lp06‘गुरुकुल परंपरा आजही आहे. त्याची बदलणारी व्याख्या स्वीकारायला हवी’, असं सांगत पंडित उल्हास कशाळकर संगीतातील नवीन संकल्पनांचं स्वागत करतात.
संगीत आणि गुरुकुल परंपरा यांचे एक अतूट नाते आहे. आजच्या काळात खरंतर गुरूंच्या घरी वर्षांनुर्वष राहून संगीत शिकणारी मुलं दुर्मीळच. पण यामुळे गुरुकुल परंपरा लयाला गेली असं होत नाही. संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार आजही गुरुकुल परंपरा जपत असल्याचे ठाम मत पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर मांडतात, ‘आजही शिष्य गुरूंच्या घरी जाऊन संगीत विद्या शिकतो. अर्थात तो तिथे राहत नाही कारण तरुणांना आजकाल कॉलेज आणि अभ्यासाचा बराच व्याप असतो. त्यामुळे गुरुकुल पद्धतीत बदल नक्कीच झाला आहे. पण, वातावरण अजूनही गुरुकुलासारखेच आहे.’
पंडित उल्हास कशाळकर स्वत: गेली अनेक वर्षे कोलकात्यामधील आयटीसी संगीत रिसर्च अकादमीमध्ये गुरुकुल पद्धतीने संगीताचे शिक्षण देत आहेत. गुरुकुल परंपरेबद्दल बोलताना ते पंडित हरिप्रसाद चौरासिया, पंडित शिवकुमार शर्मा, अश्विनी भिडे यांच्या गुरुकुलांचे दाखले देतात तेव्हा भारतभर सर्वत्र आजही ही परंपरा जपली जाते याची साक्ष मिळते. गांधर्व विद्यालयाबद्दल बोलताना मात्र पंडित कशाळकरांचा नाराजीचा सूर लागतो. त्यांच्या मते ‘गांधर्व विद्यालयातून कलाकार तयार होत नाहीत. फक्त कानसेन तयार होत आहेत.’ गुरूंनी घरात किंवा गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिले तर शिष्यांचे गुण-दोष समजून घेऊन ते योग्य ते मार्गदर्शन करू शकतात असं त्यांचं स्पष्ट मत आहे. पूर्वी आणि आताच्या गुरुकुल पद्धतींमधील फरकांबद्दल बोलताना ते सांगतात, ‘पूर्वी शिष्य गुरूंच्या घरात राहून संगीत शिकत असत. त्यांना गुरूंच्या घरातील इतर कामेही करावी लागत. कधी अपमानही सहन करावा लागत. कडक शिस्तीच्या वातावरणात राहावे लागत. पण, आता गुरू-शिष्यातील नाते मैत्रीपूर्ण झाले आहे.’
गुरू-शिष्य परंपरा हा शास्त्रीय संगीताचा एक अविभाज्य घटक आहे. पंडित कशाळकरांनी स्वत: पंडित रामभाऊ मराठे आणि पंडित गजाननराव जोशी यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले असल्याने जयपूर, ग्वाल्हेर आणि आग्रा या तिन्ही घराण्यांच्या शैली त्यांना अवगत आहेत. ‘प्रत्येक घराण्यातील शैलीत विविधता आहे. ती विविधता अवगत केली तर तुमचे संगीत अजून समृद्ध होऊ शकते’, असे त्यांना वाटते. पण, सतत गुरू बदलणे योग्य नाही असेही त्यांचे ठाम मत आहे. आजच्या तरुण पिढीने एका गुरूंकडून त्यांची पूर्ण शैली आत्मसात केल्यावरच दुसऱ्या शैलीकडे वळावे असे त्यांना वाटते. तरुणांना आज संगीत शिकण्यासाठी, त्याची माहिती मिळवण्यासाठी अनेक साधने उपलब्ध आहेत. इंटरनेट आणि युटय़ूबवर बरीच गाणी तरुण मंडळी सतत ऐकत असतात. पंडित कशाळकर या साधनांचे समर्थनच करतात, ‘पूर्वी ग्रामोफोन होते, मग सीडीज आल्या आणि आता इंटरनेट. माध्यमे बदलली तरी त्याचा फायदा शिष्यांनी आणि गुरूंनी नक्की करून घ्यावा’, असे पंडितजींचे स्पष्ट मत आहे.
अनेक माध्यमांद्वारे आवड निर्माण होऊन आजची तरुणाई मोठय़ा संख्येने शास्त्रीय संगीताकडे वळत आहे. पण, तरुणांच्या धावपळीच्या जीवनात संगीताचे शास्त्रशुद्ध आणि रीतीबद्ध शिक्षण घेण्यासाठी दिवसाचे किमान तीन ते चार तास रियाजासाठी देणे गरजेचे आहे, असे पंडितजींना मनापासून वाटते. ‘प्रत्येक जण प्रत्येक कामात यशस्वी होईल असे नाही. त्यासाठी पुलंसारखे व्यक्तिमत्त्व जन्माला यावे लागते. त्यामुळे तुम्हाला ज्यात रस आहे अशा कलेचा मनापासून ध्यास घेतला तर त्यात नक्की यशस्वी होता येते. कष्टाला शॉर्टकट नसतो’, असं ते आवर्जून सांगतात. संगीतातील बारकावे कळायला आणि स्वत:ची शैली तयार करायला अनेक वर्षे लागतात हे खरे आहे. ‘पंधराव्या किंवा विसाव्या वर्षी संगीत पूर्णपणे अवगत होणं कठीण आहे. मी आजही संगीत शिकत आहे’, असं म्हणत ते तरुणांना आणि नवोदितांना सांगू इच्छितात की, ‘वेळ दिलात तरच योग्य ते फळ मिळेल आणि जेव्हा तुम्ही गुरूंच्या शैलीतून स्वत:ची शैली निर्माण कराल तेव्हा तुम्हाला खरी संगीत विद्या अवगत झाली असे म्हणता येईल.’
आज संगीत क्षेत्रात तरुण भरारी घेत आहेत. सुगम संगीताच्या तुलनेत शास्त्रीय संगीताकडे वळणारा आकडा जरी कमी असला तरी तरुण मोठय़ा संख्येने भारतातील आणि भारताबाहेरील शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. तरुणांना संगीताचे शिक्षण घेण्यासाठी अनेक शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत. अनेक तरुण कलाकार परदेशी जाऊन कार्यक्रम करत आहेत. या सगळ्याच्या पाश्र्वभूमीवर गुरू-शिष्य आणि गुरुकुल परंपरांना कुठेही धक्का लागणार नाही, या परंपरा अविरत अशाच सुरू राहतील यात दुमत नाही.
तेजल शृंगारपुरे – response.lokprabha@expressindia.com