lp06पन्नास वर्षांहून अधिक काळ आपल्या कुंचल्याने लोकांना मोहून टाकणाऱ्या सत्तार सादी शेख ऊर्फ एस. एस. शेख यांचे नुकतेच निधन झाले. या आपल्या गुरुवर्याना ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांनी वाहिलेली आदरांजली

कश्मिर के घाटी का एक चित्र बनाया था। उसमें कुछ भेड बकरीयाँ चरती हुई दिखाई थी। जो कोई देखता था, उस चित्र की बहुत तारीफ करता था। एक दिन मेरा एक छोटा भतीजा घर आया था, उसने वह चित्र देखा और बोला की, ‘अंकल, यह चित्र पहाडी देहात का है ना?’ तो मैंने हाँ कर दी और बोला ‘बेटा, यह कश्मिर का सीन है’ तो फिर छोटे बच्चेने कहा की, ‘अंकल, तो ये चित्र एकदम गलत है’ मैं चौका गया और पुछा की ‘कैसे?’
‘अंकलजी, ये जो भेड बकरी है, यह कश्मिर की नहीं हो सकती। उनके बाल बहुत लम्बे होते है। कल ही हमारी स्कूल के टीचरने सिखाया की ठंडे पहाडी प्रदेश की भेडियोंकी खाल के बाल बहुत लम्बे होते है।’ मैंने उस बच्चे lp05की मान ली। मैंने तो सिर्फ बकरी के कुछ रेफरन्स इकठ्ठा कर के यह चित्र बनाया था। जो की पहाडी प्रदेश की नहीं थे..
इसलिए वासुदेव, आपल्याला कुठून कधी काय शिकवण मिळेल, याचा काही नेम नाही. बस आपण सतत विद्यार्थीदशेत असलं पाहिजे. मला जिथून तिथून शिकता येईल ते मला गुरूसारखेच वाटतात. मग ते पुस्तक असो वा व्यक्ती, तिथे छोटा-मोठा ही प्रमाणे गळून पडायला हवीत.’
शेखसाहेब बोलत होते आणि मी ऐकत होतो. शेखसाहेबांच्या संगतीत जे जे काही शिकायला मिळाले, ती माझी पुंजी मला आयुष्यभर पुरणारी आहे. सत्तार सादी शेख ऊर्फ एस. एस. शेख आपल्या जुन्या आठवणी सांगायचे. सर जेजे कला महाविद्यालयातून प्रथम श्रेणी, प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले एस. एस. शेखसाहेब हे प्रा. प्रल्हाद अनंत धोंड सरांचे आवडते विद्यार्थी. निसर्गचित्रण हा त्यांचा आवडता विषय. माझ्या ‘कृष्ण’ या चित्रमालिका प्रदर्शनाचे उद्घाटन शेखसाहेबांनी करावे अशी मी त्यांना विनंती केली होती. त्याप्रमाणे शेखसाहेब सपरिवार नेहरू सेंटरच्या आर्ट गॅलरीत वेळेवर उपस्थित झाले आणि संयोग असा की त्या वेळी प्रा. धोंड सरसुद्धा आपल्या जावयास बरोबर घेऊन गॅलरीत हजर. या दुहेरी लाभाने मी खूप खूश झालो. पण, शेखसाहेब मला हळूच म्हणाले की, ‘अरे माझे गुरू समोर असताना मी नव्हे तर धोंड सरांनीच दीपप्रज्वलन करावे. ते माझे गुरुजी आहेत.’ काही वेळ धोंड सरांचे आणि शेखसाहेबांचे ‘पहिले आप-पहिले आप’ चालले होते. गुरू-शिष्यांच्या नम्रता-विनम्रतेचा प्रेमाविष्कार मी तिथे न्याहाळत उभा होतो.
गुरुपौर्णिमेच्या मंगल दिवशी माझ्या गुरुतुल्य मार्गदर्शक आणि शिक्षकांच्या अनुक्रमेत शेखसाहेबांची ही आठवण आली. ज्यांचे कला काम चांगले आहे अशा चित्रकारांवर आणि नवोदित कलाकारांवर त्यांचे विशेष प्रेम असे. माझ्यासारख्या अनेक चित्रकारांना त्यांनी व्यावसायिक आधार दिला आणि वेळोवेळी प्रोत्साहनही दिले. मी विशेष एखादे मोठे चित्र रंगविले तर शेखसाहेब अंधेरीहून माझ्या बोरिवलीच्या घरी अगत्याने येऊन मला मार्गदर्शन करीत.
जवळ पास पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांनी आपल्या कुंचल्याच्या किमयेने लोकांना मोहून टाकले. कॅलेंडरच्या क्षेत्रात भारतीय, ग्रामीण जीवन दर्शवणारी त्यांची निसर्गचित्रे आजही अनेकांच्या संग्रहात आणि स्मरणात ताजी आहेत. गेली दहा वर्षे अर्धागवायूच्या पक्षाघाताने त्यांचे काम थांबल्याने कॅलेंडरच्या जगतात त्यांच्या निसर्गचित्रांचा ओघ आटला होता. दिनांक २ जुलै २०१५ रोजी सकाळी शेखसाहेबांनी दीर्घ काळाच्या आजारातून या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाची छोटी बातमीदेखील फारशी कुठल्या वृत्तप्रसारणात आली नाही. परंतु त्यांनी वास्तववादी निसर्गचित्रांच्या क्षेत्रात दिलेले योगदान अनन्यसाधारण होते हे इतिहासाला मान्य करावे लागेल. अत्यंत प्रेमळ, काहीसे लाजाळू आणि चांगल्या कलाकारांबद्दल निस्सीम आदर हा त्यांचा स्थायी स्वभाव होता. ते स्वत: कुटुंबवत्सल होतेच शिवाय त्यांचा मित्रपरिवारदेखील मोठा होता. स्वत:च्या शैलीत विद्यार्थ्यांला बांधून न ठेवता त्याच्यातील स्वयंभू कलाशैलीला त्यांनी प्रोत्साहन दिले. अनेक मान्यवर चित्रकारांशी त्यांची मैत्री होती; तसेच त्यांच्या चित्रांचा संग्रहदेखील होता. त्यांचा कलापुस्तकांचा संग्रह असा की त्यांच्या घरातील एका खोलीच्या भिंती पुस्तकांच्या कपाटाने झाकलेल्या होत्या.
शाळेत असल्यापासून चित्रकलेची आवड असलेल्या मुलाने चित्रकलेच्या नादात पडू नये अशी त्यांच्या वडिलांची इच्छा. परंतु त्यांच्या बहिणीने त्यांना प्रोत्साहित केले. आर्ट स्कूलमध्ये शिकतानाच त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते. सर जेजे स्कूल ऑफ आर्टचे सुवर्णपदक, डॉली कर्सटनीचे द्वितीय पारितोषिक, बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, बेस्ट कॅलेंडर पेंटिंगचे नॅशनल अ‍ॅवॉर्ड, रवि परांजपे फाउंडेशनतर्फे ‘कृ. रा. परांजपे गुणिजन कला पुरस्कार’ आणि २०१२ साली नाशिक कला निकेतनचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ त्यांना बहाल करण्यात आला होता.
‘अरे, ये तुम्हारी बैलगाडीवाली पेंटिग कौन खरीदेगा? कुछ भगवान का चित्र बनाओ. लक्ष्मी, गणेश, शंकर भगवान का चित्र बनाओगे तो हम आपका चित्र कॅलेंडर में छपवायेंगे,’ असा सल्ला त्यांना कॅलेंडर बनवणाऱ्या एजन्सीने दिला होता. तत्कालीन आर्ट स्कूलमधून बाहेर पडणाऱ्या चित्रकारांप्रमाणे शेखसाहेबांनासुद्धा उपजीविकेसाठी वणवण फिरावे लागले होते. त्या वेळी अनेक मान्यवर कलावंतांचा या कॅलेंडर व्यवसायावर जम बसलेला असायचा. देवादिकांची चित्रे कॅलेंडर म्हणून घरोघर लोकप्रिय होती. अशा वेळी ग्रामीण निसर्गचित्रे कॅलेंडरच्या क्षेत्रात रुजवणारे एस. एस. शेख हे पहिले चित्रकार होते. ती ही नामवंत कंपन्यांसाठी काढलेली त्यांची चित्रे विशेष गाजली. उदा. शिपिंग कॉपरेरेशन ऑफ इंडिया, ब्राइट प्लास्टिक, मफतलाल, माइको, स्टेट बँक ऑफ इंडिया, इत्यादी.
याशिवाय त्यांची तैलरंग आणि जलरंगातील अनेक निसर्गचित्रे देश-विदेशी कॉपरेरेट कंपन्यांत हॉटेल्स आणि खासगी संग्रहात आहेत.
संपूर्ण भारतातील पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण पसरलेल्या ग्रामीण जीवनाचे ऐतिहासिक आणि अर्वाचीन निसर्गचित्रण त्यांच्या कुंचल्यातून साकार झाले. छायाप्रकाश, सौम्य रंगछटा आणि ऊनपावसाचा खेळ त्यांच्या चित्रांतून दिसे.
शेखसाहेबांची चित्रे श्रीमंतांच्या दिवाणखान्यात होती, सामान्य माणसाच्या भिंतीवरील कॅलेंडरवर होती, तसेच मुलांच्या चॉकोलेट बिस्किटांच्या खोक्यावरही होती. हा कलाकाराच्या सृजनतेचा कमीपणा नव्हता तर ती असीम लोकप्रियता होती.
अशा कलाकाराचे काम गत काही वर्षांपूर्वीच थांबले हा नियतीचा खेळ. परंतु त्यांनी रंगवलेल्या हजारो चित्रांची मोहिनी आजही सर्वसामान्य रसिकाच्या मनात चिरंतन आहे.
कलेची कदर करणारा रसिक हीच कलाकाराची खरी श्रीमंती असते. ते समाधान एस. एस. शेख सरांना मिळाले होते. तरीदेखील आयुष्यात स्वत:च्या चित्रांचे प्रदर्शन भरवता आले नाही ही खंत ते साश्रुनयनांनी नवोदित कलाकारांसमोर बोलून दाखवत.
त्यांच्या स्मृतीला ही भावपूर्ण शब्दश्रद्धांजली.
वासुदेव कामत – response.lokprabha@expressindia.com