जण असूनही खरं उत्तर काही सापडत नाही. ‘ग्रॅज्युएशननंतर मास्टर्स, एमबीए की आणखीन काही, ‘त्या’ला किंवा ‘ती’ला हो म्हणू की नको. नक्की जमेल का आमचं? स्वीकारावा का हा शिफ्ट डय़ूटीचा जॉब?’ अशा अनेक प्रश्नांची उत्तरं द्यायला, त्यावर सल्ले द्यायला सगळे हजर असतात. पण आपल्याला नक्की काय झेपेल याचं खरंखुरं उत्तर मात्र हा गुरूच देतो. ‘‘मी कोणाला तरी माझा गुरू मानण्यापेक्षा मी माझं चालणं पसंत करेन. माझ्या अनुभवातून शिकेन. धडपडेन, आपटेन, पण माझं मला शिकू दे. कारण तोच अनुभव माझ्या कायमचा लक्षात राहील.’’ या विचारातूनच आपण आपल्या मनातल्या आदर्श प्रतिमेकडे प्रवास करायला लागतो.
कोणताही नवीन निर्णय घेताना, नवी गोष्ट ठरवताना आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काही करताना आपल्याला जाणवतं की, नाही हे शक्य नाही बाबा आपल्याच्याने. पाण्याची खूप भीती वाटते. स्विमिंग काय कपाळ करणार. डान्स वगैरे नाही जमत. कोणी पाहून हसलं तर? या आणि अशा अनेक गोष्टी ‘अशक्य’च्या कॅटेगरीत टाकून मोकळे होतो आपण. पण, दुसऱ्या बाजूला असं कोणीतरी असतं ज्याला माहीत असतं, हे कठीण आहे पण, तरीही करणं गरजेचं आहे. तो असतो आपल्या आतला गुरू..! कधी कधी भटकत भटकत वेगळ्याच प्रांतात येऊन पोहोचतो आपण. सगळी परिस्थितीच अनोळखी. कधीही न गेलेल्या शहरात रस्ते तर दिसतायंत. पण, ते कुठून कुठे जातात हे माहीत नसल्यावर जसं होईल तसं काहीसं. इकडे मागे जायची वाट नसते आणि पुढे जाण्याची अपरिहार्यताही. आणि रात्रंदिवस सतत कोणीतरी सांगायला असतं असंही नाही. अशावेळी ही परिस्थिती आपल्या आतला हा गुरूच हाताळू शकतो. अगदी समर्थपणे. कारण आपण काय करू शकतो आणि तेव्हा काय करायला हवं हे त्याच्याइतकं अचूक दुसरं कोणीच सांगू शकत नाही.
या गुरूचं शिष्य व्हायचं तर अट एकच. त्याच्याशी मनापासून कनेक्ट होणं. पूर्ण विश्वासाने त्याला सामोरं जाणं. हा असा स्वत:चा स्वत:शी संवाद या गुरूशी भेट घडवून देतो. याचं हे गमक आत्ताच्या आपल्या पिढीने बरोब्बर ओळखलंय आणि म्हणूनच वेळ पडली तर कोणी बरोबर येईल याची वाट न पाहता ही पिढी स्वत:च पावलं उचलू शकते. मात्र त्याच्या कसोटीला उतरणंही तितकंच कठीण असतं. एक गुरू म्हणून समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षा पूर्ण करण्यापेक्षाही या आतल्या गुरूच्या अपेक्षेला पात्र ठरणं ही खरी परीक्षा असते. कारण इकडे परीक्षा घेणाराही तोच असतो आणि देणाराही. त्यामुळे नो चीटिंग..!
रोजच्या रोज इतक्या गोष्टी ऐकतो आपण. काही घेतो, काही सोडून देतो. मुळात तेव्हाही काय घ्यायचं आणि काय सोडायचं याचा निर्णय घेणाराही तोच असतो. त्याच्याशी इतकं जास्त कनेक्टेड असल्यामुळेच तर आपण स्वत:च्या निर्णयांची जबाबदारी घ्यायलाही तयार असतो. एकटं राहणं असू दे, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणं असू दे किंवा मग मित्रांबरोबर खोली शेअर करणं असू दे. या गोष्टींबरोबर येणारे फायदे-तोटेही ही पिढी सहजपणे स्वीकारते याचं कारणही तेच. या आतल्या आवाजाशी असणारं गुरू-शिष्याचं घट्ट नातंच या पिढीचे विचार आणखीन स्वच्छ पारदर्शी करायला मदत करतं. आपलं तेच खरं करतात अशी टीका झेलणारी ही पिढी या गुरूमुळेच तर इतकी ठाम राहू शकते. आयुष्यात आपण अनेकदा माती खातो, चुकतो. काही वेळा यश कमी, अपयश जास्त असंही होतं. “इतक्या वेळा स्पर्धा परीक्षा दिल्या. पण यावेळीसुद्धा कट ऑफ गाठायला अवघे दोन मार्क्‍स कमीच पडले. त्या प्रश्नावर तेवढा वेळ घालवायला नको होता मी. आता पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. आता नाही देणार मी परीक्षा अजिबात.’’ एवढय़ापर्यंत विचारांची गाडी येऊन ठेपते. मग काय, असा विचार आलाय म्हटल्यावर पुढे सगळंच ‘दि एण्ड’ अशा वेळी कोणी कितीही समजावलं तरी डोक्यातला नन्नाचा पाढा काही थांबत नाही. पण, एक वेळ अशी येते की ते सगळं तिकडेच थबकतं. ‘‘पुरे आता. किती रडशील. रडायचाही कंटाळा आला आता. अगदीच पिचवर न जाण्यापेक्षा जमेल तसं खेळून जाऊया ना. कोण जाणे अगदी सेंच्युरी नाही पण, हाफ सेंच्युरीपर्यंत तरी पोहोचू.’’ असा आत्मविश्वस हाच गुरू देतो.
कधी कधी सैरभैर व्हायला होतं. सगळ्यांची बोलणी, सल्ले असे मनात पिंगा घालायला लागतात. हे की ते. नको, नको. हेच.. असं म्हणत आपण त्या गोंधळाच्या जाळ्यात आणखीन फसायला लागतो. पण मग थोडा वेळ आतल्या आत शांतपणे कनेक्ट होतो. तेव्हा खोलवरून सरसरत एक आवाज साद घालत वर येतो. मला नक्की हेच हवंय असं सांगणारा. तो असतो या गुरूचा आवाज. जेव्हा आपण छापा-काटा करतो. तेव्हा नाणं उंच उडाल्यावर मनात पटकन येणारं उत्तर देणारा हाही तोच असतो. कारण आपल्याला काय हवंय, काय करणं गरजेचं आहे हे त्याच्याइतकं अचूक कोणाला माहीत असणार. तो आपल्याला रडू देतो, मोकळं व्हायला वेळ देतो. आपल्याबद्दल जजमेण्टल नसतो तो. म्हणूनच आपण त्याच्याबरोबर इतकं घट्ट जुळवून घेऊ शकतो. हा एकच गुरू असा आहे ज्याची गुरूदक्षिणा म्हणजे आपली आंतरिक वाढ. ‘एक शून्य ते मी’पर्यंतच्या या आपल्या प्रवासात पावलोपावली सोबत करणारा असा हा गुरू. तसा तो प्रत्येक वयाच्या व्यक्तीचा असतो. पण त्यातल्या त्यात या जनरेशन नेक्स्टचा जरा अधिकच. आई, बाबा, मित्र, आप्तेष्ट या सगळ्यांच्याही आधी येणारा. शब्दश: खऱ्या अर्थाने आपली कायम साथ देणारा. आपली सगळी सिक्रेट्स, केलेले उपद्व्याप, बलस्थानं आणि मर्मस्थानंही माहीत असणारा. त्यानुसार आपलं बोट धरून योग्य मार्गावर चालवणारा हा गुरू..! त्याचं आपल्या आयुष्यातलं स्थान हे जितकं अपरिहार्य, तितकंच गरजेचंही आहे. आणि म्हणूनच या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्याची जाणीव आपली आपल्यालाच करून देण्यासाठी हे सारं..!
रश्मी जोशी – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2015 1:14 am

Web Title: guru paurnima special 25
Next Stories
1 लेक झाली गुरु!
2 दत्तात्रेयांचे चोवीस गुरू
3 रसिकश्रीमंत चित्रकार!
Just Now!
X