प्रत्येकाने आरोग्याबाबत जागरूक असणं उत्तमच. पण अनेकदा न झालेल्या आजारांबाबत काही जण अती काळजी करतात, तर मोठय़ा आजाराकडे घरगुती उपचार करून दुर्लक्ष करतात. कधी, कोणती काळजी घ्यायला हवी, यात अनेकांची गल्लत होते. त्याविषयी..

अनेकदा वर्तमानपत्रं, मासिकं चाळताना एखादा आरोग्यविषयक लेख हाती पडतो. आरोग्यविषयक कोणताही मजकूर हमखास वाचलाही जातोच. कारण त्यामध्ये आवश्यक अशी माहिती दिली जाते. तसंच काही आजारांची लक्षणं, त्यावरचे घरगुती उपाय अशा अनेक गोष्टी त्यामध्ये समाविष्ट असतात. सगळेच आरोग्याबाबत जागरूक असतात. त्यामुळे अशी माहिती लोकांसाठी महत्त्वाची ठरते. पण त्यामध्ये दिलेल्या विशिष्ट आजारांची लक्षणं वाचून एखादा माणूस त्याला होणाऱ्या त्रासचं निदान ‘आपल्याला हाच आजार झालाय’ असं स्वत:च करतो. आणि पुढची सगळी गणितं चुकायला इथूनच सुरुवात होते. बारीकसा त्रास मोठमोठय़ा आजारांचं आपणहून आमंत्रण देतो. काही झालं नसलं तरी खूप काही झालं असावं या अंदाजाने अनेक जण स्वत:च गोष्टींचा बाऊ करतात. मग काही वेळा घरगुती उपचार सुरू करतात. याचा परिणाम उलटही होऊ शकतो. लहानशा आजारांवर चुकीच्या पद्धतीने उपचार केल्यामुळे मोठय़ा, गंभीर आजाराची सुरुवात होऊ शकते. त्यामुळे घरगुती उपचार ही संकल्पना फायद्याची ठरत असली, तरी ती विशिष्ट मर्यादेपर्यंतच योग्य असल्याचा महत्त्वाचा सल्ला डॉक्टर देतात. आजारांविषयी, लक्षणांविषयी रुग्णांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती असते. ही भीती त्याबाबत असणाऱ्या समज-गैरसमजांमुळेच असते. म्हणून कोणत्याही आजारावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय सल्ला आवश्यक असतो.

सेल्फ मेडिकेशनमध्ये तरुणांचं प्रमाण जास्त
आजचं युग हे इंटरनेटचं आहे. ‘जिसका कोई नहीं होता, उसका गुगल होता है’ असं तरुण पिढी म्हणत असते. कोणतीही माहिती हवी असेल तर ती आज एका क्लिकवर सहज मिळते. त्यामुळे त्यांना होणारा त्रास कशामुळे, का, परिणाम, उपचार या सगळ्याचा त्या एका क्लिकवर ते अभ्यास करतात. त्यात दिलेले सल्ले, उपचार याची अंमलबजावणीही केली जाते. तिथे दिलेल्या औषध-उपचारांनी तात्पुरतं बरंही वाटतं. त्यामुळे तो त्रास वारंवार झाल्यास तीच औषधं घेतली जातात. आजच्या तरुण पिढीचा सर्वाधिक त्रास म्हणजे अंग, मान, पाठ, डोळे दुखणं. याचं कारण म्हणजे त्यांच्या कामाचं स्वरूप. बारा-तेरा तास एसीमध्ये कॉम्प्युटरसमोर बसून काम केल्यावर अशा प्रकारचा त्रास होणं स्वाभाविक आहे. अशी दुखणी वाढली की ही पिढी औषधोपचार करू लागते. त्या औषधांनी आराम वाटत असल्यामुळे ती औषधं पुन्हा घेतली जातात. या दुखण्याच्या मुळाशी जाऊन मात्र विचार केला जात नाही. बरेच तास कॉम्प्युटरसमोर काम करीत असलात तरी दर दोन तासांनी उठून चालणं, मानेची, हाताची, डोळ्यांची हालचाल करणं सहज शक्य असतं. पण ते केलं जात नाही. झोप लागत नाही म्हणूनही गोळ्या घेतल्या जातात. अशा प्रकारच्या औषधांचं सेवन वारंवार केल्यास त्याचं व्यसनच लागतं. तरुणाईच्या या पिढीमध्ये सगळं काही ‘इन्स्टंट’ हवं असल्यामुळे त्यांच्यामध्ये सेल्फ मेडिकेशनचं प्रमाण जास्त आहे.

‘आपल्याला तोच आजार झालाय’ या समजुतीला ‘सायकोसोमॅटिक’ असं म्हणतात; असं डॉ. अरुण बाळ सांगतात. अशा समजुतीबाबतही ते म्हणतात, ‘विशिष्ट आजाराचे आपण बळी आहोत, अशी समजूत काही रुग्णांच्या मानसिक ताणामुळे बळावते. अशा रुग्णांची मानसशास्त्रीय तपासणी करणं आवश्यक असतं. कारण तो फक्त एक गैरसमज नसतो, तर तशा मानसिकतेमागे विशिष्ट कारणं असतात. केवळ गैरसमजुतीमुळे कोणताही आजार होत नाही.’ गैरसमजुतीसोबतच अंधश्रद्धा हाही एक महत्त्वाचा मुद्दा असल्याचं डॉ. बाळ सांगतात. ‘मधुमेह असलेले रुग्ण कालांतराने आयुर्वेदिक चिकित्सेकडे वळतात. याचं कारण असं की, अॅलोपॅथीची औषधं सुरू केल्यास ती आयुष्यभर घ्यावी लागतात. तसंच त्याचे दुष्परिणामही होतात; हा आणखी एक समज त्यांच्या मनात असतो. पण आयुर्वेदिक औषधांचेही तितकेच दुष्परिणाम होतात, याची पुरेशी माहिती त्यांच्याकडे नसते’, असं ते सांगतात. हा महत्त्वाचा मुद्दा नमूद करताना डॉ. प्रदीप आवटे सांगतात, ‘जे लोक स्वत:बद्दल अती जागरूक असतात त्यांच्यामध्ये विशिष्ट आजारांविषयीचे समज-गैरसमज अधिक प्रमाणात बळावतात. त्यांच्या अशा स्वभावामुळे मानसिकता तयार होते. आणि त्यामुळे ‘आपल्याला तो आजार झालाय’ ही समजूत व्हायला वेळ लागत नाही. अलीकडच्या काळात ‘गुगल’ हे या सगळ्या मानसिकतेमागचं महत्त्वाचं कारण झालंय. अनेक रुग्ण आमच्याकडे येतात तेव्हाच सगळी माहिती घेऊन येतात. तेच आम्हाला सांगतात, ‘मला हा त्रास होतोय. हा आजार तर नसेल ना?’ मग आम्ही त्यांना असं सांगतो, ‘यू आर सफरिंग फ्रॉम गुगलायटिस’’

महत्त्वाचे मुद्दे :

  • सेल्फ मेडिकेशन दोन दिवसांपेक्षा जास्त नसावं. दोन दिवसांनंतरही होणारा त्रास थांबला नाही तर मात्र योग्य त्या सल्ल्यासाठी डॉक्टरांकडे जावं.
  • डॉक्टरांच्या एका निदानाच्या वेळची औषधे कालांतराने पुन्हा तोच आजार झाल्यास वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेऊ नयेत.
  • आयुर्वेदिक चिकित्सा घेताना औषधांचा दुष्परिणाम होत नाही ही समजूत चुकीची आहे.
  • इंटरनेट, जाहिरात अशा माध्यमांमध्ये आजारांविषयी वाचलेल्या-ऐकलेल्या माहितीवर पूर्ण विश्वास ठेवू नये.
  • अॅलोपॅथी उपचार सुरू असताना आयुर्वेदिक चिकित्सेकडे वळणे हे अयोग्य नाही. पण दोन्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच निर्णय घ्यावा.
  • महिन्यातून एकदा नियमित आरोग्य चाचणी होणं गरजेचं असतं.

काही वेळा होणाऱ्या त्रासाची तीव्रता कमी असली, तरी त्याचा बाऊ केला जातो. काही तरी मोठा आजार असेल अशी शंका मनात येते. तर काही वेळा याच्या उलट घडतं. साधा आजार दुर्लक्ष केल्यामुळे गंभीर स्वरूपाचा होऊ शकतो. मायग्रेन या आजाराबाबत अनेकदा गैरसमज होत असतात. एका बाजूने डोकं दुखणं, झोपून राहणं, थकवा येणं, उजेड सहन न होणं अशी लक्षणं वाचली की आपल्याला मायग्रेन झालाय असा काही रुग्णांचा समज होतो. वास्तविक केवळ अशा लक्षणांवरून स्वत:च विशिष्ट आजाराचं निदान करणं चुकीचं आहे. अशा पद्धतीची डोकेदुखी वेगवेगळ्या कारणांमुळे असू शकते. ब्रेन टय़ुमर, स्ट्रेस, सर्दी यामुळेही डोकं दुखू शकतं. तसंच थकवा येणं हे मानसिक ताणाचंही लक्षण आहे. त्यामुळे ही लक्षणं नेहमी मायग्रेनचीच असतील असं नाही. असंच तापाचंही आहे. ताप आला की सुरुवातीला रुग्णांचा सेल्फ मेडिकेशनवर भर असतो. साधा वाटणारा ताप कालांतराने वेगळ्या स्वरूपाचा ठरतो. डेंग्यू, मलेरिया, न्युमोनिया अशा आजारांमुळेही ताप असण्याची शक्यता असते. त्यामुळे सेल्फ मेडिकेशनवर पूर्णत: अवलंबून राहू नये. डॉक्टरांचा सल्ला घेईपर्यंतच्या काळापर्यंत घरगुती उपचार केल्यास हरकत नसते. आजच्या लाइफस्टाइलमुळे लोकांमध्ये अॅसिडिटी होण्याचं प्रमाण वाढलंय. अॅसिडिटीमुळे पोट, छाती दुखणं हे होत असतं. पण पोट, छाती दुखायला लागली की, काही तरी गंभीर आजार असण्याची शंका त्यांच्या मनात येऊन जाते. अलीकडे हृदयविकार होण्याचं प्रमाणही वाढलंय. त्यामुळे छातीत दुखायला लागल्यावर नाना शंका मनात डोकावतात.
लोकांमध्ये अॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद अशा माध्यमांबाबतही काही समज-गैरसमज आहेत. अॅलोपॅथीचे उपचार घेत असताना कालांतराने त्याचे दुष्परिणाम होताहेत असं रुग्णांच्या लक्षात येतं. मग आयुर्वेदाकडे त्यांची पावलं वळतात. आयुर्वेदाचे दुष्परिणाम होत नाहीत हा समज त्यांच्या मनात असल्यामुळे ते आयुर्वेदाचा मार्ग अवलंबतात. याबाबत डॉ. आवटे सांगतात, ‘कुठलंही औषध दुष्परिणामाशिवाय नसतं. विशिष्ट आजारांसाठी विशिष्ट उपचार फायदेशीर ठरतात. अॅलर्जी असलेल्या आजारांसाठी होमिओपॅथी उपचार योग्य असतात, तर काही आजारांना आयुर्वेदाच्या उपचारांनी गुण येतो. तर शस्त्रक्रिया करणाऱ्या काही आजारांसाठी अर्थात अॅलोपॅथी उत्तम असते. तिन्ही प्रकारांचं महत्त्व सारखंच आहे. मात्र रुग्णांना उपचार घेताना एका प्रकारातून दुसऱ्या प्रकाराकडे वळायचं असेल तर त्यांनी दोन्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं. काही रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय एकाच वेळी दोन्ही उपचार घेत असतात. पण त्यांनी डॉक्टरांना विश्वासात घेऊन याबाबत सांगायला हवं; जेणेकरून त्यांनाही योग्य तो उपचार करता येईल.’ उपचारांच्या या विविध माध्यमांबाबत डॉ. बाळ सांगतात, ‘अॅलोपॅथीचे दुष्परिणाम होतात म्हणून आयुर्वेदाकडे रुग्ण वळतात. पण आयुर्वेदिक काही औषधांमध्ये ‘शिलाजीत’ असतं. त्यात शिशाचं प्रमाण जास्त असतं. मधुमेह असलेल्या रुग्णांनी ते घेतल्यास त्याचा किडनीवर परिणाम होतो. त्यामुळे आयुर्वेदिक औषधांनीही दुष्परिणाम होतोच. तसंच वर्षांनुवर्षे एकाच प्रकारचे उपचार घेणारे दुसऱ्या प्रकारचे उपचार घेण्यासाठी सहसा तयार होत नाहीत. पण हा अट्टहास असू नये. कारण काही गोष्टी करण्यासाठी ठरावीक उपचारांचाच मार्ग स्वीकारावा लागतो. हृदयाचा आजार बरा करण्यासाठी योगा करण्याचा सल्ला दिला जातो. पण यामुळे तो आजार बरा होत नाही. तसंच बायपास करण्यासाठी अॅलोपॅथीचाच आधार घ्यावा लागतो. फ्रॅक्चर झाल्यास त्यावर आयुर्वेदिक उपचार करणं उपयोगाचं नाही.’
डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन ही खूप महत्त्वाची बाब आहे. मेडिकल स्टोअर्सही प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधं देत नाहीत. पण सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांची औषधं डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवायही मिळतात. पण आता यामध्ये पोटदुखी, डोकेदुखी अशाही काही दुखण्यांवर औषध घेतलं जातं. पण डॉक्टरांची औषधांची एखादी जुनी चिठ्ठी दाखवून त्याच आजारावरची औषधं घेण्याचंही प्रमाण वाढताना दिसतंय. याबाबत डॉ. आवटे सांगतात, ‘पूर्वी झालेल्या आजारासाठी दिलेली औषधं पुन्हा तोच आजार उद्भवला की जुनं प्रिस्क्रिप्शन दाखवून विकत घेतली जातात. हे चुकीचं आहे. पुन्हा तसाच त्रास होत असला तरी त्याची कारणं वेगळी असू शकतात. नव्याने उद्भवलेल्या आजाराला जुनी औषधं फायदेशीर ठरतीलच असं नसतं. त्यामुळे तिथे डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.’ एकाच चिठ्ठीवर रुग्ण अनेक महिने, वर्षे औषधं घेतात. आधी झालेला खोकला आणि नंतर झालेला खोकला यात फरक असू शकतो. त्याची कारणं वेगळी असू शकतात. त्यामुळे डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन विचारपूर्वक वापरलं पाहिजे. मधुमेह, रक्तदाब, अस्थमा अशा रुग्णांनी दर तीन-सहा महिन्यांनी डॉक्टरांना भेटणं आवश्यक असतं. अशा आजारांची औषधं ही दीर्घकाळासाठी असतात. डॉक्टरांनी त्या रुग्णांच्या औषधांच्या चिठ्ठीत ‘तीन महिन्यांसाठी’ किंवा ‘सहा महिन्यांसाठी’ असं लिहिलेलं असतं. त्यामुळे अशा रुग्णांनीही तीच औषधं असली तरीही त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नयेत.
खेडय़ांमध्ये डॉक्टर सहज उपलब्ध नसतात. तिथल्या लोकांना खासगी डॉक्टरांची फी परवडत नाही. मग अशा वेळी त्यांचा कल सेल्फ मेडिकेशनकडे झुकणारा असतो. बऱ्याच लोकांचा इंजेक्शन आणि सलाइनवर जास्त विश्वास असतो. खरंतर औषध आणि इंजेक्शन, सलाइन या दोन्हींचा परिणाम एकच असतो. पण औषधांपेक्षा इंजेक्शनमुळे एखादा रुग्ण चटकन बरा होतो. काही गावांमधले डॉक्टर महिन्यातून एक सलाइन लावण्याचा सल्लाही देतात, अशी माहिती डॉ. आवटे यांनी दिली. डॉक्टरांनी सांगितल्यामुळे रुग्णही विश्वास ठेवतात. त्यामुळे त्यांच्यात सलाइनचं फॅड जास्त आहे. डॉक्टरांनी केवळ तपासून औषध दिलं आणि त्याची फी घेतली हे गावकऱ्यांना पटत नाही. सलाइन-इंजेक्शनची फी जास्त असते. पण डॉक्टरकडे जाऊन केवळ औषध लिहून देण्याचे पैसे देण्यापेक्षा सलाइन लावून घेणं त्यांना पटणारं असतं. आर्थिक अपरिहार्यतेमुळे काही लोक आजार अंगावर काढतात.

lp30वैद्यकीय सल्लाच घ्या
आपल्या देशात शिक्षणाचा प्रसार होत असला तरी सामाजिक जाण, सजगता पाहिजे. आपण काय, कशाबाबत वाचतोय-ऐकतोय, ते कितपत खरं याची शहानिशा करणं आवश्यक असतं. इंटरनेटमुळे अनेक फायदे होत असले तरी त्यावर दिली जाणारी सगळीच माहिती खरी असेलच असं नाही. त्यामुळे आरोग्यासंबंधी कोणताही निर्णय घेताना वैद्यकीय सल्लाच घ्यावा. वाचलेल्या-ऐकलेल्या माहितीवर अवलंबून राहू नये. त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता जास्त असते.
– डॉ. अरुण बाळ, अध्यक्ष,
असोशिएशन फॉर कन्झ्युमर्स अॅक्शन ऑन सेफ्टी अँड हेल्थ.

lp31घरगुती उपचाराला मर्यादा हवी
अॅसिडीटी, अंगदुखी, ताप, उलटी होणं, सर्दी, खोकला इत्यादी आजारांसाठी घरगुती उपाय करायला हरकत नाही. पण तेही वैद्यकीय सल्ला मिळेपर्यंतच. छोटा आजारही नंतर वेगळ्या कारणांमुळे बळावतो. त्यामुळे सेल्फ मेडिकेशन वैद्यकीय सल्ला मिळेपर्यंतच घेणं योग्य आहे. तसंच पूर्वी दिलेल्या वैद्यकीय सल्ल्याचा पुन्हा तोच आजार झाल्यास उपयोग करू नये. नव्याने उद्भवलेल्या आजारासाठी डॉक्टरांचा नव्याने सल्ला घ्यावा.
डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी, एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम, महाराष्ट्र

lp32मेडिकल स्टोअर : दुसरा दवाखाना
सर्दी-तापासाठी डॉक्टरकडे जाण्यापेक्षा मेडिकल स्टोअरमधून एक गोळी आणली की आजार दूर पळतो, अशी अनेकांची समजूत आहे. हे खरं असलं तरी ते तात्पुरतं असतं, याचा मात्र सोयीस्कररीत्या विसर पडतो. मेडिकल स्टोअर्समध्ये अॅसिडिटी, सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, उलटी होणं अशा आजारांवर लोक औषध मागतात. मेडिकलमधूनही त्यांना ती दिली जातात. पण अशा प्रकारे औषध मागणाऱ्यांमध्ये आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असलेल्यांचं प्रमाण खूप आहे. मेडिकल स्टोअर्समध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठीबद्दल विचारलं जातं. पण अशा लोकांकडे ती औषधं घेण्यासाठीही पुरेसे पैसे नसतात, त्यामुळे त्यांना डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधं दिली जातात. यात सुशिक्षित लोकही मागे नाहीत. फरक इतकाच की, त्यांना औषधांची नावं माहीत असतात. पेनकिलरसाठी सर्वाधिक मागणी असल्याची माहिती मिळते. मेडिकलमध्ये जाऊन होत असलेला त्रास सांगितला की औषध मिळतं. असा सोयीचा मार्ग असल्यामुळे अनेक जण तोच स्वीकारतात. केमिस्ट औषध देताना दोन गोळ्यांनी थांबलं नाही तर डॉक्टरकडे जाण्याचा सल्लाही देतात. जुलाब, सर्दी, खोकला, ताप, अॅसिडिटी अशा आजारांसाठी औषध मागायला रुग्ण थेट मेडिकल स्टोअर्सकडे आपली पावलं वळवतात.

स्वत:ची काळजी घेणं केव्हाही चांगलंच. पण ती काळजी कशा प्रकारे, केव्हा आणि कशासाठी घेतली पाहिजे याचंही ज्ञान असणं आवश्यक आहे. ‘आपल्याला हा आजार झालाय’ आणि ‘हा साधाच आजार आहे’ या परस्पर विरुद्ध समजुती आहेत. दोन्ही घातकच. दोन्हीने मर्यादा ओलांडल्या की त्याचे दुष्परिणाम जाणवायला लागतात. म्हणूनच घरगुती उपचार, वैद्यकीय सल्ला, उपचाराच्या वेगवेगळ्या प्रकारांचा अनुभव, आजारांबाबतचे गैरसमज याबाबत प्रत्येकाने विचारमंथन करायला हवं.