lp06नृत्यासारख्या पारंपरिक कलेत गुरू-शिष्य नात्याला खूप महत्त्व आहे. या परंपरेतून, या नात्यातून नेमकं काय मिळत असतं? एका पिढीतून दुसऱ्या पिढीला मिळणारा तो अदृश्य धागा नेमका कसा असतो?
आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा. हा दिवस म्हणजे व्यास पूजेचा दिवस. महर्षी व्यास हे समाजाचे गुरू म्हणूनच परंपरागत व्यासपूजा ही गुरुपूजा मानली गेली व व्यास-पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी होऊ लागली.
त्यानिमित्त ज्येष्ठ कथक नृत्यांगना पंडिता शमाताई भाटे यांच्याशी गुरुशिष्य परंपरा या विषयावर संवाद साधला. पुण्यामध्ये गेली २७ र्वष ‘कथक नृत्यांगना’ घडविण्याचं काम शमा भाटे अविरतपणे करत आहेत. शमाताईंनी घडविलेल्या विद्यार्थिनी आज देशात, परदेशात कथक नृत्याचा प्रसार करीत आहेत.
शमाताई आपल्या मनातल्या गुरू शिष्य या संकल्पनेबद्दल सांगतात, ‘कलेच्या क्षेत्रामध्ये गुरुशिष्य परंपरेला खूप महत्त्व आहे. गुरुशिष्य परंपरा म्हणजे गुरूच्या घरी राहून त्यांची सेवा करणं, समोरासमोर सतत राहून तालीम करणं, ‘रूबरू’ म्हणतात तशी तालीम या गुरुशिष्य परंपरेत मिळते, परंतु गुरूच्या घरी राहूनच शिकणं यालाच गुरुकुल म्हणायला पाहिजे असं नाही. कारण माझंच उदाहरण आहे की माझ्या नृत्यगुरू रोहिणीताई भाटे यांनी मला कलाकार बनवण्याची जबाबदारी घेतली. कलेतलं सगळं समजावण्याची, उत्तम व्यक्ती बनवण्याची जबाबदारी घेतली. गुरूंनी शिष्याची जबाबदारी घेणं आणि बांधीलकी मानणे याला मी गुरू-शिष्य परंपरा म्हणते. ही परंपरा गुरू आणि शिष्य दोघांच्याही बाजूने असते. असायला हवी. शिष्यांनी गुरूची बांधीलकी मानली पाहिजे – गुरूकडून आपण जे शिकतो ते गुरूवर निष्ठा ठेवून करत राहणे, त्या शिक्षणाचं अवमूल्यन न होऊ देणं हे सगळं मला महत्त्वाचं वाटतं.’ नृत्य ही प्रयोगजीवी कला असल्यामुळे सतत काम करत राहणं याला शमाताई गुरू-शिष्य परंपरा मानतात.
शमाताईंची नृत्याकडे पाहण्याची जी धारणा आहे, ती त्या विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लावतात. त्या म्हणतात ‘मी नुसतं ज्ञान देत नाही तर नृत्यातील सर्व वृत्ती शिकवते. पाय कसे चालवले पाहिजेत – हस्तक कसे असले पाहिजेत, एवढंच मर्यादित नाही. कारण मला माझ्या गुरूंनी रोहिणीताईंनी दहा चाली अशा शिकवल्या, ज्यामधून मला शंभर वेगवेगळ्या चाली निर्माण करता येण्याजोगं ज्ञान मिळालं.’
रोहिणीताईंच्या मते शिष्य आणि गुरू दोघांनीही एकमेकांची व्हायब्रेशन्स एकमेकांना देणं खूप गरजेचं असतं आणि ती समोरासमोरच होतात. त्या म्हणतात, नृत्य हे डोक्याचं काम आहे, भावनांचं, मनांचं, काम आहे, शरीराचं काम आहे. एका अवकाशामध्ये राहणं, अवकाश शेअर करणं महत्त्वाचं आहे. त्या अर्थाने शिष्याने गुरूच्या घरी राहाणं, सेवा करणं ही जुनी परंपरा आदर्श होती. पण आता ते कुणालाच शक्य नाही. कारण शमाताई सांगतात, आजच्या काळाप्रमाणे सगळ्यांनाच बदलणं गरजेचं आहे. नृत्याचं क्षेत्रही त्याला अपवाद नाही. परंतु आजही वर्तमानकाळातील सर्व परिस्थिती स्वीकारून, तसेच सर्व तांत्रिक गोष्टी स्वीकारून नादरूपमध्ये गुरू-शिष्य परंपरेनेच विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. कारण काळ बदलला तरी नृत्याची परंपरा नाही बदलणार. कला ही एका पिढीतून जातच राहणार.
शमाताईंनी अनेक विद्यार्थिनी घडवल्या आहेत पण त्या स्व:त मात्र म्हणतात की मी स्वत:ला कधीही गुरू मानत नाही. त्यांच्या मते गुरू हा शिष्यांमुळे घडत असतो.
गुरू शिष्य परंपरा तशीच राहते फक्त काळाप्रमाणे थोडा संदर्भ बदलतो हे सांगताना एक आठवण शमाताई सांगतात की, उस्ताद अल्लारखाँसाहेबांची एक कार्यशाळा झाली. तेव्हा त्यांनी सांगितले की, आम्हाला तर सगळं मुखोदगत करावे लागे कारण लिहायचीसुद्धा परवानगी नव्हती, परंतु आता असं शक्य नाही. कारण आजच्या काळात किती गोष्टी मुखोद्गत करणार? लिहिण्याच्या पुढे ध्वनिमुद्रण आहे, छायाचित्रण आहे. ही सगळी साधनं आहेत अर्थात ही साधनं म्हणजे गुरू-शिष्य परंपरेला पर्याय नाहीये. तर ती साधनं सपोर्टिग आहेत असे म्हणता येईल.’ मी स्वत:च या सगळ्या गोष्टी करण्याची माझ्या विद्यार्थिनींना कायमच परवानगी देते, असंही शमाताई सांगतात.

शमाताईंच्या मते आता काळ बदललेला आहे. सगळ्यांना शिकण्याची घाई असते. रियाजाला वेळ नसतो. परंतु त्याचा अर्थच लवकर विसरणे असा होतो. रोहिणीताईंनी शिकवलेले मी अजूनही विसरले नाही. तो रियाझ इतक्यांदा केलाय की विसरलंय असं वाटत असतानाच नृत्य करायला उभं राहिलं की क्षणार्धात सगळं आठवतं. ही शरीराची मेमरी आहे, डोक्याची नाही. ज्या वेळी तुम्ही त्याचा रियाज करत असता त्या वेळी दुसरं काही व्यवधान तुम्हाला नसतं. शिकवलेल्या गोष्टी उत्तम करणे हा एकाच ध्यास असतो. म्हणून विद्यार्थी दशा म्हणतात.
आजकाल विद्यार्थी एकाच वेळी अनेक नृत्यशैली शिकतात. त्याबाबत शमाताईंचं मत असं की एका वेळी वेगवेगळ्या नृत्यशैली शिकून प्रत्येक शैलीचा लहेजा स्वीकारणं खरंच शक्य होतं का? किंवा विद्यार्थी ती शैली शंभर टक्के ग्रहण करू शकतो का? काळाची गरज आहे दहा गोष्टी करणं. त्यामुळे चूक की बरोबर, हे आपण ठरवू शकत नाही. पण मला वाटतं तुम्ही एक गोष्ट पूर्ण झोकून देऊन करा आणि मग दुसरी गरजेपुरती करा. त्या म्हणतात की दहा ठिकाणी दहा गोष्टी केल्यावर फार तर दोन र्वष त्या टिकतात. पंधरा दिवसांत पंधरा वर्षांचं काम शिकलं तर ते पंधरा नाही आठ दिवसांतच जाईल. इन्स्टंट फूडसारखं आहे ते. एका कोणत्याही शैलीचं शिक्षण पूर्ण घ्यावं असं मला कायम वाटतं. कारण शैली फार खोल आहे. जितकं तुम्ही आत जाल, तितकं तुम्हाला जास्त सापडत जाईल. अर्थात इतर कलांशी तुम्ही जोडलेले राहणे तितकंच महत्त्वाचं आहे. तुमच्या संवेदनशीलतेनुसार कशाला किती प्राधान्य द्यायचं ते ठरवा असं त्या सांगतात.
शमाताईंच्या मते कोणीच कुठलीच गोष्ट शंभर टक्के ग्रहण करू शकत नाही. कारण काळ बदललाय. टी.व्ही. आला. दहा ठिकाणी सादर केल्यामुळे नृत्यातले कुठलेही हस्तक एका ठरावीक पातळीपर्यंत येते. मग त्याची भेसळ करून जे काम असतं ते कसंही करून पूर्ण करतात. एक रचना मला शिकवली की त्यातून मी अनेक रचना करू शकते. का? तर पहिली जी रचना शिकले तीच खूप केली. त्याचा विचार केला, बॅडमिंटन खेळणारा माणूस टेनिस खेळू शकतो का? रसायनशास्त्र आणि इंग्रजी भाषा एका वेळी शिकता येऊ शकते, कारण ते डोक्याने करायचं काम आहे. ताकदीचा वापर करणं ही वेगळी गोष्ट आहे. ( its different use of musscles.)
त्या सांगतात, कथक हा महासागर आहे. तो समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष कार्यक्रम पाहणं असो की यू टय़ूब असो ही सगळी साधनं आहेत. पण त्यांचा वापर करताना आपल्याला हवं ते घ्यावं, पण इतरांची कॉपी करू नये. पूर्वी नृत्य शिकणाऱ्यांना इतरांचे कार्यक्रम बघायला जायलाही बंदी असायची. पण त्या सांगतात की मी ते स्वातंत्र्य माझ्या विद्यार्थिनींना दिले आहे कारण मी माझ्या विद्यार्थिनींची कथकची निष्ठा एवढी घडवली आहे की मला कधी भीतीच नाही वाटली की मुली कथक सोडून इतर काही करतील.
त्या सांगतात, आठवडय़ातून दोन दिवसांचा क्लास ही गोष्ट गुरू-शिष्य परंपरेपेक्षा वेगळी गोष्ट आहे. जे दोन दिवस शिकत असतात, त्यांचं पुढे जाऊन नृत्यामध्येच करिअर करायचं का हे ठरलेलं नसतं. सुरुवातीला विद्यार्थी नृत्याची केवळ ओळख करून घेतात. कलाकार होण्यासाठी गुरू-शिष्य परंपरेशिवाय पर्याय नाही. कुठल्याही काळात सुरुवातीची पाच ते आठ र्वष नृत्याची ओळख करून घेऊन मग गुरू-शिष्य परंपरेमध्ये शिकण्याचा विचार करावा. परंतु सुरुवातीला आठवडय़ातून दोन दिवस नृत्यवर्गात शिकणं गरजेचं आहे, असं त्यांचं मत आहे. कारण त्या म्हणतात, जे केवळ छंद म्हणून शिकायचं असतं, त्यांना गुरुकुल पद्धतीने शिक्षण देऊन कसं चालेल? या दोन दिवस शिकण्याच्या नृत्य पद्धतीवरून एक प्रेक्षक वर्ग हे तयार होत असतो. एक जागृती निर्माण होत असते. सगळेच कलाकार कसे होतील? परंतु ठरावीक र्वष नृत्य शिकवून, नृत्याविषयी आस निर्माण झाल्यानंतर मात्र गुरू-शिष्य परंपरेला पर्याय नाही, असं त्यांना ठामपणे वाटतं.
शमाताई म्हणतात, मी माझ्या आयुष्याबद्दल विचार करते तेव्हा देवाने मला काय दिलं, हा विचार येतो. आणि आपोआपच उच्चर येतं, उत्तम नृत्य दिलं. उत्तम विद्यार्थिनी दिल्या. नृत्यातून मी जीवनाचा ओतप्रोत आनंद घेतला. नृत्याने मला खूप काही दिलं आजवर. केवळ गुरू-शिष्य परंपरेनेच मला हे मिळालं. माझ्या नृत्यगुरू पंडिता रोहिणीताई भाटे आणि ज्यांच्याकडून ताल-लयीचे शिक्षण घेतले ते पंडित सुरेशजी तळवलकर यांनी प्रत्येक क्षणी मला जगायला अपरिमित असा आनंद दिला; जो कधीही न संपणारा आहे.
शीतल कपोले – response.lokprabha@expressindia.com