lp06आपल्या कलेमुळे खूप नाव झालेला कलाकारच चांगला गुरू असतो असं नाही. तुलनेत लहान पातळीवर काम करणारे पण उत्तम विद्यार्थी घडवणारे अनेक गुरू आपल्या आसपास असतात. अशातल्याच काही गुरूंची ओळख-
कालानुरूप ‘गुरू-शिष्य’ परंपरेमध्ये बरेच बदल घडत गेले, त्याबद्दल सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना व गुरू डॉ. टीना तांबे म्हणतात, ‘‘जुन्या काळच्या ‘गुरू-शिष्य’ परंपरेमध्ये शिष्य गुरूकडे रहायचा आणि कलेसाठी पूर्ण वेळ समर्पित करायचा. पण आजच्या काळात शालेय, महाविद्यालयीन शिक्षणाला प्राधान्य प्राप्त झालंय; त्यामुळे नृत्य, गायन, चित्रकला अशा कलांकडे ‘अभ्यासेतर विषय’ म्हणून पाहिले जाते. एक छंद म्हणून शिकायला सुरुवात होते आणि मग त्याची रुची वाढायला लागते..’
नृत्यवर्गात प्रवेश मिळवल्यापासूनच पालकांना मुलांनी रंगमंचावर परफॉर्म करण्याची, दूरदर्शनवरील रिअलिटी शोमध्ये झळकण्याची घाई लागू लागते. याबाबतीत डॉ. टीना तांबे म्हणतात की, ‘शिष्य सादरीकरणासाठी तयार नसताना त्याला परफॉर्मन्ससाठी घाई केली तर त्याचा पाया भक्कम होणार नाही. शास्त्रीय नृत्यशैलींसाठी पाया मजबूत असणं अत्यावश्यक आहे, त्यासाठी शिष्याने आणि त्याच्या पालकांनी तसेच गुरूंनी संयम ठेवणं महत्त्वाचं आहे.’ आताच्या पालकांचा दृष्टिकोन आपल्या मुलांना जास्त नृत्यशैली मुलांना याव्यात असा असतो. त्याबद्दल डॉ. टीना तांबे सांगतात, ‘ही पालकांची जबाबदारी आहे की जरी मुलांना विविध क्लासेसला घातलं तरी त्यांची रुची कशात आहे हे बघून योग्य क्लास चालू ठेवणं आणि चांगला गुरू ओळखून त्याच्याकडे आपल्या मुलांना पाठवणं. त्यामुळे मुलांची ओढाताण कमी होईल आणि त्यांचा वेळ वाचून योग्य दिशेमध्ये पाऊल टाकण्यास त्यांना मदत होईल.’ तसेच आजकाल मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या ‘नृत्य कार्यशाळे’बद्दल डॉ. त्या म्हणतात, ‘अगदी सुरुवातीच्या काळात विविध गुरूंचं मागर्दर्शन घेतलं तर मुलांचा गोंधळ होऊ शकतो; कारण प्रत्येक गुरूची शिकवण्याची पद्धत, बोल, तुकडे वेगवेगळे असतात. त्यामुळे अशा कार्यशाळांमध्ये मूलभूत शिक्षण झाल्यानंतरच जाणे अधिक योग्य’
रियाजाबद्दल डॉ. टीना तांबे म्हणतात, ‘केवळ छंद म्हणून शिकणाऱ्यांसाठी आठवडय़ातून दोन तास क्लास पुरेसा आहे. परंतु ज्यांना या क्षेत्रात करिअर करायची इच्छा आहे त्यांनी मात्र नक्कीच नृत्यासाठी जास्त वेळ देऊन दररोज रियाज, मनन, चिंतन करणे आवश्यक आहे.’ आता कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिकाधिक व्यावसायिक होत चालला आहे. याबाबतीत डॉ. टीना तांबे म्हणतात, ‘काळाबरोबर व्यावसायिक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे. परंतु, केवळ पैशांसाठी कलेचा मार्ग स्वीकारणं योग्य नाही. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देणे, कलेची गोडी निर्माण करणे अधिक महत्त्वाचे आहे.’
डॉ. टीना तांबे यांना‘गुरू-शिष्य परंपरा आणि‘नृत्याचे विद्यापीठातील पदवी शिक्षण अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षण पद्धतीचा अनुभव आहे. दोन्ही पद्धतींमध्ये काही फायदे, काही तोटे आहेत. पण आपण दोन्ही मध्ये संतुलन साधून विद्यार्थ्यांना शिकवावे असे त्यांना वाटते. बऱ्याच ठिकाणी शिष्याच्या कर्तव्याबद्दल बोलले जाते, परंतु गुरुस्थानी गेल्यावर गुरूनेदेखील काही तत्त्वे पाळली तर हे ‘गुरू-शिष्याचे’ नाते दृढ व्हायला मदत होते, असे त्यांचे म्हणणे आहे. यासाठी ‘गुरू आणि शिष्याच्या’ नात्यामध्ये पारदर्शकता, सच्चेपणा, एकमेकांविषयी आदर आणि प्रेम असणे आवश्यक आहे. तसेच गुरूने कधी विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करू नये. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करताना त्यांच्या चुका दाखवण्याबरोबर त्यांच्या गुणांचं कौतुक करणंही गरजेचं असतं! विद्यार्थ्यांना स्वत:ची खासगी कामे करायला लावणं हे नक्कीच चुकीचं आहे, असे त्या ठामपणे सांगतात. विद्यार्थ्यांमधील गुण-दोष ओळखून त्यांना मार्गदर्शन करणं आणि योग्य वेळी त्यांना योग्य संधी देणं हेही एक गुरूचं कर्तव्य आहे, असे त्या मानतात. तसेच शिष्यानेही गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचे स्मरण ठेवून, त्यांच्याविषयी कृतज्ञ असणे आवश्यक आहे. गुरू-शिष्याचे नाते हे दुहेरी नाते असते. गुरूलादेखील शिष्यांकडून खूप काही शिकायला मिळते, ‘शिकवणं म्हणजे पुन्हा शिकणं’ असेही डॉ. तांबे स्वत:च्या अनुभवाविषयी बोलताना आवर्जून सांगतात.
तेजाली कुंटे – response.lokprabha@expressindia.com