00gajananछातीत दुखतं आहे असं म्हणत एखादा रुग्ण डॉक्टरकडे जातो. त्याच्या तपासण्या करून डॉक्टर सांगतात की तुला हार्ट अ‍ॅटॅक येऊन गेला आहे. असं का होतं? हृदयविकार ओळखण्याची लक्षणं कोणती?

रक्तवाहिनीतील अडथळ्यांनुसार (ब्लॉकेज) हृदयविकाराची लक्षणे असतात.
१) स्थिर स्वरूपाचा आजार (Chronic stable Angina – क्रोनिक स्टेबल अँजायना)- यामध्ये रक्तवाहिनी अरुंद होऊन अडथळा ७० टक्क्यांपेक्षा जास्त असतो. अशा रुग्णांना चालल्यानंतर छातीत दुखणे, दम लागणे किंवा अस्वस्थ वाटणे.. आणि थांबल्यावर दोन ते पाच मिनिटांत त्यांना बरे वाटणे अशी लक्षणे दिसून येतात. या अँजायना प्रकारच्या लक्षणांना ‘Chronic stable Angina- क्रोनिक स्टेबल अँजायना’ स्थिर स्वरूपाचा आजार असे म्हणतात.
बरेचदा मधुमेह, अस्थमा, अतिरक्तदाब किंवा खूप वयस्क व्यक्तींमध्ये ‘अंजायना’ दुखणे हे लक्षण आढळत नाही, अशा व्यक्तींमध्ये चालल्यानंतर दम लागणे, थकवा येणे, ढेकर येणे, चक्कर येणे अशी कमी प्रमाणात दुखण्याची लक्षणे.. किंवा दुखण्याव्यतिरिक्त लक्षणे दिसून येतात. अशा लक्षणांना ‘Angina Equivalent – अँजायना इक्विव्हॅलंट’ असे म्हणतात.
काही लोकांना छातीत न दुखता घशामध्ये किंवा मानेमध्ये दुखणे.. उजव्या-डाव्या दंडांमध्ये वेदना होणे, पोटामध्ये किंवा पाठीमध्ये दुखणे यांसारखी लक्षणे दिसतात याला ‘Referred Angina – रेफर्ड अँजायना’ असे म्हणतात.
२) अस्थिर अंजायना किंवा हृदयविकाराचा झटका :
(Unstable Angina/ Heart Attack… Myocardial Infarction) (अनस्टेबल अँजायना/ हार्ट अ‍ॅटॅक)
या प्रकारात बसल्या-बसल्या किंवा आरामदायी अवस्थेतसुद्धा तीव्र वेदना होणे, छातीच्या मध्यभागी डाव्या बाजूला खूप दुखून येणे, हे दुखणे २० मिनिटे ते ३० मिनिटांपेक्षा अधिक राहणे किंबहुना वाढतच जाणे. दोन्ही दंडांमध्ये, माने-घशाच्या ठिकाणी तसेच पाठीच्या मध्यभागी दुखणे सोबतच दरदरून घाम येणे, उलटी होणे, चक्कर येणे, खूपच थकवा येणे, ग्लानी येणे यांसारखी लक्षणे दिसतात. अशा वेळेस त्या व्यक्तीला ‘हृदयविकाराचा झटका’ आला आहे असे समजावे.
पण प्रत्येक व्यक्तीला वरीलप्रमाणे लक्षणे दिसतीलच असे नाही. तरी ७० टक्के व्यक्तींमध्ये वरीलप्रमाणे लक्षणे दिसतात. ज्या लोकांना खूप दिवसांपासून मधुमेह, अतिरक्तदाब आहे.. जे खूप वयस्क आहेत.. किंवा ज्यांना हृदयाचे इतर विकार आहेत जसे झडपांचे आजार (Valvular Heart Disease), हृदयांच्या स्नायूंचे आजार (cardiomyopathy).. अशा व्यक्तींमध्ये खूप कमी लक्षणे दिसतात किंवा काहीच लक्षणे दिसत नाहीत.. अशा प्रकाराला सायलेंट हार्ट अ‍ॅटॅक (Silent Heart Attak) असे म्हणतात. अशा व्यक्तींमध्ये शारीरिक कमजोरी, थकवा वाटणे यांसारखी लक्षणे दिसून येतात. जेव्हा इतर काही आजारांच्या तपासणीमध्ये ईसीजी (हृदयविद्युत आलेख) काढतात, त्यात त्या व्यक्तीला पूर्वी हृदयविकाराचा झटका येऊन गेला असे समजते. (सायलेंट हार्ट अटॅक- Silent Heart Attack)
हृदयविकाराचा झटका कसा ओळखाल?
वेगवेगळे रुग्ण वेगवेगळी लक्षणे घेऊन रुग्णालयात येतात. त्यामुळे कुठल्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. हृदयविकाराचा झटका याचे निदान करायला लागलेल्या चाचण्या ताबडतोब कराव्यात.
दुर्दैवाने २५ ते ३० टक्के रुग्ण अतिदक्षता विभागात (ICCU- Intensive Cardiac Care Unit) पोहचण्याच्या आधीच दगावतात. हृदयविकाराचा झटका छोटा किंवा मोठा यावर ते अवलंबून नसते.
अनेक रुग्ण त्यांना होणाऱ्या त्रासाला ‘दुखते आहे’ असे म्हणत नाहीत. या उलट आपल्या छातीवर जड ओझे लादले आहे.. छाती आवळल्यासारखे वाटणे.. छातीत जळजळ होत आहे अशी तक्रार करणे.. जास्त गॅसेस होणे.. वगैरे अशी वर्णने करतात. पुष्कळ लोक ‘डिनायल मोड’मध्ये असल्यामुळे खरी लक्षणे लपवतात. अशा रुग्णांना इतर त्रास जाणवतात, जसे दरदरून घाम येणे.. उलटय़ा होणे.. चक्कर येणे.. ग्लानी येणे.. चेहरा पांढराफटक पडणे.. अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात. थंडगार पडलेली त्वचा.. रक्तदाब कमी होणे, मोठा हृदयविकाराचा झटका आल्याची लक्षणे आहेत. चक्कर येणे.. छातीत धडधडणे किंवा हृदयाचे ठोके अनियमित पडणे.. काही काळ बेहोश पडणे ही पण मोठा हृदयविकाराचा झटका आल्याची लक्षणे होत.
दिशाभूल करणारी लक्षणे
छातीच्या मध्यभागी सोडून बाकी ठिकाणी उदा. हातामध्ये.. दंडामध्ये.. घशामध्ये.. मानेमध्ये.. पाठीमध्ये वेदना जाणवते किंवा वेदनारहित हृदयविकाराचा झटका येणे.. फक्त घाम येणे किंवा गॅसेस होत आहे.. ढेकर येणे.. थकवा येणे.. अतिकष्ट केल्यास चक्कर येणे.. भोवळ येणे.. अशी दिशाभूल करणारी लक्षणे काही लोकांत दिसून येतात.
स्त्रियांमध्ये हृदयविकाराचा झटका तरुणपणात किंवा मासिक पाळी चालू असलेल्या वयात येत नाही असे शास्त्रीयदृष्टय़ा खरे असले तरी.. या संप्रेरक (हार्मोन्स) रूपी कवचाचा काही स्त्रियांना उपयोग होत नाही. आजकाल स्त्रियांच्या जीवनामध्ये घरची जबाबदारी आणि नोकरी.. मुले.. शाळा.. अभ्यास.. या सर्वामुळे lp36मानसिक तणाव वाढीस लागला आहे. मधुमेह.. अति रक्तदाब यांचे प्रमाणसुद्धा तरुण स्त्रियांमध्ये वाढीस लागले आहे.
अशा स्त्रियांमध्ये जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा छातीत होणाऱ्या वेदनेचे प्रमाण आणि स्वरूप वेगळे असते. स्त्रियांची सहनशक्ती प्रचंड असल्यामुळे त्या दुखणे अंगावर काढतात. सांगत नाहीत. त्यामुळे वैद्यकीय तपासणीसाठी उशिरा जातात. दीर्घकाळ अस्वस्थ वाटणे किंवा थकवा जाणवणे, याच स्त्रियांच्या मुख्य तक्रारी. त्यामुळे त्यांना वैद्यकीय निदान-सुविधा उशिरा मिळतात. आजार जास्त बळावल्यावरच त्यांना डॉक्टरांचा सल्ला मिळतो. स्त्रियांची स्वत:बद्दलची.. स्वत:च्या आरोग्याबद्दलची अनास्था संपूर्ण कुटुंबाला घातक ठरणारी आहे.
आपण काही रुग्णांची उदाहरणे बघू या, जेणेकरून आपल्याला कळेल की हृदयविकाराचा झटका कोणकोणत्या स्वरूपात येऊ शकतो.
हृदयविकाराचा झटका हे असे दुखणे आहे की ज्याचा काहीच अंदाज बांधता येत नाही. काही काही लोकांना तर झोपेतच तीव्र हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू येतो. कधी कधी तर आदल्या दिवशी सर्व तपासण्या केल्यात. हृदयाचीपण व्यवस्थित तपासणी केलीय.. त्यात ईसीजी, इको वगैरे करूनसुद्धा दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
उदाहरणे –
३०-३५ वयाचा एक तरुण छातीत जरा जळजळ होत आहे म्हणून डॉक्टरला भेटायला गेला. डॉक्टरांनी ईसीजी काढला आणि म्हणाले, ‘तुम्हाला हार्ट अ‍ॅर्टक आला आहे. पण त्या तरुणाने या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही आणि तो रुग्णालयात भरती झाला नाही.. त्या रात्री त्याला छातीत खूप दुखू लागले. दम लागला.. उलटय़ा झाल्या.. चक्कर येऊ लागली.. घाम येऊ लागला.. मग अत्यंत सीरिअस अवस्थेत त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले.. हृदयाच्या सोनोग्राफीमध्ये दिसून आले की, त्या रुग्णाच्या हृदयाला खूप हानी झाली होती. कारण त्याला योग्य ते उपचार मिळण्यासाठी खूप उशीर झाला होता. त्यामुळे त्याच्या फुप्फुसात पाणी जमा झाले होते (Lung Congestion) नाडी वाढली होती, रक्तदाब कमी झाला होता (Cardiogenic Shock due to Major Heart Attack)
गैरसमज : ३० ते ३५ वर्षे वय असताना हृदयविकार सहसा येत नाही.. कदाचित तो जळजळ अ‍ॅसिडिटीमुळे असेल.. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यामुळे हृदयाची हानी वाढली आणि हृदयाची कार्यक्षमता कमी होऊन.. गंभीर अवस्थेत भरती करावे लागले..) (बोध : हृदयविकार ३० ते ३५ वर्षे वयातपण येऊ शकतो. त्यामुळे कुठल्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.)
५० वर्षे वयाचे गृहस्थ छातीत मध्यभागी दुखते आहे.. घाम येतो आहे आणि चक्कर येते आहे, या लक्षणांनी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये भरती झाले होते. त्यांचा ईसीजी काढल्यानंतर असे समजले की, त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे.. त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांची गती ३५ ते ३८च्या दरम्यान आहे आणि त्यांचा रक्तदाब कमी आहे (८०/५० mmHg)
या रुग्णाला हृदयाच्या खालील भागात अटॅक आला होता. (Inferior wall Myocardial Infarction) डॉक्टरांनी ताबडतोब मानेच्या नसेतून एक वायर हृदयाच्या उजव्या जवनिकेत पोहोचवली आणि तिला ‘पेसमेकर’ (Temparary Pacemaker) ला जोडून हृदयाची गती ७० ते ७२च्या मध्ये नियंत्रित केली आणि इतर औषधोपचार सुरू केले.
जर अशा रुग्णाला ‘पेसमेकर’ (Temparary Pacemaker)ची सुविधा मिळाली नसती तर कदाचित त्यांचा हृदयाच्या संथ गतीमुळे किंवा हृदय थांबल्यामुळे (Asystole) मृत्यू झाला असता.
४० वर्षांचा तरुण छातीत दुखत आहे, उलटी होत आहे आणि दरदरून घाम येऊन अस्वस्थ वाटत आहे.. म्हणून मित्रासोबत रुग्णालयात आला. ईसीजी (हृदय विद्युत आलेख) काढल्यानंतर निदान झाले की, त्या तरुणाला हृदयविकाराचा झटका आला आहे. उपचाराची दिशा ठरवण्यासाठी रुग्णाच्या मित्रांशी आणि नातेवाईकांशी चर्चा चालू असताना ज्युनिअर डॉक्टर जोराने ओरडला.. Sir V. Fib…V. Fib…V. Fib… shock immediately म्हणजे रुग्णाची हृदयगती एकदम वाढून २०० प्रति मिनीटपेक्षा जास्त झाली होती आणि रक्तदाब २०. २५ पेक्षापण कमी झाला होता याला ‘Ventricular Fibrillation- वेंट्रिक्युलर फिब्रिलेशन’ असे म्हणतात. हा अत्यंत जीवघेणा प्रकार आहे आणि हृदयविकाराचा झटका झाल्यानंतर मृत्यूचे हे महत्त्वाचे कारण आहे.
Ventricular Fibrillation असताना लगेचच ताबडतोब ‘डीफिब्रिलेटर Difibrillator’  या यंत्राचा वापर करून एक विजेचा झटका छातीवर देण्यात येतो आणि हृदय पुन्हा व्यवस्थित सुरू होते. काही रुग्णांना जास्त वेळा पुन्हा पुन्हा विजेचा झटका द्यावा लागतो. ही सुविधा रुग्णालयात नसेल किंवा Difibrillator  वापरण्यात तज्ज्ञ किंवा शिक्षित व्यक्ती नसेल तर ही घटना जीवघेणी होऊ शकते.
६५ वर्षांच्या गृहस्थांनी डॉक्टरकडे जाऊन सांगितले की २५-३० दिवसांपासून मला खूप थकायला होते आहे. दम लागतो आहे. त्यांना २० वर्षांपासून मधुमेह आहे.. रक्तातील साखरेचे प्रमाणपण व्यवस्थित आहे. तरीपण का थकवा जाणवतो आहे?
डॉक्टरांनी तपासणी केली.. रक्तदाब थोडा वाढलेला होता. नाडीचे ठोकेपण वेगाने पडत होते. ईसीजी (हृदय विद्युत आलेख) काढला असता रुग्णाला मोठा हार्ट अटॅक येऊन गेला असे ध्यानात आले. हृदयाच्या सोनोग्राफीमध्ये (Echocardiography) हृदयाला मोठय़ा प्रमाणात इजा होऊन हृदयाची कार्यक्षमता खूप कमी झाली असल्याचे कळते.
रुग्णाला खूप दिवसांपासून मधुमेह असल्यामुळे त्याला सायलेंट हार्ट अ‍ॅटॅक येऊन गेला आणि आता हृदयाची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे रुग्णाला दम लागणे.. थकवा जाणवणे.. यांसारखी लक्षणे दिसून येतात.
(बोध : वयस्क लोकांमध्ये, मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये किंवा हृदयाच्या झडपेचे किंवा स्नायूंचे आजार असलेल्या व्यक्तींमध्ये सायलेंट हार्ट अ‍ॅटॅक वेदनारहित हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण अधिक असते. जेव्हा अशा व्यक्तींमध्ये काहीही नवीन लक्षणे आढळल्यास किंवा काहीही नवीन त्रास जाणवल्यास, त्याच्या व्यवस्थितपणे सर्व तपासण्या करून योग्य ते निदान करणे आवश्यक आहे.)
आपल्या परिवारातील कोणाला हृदयविकारचा झटका येऊन मृत्यू आल्यास.. घरातील इतर सदस्य अत्यंत तणावात असतात. आपल्यालापण हृदयविकाराचा झटका येईल या चिंतेत ते असतात. अशा वेळी छातीत थोडेपण दुखले की ते पटकन डॉक्टरकडे जातात. त्यांना टेन्शनमुळे धाप लागणे.. धडधड वाढणे.. या सर्व लक्षणांमुळे हृदयविकाराचा झटका आलेला नाही ना..! अशी भावना, विशेषत: तरुण वयाच्या व्यक्तींना किंवा स्त्रियांमध्ये येते. अशा वेळी सर्व तपासण्या करून हृदयविकाराचा झटका आलेला नाही याची शहानिशा करून अशा रुग्णांना समजून सांगणे.. सांत्वना करणे.. आणि मानसिक आधार देणे.. आवश्यक असते..!
(बोध : अशा रुग्णांच्या ईसीजी, इको कार्डिओग्राफी- ECG Echocardiography आणि स्ट्रेस टेस्ट या तपासण्या करून त्यांना हृदयविकार नसल्याची शहानिशा करून त्यांना धैर्य देणे.. आवश्यक असते.)
काही रुग्णांमध्ये छातीच्या बरगडय़ांना किंवा छातीच्या स्नायूंना इजा होऊन. त्यांना वेदना होऊ शकतात. ही वेदना जोरात श्वास घेतल्यावर किंवा छातीची.. हातांची हालचाल झाल्यावर वाढू शकते. बरगडय़ांच्या सांध्याची किंवा स्नायूची तपासणी केली असता तेथे दुखण्याचे कारण सापडते. याला Costochondritis किंवा Myositis  असे म्हणतात. वेदनाशामक गोळ्या आणि रुग्णाला समजावून सांगून धीर दिल्यास. दोन-तीन दिवसांत हे बरे होते.
अ‍ॅसिडिटीचे दुखणे आणि हृदयविकाराचे दुखणे यात बऱ्याचदा गफलत होते. दोन्हीमध्ये छातीमध्ये दुखू शकते. पण अ‍ॅसिडिटीचे दुखणे हे खाण्याच्या वेळांवरसुद्धा अवलंबून असते. चालल्यानंतर अ‍ॅसिडिटीचे दुखणे वाढत नाही. हृदयविद्युत आलेख (ECG) आणि स्ट्रेस टेस्ट (Stress Test) या दोन्ही तपासण्या अ‍ॅसिडिटीच्या रुग्णामध्ये नॉर्मल असतात.
पोटाला आणि अन्ननलिकेला वाढलेल्या आम्लाच्या प्रमाणामुळे (Acid production) सूज येते. त्यामुळे पोटात किंवा छातीत जळजळ होण्यासारखी लक्षणे दिसतात. स्कोपी करून याचे निदान होते आणि अँटासिड आणि पोटातील आम्ल कमी करणाऱ्या गोळ्यांमुळे अशा रुग्णांना फायदा होतो आणि बरे वाटते.
इतर आजार आणि छातीत दुखणे :
१) अ‍ॅनिमिया : ज्या रुग्णांमध्ये रक्ताचे प्रमाण कमी असते, हिमोग्लोबीनची मात्रा कमी असते, अशा रुग्णांना छातीत दुखणे.. धडधडणे.. दम लागणे.. थकवा जागवणे.. अशी लक्षणे आढळून येतात. त्या वेळेस रुग्णाची योग्य तपासणी.. रक्तचाचणी करून योग्य निदान व उपाय योजनाकरणे आवश्यक असते.
२) अतिरक्तदाब : रक्तदाब एकाएकी वाढला तर रुग्णाला छातीत दुखून येऊ शकते. योग्य रक्तदाबाचे मोजमाप आणि योग्य औषधोपचाराने रक्तदाब कमी होऊन छातीतील दुखणे कमी होते. पण अशा रुग्णांचे ईसीजी आणि इकोकार्डिओग्राफी – Echocardiography या तपासण्या करणे अत्यावश्यक आहे. जेणे करून अतिरक्तदाबाने हृदयविकाराचा झटका आला तर नाही ना? किंवा हृदयविकाराच्या झटक्याने.. तीव्र वेदनांनी तर रक्तदाब वाढला नाही ना? हे बघणे आवश्यक आहे.
३) Thyroid (थायरॉईड.. गलगंड) च्या अति संप्रेरके निर्मितीमुळे.. (Hyperthyroidism- Excess of thyroid Hormones) नाडीचे ठोके वाढणे.. धडधड वाढणे.. घाम येणे.. दम लागणे.. छातीत दुखल्यासारखे वाटणे.. थकवा जाणवणे यांसारखी लक्षणे दिसून येतात.
गळ्यातील (Thyroid- थायरॉइड)ची गाठ ठळकपणे दिसून येणे आणि रक्तातील Thyroid Hormone- थायरॉइड हार्मोनची तपासणी केली असता या आजाराचे योग्य निदान होते.
४) Perimenopausal Syndrome
स्त्रियांमध्ये जेव्हा मासिक पाळी बंद होण्याची प्रक्रिया सुरू होते.. तेव्हा त्यांच्यात बरेच (Hormonal Changes) संप्रेरके बदलण्याची शक्यता असते. अशा वेळी स्त्रियांमध्ये बरीच वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. यात हृदयाची धडधड वाढणे.. घाम येणे.. थकवा जाणवणे.. गरम वाटणे (Hot flushes).. चिडचिड वाढणे.. अस्वस्थ वाटणे.. काळजी वाटणे.. मानसिक तणाव वाटणे.. अशी अनेक लक्षणे आढळतात. अशातच जर हृदयविकाराचा झटका आला तर निदान करणे.. कठीण जाते. योग्य चाचण्या आणि योग्य लक्षणांची शहानिशा केल्यास आजाराचे निदान व्यवस्थित करण्यास मदत होते.
थोडक्यात.. हृदयविकाराचा झटका आहे की नाही हे ठरवताना रुग्णांची लक्षणे आणि तपासण्या यांचा योग्य मिलाफ करणे, डॉक्टरला अत्यंत आवश्यक असते आणि रुग्णांनीसुद्धा लक्षणांना न लपवता.. वेळकाढू धोरण न अवलंबता लवकर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.. जेणेकरून हृदयाला जास्त इजा होण्याच्या आधीच योग्य उपाययोजना आणि औषोधोपचार करून हृदयाची कार्यक्षमता जोपासली जाते.. आणि हृदयाच्या कार्यक्षमतेवरच रुग्णाचे आयुष्य अवलंबून असते.. म्हणतात ना.. वेळीच घातलेला एक टाका पुढचे दहा टाके वाचवतो!
डॉ. गजानन रत्नपारखी

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Bird Flu Outbreak Signs & Symptoms, Treatment
बर्ड फ्लूचा धोका वाढला! चिकन खाण्याआधी ‘ही’ काळजी घ्याच; डॉक्टरांनी सांगितली आजाराची लक्षणे व उपचार