10 July 2020

News Flash

स्वास्थ्य : स्वास्थ्याकरिता ऋतुचर्या : डिसेंबर महिना

डिसेंबर महिना थंडीचा आणि म्हणून तब्येत कमवण्याचा महिना आहे. या महिन्यात भरपूर व्यायाम करा, चांगलं खा आणि वर्षभर निरोगी राहा.

| November 21, 2014 01:24 am

01khadiwaleडिसेंबर महिना थंडीचा आणि म्हणून तब्येत कमवण्याचा महिना आहे. या महिन्यात भरपूर व्यायाम करा, चांगलं खा आणि वर्षभर निरोगी राहा.

यंदाच्या डिसेंबर महिन्याची सुरुवात मार्गशीर्ष दशमीपासून होत आहे. या डिसेंबर महिन्यात आपणाला विविध धार्मिक कार्यक्रम व संत महंतांची जयंती व पुण्यतिथीच्या निमित्ताने, निवांतपणे प्रार्थना व आत्मचिंतन करण्याची; स्वत:ला सवय लावून घेता येते. १ डिसेंबर हा दिवस जगभर एड्स निर्मूलन दिवस म्हणून पाळला जातो. २ डिसेंबर या दिवशी सर्वच भागवतप्रेमी गीता जयंती म्हणून गीतेच्या विविध अध्यायांचे पारायण करतात. ३ डिसेंबर हा जागतिक अपंगदिन, त्या निमित्ताने आपल्या परिचयातील अपंगांची दु:खे समजावून घेऊन यशाशक्ती सहाय्य करू या! ५ व ६ डिसेंबर हे दोन दिवस, अनुक्रमे गाणगापूर दत्तजयंती व सार्वत्रिक दत्तजयंती म्हणून, ‘श्री गुरुदेवदत्त’ असे स्मरण करूया. तसेच श्रीधर स्वामी जयंती म्हणून स्वामींचे मार्गदर्शन दैनंदिन जीवनात नित्य स्मरूया. ६ डिसेंबर या दिवसाला भारतीय इतिहासात, ‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार’ डॉ. भीमराव आंबेडकर यांच्यामुळे विशेष महत्त्व आहे. ७ डिसेंबर हा भारतभर ‘ध्वजदिन’ फ्लॅग डे म्हणून आपल्या भारतीय सैनिकांच्या मदतीकरिता छोटय़ा-मोठय़ा देणग्या जमा केल्या जातात. ११ व १२ डिसेंबर रोजी अनुक्रमे गुलाबमहाराज व चिंचवडचे मोरया गोसावी यांच्या पुण्यतिथीनिमित्त थोडा वेळ ध्यानधारणा करूया. १२ डिसेंबर या दिवसाला ‘हुतात्मा बाबू गेनू स्मृतीदिनामुळे’ एक विशेष महत्त्व आहे. १४ डिसेंबर रोजी श्री ज्ञानदेव महाराजांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीची जयंती, ज्ञानेश्वरीचे पठण करून संपन्न करण्याची संस्कृती महाराष्ट्रात लहानमोठय़ा गावात घरोघर जपली जाते. १७ डिसेंबर हा दिवस श्रीगोंदवलेकर महाराज पुण्यतिथी म्हणून महाराष्ट्रभरचे भगतलोक मोठय़ा संख्येने गोंदवले येथे येतात. १९ डिसेंबर या दिवशी पावसच्या स्वामी स्वरूपानंदांची पुण्यतिथीनिमित्त आठवण ठेवू या.

२० डिसेंबर हा दिवस संत गाडगेबाबा महाराजांचा पुण्यतिथी दिवस म्हणून नुसता लक्षात ठेवण्यापेक्षा, आपला परिसर सातत्याने, स्वहस्ते, स्वकष्टाने, कोणीही न सांगता कसा स्वच्छ ठेवता येईल, याकरिता चिकाटीने यत्न करू या. भारतीय कालगणनेप्रमाणे २१ डिसेंबर या दिवशी उत्तरायण आरंभ होत असतो. २४ डिसेंबर भारतीय ग्राहकदिन म्हणून देशभर, ग्राहकांची पिळवणूक होऊ नये म्हणून मोठेच प्रबोधन होत असते. ख्रिश्चन बांधवांच्या दृष्टीने २५ डिसेंबर हा अत्यंत पवित्र दिवस ख्रिसमस किंवा नाताळ दिन म्हणून खूप आनंदात साजरा केला जातो.

डिसेंबर महिना हा सर्व जगभर खूप खूप थंडीचा म्हणून, तबियत कमाविण्याकरिता उत्तम काळ म्हणून समजला जातो. या काळातील थंडीत ‘आपण भरपूर व्यायाम केला, भरभक्कम आहार केला तर आपल्याला चांगले शरीर कमावता येते अशी बहुसंख्यांची धारणा असते.’ त्यामुळे गोरगरिबांपासून श्रीमंतांपर्यंत बहुतेक मंडळी आपला आहार वाढेल कसा याकडे तर लक्ष देतातच, पण त्याबरोबरच सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्रौ; जसे जमेल तसे विविध प्रकारच्या खाद्यपदार्थाची, अनेकानेक गोड पदार्थाची आठवणीने दखल घेत असतात. खाण्यापिण्याची चंगळ करत असतात. खरे पाहिले तर हा महिना हेमंत ऋतूचा शेवटचा व शिशिर ऋतूचा सुरुवातीचा थोडासा भाग म्हणून अत्यंत निरोगी महिना समजला जातो व ते वास्तवही आहे. तुम्ही आम्ही जे अन्न खाऊ, जो आहार घेऊ तो अग्नी आपल्या पाचकाग्नीच्या बलाला धरून असावा. आपल्याला नुसती चांगली भूक लागून किंवा खूप चांगले खाण्याची इच्छा असून भागत नाही. आपण जेव्हा विविध अन्नपदार्थ खातो त्या वेळेस आपणास त्या त्या अन्नाबद्दल रुची अवश्य हवी व असे अन्न खाल्ल्यावर त्याचे नीट पचन होईल, पोट फुगणार नाही, पोट जड होणार नाही याची काळजी घ्यायलाच लागते. म्हणजे जड जेवणाबद्दल पश्चात्तापाची पाळी येत नाही.

हिवाळ्यातील खूप थंडीमुळे काही वेळेस खूप चमचमीत, गरम गरम, उष्ण पदार्थ खाण्याचा मोह, लहानथोरांना सर्वानाच होतो. त्यामुळे ‘तोंड येणे’ या विकाराचे रुग्ण वाढत्या संख्येने डॉक्टर वैद्यांची दारे ठोठावत असतात. ज्यांना नेहमीच तोंड येण्याची समस्या भेडसावते त्यांनी आपले ओठ, हिरडय़ा, गाल व दात यांची आरोग्य दृष्टिकोनातून विशेष काळजी घ्यावयास हवी. तोंड आलेल्या रुग्णांना मलावरोध समस्येने ग्रासले असेल तर काळ्या मनुका, रात्रौ गरम दूध व तूप, सौम्य त्रिफळा चूर्ण, आहारात ज्वारीची भाकरी, मुगाचे वरण, उकडलेल्या बिनतिखट मिठाच्या भाज्या असे उपाय करून पाहावेत. तोंडात, जिभेवर लाली किंवा फोड असल्यास चांगले घरगुती लोणी किंवा तूप पन:पुन्हा खुळखुळून, त्यानंतर चूळ थुंकून द्यावी. कटाक्षाणे, ताप, सर्दी, खोकला या विकारांकरिता स्ट्राँग औषध घेण्याचे टाळावे. त्याऐवजी खाण्यापिण्यात संयम पाळावा.

खूप थंड हवामानाचा डिसेंबर महिना येतो म्हटले की काही दमेकरी लोकांच्या पोटात एकदम ‘धस्स’ होते. अशी मंडळी शक्यतो आपणहूनच खूप गारठय़ात भल्या पहाटे किंवा रात्री बाहेर पडत नाहीत. स्वेटर, मफलर, गरम पांघरुणे, ब्लँकेट यांचा सहारा घेत असतात. तरीपण कृश माणसांचा दमा, खोकला बळावतो. मग अशांनी काय, कायम इन्हेलर-पंप यांचा सहारा घ्यायचा? नको. त्यांनी पुढील चार मंत्र, जसे टेबलाला चार भक्कम पाय असायला हवे तसे आठवणीने किमान डिसेंबर महिनाभर तरी पाळावे. जेवणामध्ये आपल्या प्रकृतीनुसार पुदिना, आले, लसूण, ओली हळद यांची मदत कटाक्षाणे चटणी स्वरूपात घ्यावी. त्यांच्या जोडीला दोन काळी मिरी व दहा-वीस तुळशीची पाने यांचाही युक्तीने वापर करावा. जेवताना सुंठयुक्त गरम पाणी आठवणीने घ्यावे. डिसेंबर महिन्यात सर्वाचाच अग्नी खूप प्रखर असतो, तरीपण दमेकरी, खूपखूप सर्दी कफाने हैराण होणाऱ्या मंडळींनी सायंकाळी सूर्यास्ताच्या अगोदर जेवावे व कटाक्षाने दोन घास कमीच जेवावे.

सूर्यास्ताअगोदर जी व्यक्ती आपले सायंकाळचे भोजन संपवेल तिला दमा, सर्दी, खोकला, कफ या विकारांना निश्चियाने लांब ठेवता येते. डॉक्टर, वैद्यांच्या दवाखान्याची पायरी, रात्री-अपरात्री चढावी लागत नाही.

आपल्या देशात विविध वैद्यकीय व्यावसायिक, वैद्य, डॉक्टर, विविध रुग्णालये यांच्याकडे नित्य रुग्ण, आपल्या शारीरिक, मानसिक तक्रारींकरिता येत असतात. त्यात संधिवात, आमवात, गुडघेदुखी, फ्रोजन शोल्डर (अवबाहुक), सायटिका (गृध्रसी) या वातविकारांनी पछाडलेल्या रुग्णांची संख्या खूपच असते. त्याकरिता आयुर्वेदात विविध गुग्गुळ, कल्प व बाह्य़ोपचाराकरिता लेप, गोळय़ा, अभ्यंग तेले मोठय़ा संख्येने उपलब्ध आहेत. आधुनिक वैद्यकात अनेक प्रकारची पेन किलर औषधे तसेच गुडघाबदल, खुबाबदल याकरिता शस्त्रकर्माचा सल्लाही दिला जातो. हे सगळे महागडे खटाटोप करायला लागू नयेत म्हणून वर सांगितलेल्या वातविकारग्रस्त रुग्णांनी पुढील चतु:सूत्रीचे कटाक्षाने पालन करावे. आपल्या आहारात गव्हाची चपाती असल्यास, ती करताना एका चपातीच्या कणकेकरिता एक चमचा एरंडेल तेल ‘मोहन’ म्हणून आठवणीने वापरावे. जेवताना व अन्य वेळी उकळलेल्या गरम पाण्यात थोडी सुंठपूड मिसळून जलपानाचा आनंद घ्यावा. आपल्या जेवणात दही, लोणची, पापड, खूप जडान्न, शिळे अन्न, मांसाहार, बेकरीचे पदार्थ, मेवामिठाई यांना स्थान देऊ नये. शक्यतो उकडलेल्या बिन मिठाच्या भाज्या खाव्यात. खूप स्ट्राँग पेनकिलर गोळ्या घेण्यापेक्षा आयुर्वेदीय विविध प्रकारची अभ्यंग तेले व दोषघ्न लेप गोळीचा बाह्य़ोपचारार्थ वापर करावा. विविध वातविकारग्रस्त रुग्णांनी आपले अंथरूण हे कठीण व उबदार; ब्लॅकेट, कांबळे, शाल असे कटाक्षाने पाहावे. गाद्या विशेषत: फोमच्या मऊ गाद्या टाळाव्यात.

दिवसेंदिवस सर्वाचेच जीवनमान उंचावत चाललेले आहे. त्यामुळे बहुधा प्रत्येक जण आपल्या ताकदीप्रमाणे, कमीअधिक गल्ला खर्च करून फ्रिजसारख्या अनावश्यक गोष्टी खरेदी करून आपल्या गरजा अकारण वाढवतो व त्याबरोबर अनेकानेक छोटय़ा-मोठय़ा रोगांना आमंत्रण देत असतो. आजकाल सर्वच लहान-मोठय़ा शहरांत, आपल्या घराजवळच सर्व तऱ्हेचा भाजीपाला, फळे, दूध, ताजे ताजे मिळत असते. तरीपण एक खोटी प्रतिष्ठा किंवा ‘स्टेट्स’ म्हणून आपण सर्वच फ्रिज घेतो व त्यात ठेवलेले पदार्थ, दूध, फळफळावळ शिळे झाले तरी खातो व विविध वातरोगांना अकारण आमंत्रण देतो. फ्रिजमधले पदार्थ बाहेर काढल्यावर ते नॉर्मल टेंपरेचरला यायला किमान दोन तास लागतात. घरातील स्वयंपाककुशल गृहिणी इतका वेळ कशाला थांबेल? फ्रिजमधील भाज्या व फळफळावळ बाहेर काढल्याबरोबर लगेचच, स्वयंपाकात किंवा खाण्यापिण्यात वापरली जातात. आपल्या सगळ्यांच्याच पोटातील अग्नी दीर्घकाळ उणे तापमानात असणारे हे फ्रिजमधील पदार्थ, पचवू शकत नाही, हे वास्तव पुढील प्रकारच्या रुग्णांनी लक्षात ठेवावे. अग्निमांद्य, उदरवात, पोटफुगी, गॅसेस, सर्दी, पडसे, खोकला असे प्राणवह स्रोतसाचे विविध विकार. तसेच यापूर्वी सांगितलेले वातविकार व अ‍ॅनिमिया-पांडुता. ‘फ्रिजसे जल्दी छुटकारा लेओ। और छोटे मोटे बेमारीसे बचो.’

आपल्या जीवनात जितकी सुखसमृद्धी येते, पैसा येतो, त्याचबरोबर चोरपावलांने अनेकानेक लहान मोठे रोग वा लक्षणे पछाडत असतात. बहुसंख्य मंडळी आपल्या रोजच्या दिनक्रमात खंड पडू नये म्हणून नोकरी-धंद्यात सक्तीची सुट्टी घ्यायला लागू नये म्हणून वैद्यकीय सल्लागारांचे उंबरठे झिजवत असतात. लहान बालकाला जरासा जरी खोकला, कफाचा त्रास झाला किंवा अंग गरम वाटले तरी लगेच धावपळ करतात. तज्ज्ञ डॉक्टरमंडळी विविध रोग, समस्यांकरिता तऱ्हतऱ्हेची व्हिटॅमिन्स, कॅल्शियम, टॉनिक किंवा आयर्नच्या गोळ्यांचा मारा करतात. काही तज्ज्ञ पोटात पुरेसे झिंक जायला पाहिजे असा आग्रह धरतात. व्हिटॅमिन्स तपासली जातात. ए, बी, सी, डी अशा विविध व्हिटॅमिनची औषधे सुचविली जातात.

वाचक मित्रांनो, माझ्या लहानपणी डालडा या हायड्रोजनेटेड ऑइल असणाऱ्या डब्यांवर अे व डी व्हिटॅमिनयुक्त असा उल्लेख असे. याचा अर्थ, तुम्ही आम्ही अे व डी व्हिटॅमिनच्या कमतरतेकरिता डालडायुक्त पदार्थ का खायचे? विविध व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होते असे थोर थोर आहारतज्ज्ञ आपणाला सुचवितात. सुजाण वाचक मित्रांनो, तुम्ही क्षणभर असा विचार करा की ज्या ब्रह्मदेवाने हजारो प्रकारची विविध झाडे, झुडपे, वेली आपल्या पृथ्वीवर लावलेले आहेत, त्या भगवंताला दहा-वीस व्हिटॅमिनची झाडे उभी करणे अशक्य होते का? ज्यांना डिसेंबर महिन्यातील कडक थंडीत आपल्या शरीरात विविध व्हिटॅमिन किंवा लोह वा झिंक पुरवायचे आहे त्यांनी खूपखूप प्रमाणात, सर्वत्र उपलब्ध असणाऱ्या हिरव्या पालेभाज्या, ताजी फळफळावळ, टरफलासकट कडधान्ये, अनेक प्रकारच्या डाळी, द्विदल धान्ये, दूध, लोणी, तूप, सोयाबिन, मटार, यांची नेहमी मदत घ्यायला काय हरकत आहे.

जानेवारी २०१४ पासून ‘स्वास्थाकरिता ऋतुचर्या’ या लेखमालेची संधी मला एक्सप्रेस ग्रुपच्या ‘लोकप्रभा’ साप्ताहिकाने दिली, वाचकांनी या लिखाणाला साथ दिली, याबद्दल मी त्यांचा ऋणी आहेच. शुभं भवतु।

(समाप्त)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2014 1:24 am

Web Title: health tips for the month of december
टॅग Fitness
Next Stories
1 स्मरणरंजन : अर्धीच राहिलेली गोष्ट
2 चर्चा : एक गोष्ट देवबाप्पाची
3 कथा : वाघोबांचे मुंबई दर्शन..
Just Now!
X