13 August 2020

News Flash

‘मरुत्सखा’ अर्थात ‘हवाईजादा’

‘बायोपिक’ चित्रपटाचे ‘पीक’ मोठय़ा प्रमाणात मराठी-हिंदी रुपेरी पडद्यावर आले आहे. यातून ऐतिहासिक तसेच स्वातंत्र्यपूर्व काळातील महान व्यक्तींपासून ते जिवंत असलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींवरही चित्रपट...

| January 9, 2015 01:11 am

‘बायोपिक’ चित्रपटाचे ‘पीक’ मोठय़ा प्रमाणात मराठी-हिंदी रुपेरी पडद्यावर आले आहे. यातून ऐतिहासिक तसेच स्वातंत्र्यपूर्व काळातील महान व्यक्तींपासून ते जिवंत असलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींवरही चित्रपट बनविले जात आहेत. काल्पनिक कथानकांपेक्षा महान व्यक्तींचे जीवन, कार्य आणि संघर्ष निर्माते-दिग्दर्शकांना अधिक भावतो, असे म्हणता येईल. आतापर्यंत सिंधुताई सपकाळ, डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे, मिल्खासिंग, बालगंधर्व अशा कितीतरी वेगवेगळ्या क्षेत्रांतील जिवंत तसेच दिवंगत कर्तृत्ववान व्यक्तींवर चित्रपट आले असून ते गाजलेही आहेत. 

भारतीय विज्ञान-तंत्रज्ञानात योगदान देणाऱ्या व्यक्तींवर अजून ‘बायोपिक’ चित्रपट आलेले नाहीत. पण, राइट बंधूंच्याही आधी विमान बनवून ते उडविण्याचा प्रयत्न करणारे मुंबईकर शिवकर बापूजी तळपदे यांच्या या शोधावर आधारित ‘हवाईजादा’ हा चित्रपट ३० जानेवारीला प्रदर्शित होतोय.
यापूर्वी प्रख्यात भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्यावर तामिळ भाषेत २००४ साली चित्रपट आला होता. आता शिवकर बापूजी तळपदे यांच्या शोधावर आधारित चित्रपट हिंदीत झळकणार असून तळपदेंची मध्यवर्ती व्यक्तिरेखा आयुषमान खुराना साकारतोय. संजय लीला भन्साळी यांच्या ‘गुजारिश’ या चित्रपटाचे संवादलेखक आणि साहाय्यक दिग्दर्शक विभू पुरी यांचा स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून ‘हवाईजादा’ हा पहिला सिनेमा ठरणार आहे.
राइट बंधूंनी पहिल्यांदा विमान बनविले आणि विमानाचा शोध त्यांच्या नावावर असून ही घटना १७ डिसेंबर १९०३ रोजी घडली. परंतु, त्याच्या आठ वर्षे आधी म्हणजे १८९५ साली शिवकर बापूजी तळपदे या भारतीय शास्त्रज्ञाने विमानाचा शोध लावून मुंबईच्या चौपाटीवर या विमानाचे प्रात्यक्षिक केले होते. तळपदे यांनी ‘मरुत्सखा’ असे या विमानाला म्हटले होते.
‘वैमानिक शास्त्र’ किंवा ‘बृहद् विमानशास्त्र’ या प्राचीन ग्रंथानुसार हे विमान शिवकर तळपदे यांनी बनविले होते असे मानले जाते. याबाबत वाद असले तरी प्राचीन ऋषी भारद्वाज यांनी आपल्या संस्कृत ग्रंथामध्ये विमान बनविण्याच्या तंत्रज्ञानाचा उल्लेख केला आहे. याचआधारे मुंबई विद्यापीठात १०२ व्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये प्राचीन भारतीय हवाई तंत्रज्ञान या विषयावर परिसंवाद चांगलाच गाजला आहे.
शिवकर बापूजी तळपदे आणि त्यांच्या पत्नी यांनी चौपाटीवर १८९५ साली मनुष्यविरहित विमान उडविले होते. एकीकडे इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये यासंदर्भात बरीच चर्चा झाली असतानाच दुसरीकडे विभू पुरी या दिग्दर्शकाला तळपदे या भारतीय शास्त्रज्ञाच्या या धाडसाबद्दल, शोधाबद्दल सिनेमा बनवावा असे वाटले हा योगायोग म्हणावा लागेल.
शिवकर बापूजी तळपदे ही प्रमुख भूमिका एमटीव्ही रोडीजचा विजेता, लोकप्रिय अँकर आणि ‘विकी डोनर’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलेला आयुषमान खुराना साकारत आहे.
तळपदे यांनी जगातील पहिले विमान बनविले. असे विमान बनविणे हे कर्मकठीण काम होते हे नक्की. ‘हवाईजादा’ चित्रपट आणि त्यातील तळपदे यांची भूमिका साकारणे हेही माझ्यासाठी तेवढेच कठीण काम होते. आतापर्यंत मी सर्वसाधारणपणे उत्तर भारतीय तरुणाची भूमिका साकारत आलो आहे. आता प्रथमच एक महाराष्ट्रीय शास्त्रज्ञ तरुण साकारणार आहे. त्यामुळे आपली प्रतिमा बदलेल असा विश्वास आयुषमान खुराणाने व्यक्त केला आहे.
तळपदे यांच्या पत्नीच्या भूमिकेत पल्लवी शारदा दिसणार आहे. विमान बनवून उडविले एवढीच एक क्रांतिकारक घटना असली तरी त्यामागची तळपदे यांची मानसिकता, त्यांचे कष्ट आणि स्वातंत्र्यपूर्व काळातीले तत्कालीन वातावरण, इंग्रजांच्या राजवटीविरोधातील धुमसते वातावरण अशी पाश्र्वभूमीही चित्रपटाला आहे. तळपदे हे मराठी व्यक्तिमत्त्व असल्यामुळे दिग्दर्शकाने सौरभ भावे यांच्या मदतीने कथा-पटकथा विकसित केली आहे. तळपदे तळपदे यांचे मार्गदर्शक सुब्बराय शास्त्री यांच्या भूमिकेत मिथुन चक्रवर्ती दिसणार आहेत.
सुनील नांदगावकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2015 1:11 am

Web Title: hawaijada
Next Stories
1 मेसेज – द मेसेंजर ऑफ गॉड
2 दक्षिणी रिमेकचा ‘तेवर’
3 तितली
Just Now!
X