‘तारे जमीन पर’ आणि ‘स्टॅनली का डिब्बा’ या चित्रपटाच्या यशानंतर लेखक, निर्माते आणि दिग्दर्शक अमोल गुप्ते यांचा ‘हवा हवाई’ हा चित्रपट लवकरच सर्वत्र प्रदर्शित होतोय. सामाजिक परिस्थितीमुळे बालपण हरवलेल्या एका मुलाच्या स्वप्नपूर्तीची ही एक अत्यंत प्रेरणादायी कथा आहे.

लहान मुलांचे भावविश्व एका वेगळ्या नजरेने पाहण्याची गरज असणे हेच मुळी आपल्या सामाजिक आणि कौटुंबिक मानसिकतेचे दर्शन घडवते. मुलांच्या मूलभूत हक्कांविषयी आपल्या समाजामध्ये कुठलीच जागृती नाही. त्यांच्या नजरेतून जगाकडे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याचा फारसा प्रयत्न होताना अजूनही दिसत नाही आणि आपण मुलांना नेहमीच गृहीत धरतो. पण याचा मुलांच्या आयुष्यावर काय दुष्परिणाम होऊ शकतो, याची अनेक उदाहरणे आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळतात. मुलांना खरी गरज असते ती प्रेमाची, मायेची आणि एका चांगल्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत असलेल्या आपल्या पालकांची. आज आपण एका मॉडर्न जगात जगत असल्यामुळे आपल्या पाल्याकडे लक्ष द्यायला कुणालाही फारसा वेळ नाही. आईवडील दोघेही नोकरी करत असल्यामुळे अनेक मुलांच्या नशिबी एकाकीपणा आलाय, पण हे झालं सुस्थितीतील असलेल्या कुटुंबाचं. पण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या लहान मुलांच्या मूलभूत हक्कांविषयी काय? त्यांचे तर खूप मोठे प्रश्न आहेत. सरकारने शिक्षण हक्काचा कायदा के ला असला, तरीही अनेक लहान मुलांना परिस्थितीमुळे शाळेत जाण्यापासून वंचित राहावं लागतं. त्यांच्या जगण्याचेच भीषण प्रश्न आहेत. अनेकांच्या पदरी बालकामगार म्हणून काम करण्याची पाळी येते. त्यामुळे त्यांचे त्या वयातील स्वप्न पाहण्याचे, जगण्याचा निखळ आनंद घेण्याचे स्वातंत्र्यच हिरावले जात आहे. या मुलांना स्वत:चा आवाज नाही आणि मतदान करण्याचा हक्क नसल्यामुळे त्यांच्या प्रश्नांकडे पाहण्याचा राजकारण्यांचा दृष्टिकोनही फारसा गंभीर नाही. अशा बालपण हरवलेल्या मुलांच्या अवस्थेला जबाबदार कोण, हा मुख्य प्रश्न आहे. बालपण हरवलेल्या अशा वंचित मुलांच्या प्रश्नावर गेली अनेक वर्षे ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाचे लेखक आणि ‘स्टॅनली का डिब्बा’ या चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक अमोल गुप्ते आणि त्यांची पत्नी चित्रपट संकलक दीपा भाटिया हे दोघे काम करत आहेत. चित्रपट निर्मितीच्या माध्यमातून हे दोघे जण लहान मुलांच्या मूलभूत प्रश्नांविषयी जनजागृती करायचा प्रयत्न करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघे मुंबईच्या वेगवेगळ्या भागात अशा वंचित मुलांसाठी नाटय़प्रशिक्षण, भाषा आणि इतर गोष्टींचे प्रशिक्षण वर्ग चालवतात. ज्यांच्या सोबत ते काम करत आहेत ती मुलं खरी बालकामगार आहेत, त्यांना आयुष्यभर कामगार बनून राहायचं नाही आहे, त्यांच्या आयुष्याला कुठलीही दिशा नाही, पण इतरांसारखी त्यांचीही काही स्वप्नं आहेत. त्यांच्या स्वप्नांना दिशा देण्याचे, तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे महत्त्वाचे कार्य अमोल गुप्ते करत आहेत. आतापर्यंत जवळपास वीस हजार मुलं अशा कार्यशाळेतून शिकून गेली आहेत. ‘तारे जमीन पर’ आणि ‘स्टॅनली का डिब्बा’च्या यशानंतर अमोल गुप्ते यांचा नवीन चित्रपट ‘हवा हवाई’ प्रदर्शनासाठी सज्ज आहे. ज्यात मुलांविषयीचे काही वेगळे पैलू प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. फॉक्स स्टार स्टुडिओ – अमोल गुप्ते सिनेमा प्रॉडक्शनची निर्मिती असलेला आणि आकर्षक नाव असलेला हा ‘हवा हवाइर्’ चित्रपट स्केटिंग या क्रीडाप्रकारावर आधारित एक कौटुंबिक चित्रपट आहे. या चित्रपटात अर्जुनची मध्यवर्ती भूमिका साकारत आहे अमोल गुप्ते यांचा मुलगा पार्थ गुप्ते तर स्केटिंग प्रशिक्षक लक्कीची भूमिका साकारत आहे अभिनेता सकीब सलीम.

‘हवा हवाई’ ही जगण्याच्या मूलभूत मानवी प्रेरणांची, मैत्रीची आणि एका मुलाच्या स्वप्नपूर्तीच्या प्रवासाचा आनंद लुटण्याची कथा आहे.

‘हवा हवाई’ ही जगण्याच्या मूलभूत मानवी प्रेरणांची, मैत्रीची आणि एका मुलाच्या स्वप्नपूर्तीच्या प्रवासाचा आनंद लुटण्याची कथा आहे. अर्जुन हरिश्चंद्र वाघमारे (पार्थ गुप्ते) नावाचा एक बालकामगार मुलगा, आपल्या आई आणि छोटय़ा बहिणीसह मोठय़ा शहरात स्थलांतरित होतो. तिथे त्याची ओळख लक्की (सकीब सलीम)शी होते. जो इतर मुलांना स्केटिंग या क्रीडाप्रकाराचे प्रशिक्षण देत असतो. लक्कीमार्फत अर्जुनला स्केटिंगच्या अत्यंत रोमांचकारी खेळाची ओळख व्हायला लागते आणि त्यातून स्केटिंग शिकण्याचे स्वप्नरंजन तो करायला लागतो. अर्जुनच्या प्रशिक्षणाची जबाबदारी लक्की स्वीकारतो आणि त्याला स्केटिंग चॅंपियन बनण्यासाठी प्रेरित करतो. अर्जुनचे चार बालकामगार मित्र आपल्या अर्जुनचे स्केटिंग चॅंपियन बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करतात. अनेक अडथळे पार करत आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एक बालकामगार अर्जुन हरिश्चंद्र वाघमारे शेवटी आपल्या स्वप्नाला गवसणी घालू शकतो का, याचे चित्रण म्हणजे हवा हवाई. मुलांसाठी अत्यंत स्फूर्तिदायक, भावनिक आणि आशादायी असा हा तरल चित्रपट प्रचलित सामाजिक परिस्थितीवरही मार्मिक भाष्य करतो. अमोल गुप्तेंनी या चित्रपटाची कथा सात वर्षांपूर्वीच लिहिली होती. गुप्ते सांगतात, ‘माझा मुलगा पार्थ जेव्हा चार वर्षांचा होता, तेव्हापासून तो स्केटिंग शिकत आहे. वडील म्हणून त्याच्या स्केटिंग शिकण्याच्या अनुभवाचा मी पहिला साक्षीदार होतो. त्याच्या स्केटिंग शिकण्याच्या प्रक्रियेतून मला कथा सुचत गेली आणि त्याप्रमाणे मी कथा लिहायला लागलो. या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये मात्र जवळपास एक वर्षांचा काळ गेला. चित्रीकरणात सहभागी होणाऱ्या मुलांच्या शाळा बुडू नयेत, म्हणून चित्रपटाचं चित्रीकरण फक्त उन्हाळी सुट्टय़ा आणि शनिवार असं करण्यात आलं. १२-१२ तासांच्या चित्रीकरणाचा ताण मी कधीच मुलांना देत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर मुलांसोबत चित्रीकरण करण्याचे अत्यंत काटेकोर नियम आहेत आणि भारतामध्ये मी ते तंतोतंत पाळण्याचे स्वत:साठी ठरवले आहे. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात मुलांसोबत आम्ही हे चित्रीकरण पूर्ण केले आहे.’ गुप्ते यांच्या असीमा संस्थेच्या दोन मुलांनीही या चित्रपटात काम केलं आहे. राष्ट्रीय पातळीवरील खेळणारे यशस्वी स्केटिंग खेळाडू धीरज आणि अजय ज्यांनी पार्थला स्केटिंगचे प्रशिक्षण दिले आहे, त्यांनीही या चित्रपटात भूमिका साकाराल्या आहेत हेही विशेष. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात एक मार्गदर्शक हवा असतो. समाजातील खरे चॅंपियन्स आपल्या चित्रपटासोबत जोडले गेले याचा खूप आनंद झाला असल्याचे गुप्ते सांगतात. त्यांच्या मते, ‘चित्रपट ही एक कला आहे. एखादा चित्रकार जसा प्रत्येक वेळेस नव्याने कॅनव्हासवर रंग भरतो, तेव्हा त्यातून एका नव्या चित्राची निर्मिती होते, तसंच चित्रपटाचं असतं. प्रत्येक वेळेस आम्ही नव्याने कथा सांगायचा प्रयत्न करतो. माझ्या यापूर्वीच्या चित्रपटांमुळे माझ्या नावावर लहान मुलांचे चित्रपट बनवणारा असा जरी शिक्का बसला असेल, तरी मला वाटतं की माझा हा चित्रपट अत्यंत वेगळा आहे. ज्या प्रत्येकाकडे एक संवेदनशील हृदय आहे त्या सर्वाना हा चित्रपट नक्कीच आवडेल, याची मला पूर्ण खात्री आहे.’
चहाच्या टपरीवर काम करणाऱ्या पोऱ्याची भूमिका साकारण्यासाठी या चित्रपटाच्या चित्रीकरणापूर्वी पार्थला दोन आठवडय़ांसाठी अकोल्याला पाठवण्यात आलं होतं. प्रत्यक्ष आयुष्यात चहाच्या टपरीवर काम करणाऱ्या बालकामगाराचे विश्व पडद्यावर साकारण्यासाठी यानिमित्ताने पार्थला खूप मदत झाली. पार्थ म्हणतो, ‘स्टॅनली का डिब्बा’मध्ये मी माझंच पात्र पडद्यावर साकारत होतो, त्यामुळे जास्त काही करावं लागलं नव्हतं. पण इथे मला भूमिकेच्या गरजेनुसार स्वत:मध्ये काही बदल करणं आवश्यक होतं. चित्रपटातील अर्जुन हा मुलगा मूळचा महाराष्ट्रातील खेडेगावाहून आलेला आहे, त्यामुळे त्याची भाषा, पेहराव आणि देहबोली जाणून घेणं थोडं गरजेचं होतं. खेडय़ांमध्ये अत्यंत कमी पैशात लोक आपल्या गरजा भागवत असतात, पण ते आपलं आयुष्य किती आनंदात जगत असतात, हे पाहायला मिळालं.’ साकिब सलीम ज्याने ‘मेरे डॅड की मारुती’ आणि ‘बाम्बे टॉकीज’ अशा चित्रपटांतून भूमिका केलेल्या आहेत, त्याच्यासाठी हवा हवाई या चित्रपटातील भूमिका साकारायला मिळणं खूपच आनंददायी आणि समाधान देणार होतं. साकिबच्या मते, ‘चित्रपटात मी एका प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहे आणि प्रत्यक्षात अमोल सर माझे प्रशिक्षक आहेत. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्यामुळे माझे त्यांच्यासोबत काम करण्याचे एक स्वप्न पूर्ण झाले.’ या चित्रपटात पाहुणी कलाकार म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी हिची एक छोटी भूमिका असणार आहे. नुकताच एका कार्यक्रमात श्रीदेवीच्या हस्ते ‘’हवा हवाई’ चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना आवडल्यामुळेच आपण काम करण्यास तयार झाल्याचे श्रीदेवी सांगते. श्रीदेवीवर चित्रित झालेले ‘मि. इंडिया’ चित्रपटातील हवा हवाई या प्रसिद्ध गाण्याच्या ओळीचे या चित्रपटाला नाव आहे हा फक्त योगायोग आहे, त्याव्यतिरिक्त काहीही नाही, असे गुप्ते स्पष्ट करतात.

‘खेडय़ांमध्ये अत्यंत कमी पैशात लोक आपल्या गरजा भागवत असतात, पण ते आपलं आयुष्य किती आनंदात जगत असतात, हे पाहायला मिळालं.’ पार्थ गुप्ते सांगतो.

या चित्रपट योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहचण्यासाठी उत्तम प्रदर्शन व्यवस्थेची गरज आहे. त्या संदर्भात बोलत असताना फॉक्स स्टार स्टुडिओचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सिंग म्हणतात, ‘आमच्या स्टुडिओने निर्मिती केलेल्या इतर मोठय़ा चित्रपटांप्रमाणेच हाही चित्रपट आमच्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे. आम्ही हवा हवाईकडे केवळ एक छोटय़ा बजेटचा चित्रपट म्हणून बघत नाही आहोत. हा फक्त मुलांसाठीचा चित्रपट नसून पूर्णपणे एक कौटुंबिक चित्रपट आहे. शिवाय मे महिन्याच्या सुट्टय़ांचा आम्हाला नक्कीच चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही, किंबहुना काही मोठय़ा शहरांत आम्ही जास्तीचे शोज लावणार आहोत.’ या चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीसाठी ‘ऊ१ींेी१२ उंेस्र्ं्रॠल्ल’ नावाचे एक अभियानही चालवले जात आहे, ज्यात देशातील वीस प्रसिद्ध खेळाडू आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवर त्यांच्या आयुष्यातील स्वप्नांबद्दल बोलणार आहेत, ज्यातून मुलांनाही आपल्या आयुष्यात उच्च ध्येय गाठण्याची प्रेरणा मिळेल.
मुलांना त्यांच्यासाठी बनवण्यात आलेले जगभरातील चित्रपट पाहता यावेत यासाठीही गुप्ते प्रयत्न करत आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या संस्था आणि शाळांशी बोलणी करून त्यांच्या माध्यमातून चांगले चित्रपट जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहचवण्याची त्यांची इच्छा आहे. चित्रपट आणि सामाजिक कार्य याचं उत्तम मिश्रण करून त्यांनी तयार केलेले त्यांचे हे कामाचे मॉडेल इतरांसाठी नक्कीच स्फूर्तिदायक आहे. त्यासाठी येत्या ९ मेला प्रदर्शित होणाऱ्या ‘हवा हवाई’ला चांगला प्रतिसाद मिळणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे.