lp06गुरूमुळे शिष्य घडत असतो आणि शिष्यामुळे गुरू घडत असतो या विधानाची प्रचीती देणाऱ्या एका गुरू-शिष्य जोडीविषयी-
गुरू-शिष्य परंपरेबद्दल, गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याबद्दल बोलताना मुख्यत्वे गुरूची महती, गुरूचे श्रेष्ठत्व, शिष्याच्या आयुष्यातील गुरूचे अढळ स्थान- याबद्दलच बोलेले जाते. परंतु या गुरू-शिष्य परंपरेचा मोठा आधारस्तंभ आहे तो म्हणजे ‘गुरुप्रती आदर ठेवणारे, त्यांनी दिलेल्या शिक्षणाचा योग्य वापर आणि प्रसार करणारे त्यांचे शिष्यगण!!’ गुरू-शिष्य हे दुहेरी नाते आहे; जसा शिष्य गुरूंच्या मार्गदर्शनाने मोठा होतो तसाच गुरूदेखील शिष्याच्या प्रेमाने, आदराने यशस्वी आणि श्रेष्ठ ठरतो.. कलेच्या क्षेत्रात तर शिष्याला चांगला, योग्य गुरू आणि गुरूला निष्ठावान शिष्य मिळणं अतिशय आवश्यक असतं. कथकच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले, जेष्ठ आणि श्रेष्ठ गुरुस्थानी असलेले, कथकच्या क्षेत्रात दैवी देणगी मिळालेले जगत्गुरू पं. बिरजू महाराज. जगभरात हजारो, लाखो विद्यार्थ्यांना कथकचे शिक्षण देऊन कथकचा जगभर प्रसार त्यांनी केला आणि कथकला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले! त्यांचे दर्शन व्हावे, त्यांचे नृत्य प्रत्यक्ष पाहता यावे, त्यांच्याकडून शिकायला मिळावे ही प्रत्येक नृत्य शिकणाऱ्याच्या मनात इच्छा असते. पण प्रत्यक्षात मात्र सर्वाचीच इच्छा पूर्ण होऊ शकत नाही.. ज्या शिष्याला अशा थोर गुरूंचा ‘सर्वप्रथम गंडाबंध शागीर्द’ होण्याचे भाग्य प्राप्त झाले असे पद्मश्री प्रताप पवार स्वत:ला नक्कीच भाग्यवान समजतात! आज पं. बिरजू महाराज कथकमधील सर्वोच्च गुरुस्थानी पोहोचले आहेत ह्यत नक्कीच त्यांच्या असंख्य शिष्यांचा मोलाचा वाटा आहे, आणि ह्यची सुरुवात केली ती – पद्मश्री प्रताप पवार यांनी!
प्रताप पवार यांचा २० मे १९४२ मध्ये मध्य प्रदेशातील ‘धार’ या गावात सैनिकी घरात जन्म झाला. घरात केवळ घोडा, तलवार, दारू, मांसाहार असे वातावरण असताना प्रताप पवारांनी नृत्य शिकण्याचा धाडसी निर्णय घेतला व इंदौरमध्ये भरतनाटय़म्चे शिक्षण घेतले. १९५८ मध्ये दिल्ली येथील ‘भारती कला केंद्र’मध्ये ‘रामलीला’ नृत्यनाटय़ाच्या निमित्ताने ते गेले असताना त्यांची पं. बिरजू महाराजांशी ओळख झाली. तोपर्यंत कथक म्हणजे कोठय़ावर केले जाणारे नृत्य अशी त्यांची समजूत करून देण्यात आली होती, परंतु दिल्लीमध्ये त्यांनी बिरजू महाराजांचं मनमोहक नृत्य पाहिलं आणि त्यांचा गैरसमज दूर झाला.. बिरजू महाराज व प्रताप पवार समवयस्क असल्याने त्यांची छान मैत्रीदेखील झाली. आणि प्रताप पवारांना पं. बिरजू महाराजांच्या नृत्याने भुरळ घातली. कारण ते पाहूनच त्यांना कथक शिकायची इच्छा निर्माण झाली व बिरजू महाराजांकडे ते कथकची मुळाक्षरे गिरवू लागले. तेव्हा महाराजदेखील अशा एका शिष्याच्या शोधामध्ये होते जो त्यांनी शिकवलेल्या गोष्टीत पारंगत होऊन चांगला कलाकार बनेल; आणि पवारांच्या रूपात त्यांना असा तयारीचा शिष्य मिळाला. ‘दिल्लीमध्ये असताना भारत सरकारच्या सांस्कृतिक व कला मंत्रालयातर्फे घेण्यात येणाऱ्या कलाशिक्षणाच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याबाबत मला सुचवले गेले. तेव्हा मला केवळ तीन तुकडे व तीन तिहाई इतकंच येत होतं, परंतु त्यावर माझी ह्य शिष्यवृत्तीसाठी निवड झाली. तेव्हा मला प्रचंड आनंद झाला व गुरू म्हणून पं. बिरजू महाराजांची मी निवड केली. परंतु तेव्हा शंभूमहाराज लखनौ घराण्याचे सर्वात मोठे गुरू म्हणून प्रसिद्ध होते, त्यामुळे मी त्यांच्याकडे शिकायला जावे असे मंत्रालयाने सुचविले, तसेच तेव्हा बिरजू महाराज वयाने व अनुभवाने लहान असल्याने त्यांना शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची अनुमती मंत्रालयाने दिली नव्हती. मात्र मला बिरजू महाराजांकडेच शिकायचे होते, कारण त्यांनी शिकवलेल्या तीन तोडय़ांवरच मला शिष्यवृत्ती मिळाली होती; त्यामुळे त्यांना सोडून दुसऱ्या कुणाहीकडे शिकणे मला मान्य नव्हते. अखेरीस स्वर्गीय मोहनराव कल्याणपूरकर यांनी मंत्रालयामध्ये विनंती करून मला पं. बिरजू महाराजांकडे शिकायची अनुमती मिळवून दिली. ८ फेब्रुवारी १९५९, गुरुवारी बिरजू महाराजांनी मला गंडा बांधला, विविध विद्वान कलाकारांच्या उपस्थितीत हा गंडाबंधनाचा पवित्र सोहळा पार पडला व मी पं. बिरजू महाराजांचा पहिला गंडाबंध शागीर्द झालो. प्रताप पवार आजही ह्य सोहळ्याबद्दल भरभरून बोलतात. गेली ५६ वर्षे ते नित्यनेमाने ह्य दिवशी व गुरुपौर्णिमेला गुरुपूजा करतात, गुरूंचे आशीर्वाद घेण्यासाठी प्रत्यक्ष भेट किंवा फोन करतात, त्यांना भेटवस्तू देतात आणि ह्य सुवर्णदिवसाचं स्मरण करतात!
पं. बिरजू महाराजांनी लाखो विद्यार्थ्यांना शिकवलं, परंतु आतापर्यंत त्यांचे गंडाबंध शागीर्द होण्याचं भाग्य मात्र केवळ सहा शिष्यांना लाभलं आहे. आज जगभरात महाराजजींच्या विद्यार्थिनी अशी ख्याती असणाऱ्या शाश्वती सेन यांना प्रताप पवारांनंतर ३५ वर्षांनी महाराजजींनी गंडा बांधला. गंडाबंधन हा असा सोहळा असतो ज्यात, गुरू-शिष्याच्या नात्यामध्ये बांधीलकी, विश्वास स्थापन केला जातो. यानंतर त्या गुरूशी एकनिष्ठ राहण्याचं, त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा पूर्ण वापर करण्याचं वचन शिष्य देतो तर गुरू संपूर्ण तनमन लावून आणि सढळहस्ते शिष्याला शिकवण्याचं वचन देतात. हा सोहळा कलेच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा व पवित्र सोहळा मानला जातो.
lp15प्रताप पवार यांनी कथकचं शिक्षण पं. बिरजू महाराजांकडून घेतलं आणि कमी कालावधीतच एक उत्तम कलाकार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. विविध कठीण प्रसंगांतून त्यांचं हे शिक्षण घडत गेलं ज्यात प्रत्येक संकटावर मात करत ह्य गुरू-शिष्याच्या जोडीने कधी हार पत्करली नाही आणि शिक्षण चालू ठेवलं. १९७२ मध्ये भारत सरकारच्या ‘कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्स’तर्फे कथक भारताबाहेर शिकवण्यासाठी, कथकचा प्रचार करण्यासाठी पवारांची निवड झाली. या विभागाकडून कथकसाठी निवड होण्याचा पहिला मानही पद्मश्री प्रताप पवारजींचाच! तेव्हापासून ते कथकची अविरत सेवा करत आहेत व गेली ४० हून अधिक वर्षे लंडनमध्ये स्थायिक आहेत. त्यांनी स्वत:ची ‘त्रिवेणी नृत्यालय’ ही संस्था लंडनमध्ये स्थापन केली आहे आणि हजारो परदेशी व भारतीय विद्यार्थ्यांना ते कथकचे शिक्षण देत आहेत, कथकचा जगभर प्रसार करण्याचं मोलाचं कार्य करत आहेत. आज जगभर कीर्ती असलेला अक्रम खानही ह्यंचाच पहिला गंडाबंध शागीर्द आहे! असे अनेक कलाकार आणि शिष्य प्रताप पवारांनी घडवले आहेत आणि गुरूकडून मिळालेल्या ज्ञानाची शिदोरी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी परिश्रम घेत आहेत. २००८ मध्ये त्यांच्या कार्याचा गौरव भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा किताब राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते देऊन केला. तसेच श्रंगार मणी, नृत्य शिरोमणी, कथक सम्राट अशा अनेक किताबांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे. त्यांच्या आयुष्यावर लिहिलेले माय जर्नी इन डान्स -गुरू प्रताप पवार ह्यत त्यांच्या कथक शिकण्याच्या ऊर्मीविषयी, त्यांच्या गुरुप्रती असलेल्या निष्ठा आणि आदराविषयी आणि आतापर्यंत त्यांनी कथकच्या क्षेत्रात केलेल्या प्रवासाविषयीचं वर्णन आहे!!
आज स्वत: जागतिक पातळीवरचे गुरू म्हणून प्रसिद्ध असलेले प्रताप पवार त्यांच्या गुरूंच्या समोर मात्र तितकेच नम्र आणि नतमस्तक होतात. ते भारतात येतात तेव्हा न चुकता पं. बिरजू महाराजांची भेट घेतात व त्यांच्याकडून आज वयाच्या ७३ व्या वर्षी शिकण्यास ते तत्पर असतात. प्रताप पवार सांगतात, ‘गुरूसमोर माझे हात नेहमीच पसरलेले असतात, त्यांच्याकडून जितकं शिकू तितकं थोडं आहे. ह्य भव्य ज्ञानाच्या अथांग महासागरात ओंजळभर जरी ज्ञानामृत गुरूकडून मिळालं तरी ते फार मोठं आहे. शिष्याने नेहमीच गुरूंकडून अधिकाधिक शिकण्याचा मानस ठेवावा, कारण शिक्षण ही अखंड चालू असणारी प्रक्रिया आहे.’ त्यांचा ह्य वयातील हा उत्साह आणि शिकण्याची ईर्षां आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांना नक्कीच थक्क करणारी आहे.
आजकाल कलाक्षेत्रात गुरू-शिष्याचं जे नातं पाहायला मिळतं, लवकर निकाल मिळण्यासाठी शिष्य जे शॉर्ट-कट वापरत आहेत त्याविषयी बोलताना प्रताप गुरुजी म्हणतात, ‘आज विद्यार्थ्यांना नाव, पैसा, चांगले कपडे, चांगली आभूषणं, लोकांकडून स्तुती हे सगळं हवं आहे; पण हे सगळं ज्यामुळे मिळतं असं शिक्षण घेण्यास, त्यासाठी करावा लागणारा रियाज करण्याची, कठोर आणि अविरत मेहनत घेण्याची मात्र त्यांची तयारी दिसत नाही. गुरूविषयी, नृत्याविषयी जो आदरभाव असयला हवा तोदेखील कमी दिसतो. नाव, पैसा, प्रसिद्धी मिळाल्यावर गुरूचं स्मरण न ठेवणं हे नक्कीच चुकीचं आहे. मीदेखील माझ्या शिष्यांना नेहमी हेच सांगत असतो की आज मी जो कोणी आहे, ज्या घरात राहतो, घरातील प्रत्येक वस्तू ही माझ्या गुरूमुळे मला मिळाली आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी मी त्यांचा आयुष्यभर ऋणी राहीन..’
अशी गुरुप्रती असणारी निस्सीम भक्ती, आदर, प्रेम आजच्या युगात शोधून सापडणं मुश्कील आहे!! ही गुरू-शिष्य परंपरा अशीच पुढे चालू राहण्यासाठीदेखील प्रताप पवार प्रयत्नशील असतात. आज लंडनमध्ये देखील त्यांनी न सांगूनसुद्धा त्यांचे परदेशी विद्यार्थी रस्त्यात कुठेही भेटले तरी खाली वाकून नमस्कार करतात, गुरुजींना हा भारतीय संस्कृतीतील संस्कार नृत्याबरोबरच जगभरात पोहचवला आहे!
आयुष्यभर गुरूकडून शिकण्याची आस, मिळालेल्या ज्ञानाचा योग्य वापर, गुरूविषयी आदरभाव, निस्सीम प्रेम आणि भक्ती, कृतज्ञता आणि गुरूच्या व कलेच्या ठायी समर्पित आयुष्य ह्य सर्वच गोष्टी एक आदर्श शिष्य घडवतात व प्रताप पवार हे त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहेत. असे शिष्य असतील तर गुरूदेखील गुरू म्हणून महान ठरतो, यशाच्या उंच शिखरावर पोहोचतो, याचं उदाहरण म्हणजे साक्षात- पं. बिरजू महाराज!!
तेजाली कुंटे – response.lokprabha@expressindia.com