प्राचीन काळापासून मे महिन्याचे वर्णन ‘वैशाख-वणवा’ अशा प्रकारे तुम्हीआम्ही लहान-मोठे सर्व जण करत असतो. या महिन्यात स्वत:ची काळजी कशी घ्यायची?

इंग्रजी कालगणनेप्रमाणे बारा महिन्यांच्या अक्षरातील अंतर्विरोध गमतीदार आहे. जानेवारी, फरवरी, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर चार अक्षरी महिने आहेत; तर ‘मे’ हा अनेक कारणांनी खूप महत्त्वाचा महिना एकाक्षरी आहे. मे महिन्याचे विशेष महत्त्व श्रमजीवी मराठी बांधवांना सांगायला हवे का? १ मे हा चंद्रपूर ते कोल्हापूर, मुंबई ते सोलापूर बार्शी अशा संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळेला ‘महाराष्ट्र दिवस व कामगार दिन’ म्हणून प्रचंड उत्साहात, जल्लोषात साजरा केला जातो. २ मे या दिवशी भारतीय संस्कृतीतील एका जबरदस्त आक्रमक दैवताची; श्री परशुराम जयंती व दक्षिणेतील श्री बसवेश्वरांची जयंती साजरी केली जाते. आपल्या भारतीयांच्या कालगणनेत वर्षांतील साडेतीन मुहूर्ताना खूप महत्त्व आहे. त्यातील ‘अक्षय्य तृतीया’ हा परम मंगल दिवस तुम्हाआम्हा सर्वाना, अनेकांना नवीन शुभकार्य सुरू करायला प्रेरणा देत असतो. माझे अनेकानेक सामाजिक उपक्रम अक्षय्य तृतीया या पवित्र दिवशी सुरू झाले, हे मी येथे विनम्रपणे सांगू इच्छितो. आपल्या खूप तरुणपणी भारतभर प्रवास करून चारधाम, चारमठ स्थापन करणाऱ्या आद्य श्रीशंकराचार्याची जयंती ४ मे रोजी आहे. दानवांच्या पोटात धडकी भरेल असे कार्य केलेल्या नृसिंहांची जयंती १३ मेला साजरी करू या. सर्वसमावेशक हिंदू धर्माने बौद्धधर्म संस्थापक गौतम बुद्ध यांना देवाचा आठवा अवतार असे मानले आहे. या वर्षी बुद्ध जयंती १४ मेला येत आहे. ‘बुद्धं शरणं गच्छामि’। असे स्मरण करू या. समस्त विश्वभर आपली वीणा घेऊन भ्रमंती करणाऱ्या श्रीनारदांची व संत चोखामेळा यांची अनुक्रमे जयंती व पुण्यतिथी १५ मेला आहे. मराठी भाविकांच्या संतप्रेमातील संत मुक्ताबाईंची पुण्यतिथी २३ मे रोजी येत आहे. त्रिखंडात ज्यांची ‘उडी’ गाजली अशा स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांची जयंती २८ मे रोजी तुम्हीआम्ही स्मरू या. ‘मराठी भाषेचे शिवाजी’ म्हणून गौरविले गेलेल्या विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या लिखाणाची आठवण, त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त २० मेला ठेवू या.
प्राचीन काळापासून मे महिन्याचे वर्णन ‘वैशाख-वणवा’ अशा प्रकारे तुम्हीआम्ही लहान-मोठे सर्वजण करत असतो. मे महिन्याचा ३१ दिवसांचा काळ हा आदानकालातील जवळपास शेवटचा भाग आहे. याच्या आगोदरच्या एप्रिल महिन्यात उत्तररात्रीमध्ये थोडाफार तरी गारवा होता. आता हा वैशाख-वणवा म्हणून तुम्हाआम्हा सर्वाना, उकाडय़ाने हैराण करणारा मे महिना खूपच पीडादायक असतो. आपल्या आसपासची समस्त चराचर सृष्टी श्री भगवान सूर्यनारायणाचे चटके सोसत असते, शेतजमिनींना वाढत्या भेगा पडत असतात; मोठमोठय़ा नद्या केव्हाच आटलेल्या असतात. छोटे ओढे, नाले केव्हा गायब झाले हेही लक्षात येत नाही. सर्वत्र पाण्याची टंचाई असते. मे महिन्याची उष्णतेची तीव्रता तुम्हाआम्हाला सोसत नाही, तर मग आकाशात विहंग विहार मुक्तपणे करणाऱ्या पक्ष्यांची काय अवस्था होत असेल? या बिचाऱ्या पक्ष्यांना पाण्यासाठी उन्हात इकडे तिकडे फिरावे लागते. प्रसंगी वेळीच पाणी मिळाले नाही, तर त्यांना प्राणास मुकावे लागते. यासाठी आपल्या सभोवताली असणाऱ्या पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करावी. पाणी भरलेले पसरट भांडे घराच्या खिडकीसमोर किंवा आडोशाला सावलीत ठेवावे. ज्या वेळी पक्षी यातील पाणी पिण्यास येतील, त्या वेळी मुलांना पक्षी पाहण्याचा आनंदही मिळवता येईल, तसेच पक्ष्यांची तहान भागवल्याचाही आपल्याला आनंद मिळेल.
समस्त वर्षांतील सर्वात रूक्ष वातावरणाचा अनुभव आपण सर्वजण मे महिन्यात घेत असतो. आपणा सर्वाचेच शारीरिक बल तुलनेने खूप खूप कमी होते. मे महिन्यामध्ये तिखट रसांचे प्राबल्य आहे, त्यामुळे आपण सर्वच जणांनी तिखटापासून दूर राहण्याचा हरप्रकारे प्रयत्न करावा. मे महिन्यातील अति उष्ण व रूक्ष हवामानामुळे आपल्या शरीरातील रस, मांस, मेद, मज्जा व शुक्र या धातूंचे मोठय़ा प्रमाणावर क्षरण होत असते. शरीरात जलतत्त्वाची कमी पडते. त्याकरिता आपण कितीही पाणी प्यायलो तरीही, लघवीचे प्रमाण नेहमीपेक्षा खूप कमी होते. मग अशा वेळेस सोपा उपाय म्हणजे चमचा दोन चमचे धने ठेचून रात्रभर भिजत टाकावेत. सकाळी ते चावून खावेत, वर तेच पाणी प्यावे. असे दिवसातून दोन वेळाही करावयास हरकत नाही. आपल्या शरीराची विशेषत: तळहात, तळपाय, डोळे, मूत्रेंद्रिय यांची आग होत असल्यास, चंदनासारखा मित्र दुसरा कोणी नाही. लघवी करताना आग होणे, तिडीक मारणे, लघवीतून रक्त जाणे अशा तक्रारींवर मात करण्याकरिता उत्तम दर्जाचे चंदनखोड मिळवावे. ते सहाणेवर उगळावे. असे गंध सकाळ, सायंकाळ दोन वेळा घ्यावे. आजकाल चंदनखोड खूपच महाग आहे, हे मला मान्य आहे. पण आपल्या लहान-मोठय़ा उष्णतेच्या तक्रारींकरिता, ऊठसूट डॉक्टर-वैद्यांचे उंबरठे झिजविण्यापेक्षा चंदनाची मदत अवश्य घेऊ या. आपल्या परिसरात अनेकानेक पुष्पप्रेमी गुलाबाची झाडे लावतात. या झाडांवर बहरून आलेली गुलाबची फुले, त्यांच्या पाकळ्या वाटून घरगुती गुलाब सरबत करून मे महिन्याच्या आगडोंबी उष्णतेवर नक्कीच मात करता येते.
३१ दिवसांचा हा लांबलचक महिना बहुसंख्य नागरिकांना नकोसा असतो. पण त्याचबरोबर विविध टुरिस्ट कंपन्या, आइस्क्रीम,कोल्ड्रिंक व उसाच्या गुऱ्हाळांचे मालक मात्र या महिन्यातच अख्ख्या वर्षांची जणू काय कमाई करत असतात. वाचक मित्रहो, मे महिन्यात आपणास पर्यटनाचा आनंद घ्यावयाचा असल्यास अवश्य घ्यावा. पण या आपल्या प्रवासात आपल्याबरोबर सुरक्षित स्वच्छ, जंतुविरहित प्यावयाचे पाणी पुरेसे असणे अत्यंत आवश्यक आहे. ‘मे महिन्यात आम्ही खूप खूप प्रवास केला, नाइलाजाने बाहेरचे पाणी प्यायलो. कसलेही चटकमटक जेवण जेवलो, व जुलाब, उलटय़ा अशा विकारांचे धनी झालो. अशा कथा वैद्यकीय व्यावसायिकांना नेहमीच ऐकावयास मिळतात. मे महिन्यात आपणास अनोळखी ठिकाणी जावयाचे असल्यास, दूषित पाण्यामुळे हागवण, कॉलरा, ताप ही आफत टाळावयाची असल्यास, सोबत ‘नागरमोथाचूर्ण’ अवश्य घेऊन जावे. जगात सर्वत्र उकळलेले पाणी सुरक्षित पाणी समजले जाते. त्यानंतरचा क्रमांक नागरमोथा चूर्णयुक्त पाण्याचा आहे. ‘मुस्ता पर्पटकं ज्वरे!’ असे शास्त्रवचन आहे. आपल्या शारीरिक सर्व विकारांचे मूळ आमांशात असते. त्या आमांशावर मात करण्याकरिता नागरमोथा व महौषधी-सुंठचूर्ण यांचे योगदान विलक्षण आहे. आपल्या पर्यटन प्रवासात सुंठ व नागरमोथा जोडगोळी ठेवा. खुशाल कुठेही खा, प्या, कसलेही पाणी प्या. शुभं भवतु!
मे महिन्याच्या अगोदरच्या महिन्यात चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपण सर्वानी ‘चैतन्याची गुढी’ उभारून काही संकल्प केलेला असेल तो संकल्प पूर्ण करण्याकरिता आपले शरीर व मन ठणठणीत, दणदणादण, कितीही घाव वा श्रम सहन करणारे हवे. या आपल्या मानवी शरीराची खरी कसोटी मे महिन्यात लागते. दिवसेंदिवस वातावरणात सर्वत्र दिवसाचे तापमान दरवर्षी वाढते आहे. गेली तीन वर्षे दरवर्षी उन्हाळ्यात दिवसाचे तापमान एक अंश सेल्सिअस प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या उन्हाळ्याचा, उष्माघाताचा पहिला फटका आपल्या डोळ्यांना बसतो. ‘आला उन्हाळा डोळे सांभाळा’ हा संदेश सर्वानीच, विशेषत: खूप लिखाणकाम, कॉप्युटरवर काम, रात्रपाळी करणाऱ्यांनी लक्षात ठेवावयास हवे. त्याकरिता अत्यंत अल्पमोली, बहुगुणी उपाय म्हणजे, रात्रौ झोपण्यापूर्वी तळपाय, तळहात, कानशिले, कपाळ यांना चांगले घरगुती तूप, लोणी, खोबरेलतेल किंवा एरंडेल तेल जिरवावे. त्याकरिता रोजच्या चोवीस तासांतील पाच-दहा मिनिटांचे योगदान डोळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोठेच मोलाचे आहे.
मे महिन्यातील उष्णतेमुळे बाह्यत्वचेवरही खूप मोठा दुष्परिणाम कळत नकळत होत असतो. त्वचा खूप रूक्ष, खरखरीत, कोरडी होण्याचा धोका असतो. त्याकरताही आठवणीने सकाळी लवकर उठून कानशिले, कपाळ, हात, पाय यांना खोबरेल तेल किंवा घरी केलेल्या ‘नारिकेल तेलाचा’ अभ्यंग करावा. असे घरगुती ‘नारिकेल तेल’ बनविण्याकरिता एक चांगला ओला नारळ आणावा. त्याचे ओले खोबरे खोवावे, त्या ओल्या खोबऱ्यात थोडे पाणी मिसळून, ते पिळावे. खोबऱ्याचे दूध तयार होते. ते दूध रात्रौ फ्रिजमध्ये ठेवावे. सकाळी त्यातील स्नेहभाग- लोण्यासारखा पांढरा पदार्थ वर तरंगलेला मिळतो. मंदाग्नीवर तो युक्तीपूर्वक आटवावा. आपण घरी लोणी कढवून साजूक तूप तयार करतो. असे हे ‘नारिकेल तेल’ एक विलक्षण गुणवान, कमी खर्चातील अभ्यंग तेल आहे.
‘देवाची करणी, नारळात पाणी’ अशी आठवण मी, मे महिन्यात वाचक मित्रांना करून द्यायची अजिबात गरज नाही. तुम्हाआम्हांपैकी बहुसंख्य मंडळी ‘चहाचे चाहते आहोत’. काहीजण या संदर्भात स्वत:ला ‘चहाटळ’ म्हणजे आम्हाला चहा अटळ आहे असे समजून वागतात. उन्हाळ्यात अशा चहाची संगत सोडून, नारळपाणी घेण्याने आपण आपल्या मूत्रपिंड, मेंदू व डोळ्याची निश्चित काळजी घेऊ शकतो. मे महिना हा खूप तापदायक वातावरणाचा असला तरी या महिन्यात फळांची रेलचेल असते. सर्वानाच हवा हवासा वाटणारा आंबा, कलिंगड, खरबूज, द्राक्षे, मोसंबी, चिक्कू, संत्री, काजूची फळे, करवंद, केळी, जांभळे किती किती प्रकारची फळे तुम्हाला मंडईत खुणावत असतात. त्याकरिता अशी विविध फळे एकएकटी किंवा फ्रुटसॅलड, शिकरण, फळांचे रस अशा विविध स्वरूपात घेता येतात. काही फळांबाबत एक वैद्यकीय व्यावसायिक म्हणून मी थोडा ‘लाल झेंडा’ दाखवू इच्छितो. कलिंगड सर्वानाच हवे हवेसे वाटते, पण गर्भवती स्त्रियांनी कलिंगड, पोपई व अननस कटाक्षाने टाळावे. केळी तुलनेत स्वस्त व सर्वत्र मिळतात. पण मलावरोध, कफविकार, त्वचेचे डाग, विविध त्वचाविकारग्रस्तांनी केळी, अननस, पपईपासून लांब राहावे. मधुमेही मंडळींनी आंबा, द्राक्षे, केळी, चिक्कू, अननस, फणस यांचे बाबतीतील आकर्षण आपणास महागात पडू शकते, हे सतत लक्षात ठेवावे.
उन्हाळ्यात सर्वानाच खूप लवकर जाग येते. खूप घाम गाळून हटातटाने व्यायाम करण्यापेक्षा माफक सूर्यनमस्कार, फिरणे व पोहणे यांचा आनंद जरूर घ्यावा. पोहणे हा अपवादात्मक व्यायाम आहे. सर्वच व्यायामप्रकारांत आपण घाम गाळतो; त्यामुळे साहजिकच थोडा थकवा येतो. पण पोहणे या व्यायामामुळे घाम न येता अजिबात न थकता, आपले शरीर आपण तंदुरुस्त व उल्हसित ठेवू शकतो. उन्हाळ्यात पुरेसा व्यायाम, फिरणे झाल्यावर न्याहरी व्यवस्थित करावी. त्याकरिता पर्याय खूप खूप आहेत. ब्रेड, बिस्किटापेक्षा, पातळ ज्वारीची भाकरी, छोटी सुकी चपाती, गोडाच्या पोळ्या, चांगल्या तुपातला शिरा, खूप मसाला, तिखट नसलेला उपमा, दूध पोहे, दहीपोहे, तांदळाच्या पिठीची धिरडी, भात, ज्वारी, राजगिऱ्याच्या लाह्य अशातून निवड करता येते. दुपारच्या जेवणात काकडी, टमाटू, दुध्याभोपळा, पडवळ, कोहळा, चाकवत, राजगिरा, लालमाठ, तुलनेने गोड चवीचा लाल मुळा अशांची निवड भाजी, तोंडी लावण्याकरिता करावी. दुपारी भात, गहू यांचा वापर तुलनेने कमी करावा. जेवणानंतर किंचित तुरट, मधुर ताक घ्यावयास विसरू नये. त्याकरिता दह्यचे विरजण फक्त तीन-चार तास अगोदरच करावे. दुपारच्या वेळात चहा-कॉफीऐवजी घरी केलेल्या लस्सीचा सहारा जरूर घ्यावा. ज्यांना सकाळच्या नाष्टय़ानंतर दुपारी भोजनाचा आनंद घेता येत नाही, अशी मंडळी मुंबईत मोठय़ा संख्येने भेटतात. अशांनी दुपारी चार वाजता शक्य असल्यास तांदळाची किंवा साबुदाण्याची जिरेयुक्त पेज किंवा दोन खजुरांचे सरबत घ्यावे.
उन्हाळ्यात सायंकाळचे जेवण केव्हाही हितप्रद. ते लवकर जेवणे सर्वाच्याच हातात असते असे नाही, तरीपण ज्यांना उन्हाळ्यात अनेकानेक आजारांना लांब ठेवायचे आहे त्यांनी कटाक्षाने रात्रौ नऊनंतर राक्षसकाली जेवण अवश्य टाळावे. ‘अर्ली टू बेड, अर्ली टू राइज, मेक्स मॅन हेल्दी, वेल्दी, अँड वाइज’  ‘Early to bed, early to rise, makes man healthy, wealthy and wise’ हे मी सुजाण वाचकांना सांगावयास नकोच!