01khadiwaleपावसाळा, उन्हाळा, हिवाळा अशा वेगवेगळ्या हवामानकाळात आपली काळजी कशी घ्यायची? चालण्याचा व्यायाम कसा करायचा? कधी करायचा? सौंदर्यप्रसाधनं वापरायची की वापरायची नाहीत?

आपल्या रोजच्या जीवनातल्या काही गोष्टींमुळे आपल्याला त्रास होतो. अर्थात हा त्रास होतो ते निव्वळ त्यापासून बचाव कसा करायचा हे माहीत नसल्यामुळे. म्हणूनच आपल्याला माहीत असायलाच हव्यात अशा काही गोष्टी पुढे देत आहे.

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Clean Intestine In 20 Minutes In Morning With These Simple Five Asanas How Much Luke Warm Water To Drink First After Waking Up
Video: सकाळी उठताच १५ मिनिटांत पोट स्वच्छ होण्यासाठी करा ‘या’ पाच कृती; कोमट पाणी पिण्याचं प्रमाणही पाहा
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
article about society s attitude towards sports careers
चौकट मोडताना : सहज स्वीकार नाहीच

ओल
दमा, सर्दी, पडसे, खोकला, क्षय, बारीक ताप, संधिवात, आमवात, अर्धागवात, पाठदुखी, गुडघे, खांदे किंवा कंबरदुखी, सूज, मुंग्या, कंड, त्वचाविकार इत्यादी रोगांना घरातील ओल, आसपासचा पाण्याचा तलाव, गार फरशी, सभोवतालची भरपूर झाडे व या सर्वाचा शेजार किंवा ओल टाळता येत नाही. त्यांनी निदान काही गोष्टी पाळाव्या, पायात सतत चप्पल असणे, अंगात स्वेटर, मफरल असणे, जेवणात आले, सुंठ, पुदिना, लसूण व तुळशीची पाने, हळद असणे आवश्यक आहे.

गार वारे
गार वारे विशेषत: पूर्वेकडचा गार वारा प्राणवह स्त्रोतसाचे दमा, खोकला, सर्दी, आवाज बसणे, कानाचे विकार, लाली, पाणी येणे, कमी दिसणे, खुपऱ्या, त्वचेच विकार, खाज, अ‍ॅलर्जी, त्वचा काळी पडणे, वाताचे व हाडांचे विकार, पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी, आमवात अशा अनेक रोगांचे कारण आहे. त्याकरिता वरीलप्रमाणेच मफरल, स्वेटर वा शाल इत्यादींनी संरक्षण करणे व तुळस, लसूण, पुदिना, आले या पदार्थाची शरीरात ऊब निर्माण करणे आवश्यक आहे.

धूळ
धुळीच्या अ‍ॅलर्जीमुळे भलेभले सर्दी, पडसे, दमा, खोकला या विकारांनी पछाडले जातात. नाक चोंदते किंवा बंद होते, सतत वाहते. त्याकरिता नाकाचा भाग रुमालाने किंवा मफरल बांधून संरक्षित ठेवावा. तुळशीची पाने खाणे, दीर्घश्वसन व नाकाला आत तूप लावणे यांचा उपाय करावा. नाकाची रोग प्रतिकारशक्ती वाढवावयास हवी. त्याकरिता वेखंड कांडी सहाणेवर पाण्यात उगाळावी. ते गंध चमच्यात गरम करावे. नाकाच्या शेंडय़ावर बाहेरून लावावे. त्या गंधाचे नस्यही करावे.

कोंदट हवा
कोंदट हवेत नेहमी राहण्याने पांडू, क्षय, वजन घटणे, बारीक ताप, सांध्याचे विकार, दमा, खोकला असे प्राणवायूच्या अभावाचे विकार उत्पन्न होतात. त्याकरिता दीर्घश्वसन, प्राणायाम, तुळशीची पाने खाणे याबरोबरच अशा हवेत धूप, ऊद, वेखंड, ओवा, शोपा, निरगुडी यांची धुरी अधूनमधून करावी.

अतिऊन
सगळेच रोग जेवणखाण्यात कमी-अधिकपणे होतात असे नाही. अनेक रोगांचे मूळ आपल्या राहण्यासभोवतालचा परिसर, हवा, ऊन, पाऊस, पाणी, थंडी, वारा यावर अवलंबून असते. त्याचप्रमाणे आपल्या परिसरात, आपल्या राहणीत, निवासात किंवा दैनंदिन कार्यक्रमांत बदल केला तरी रोगांवर उपाय सापडतो. ऊठसूट औषधांकरिता दवाखान्यांत पळावे लागते असे नाही.
अति उन्हात काम करण्याची ज्यांना सवय आहे त्यांना सहसा उष्णतेचे, पित्ताचे, रक्ताचे, त्वचेचे विकार होत नाहीत. त्यांना त्याच्यापासून बचाव करण्याचे काही मार्ग माहीत असतात. उदाहरणार्थ, वारंवार भरपूर पाणी पिणे, टोपीत किंवा काखेत कांदा ठेवणे, धण्याचे पाणी पिणे, काम विभागून करणे इत्यादी. उत्तर हिंदुस्थानात अतिउन्हामुळे सनस्ट्रोक, मेंदूला इजा पोहोचणे, विलक्षण थकवा येऊन दुबळेपणा अशा क्वचित कथा ऐकायला मिळतात. असे होऊ नये म्हणून तिकडे पुदिन्याचे थंडाई सरबत पिण्याचा प्रघात आहे. आपल्याकडे तुळशीच्या बियांची खीर हा उपाय आहे. अति उन्हामुळे शरीरातून ताकद गमावली जाते. त्याकरिता कोहळा रस, उसाचा रस, काकडी, कोथिंबीर, मनुका, ताडफळ असे ज्यांच्या त्यांच्या ऐपतीप्रमाणे व उपलब्धतेनुसार उपाय आहेत. अतिउन्हात काम झाल्यानंतर हातापायाची आग, भगभग, डोळय़ांचा दाह, लाली, दृष्टिक्षीणता, निद्रा कमी होणे, याकरिता एरंडेल, खोबरेल किंवा चांगले तूप; कानशिले, हातपाय, डोके, डोळय़ांच्या बाजूला हलक्या हाताने जिरवावे. अतिकफाच्या विकारात काही प्रमाणात अतिऊन वाईट नाही. विशेषत: क्षय, प्लुरसी या विकारांत अतिउन्हात वावर हा एक उपायच आहे. कफ प्रकृतीच्या स्थूल, बलवान व्यक्तींनी अति उन्हाचा वापर घाम निघण्याकरिता जरूर करावा. ज्यांना तीव्र ऊन चालत नाही अशा क्षयी किंवा कफग्रस्त रुग्णांनी सकाळी नऊ-दहा वाजेपर्यंत कोवळे ऊन पाठीवर घ्यावे. सूर्यप्रकाशात अनेक जीवनसत्त्वे आहेत.

अतिश्रम
तारुण्याच्या मस्तीत अतिश्रम एखादे वेळी किंवा काही काम केले तर खपून जातात. पण सदासर्वदा सर्वच ताकद पणाला लावून काम करू नये. ‘सिंह आपल्या ताकदीवर हत्तीचा पराभव करतो, पण स्वत:ची ताकद गमावतो’ असे संस्कृत सुभाषित आहे. त्याकरिता आपल्या ताकदीच्या निम्मीच ताकद खर्च होईल असे श्रम नेहमी करावेत. अतिश्रमाने क्षय, राजयक्ष्मा, छातीत दुखणे, गुडघे, खांदा, मान, पाठ यांचे वाताचे विकार उत्पन्न होतात. भगंदर, मूळव्याध, पोटदुखी, अल्सर, आम्लपित्त, हृद्रोग, रक्तदाबक्षय, पांडू, संधिवात, जीर्णज्वर हे विकार बळावतात. अतिश्रम होणार असतील तर त्या मानाने तूप, तेल, शेंगदाणे, उडीद, मूग, साखर, दूध, फळे असा झीज भरून येणारा आहार व मिळेल तेवढी विश्रांती व झोप याकडे लक्ष असावे.

रात्री फिरणे
चाळिशीतल्या वयानंतर बहुधा सर्व शहरवासीयांना, सुखासीन किंवा श्रमिकांना पोटाचा त्रास सुरू होतोच. वायू धरणे, पोट साफ न होणे, जेवणानंतर शौचाला लागणे, पोट डब्ब होणे, एवढय़ा-तेवढय़ा खाण्याने पोटाला तडस लागणे, सकाळी पोट साफ न होणे, शौचाला चिकट, आमांश किंवा खडा होणे इत्यादी वायूंचा प्रकोप झाल्याच्या रोगांचा प्रादुर्भाव या काळात सुरू होतो. सगळय़ा आरोग्याची, स्वास्थ्याची मजा निघून जाते. या साध्या विकारांव्यतिरिक्त आम्लपित्त, ‘अंग बाहेर येणे, उलटय़ा, निद्रानाश, रक्तदाबवृद्धी, मधुमेह, मूळव्याध, लठ्ठपणा, शय्यामूत्र, सगळय़ा अंगावर सूज येणे या विकारांतही रात्री फिरणे- किमान पंधरा-वीस मिनिटे फार फलदायी आहे. जेवणानंतर शतपावली करावी असे म्हणतात. त्याऐवजी किमान तीन-चार हजार पावले चालावे, सावकाश चालावे. हे चालणे चालू असताना वायू तर मोकळा होतोच. शिवाय आल्या आल्या अंथरुणाला पाठ लागली की उत्तम झोप लागते. या फिरण्यामुळे मनातील वाईट विचार घराबाहेर राहतात. डोक्यातील वायू निघून जातो. स्वप्ने खूप पडण्याची सवय आहे त्यांनी रात्री अवश्य फिरावे. स्वप्ने पडत नाहीत, उत्तम झोप लागते. बैठय़ा कामामुळे ज्यांचे अन्नपचन होत नाही. व्यायामाचा अभाव आहे. झोपेच्या गोळय़ा घेऊनच ज्यांना झोप येते त्यांनी हा रात्री फिरण्याचा प्रयोग अवश्य करावा. काही लोक सकाळी फिरायला जातात. ते योग्यच आहे. पण रात्रीचे फिरणे हे ‘रोगनिवारणा’करिता आहे, हे जरूर लक्षात ठेवावे.

सकाळी फिरणे
पित्तप्रकृती, कृश व्यक्ती, पांडू, हर्निया, हृद्रोग, क्षय, दमा, जुलाब, रक्तदाबक्षय, छातीत दुखणे, ताप, सर्दी-खोकला, कफ, सायटिका, सायंकाळी अंगावर सूज येणाऱ्या रुग्णांनी रात्री फिरणे टाळावे.
‘सकाळी फिरणे’ कसे आवश्यक ते सांगण्याची गरज नाही. मात्र सकाळी फिरणे हे रोगनिवारणापेक्षा ‘आरोग्यरक्षणाकरिता’ आहे. सकाळी आपण उठतो तेव्हा आपली सर्व इंद्रिये विश्रांती घेऊन ताजीतवानी झालेली असतात. मोकळी हवा घेऊन फुप्फुसे अधिक कार्यक्षम करता येतात. चक्कर येणे, छातीत दुखणे, रक्तदाबक्षय, क्षयविकारांच्या रुग्णांनी सावकाश का होईना सकाळी थोडे तरी फिरावयाचा प्रयास करावा. त्यामुळे त्यांच्या फुप्फुसाची ताकद वाढते. स्थौल्य, मधुमेह, अंगाला खाज येणे, आमवात, अग्निमांद्य, उदरवात, मलावरोध, आमांश, बैठे काम असणाऱ्यांनी किमान पंधरा मिनिटे किंवा दोन किलोमीटर फिरून यावे. या फिरण्यामुळे खूप घाम यावा व त्याचे श्रम व्हावेत अशी अपेक्षा नाही. फिरून आल्यावर लगेचच घाईघाईने स्नान करू नये. तसेच या फिरण्यानंतर चहा पिऊन फिरण्याचे गुण घालवू नयेत. चहा-कॉफी ही पेये अनेक रोगांची कारणे आहेत. त्यापेक्षा जिरेमिश्रित तांदळाची पेज घ्यावी किंवा गरम पाण्यात लिंबूपाणी वा सरबत घ्यावे. चांगल्या आरोग्याकरिता सकाळी फिरावयास जात असलात तर कृपया तोंडाला ‘कुलूप’ लावावे.

बैठे काम
बहुसंख्य शहरवासीयांना निरनिराळय़ा कार्यालयांमधील ‘बैठे कामच’ भरपूर असते. बैठय़ा कामामुळे अन्नवह स्रोतसाचे अनेक विकार उत्पन्न होतात. त्या बैठय़ा कामाला सिगारेट, विडी, अधिक चहापान याची जोड असली तर मूळव्याध, भगंदर, उदरवात, अम्लपित्त, अल्सर, मलावरोध, गॅस, अपचन, स्थूलपणा या सगळय़ा विकारांना सुरुवात होते. पूर्वीच हे विकार असले तर ते विकार वाढतात. पाठदुखी, गुडघेदुखी, पायावर सूज, मुंग्या येणे, मधुमेह, खाज येणे हे विकार सुरू होऊ शकतात. त्याकरिता लक्ष जरूर असावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी ऑफिसमधून परत जाताना पायी जावे. खूप खूप काळ बैठे काम केले तर गुदभाग उबतो. त्यामुळे मूळव्याध हा विकार होऊ शकतो. त्याकरिता आवश्यक अधेमधे उठावे. शक्य असल्यास वेताची खुर्ची किंवा भोके असलेली खुर्ची वापरावी.

झोपून, अतिबारीक वाचन
दिवसेंदिवस डोळय़ांचे दृष्टीचे, अंधत्वाचे विविध विकार वाढत आहेत. शहरी राहणी, तथाकथित मॉडर्न खाणे-पिणे यामुळे डोळय़ांचे विकार होतातच. मधुमेह व रक्तदाब वाढतो. यामुळे दृष्टी कमी होणे, अजिबात न दिसणे, पूर्ण अंधत्व या विकारांची वाढती संख्या ही नेत्रतज्ज्ञांच्या चिंतेची बाब झाली आहे.
कदाचित मधुमेह व वाढता रक्तदाब हे टाळता येण्यासारखे नसतील पण झोपून वाचन, प्रवासात गतिमान वाहनात वाचन व अतिसूक्ष्म वाचन हे टाळता येण्यासारखे आहे.
काहींना कथा, कादंबऱ्या, पुस्तके, वर्तमानपत्रे, मासिके झोपून वाचायची सवय असते. या झोपून वाचण्याच्या सवयीने दोन मोठे दोष उद्भवतात. झोपून वाचण्यामुळे फार जवळ घेऊन पुस्तक वाचावे लागते, त्यामुळे ऱ्हस्व दृष्टी वाढतेच व कालांतराने जास्त वेळ वाचवत नाही. चष्म्याचा नंबर बदलत राहतो. मुख्य म्हणजे झोपून देहाला जी विश्रांती अपेक्षित आहे ती मिळत नाही. मेंदूला रक्तपुरवठा जास्त व्हावा लागतो, त्यामुळे चक्कर, तोल जाणे इत्यादी तक्रारी संभवतात.
काही अति ‘बिझी’ व्यक्तींना स्वत:च्या कारमध्ये ऑफिसातील कागदपत्रे वाचायची सवय असते. मुंबई-पुणे शहरांतील अनेक उद्योगपती, बँकर्स, वकील, सल्लागार, पत्रकार, धनिक लोक हे आपल्या प्रवासातील वेळ निवांत वाचन करण्याकरिता उपयोगात आणतात. उद्देश स्तुत्य आहे, पण त्यामुळे डोळय़ांत लाली येणे, नेहमी लाली येऊन रक्त साकळणे, दृष्टी क्षीण होणे इत्यादी पडद्याचे विकार उत्पन्न होतात. डोळय़ांमध्ये वायूच्या जोडीला पित्तप्रकोपाची जोडी मिळून अनेकांची दृष्टी कायमची गेल्याची उदाहरणे आहेत. गतिमान वाहनांत सहजपणे डोळय़ाला ताण पडणार नाही इतपत वर्तमानपत्रे, नियतकालिके यांच्या हेडलाइनचे ‘कॅज्युअल’ वाचन मी समजू शकतो, पण बारीक वाचन, लहान आकाराची आकडेमोड, सूक्ष्म टाइपामध्ये केलेले ड्राफ्टस्वाचन यामुळे दृष्टी अकाली गमावून बसायची पाळी नक्की येते.

पूर्ण विश्रांती
रक्तदाबक्षय, चक्कर येणे, पांडूता, जिना चढून धाप लागणे, डोळय़ाच्या पडद्याचे विकार, पोटदुखी, कावीळ, जलोदर, यकृत प्लीहावृद्धी, हृद्रोग, हृदयविस्तृती, पाठीच्या मणक्याची झीज, स्लिप डिस्क, हाडांचा क्षय या विकारांत ‘पूर्ण विश्रांती’ उपयुक्त आहे. शक्य झाल्यास उताणे पडून राहावे. झोपेव्यतिरिक्त नुसते ‘स्वस्थपणे’ तासभर पडून राहण्याने अधिक काम करावयास वाव राहतो. या आसनाला शवासन असे म्हणतात. ‘रिलॅक्सड् फ्रेम ऑफ माइंड’ असे सर्व स्नायू सैल सोडून निर्विकार, निर्विचार शवासन दिवसातून एकदा तरी करावेच.

दीर्घकाळ टीव्ही बघणे
बराच काळ आपल्या देशात टीव्हीचा वापर फक्त दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नईपुरता होता. तेव्हा आम्हा भारतवासीयांना आपण फार ‘मागासलेले’ आहोत असे वाटत होते. आता हा ‘इडियट बॉक्स’ भारतभर घरोघरी, दारोदारी, खेडोपाडी सर्वत्र पोचला आहे, पोचत आहे. ज्यांना उद्योग आहे व नाही अशी लहान-थोर, म्हातारी-कोतारी, घरातील कर्ती माणसे, स्त्रिया सर्वजण टीव्हीला कसे चिकटून बसतात! त्या टीव्हीला काहीही कार्यक्रम असला तरी तो या लोकांना चालतो. आपण किती जवळून टीव्ही पाहावा, किती वेळ पाहावा याचे काही ताळतंत्रच नाही. एकेका सुट्टीच्या दिवशी ‘लगातार’ तीन-तीन सिनेमे पाहणारी मंडळी पुणे-मुंबईत आहेत. त्यांचे डोळय़ांचे विकार वाढतात. नंबर वाढतो. थोडे लिखाण-वाचन त्रास देते. डोकेदुखी, डोळे लाल होणे, डोळय़ांचा थकवा इत्यादी तक्रारी सुरू होतात. अशा नाना तऱ्हेच्या डोळय़ांच्या चुकीच्या वापराबरोबर, काहींना नाइलाज म्हणून खूप वाऱ्यात मोटारसायकल किंवा स्कूटरवर प्रवास करावा लागतो. काहींचा प्रवास खूप धूळ असलेल्या भागांत, खराब रस्त्यावर असतो. काहींना रणरणत्या उन्हात, भर उन्हाळय़ात विशेषत: मे व ऑक्टोबरमध्ये प्रवास करावा लागतो. या सर्व प्रकारच्या कारणांनी प्रथम डोळे तळावतात, दृष्टीचा थोडा त्रास होतो. मग एकदम केव्हा तरी दृष्टीपडद्याचा विकार सुरू होतो. मग पडदा सरकणे किंवा ‘डिटॅचमेंट ऑफ रेटिना’ हा गंभीर विकार उत्पन्न होतो.
वरील सर्व विकारांत कारणे टाळावीतच, पण ज्यांना शक्य नाही त्यांनी रोज रात्री झोपताना तळपाय, तळहात, कानशिले यांना हलक्या हाताने चांगले तूप जिरवावे. उठल्याबरोबर व झोपताना गार पाण्याने डोळे धुवावेत. गार पाण्याने डोक्यावरून आंघोळ करावी. शक्य तेवढी डोळय़ांची काळजी ऊन व वारे यापासून घ्यावी.

लिपस्टिक
काही रोग आपण विकत घेत असतो. आपण आपल्या शरीराची हानी करतो, हे प्रथम लक्षातच येत नाही. नकळत आपण चूक करतो. शरीराला त्रास होतो आणि मग आपण त्याकरिता औषध शोधतो.
लिपस्टिक हा सौंदर्यप्रसाधनाचा प्रकार असा आहे की, शहरी संस्कृतीत तरुण मुली व मध्यमवयीन स्त्रियांत नकळत ओठाच्या त्वचेचा रंग बिघडवणारा आहे.
खरं म्हणजे लिपस्टिकने ओठ रंगविलेल्या स्त्रियांची लिपस्टिक ओळखता येते. त्यांच्या चेहऱ्याच्या सौंदर्यात फार फरक पडलेला जाणवतही नाही. उलट ओठ पुढे पुढे पांढरट होत जातात. लिपस्टिकचे कृत्रिम रंग हे ओठांना कोरडे करतात. काहींचे ओठावर कोडासारखे पांढरे डाग दिसू लागतात. किंवा ओठ एकदम काळपट पडतात. यावरचा उतारा चांगले तूप किंवा साय, लोणी हा आहे. तांब्याच्या परातीत तांब्याच्याच भांडय़ाने थोडय़ा पाण्यात पुन:पुन्हा तूप घोटावे. पाणी बदलावे. असे शंभर वेळा पाणी बदलून घोटलेले तूप ओठांच्या विकृतीत लावावे. लिपस्टिकच्या गैरवापरावरचा हा एक उत्तम उतारा आहे.

मेंदी
‘मेहंदी लगे मेरे हाथ’ हा महिलांचा मोठा आवडीचा विषय आहे. एककाळ पंजाबातील अमृतसर भागात टॉप क्वालिटीची मेंदी लागवड होत असे. अभ्यासकांनी त्याकरिता ‘वेल्थ ऑफ इंडिया’ याचा संबंधित भाग जरूर वाचावा. मेंदी हा विषय असाच चमत्कारिक आहे. ‘राजस्थानी मेंदी’ म्हणून जाहिरात होत असलेली पावडर ही मुळात मेंदी पावडर नव्हेच. कोणत्याही पानांचे चूर्ण व बहुधा चुना, हळद असे मिश्रणाची ती मेहंदी असते. राजस्थानात बाजारात मेंदीची जेवढी मागणी आहे तेवढय़ा महाप्रचंड प्रमाणावर मेंदी होतच नाही. मेंदीचा धंदा करणारे मेंदी या नावाने काय बनवतात यावर संशोधन हवे. असो. ही मेंदी काही स्त्रिया केसांकरिताही वापरतात. त्यामुळे कपाळ, कानाचा भाग यावर सोरायसिससारख्या खरपुडय़ा येतात. ज्यांना केमिकल्सची अ‍ॅलर्जी आहे त्यांना नवीन रोग मिळतो. हाताच्या नखांना व इतर ठिकाणी त्वचेचा रंग खराब होतो. त्यावर वरीलप्रमाणेच ‘शतधौत घृत’ लावावे.
फसव्या मेंदीमुळे ज्यांच्या केसांचे आरोग्य बिघडले आहे, केस अधिक पांढरे झाले आहेत, त्यांनी केस धुण्याकरिता आवळकाठी चूर्ण वापरावे. त्यामुळे केसांना नवीन जीवन प्राप्त होते. केस मुलायम होतात. मेंदीमुळे केसांत खवडे झाले तर शिकेकाईमध्ये बावची बियांचे चूर्ण मिसळून त्या पाण्याने केस धुवावेत.

नेलपॉलिश
नेलपॉलिश लावण्याने काहींची नखे चांगली दिसत असतील, पण नखांचे कुनख किंवा नखे फुटणे, तडकणे हे विकार काही काळाने होतात. मुळात रक्तवर्धक आहार नियमितपणे घेतला तर नखे तजेलदार दिसतात. त्यांना रंगवून बटबटीत करायचे कारण नाही. खराब नखांना शतधौत घृत, चंदनगंध, खोबरेल तेल लावावे.
शहरी जीवन व त्याबरोबर लहान लहान नगर, गावातून कृत्रिम सौंदर्यप्रसाधनांचे फॅड वाढत चालले आहे. शरीराचे आरोग्य व मनाचे सौंदर्य यांचा विचार कोणालाच नको आहे. तरुण मुले-मुली चेहरा सुंदर दिसावा, डाग लपावे, खड्डे बुजावे, मुरुमे जावी म्हणून किती खटाटोप करत असतात. बघून वैताग येतो. त्याकरिता तथाकथित सौंदर्य पॅक, व्हॅनिशिंग क्रीम, काल्डक्रीम अशा गोष्टींवर वायफळ खर्च होत असतो. त्यांच्यापासून काडीचाही फायदा न होता त्वचा खूप जाडजूड, अधिक रूक्ष होते. तुम्ही काही दिवसांचे बारा तास चेहरा चोपडून किंवा रंगवून बसू शकत नाही. या कृत्रिम सौंदर्यप्रसाधनांऐवजी चेहऱ्याचा तजेलपणा, खड्डे, पुटकुळय़ा, तेलकटपणा याकरिता अनुक्रमे दुधावरची साय, तूप, चंदन किंवा हळद उगाळून त्याचे गंध व हळद चूर्णाचा लेप याचा वापर करावा. चेहऱ्याचे फोड न फोडणे, साबण, सोडा चेहऱ्यास न लावणे ही तर काळजी घ्यावीच, पण त्याचबरोबर पेट्रोलियम पदार्थापासून बनत असलेल्या सर्व कृत्रित प्रसाधनांना लांब ठेवावे.

टूथपेस्ट
आपला समाज चुकीच्या मार्गाने वाटचाल करीत आपल्या व पुढील पिढय़ांची वाट कशी लावत आहे हे बघावयाचे असेल तर टूथपेस्टचा वाढता वापर बघा. शहरांच्या सीमा ओलांडून टूथपेस्ट व ब्रश गावोगाव, घरोघर पोचत आहेत. टी.व्ही.वरील आक्रमक जाहिरातींमुळे कोलगेट, प्रॉमीस, फोरान्स इत्यादी टूथपेस्ट पोरेसोरे वापरत आहेत. आम्हाला देशी दातवण, बाभूळ, खर, कडुनिंब यांच्या काडय़ा वापरायची लाज वाटते. टूथपेस्टमध्ये दातांच्या आरोग्याचे नाव नसते असे सरकारी रिपोर्टच सांगतात. लवंगीची जाहिरात करून खपवणारी कंपनी खरोखर किती लवंग वापरते याचा तपास लावावयास हवा. जाणत्या वाचकांनी टूथपेस्टवर बहिष्कार टाकावा. आपले दातांचे आरोग्य सांभाळावे. आपल्या घरातील कच्च्याबच्च्यांना आदर्श घालून द्यावा. आपल्या दातांच्या आरोग्याकरिता कडुनिंब आंतरसाल, खरसाल, हळद, गेरू , कापूर अशा घटकद्रव्यांचे दंतमंजन जरूर वापरावे.

शिकेकाई
तरुण मुले-मुली आपले केस गळणे कसे थांबेल, केस तेलकट कसे दिसणार नाहीत, कोंडा कसा कमी होईल, टक्कल पडणार नाही ना या विलक्षण चिंतेत असतात. कलप, शांपू व कृत्रिम केशतेल, जाहिरातींना भुलून वापरतात. त्यामुळे केस सुधारण्याऐवजी अंती केसांच्ी मुळे कुमकुवत होतात. केसांची गळती वाढते. केस अधिक पांढरे व रूक्ष नि:सत्त्व होतात. म्हणून या फसव्या दिखाऊ, शांपू व तेलांपेक्षा शिकेकाई वापरा. आवळकाठी, बावची, नागरमोथा, कापूर काचरी, शिकेकाई अंशाची घटकद्रव्ये असणारे ‘केश्य चूर्ण’ केस धुण्याकरिता वापरले तर केसातील कोंडा (डॅन्ड्रफ), खरबा, खवडे, खपल्या नाहीशा होतात. केसांत कोंडा असेपर्यंत कोणतेही तेल केसांना लावू नये.
वैद्य प. य. खडीवाले वैद्य response.lokprabha@expressindia.com