00gajananधूम्रपान, मद्यपान, वाढलेला रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, ताणतणाव, बैठी जीवनशैली हे घटक हृदयविकार होण्यासाठी कारणीभूत ठरतात. ते आपल्या शरीरावर नेमका कसा परिणाम करतात याबद्दल-

हृदयविकार म्हणजे काय आणि तो कसा होतो, हे आपण आधीच्या लेखांमध्ये वाचले आहे. हृदयविकाराला कारणीभूत असल्याच्या धोक्याच्या घटकांची सविस्तर माहिती आपण या लेखात घेऊ या.
धोक्याचे घटक दोन गटांत वर्गीकृत करता येतात. एक बदलता येण्याजोगे किंवा नियंत्रणात आणता येणारे आणि दुसरे बदलता न येणारे.
बदलता येणाऱ्या घटकांमध्ये धूम्रपान, मद्यपान, वाढलेला रक्तदाब, मधुमेह, शरीरातील वाढलेले चरबीचे आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण, लठ्ठपणा आणि वाढलेले वजन, मानसिक ताणतणाव, व्यक्तिमत्त्व (टाईप ए आणि टाइप बी), बैठी जीवनशैली अशा गोष्टींचा समावेश होतो.
‘बदलू न शकणाऱ्या धोक्याच्या घटकांमध्ये वय, लिंगभेद आणि आनुवंशिकता यांचा समावेश होतो.
वय
मनुष्याला वय बदलता येत नाही. वाढत्या वयानुसार हृदयविकाराचे प्रमाणसुद्धा वाढते. वयाच्या ५५ ते ६० वर्षांनंतर हे प्रमाण अधिक असते. वाढत्या वयानुसार रक्तवाहिन्यांमध्ये कठिणीकरणाची प्रक्रिया होत असते. इतर धोक्याच्या घटकांचा वर्षांनुवर्षे होत असलेला मारा आणि त्यांचे परिणाम वाढत्या वयात दिसू लागतात.
लिंगभेद
स्त्रियांमध्ये हृदयविकार होण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा कमी असते. त्यातही हृदयविकाराने मृत्यू होण्याचे प्रमाणसुद्धा पुरुषांमध्ये जास्त आहे. ३५ ते ४५ वयाच्या दरम्यान स्त्रियांपेक्षा पुरुषांचे हृदयविकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण ५ ते ६ पट जास्त आहे. ६५ वर्षांच्या वयानंतर हे प्रमाण जवळ-जवळ समान असते.
मासिक पाळी बंद होण्यापूर्वी हृदयविकार होण्याची किंवा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी असते. स्त्रियांतील इस्ट्रोजन नावाच्या हार्मोन्समुळे हे स्वसंरक्षण मिळते. या हार्मोनमुळे शरीरातील गुड कोलेस्टेरॉल – एचडीएलचे प्रमाण वाढते आणि बहुधा त्यामुळे स्त्रियांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण कमी असते; पण हळूहळू स्त्रियांमध्येसुद्धा हृदयविकाराचे प्रमाण वाढत चालले आहे. आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून सामाजिक, कौटुंबिक जबाबदारी उचलत आहेत. या सामाजिक परिवर्तनामध्ये स्त्रियासुद्धा त्याच ताणतणावातून जातात. मुक्त वातावरणामुळे व्यसनांचा विळखा त्यांनासुद्धा पडतो. घर, lp32संसार, नोकरी, करिअर यांचा ताण त्यांनापण सहन करावा लागतो. यामुळे स्त्रियांमध्येसुद्धा हृदयविकाराचे प्रमाण वाढते आहे. अनेक वर्षे गर्भनिरोधक गोळय़ा घेणाऱ्या स्त्रियांमध्येसुद्धा हृदयविकार प्रमाण वाढते आहे. आनुवंशिकता
हृदयविकार हा बऱ्याच प्रमाणात आनुवंशिक आहे. आईवडिलांना हा आजार असेल, तर मुलांना तो होण्याची शक्यता दाट असते. इतर धोक्याचे घटकसुद्धा आनुवंशिक असतात, जसे उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, घरातील वातावरण हेसुद्धा एक कारण आहे. खाण्यापिण्याच्या सवयी, तेलातुपाचे प्रमाण, घरातील ताणतणाव-संघर्ष, बैठी जीवनशैली या गोष्टींचा घरातील सर्वावरच परिणाम होतो. आता तर हृदयविकाराचे जीन्ससुद्धा ओळखण्यात आले आहेत. त्यामार्फत हा आजार घराण्यात एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जात असतो.
धूम्रपान
हा सर्वात महत्त्वाचा मोठा बदलण्याजोगा धोक्याचा घटक आहे. धूम्रपान आणि तंबाखूच्या सेवनाचे भयंकर दुष्परिणाम हृदयावर होतात. तंबाखूमध्ये घनरूप किंवा वायुरूपात असणारी चार हजार रसायने असतात. त्यातील ६० रसायने अशी असतात ज्यांच्यामुळे कर्करोग (कॅन्सर) होऊ शकतो.
कार्बन, कार्बन मोनोक्साइड आणि निकोटिन ही रसायने हृदयाला प्रचंड हानिकारक असतात. त्यांनी रक्तदाब वाढतो, रक्तवाहिन्या कठीण होण्यास मदत होते, रक्तवाहिन्यांच्या आतल्या थराला इजा होते, दुखापत होते, त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अवरोध वाढतो. रक्तवाहिन्या आकुंचन पावू शकतात (spasm) आणि निकोटिनमुळे रक्त वाहिन्यांच्या अवरोधामध्ये तडे जाऊन तेथे रक्ताच्या गुठळय़ा जमा होण्यास मदत होते. त्यामुळे हार्ट अटॅक येतो.
धूम्रपानामुळे दरवर्षी जवळ-जवळ दहा लाख लोक मरण पावतात, त्यातील ३३ टक्के लोक हे हृदयविकाराने मृत्युमुखी पडतात. धूम्रपानामुळे फुप्फुसाचे कर्करोग, दमा, ओठांचा-पोटांचा कॅन्सर, इतर रक्तवाहिन्यांचे आजार (Peripheral Artery disease), लकवा (Paralysis, Stroke), नपुंसकता, मानसिक आजार असे अनेक आजार होऊ शकतात.
मद्यपान
मद्यपान हासुद्धा एक महत्त्वाचा धोक्याचा घटक आहे. पूर्वी म्हणायचे की, ‘वन पेग अ डे कीप्स डॉक्टर अवे, कीप्स हार्ट अ‍ॅटॅक अवे’ किंवा ‘वाइन इज फाइन फॉर हार्ट’; पण ही विधाने वैद्यकीयदृष्टय़ा अत्यंत चुकीची असल्याचे आढळून आलेले आहे.
अति मद्यपान केल्याने शरीरातील कबरेदके वाढतात. कबरेदके वाढल्यामुळे शरीरातील साखरेच्या पातळीत वाढ होते. कॅलरीजचे प्रमाण वाढते, परिणामी वजन वाढते. पोटाचा घेर वाढतो. वाढलेले पोट हे इन्शुलिन रेझिस्टन्सला आमंत्रित करते आणि मग मधुमेह आणि हृदयविकार होतात.
असे म्हणतात की, थोडय़ा मद्यपानामुळे शरीरातील चांगल्या कोलेस्टेरॉलची (एचडील) पातळी वाढते; पण वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. मद्यपानामुळे फक्त एचडीएल ३ चीच वाढ होते. एचडीएल ३ हे हृदयाच्या रक्षणाला काहीही हातभार लावत नाही. एचडीएल २ या उपघटकाची पातळी मद्यपानामुळे वाढत नाही. एचडीएलच्या पाच उपघटकांपैकी एचडीएल २ हाच उपघटक हृदयरक्षक असा आहे. तो वाढवण्यासाठी आपल्याला फक्त व्यायाम, योग्य आहार आणि औषधे (स्टॅॅटिन्स) याचाच फायदा होतो.
अल्कोहोलमुळे हृदयातील स्नायूपेशींवर परिणाम होतो. हृदयाची कार्यक्षमता कमी होऊन हृदयाचा आकार वाढतो. याला ‘डायलेटेड कार्डेओमायोपॅथी’ (Dilated Cardiomyopathy) असे म्हणतात. हृदयाच्या पेशीच्या पातळीवर (Cellular level) दुष्परिणाम होऊन हृदयपेशींची कार्यक्षमता कमी होते. तसेच हृदयातील विद्युतलहरी वाहणाऱ्या तंतूंवर मद्याचा परिणाम होतो. त्यामुळे हृदयाची लय आणि गती बिघडू शकते. अतिमद्यपानामुळे रक्तदाब वाढतो, मधुमेह वाढतो, लठ्ठपणा वाढतो आणि हृदयविकाराचे प्रमाण वाढते.
वाढलेला रक्तदाब
अति रक्तदाबाचा त्रास झाला तर हृदयविकार होण्याची शक्यता तीन ते चार पटीने वाढते. रक्तदाब वाढला की, हृदयावर कामाचा अतिरिक्त बोजा पडतो. हृदयाचे स्नायू जाडे होतात. त्यांना रक्त व ऑक्सिजन दोन्हीचे प्रमाण अधिक लागते; पण रक्तवाहिन्या तेवढय़ाच आकाराच्या राहतात, त्यामुळे स्नायूंना पुरेसे रक्त मिळत नाही. अशा रुग्णांना हृदयशूळ (अन्जायना – Angina) होतो.
तसेच अति रक्तदाबामुळे रक्तवहिन्यांच्या कठिणीकरणाच्या (Atherosclerosis) प्रक्रियेला वेग येतो आणि त्यात अवरोध (Block) येऊ शकतो. म्हणून हृदयविकाराचे प्रमाण अति रक्तदाबाच्या रुग्णामध्ये अधिक असते.
रक्तदाब फारच वाढला की, शरीरात कुठेही रक्तस्राव होऊन लकवा येऊ शकतो. कधी कधी मुख्य रक्तवाहिनी फुटू शकते, त्याला डिसेक्शन ऑफ अटरे ऑर व्हेसल्स असे म्हणतात. हा प्रकार जीवघेणा असतो.
रक्तदाब नियंत्रणात असेल तर हृदयविकार होण्याची शक्यता सर्वसामान्यांइतकीच असते. रक्तदाब नियंत्रणात ठेवला, तर हृदयाच्या स्नायूंची झालेली अतिरिक्त वाढ ही कमी होऊन ते स्नायू पूर्वस्थितीत येऊ शकतात.
शरीरातील चरबी आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण
हृदयविकार होण्यामागे शरीरातील चरबीचे प्रमाण हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. हे प्रमाण जर वाढले, तर हृदयविकाराचे प्रमाण वाढते. शरीरात चांगले कोलेस्टेरॉल (HDL- High density lipids) आणि इतर वाईट हानिकारक कोलेस्टेरॉल असतात. (LDL, VLDL, Triglycerides)
कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढू लागले की, ते रक्तवाहिन्यांच्या आत साचू लागते. प्रथम सूक्ष्म असणारे हे साठे कालांतराने फुगू लागतात. ते रक्तवाहिन्यांच्या स्नायूंत जमून रक्तवाहिन्यांच्या आतल्या बाजूला ‘व्रण’ (PLAQUE) तयार करतात. कोलेस्टेरॉल, फायब्रोटलास्टस् (तंतू) आणि स्नायूंच्या पेशी मिळून खडबडीत मुरुमासारखे अडथळे निर्माण होतात. जसजसे हे अडथळे मोठे होतात, रक्तवाहिनीचा आतील पोकळ भाग कमी होत जातो आणि रक्तपुरवठा कमी होतो.
कोलेस्टेरॉल रक्तातून रक्तवाहिन्यांच्या अस्तरात सहजासहजी जात नाही. यासाठी काही कोलेस्टेरॉल वाहक रासायनिक रेणू शरीरात असतात. त्यांना ‘लायपोप्रोटीन्स’ असे (Lipoproteins) म्हणतात. रक्तातील कोलेस्टेरॉल पेशीच्या आत नेणारा रेणू हा हलक्या घनतेचा असतो, त्याला ‘हलक्या घनतेचा लायपोप्रोटीन्स’ (LDL- Low density lipoprotein) रेणू असे म्हणतात. प्रत्येक पेशीला पेशीचे आवरण करण्यासाठी कोलेस्टेरॉलची गरज असते. आवश्यकतेइतका कोलेस्टेरॉल वापरून राहिलेला कोलेस्टेरॉल पेशीतून बाहेर काढण्याचे काम अधिक घनता असलेले उच्च घनता लायपोप्रोटीन्स करतात. एलडीएल जास्त असेल तर जास्तीत जास्त कोलेस्टेरॉल आत जाईल आणि साचून अडथळे निर्माण करेल. याउलट एचडीएल जास्त असेल तर पेशीबाहेर कोलेस्टेरॉल काढण्याचे काम करेल आणि अडथळे कमी होण्यास मदत होईल. एचडीएल वाढवण्यासाठी व्यायाम करणे (आणि Statins च्या गोळय़ा) हा उपाय असतो. आपल्या आहारात योग्य असा बदल करून शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करणे आवश्यक ठरते.
(क्रमश:)
डॉ. गजानन रत्नपारखी