00gajananजगण्यामधली धावपळ, त्यासोबत येणारा ताणतणाव आणि बदलत्या जीवनमानामुळे स्त्रियांमध्ये अलीकडच्या काळात हृदयविकाराचं प्रमाण वाढलं आहे. त्यांनी कशी काळजी घ्यायला हवी याची चर्चा जागतिक महितलाल दिनाच्या निमित्ताने- 

जागतिक महिला दिन विशेष

जगामध्ये एकूण मृत्यूंपैकी जास्तीत जास्त मृत्यू हे हृदयविकाराच्या आजाराने होतात आणि हृदयविकाराच्या आजाराने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पूर्वी हा आजार वयस्कर व्यक्तीमध्येच आढळत होता, पण आता काही वर्षांपासून या आजारांची पाळेमुळे युवकांमध्ये आढळतात. पूर्वी हा आजार ५० वर्षे किंवा अधिक वय असणाऱ्यांमध्ये जास्त आढळायचा (खूपदा याला निवृत्तीचा आजार म्हणायचे.) पण आता ३० ते ५० वर्षे वयाच्या व्यक्तींमध्ये हा आजार आढळल्याचे प्रमाण ३५ ते ४० टक्के एवढे आहे.
पूर्वी हृदयविकाराचा आजार हा स्त्रियांमध्ये कमी प्रमाणात आढळत असे. त्यामागचे एक कारण म्हणजे स्त्रीच्या शरीरातील ‘हॉर्मोन्स’ हृदयविकार टाळण्यास मदत करतात. पण आज स्त्रिया पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. या सामाजिक परिवर्तनामुळे स्त्रियासुद्धा ताणतणावाच्या शिकार होतात. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. म्हणूनच स्त्रियांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे.

स्त्रियांमधील हृदयविकार वाढण्याची कारणे
वाढत्या शिक्षणामुळे आणि वाढत्या सामाजिक समानतेच्या जाणिवेमुळे आजची स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने आपली सामाजिक, कौटुंबिक जबाबदारी पार पाडीत आहे. साहजिकच नोकरी-धंद्यामधील ताण-तणाव, संघर्ष स्त्रीला सहन करावा लागत आहे.
नैसर्गिकरीत्या स्त्री जास्त संवेदनाक्षम व भावुक असते, तसेच स्त्रीची शारीरिक क्षमतासुद्धा नैसर्गिकरीत्या कमी असते. त्यामुळे या ताणतणावाचे परिणामसुद्धा तिच्यावर अधिक प्रमाणात होतात. तिच्या हळव्या मनावर हे परिणाम खोलवर रुजतात. लहानसहान गोष्टीचेसुद्धा विपरीत परिणाम मनावर होऊन त्याचा हृदयावर परिणाम होतो. नोकरीच्या दररोजच्या प्रवासातील शारीरिक, मानसिक संघर्ष तिला सहन होतोच असे नाही. शिवाय नोकरीच्या वेळेनंतर घरची जबाबदारीही असतेच.
बऱ्याच पाहण्यांमध्ये असे आढळून आले की, पुरुषांपेक्षा स्त्रियांची घरात आणि घरातील घटकांशी आणि घटनांशी भावनात्मक गुंतवणूक जास्त असते. त्यामुळे नोकरी करणाऱ्या स्त्रियांना बाहेरील आणि घरातील समस्यांना एकाच वेळी तोंड द्यावे लागते. अशा स्त्रियांना अतिरक्तदाब आणि हृदयविकाराचे आजार होण्याचे प्रमाण जास्त असते.
बैठय़ा कामाची नोकरी असणाऱ्यांची समस्या ही वेगळीच आहे. सारखे बसून काम केल्याने वजन वाढते. विशेषत: पोट वाढणे हा प्रकार मोठय़ा प्रमाणात पाहायला मिळतो. नोकरी आणि घरच्या जबाबदारीमुळे व्यायाम करायला वेळच मिळत नाही. त्यामुळे वजन वाढणे, पोटाचा घेर वाढणे, मधुमेह होणे, अतिरक्तदाबाचा आजार होणे या सर्वाना निमंत्रण मिळते. त्याला मेटॉबॉलिक सिंड्रोम असे म्हणतात. याचे प्रमाण भारतात बरेच आहे. यात हृदयविकार आणि हार्ट अ‍ॅटॅक येण्याचा खूप संभव असतो.
आजकाल स्त्रियांमध्येसुद्धा धूम्रपानाचे प्रमाण वाढत आहे. शराब, शबाब, कबाब, दारू, लेट नाइट पार्टीज, वेळी अवेळी जेवणं, त्यात तेलकट-तुपकट पदार्थाची रेलचेल, जागरण असं सगळं करणाऱ्या स्त्रियांना हृदयविकार होण्याचे प्रमाण खूप असते.
महत्त्वाचे म्हणजे बऱ्याच स्त्रिया गर्भनिरोधक गोळय़ा घेतात. काही वर्षांनंतर त्याचे परिणाम दिसून येऊ शकतात. बऱ्याच संशोधनात असे आढळून आले आहे की, ज्या स्त्रिया बऱ्याच काळासाठी गर्भनिरोधक गोळय़ा घेतात त्यांच्यात हृदयविकार होण्याचे प्रमाण जास्त असते.
एकंदरीतच आपल्या देशातील स्त्रियांची उंची आणि आकारमान (B.M.I) हा पाश्चिमात्य स्त्रियांपेक्षा कमी असतो. त्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा आकार व व्यास हा खूप कमी असतो. थोडक्यात रक्तवाहिन्या या आकाराने छोटय़ा असतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांत होणारा थोडाही अवरोध (BLOCK) हा जास्त दुष्परिणाम करू शकतो. (micro- vascular Disease) तसेच व्यायाम आणि शारीरिक हालचाल कमी असल्यामुळे स्त्रियांच्या हृदयात रक्तवाहिन्यांचे जाळे (collateral circulation) कमी आढळते. त्यामुळे हृदयविकाराची तीव्रता स्त्रियांमध्ये जास्त जाणवते.
भारतात स्त्रियांना पुरुषांपेक्षा दुय्यम स्थान देण्यात येते. त्यामुळे स्त्रियांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करण्याकडे घरातील लोकांचा आणि स्त्रियांचा स्वत:चाही कल असतो, त्यामुळे हृदयविकाराचे सुरुवातीच्या स्टेजला निदान होत नाही. दुखणे अंगावर काढणे असा हा काहीसा प्रकार आहे. या सर्व गोष्टींमुळे स्त्रियांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढत चालले आहे!
युवकांमधील वाढते प्रमाण
वाढते औद्योगिकीकरण, वाढते यांत्रिकीकरण, वाढणारी स्पर्धा यामुळे प्रत्येक देश औद्योगिक प्रगतीच्या मागे झपाटय़ाने लागलाय. यात युवकांचा मोठा सहभाग आहे, पण औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे युवकांचे आहार, विहार, आचार, विचार बदलले.
यशाच्या मागे धावणाऱ्या प्रत्येकाला यश मिळेलच याची शक्यता नसते व ज्यांना मिळाले त्यांनी ते समाधानी आहेतच असेही नाही. त्यामुळे मानसिक तणाव वाढत आहे.
टार्गेट पूर्ण करण्याची टांगती तलवार कॉपरेरेट संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळे वेळेपेक्षा अधिक काम केले जाते. कामाच्या मोबदल्यात मिळणारे वेतन हे नेहमीच कमी वाटते. ऑफिसमधील वातावरण हे पुष्कळदा तणाव निर्माण करणारे असते. त्यामुळे ऑफिस कॉपरेरेटमध्ये काम करणारे नेहमीच तणावात असतात. नोकरी, कामाच्या जागी तणाव, धंद्यामधील नफा-तोटा, घरातील ताण या सर्वाचा विपरीत परिणाम हृदयावर होऊन अतिरक्तदाब आणि हृदयविकार होण्याची संभावना असते.
आहारामध्ये तेल, तूप, मसाल्याचे पदार्थ, तळलेल्या पदार्थाची रेलचेल, पिझ्झा-बर्गर संस्कृती, अधिक कॅलरीजची शीतपेये, अल्कोहोल यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण वाढले आहे. अति शिजलेले अति तळलेले आणि मांसाहाराचा अतिरेक यामुळे कॉलेस्टरॉलचे प्रमाण वाढत आहे. फळे, पालेभाज्या, कडधान्ये, सॅलाडचा वापर कमी झाला आहे. ‘टिन फूड’ पॅकबंद डब्यातील अन्न हे नेहमीचेच झाले आहे.
शहरीकरणामुळे लोकांचे राहणीमान उंचावले. कॉम्प्युटर, वाहनांमुळे चालण्याचा व्यायाम कमी झाला. वातावरणात धुळीचे आणि कार्बनचे प्रमाण वाढून प्रदुषण वाढले. धकाधकीच्या आयुष्यामुळे व्यायामाला वेळ मिळत नाही. ताण-तणाव वाढत जातो. मानसिक त्रास वाढतो. मनुष्य धूम्रपान, मद्यपान इतर उत्तेजके यांच्या आहारी जातो. या सर्वाचा परिणाम हृदयावर होतो.
शहरीकरणामुळे सुख-सुविधा वाढल्यात, पण मानसिक स्वास्थ्य हरवले. या सिमेंटच्या जंगलात मानव भावनाशून्य-हृदयशून्य झाला. एकलकोंडा झाला. मानवाला इतरांपासून वेगळय़ा करणाऱ्या गोष्टी, एकटेपणा व ताण निर्माण करतात. न्युक्लिअर फॅमिलीमुळे माणूस गर्दीतसुद्धा एकटा असतो. जेव्हा संकटे येतात, संघर्षांचा प्रसंग येतो, त्याला आपल्या एकाकीपणाची, हतबलपणाची जाणीव होते. एकटेपणा वाढणे हे आरोग्यासाठी, मानसिक आरोग्यासाठी घातक आहे. एकटेपणामुळे डिप्रेशन, काळजी, भीतीसारख्या नकारात्मक गोष्टींचा जन्म होतो. या सर्वच हृदयविकाराला आमंत्रण देतात.
एकत्र कुटुंबात राहणाऱ्या व्यक्तींमध्ये हृदयविकाराचे प्रमाण कमी असते. कुटुंबीयांशी असलेली जवळीक आणि त्यातून मिळणारा मानसिक आधार या गोष्टींमुळे Catecholamines/ Adrenaline सारख्या (हानीकारक) हार्मोन्सचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. हे हार्मोन्स हृदयविकार होण्यास हातभार लावतात. एकटेपणा हा नैराश्याला आमंत्रण देतो. नैराश्यात सहसा लोक व्यसनांच्या नादी लागतात.
प्रथम विरंगुळा म्हणून लागलेले व्यसन नंतर त्या व्यक्तीला कधी नादी लावते हे कळतच नाही. मनुष्य सहजच व्यसनांच्या आहारी जातो. आजच्या पिढीमध्ये तंबाखू, धूम्रपान आणि मद्यपानाचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. आपल्या समाजात सध्या सर्वात जास्त मृत्यू तंबाखू सेवनाने आणि धूम्रपानामुळे होणाऱ्या आजारांमुळे होतात. धूम्रपान हे आरोग्याला अपायकारक आहे. हे युवकांना माहीत असूनसुद्धा ‘कळते पण वळत नाही’ या उक्तीप्रमाणे.. आजचा युवक हा धूम्रपानाच्या अधीन झाला आहे.
तंबाखू उद्योगाचा खप वाढवण्याच्या आक्रमक धोरणांमुळे आणि गोंडस जाहिरातींमुळे, प्रचारामुळे त्यांच्या उत्पादनाचा खप वाढतो आणि आपली युवा पिढी व्यसनाधीन होते आहे. ब्राऊन शुगर, कोकेन, मॉर्फीन, हेरॉईन यासारख्या नशील्या पदार्थामुळे पण युवकांच्या आरोग्यावर व हृदयावर विपरीत परिणाम होतात.
युवकांमध्ये मद्यपानाचे प्रमाण खूप वाढले आहे. सोशल ड्रिंिकग या गोंडस नावाखाली सुरू झालेले मद्यपान अँटीसोशल कधी होते हे युवकांना कळतच नाही.’
काही प्रचलित गैरसमज. जसे ‘Two peg a day keeps Doctors awayl, kwine is fine for heart…’ यांच्यामुळे युवक संभ्रमित अवस्थेत नकळत मद्यपानाच्या व्यसनाकडे वळतो. दारूमुळे (बीअरमुळे) वजन वाढते, रक्तदाब वाढतो. हृदयाच्या स्नायूंवर परिणाम होऊन स्नायू कमजोर होतात. त्यामुळे हृदयाचे आकारमान वाढून पंिपग क्षमता कमी होते. त्याला डायलेटेड कार्डिओमायोपॅथी- (Dilated Cardiomyopathy) म्हणतात. ऑफिसच्या पाटर्य़ामध्ये धूम्रपान आणि मद्यपान हे अगदी सर्रास पाहायला मिळते. हेसुद्धा युवकांमध्ये हृदयविकाराला आमंत्रित करते. अशा पाटर्य़ामध्ये तळलेल्या मसाल्यांच्या पदार्थाची रेलचेल, (स्टार्टर्स, चकणा) अधिक कॅलरीजची शीतपेये, रात्री-अपरात्री जागरण, पुन्हा दुसऱ्या दिवसाची धावपळ यामुळे ही पिढी शरीराचे हाल करत आहे. अशा घटनांमुळे तरुण पिढीमध्ये हृदयविकार बळावत चालला आहे.
आपण भारतीय संस्कृतीपासून भटकून विकृतीकडे चाललो आहोत. योगविलासापासून भरकटून भोगविलासाकडे जातो आहोत. आपण आपल्या ‘आचार, विचार, आहार, विहार’ याबद्दल चोखंदळ असले पाहिजे. कारण या पिढीचे अनुकरण येणारी पिढी करत असते. आधीच अति प्रमाणात अनुवांशिक असलेल्या हृदयविकाराला, या सर्व व्यसनांनी आणि इतर बाबींनी, झपाटय़ाने वाढायला हातभार लागतो.
म्हणून, सित्रायो व युवकांनो जागे व्हा,
व्यसनांविरुद्ध एक व्हा,
नेक व्हा,
हृदयविकार टाळा।
डॉ. गजानन रत्नपारखी