28 May 2020

News Flash

नातं हृदयाशी : हृदयविकाराचे बदलते स्वरूप

हृदयविकाराचे आपल्या देशातले वाढते प्रमाण गंभीर आहेच, पण त्याचबरोबर गंभीर आहे ती लोकांची या विकाराकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती.

| February 27, 2015 01:20 am

हृदयविकाराचे आपल्या देशातले वाढते प्रमाण गंभीर आहेच, पण त्याचबरोबर गंभीर आहे ती लोकांची या विकाराकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती. आपल्या जीवनशैलीचा गांभीर्याने विचार करायची वेळ आली आहे, हेच हृदयविकाराचे वाढते प्रमाण सांगते.

हृदयविकार, हृदयविकाराचा झटका, हार्ट अ‍ॅटॅक, बायपास सर्जरी, अ‍ॅन्जिओप्लास्टी हे शब्द सर्वाना चांगलेच परिचयाचे झाले आहेत. सर्वसामान्यांनासुद्धा या आजाराबद्दल काही ना काही माहिती असतेच आणि सहसा सर्वसामान्य मनुष्य या आजाराला घाबरूनच असतो. पुष्कळदा मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका हेच असते आणि या आजाराचे प्रमाण वाढतच चालले आहे.
जगभरात एकूण मृत्यूंपैकी जास्तीत जास्त मृत्यू हे हृदयविकाराच्या आजाराने होतात आणि हृदयविकाराच्या आजाराने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कॅन्सर, एड्स, संसर्गजन्य रोग, अपघात, खून.. यांसारख्या सर्व कारणांनी मरणाऱ्या लोकांपेक्षा हृदयविकारानं मरणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
हृदयविकाराचे प्रमाण भारतात झपाटय़ाने वाढत आहे. जर हे प्रमाण असेच वाढत राहिले तर २०२० मध्ये भारतात सर्वाधिक हृदयविकाराचे रुग्ण असतील.
भारतात ‘कोरोनरी आर्टरी डिसीज’ हृदयविकाराचे प्रमाण पूर्वी १९६० साली चार टक्के होते. हृदयविकार, रक्तवाहिन्यांच्या आजाराचे प्रमाण भारतीय लोकांमध्ये १९८० साली आठ टक्के होते. आता ते वाढून ११.१२ टक्के इतके झाले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते २०२० साली २०-२५ टक्के एवढे असेल. हे प्रमाण भारतीयांमध्ये युरोपियन आणि अमेरिकन लोकांपेक्षा पाच-सहा पटीने जास्त आहे.
मागील ४० वर्षांत शहरी भागात हृदयविकाराचे प्रमाण झपाटय़ाने वाढत चालले आहे. ग्रामीण भागात हृदयविकाराच्या आजाराचे प्रमाण वाढत असले तरी त्या वाढीचा वेग हा शहर भागापेक्षा नक्कीच कमी आहे.
पण ग्रामीण भागाचे झपाटय़ाने शहरीकरण होत असल्याने शहरीकरणाचे जे आरोग्यावरील दुष्परिणाम होतात तेसुद्धा ग्रामीण भागातील जनतेवर होत आहेत.
भारतात दरवर्षी लाखो लोक हृदयविकाराच्या आजाराला बळी पडतात. पूर्वी हा आजार वयस्कर व्यक्तींमध्येच आढळत होता, पण आता या आजाराची पाळेमुळे तरुण पिढीमध्ये आढळतात.
किंबहुना भारतात ३५ ते ५० या वयोगटात हार्ट अ‍ॅटॅक येणाऱ्यांचे प्रमाण ४० टक्के आहे. जेव्हा एखाद्या घरी कर्त्यां पुरुषाला हृदयविकाराचा झटका येतो, तेव्हा आर्थिकदृष्टय़ा पूर्ण कुटुंब आजारी पडते, अस्वस्थ होते, खचते.
तसेच हृदयविकाराचा आजार हा स्त्रियांमध्ये कमी प्रमाणात आढळत असे. स्त्रीच्या शरीरातील ‘हार्मोन्स’ (Harmones) हे हृदयविकार टाळण्यास मदत करतात. पण आज स्त्रिया पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून सामाजिक, कौंटुबिक जबाबदारी उचलत आहेत. राष्ट्राच्या प्रगतीला हातभार लावत आहेत. या सामाजिक परिवर्तनामध्ये स्त्रियासुद्धा त्याच ताणतणावातून जातात. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. हृदयावर होतो. म्हणूनच स्त्रियांमध्येसुद्धा हृदयविकाराचे प्रमाण वाढत चालले आहे.
सामाजिक बदल : हृदयविकार
पूर्वी भारतात किंवा इतर विकसनशील देशात कुपोषण ही मोठी समस्या होती. पण आता लठ्ठपणा या आजाराचे प्रमाण वाढत चालले आहे. न्यूट्रिशन फाऊंडेशन इंडियाच्या निष्कर्षांप्रमाणे शहरी भागात ४५ टक्के स्त्रिया आणि ३० टक्के पुरुष हे लठ्ठ आहेत.
आधुनिक जीवशैलीवर खूश होऊन आपण एका चक्रव्यूहात सापडलो आहोत. मॅकडोनाल्ड, पिझ्झाहट, चायनीज पदार्थ, फास्ट फूड, बटर-बर्गर संस्कृतीमुळे लठ्ठपणा हा वाढत चालला आहे.
सर्वाना घेऊन बाहेर जेवायला जाण्यात विरंगुळा असला तरी ती आता फॅशन होऊन त्याचा अतिरेक होत चालला आहे. तळलेल्या हाय कॅलरीज पदार्थामुळे मधुमेह, अतिरक्तदाब आणि हृदयविकार शरीरात हळूच प्रवेश करत आहेत.
नुडल्स, पिझ्झा, चॉकलेटस्, केक्स, चिप्ससोबत कोकाकोला.. पेप्सी रिचवत रिचवत टी.व्ही. पाहणे.. हाय- फाय फॅशन आली असून किंवा या सर्व गोष्टींचा उपभोग घेत नेटवर सर्फिग करणे म्हणजे जागतिकीकरणाचा एक भाग आहे असे बरेच महाभाग समजतात. पण हे ग्लोबलायझेशन नसून स्लो पॉइझनायझेशन आहे.
बैठय़ा जीवनशैलीमुळे आणि भरपूर कॅलरीजच्या सेवनाने हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. याची पाळेमुळे शालेय जीवनातच आपल्या लहान पिढीत रुजू लागली आहेत. स्पर्धात्मक जीवन, अभ्यासाचे टेंशन, टय़ुशनचा भार आणि पालकांनी आपल्या मुलांवर टाकलेल्या अपेक्षांचे ओझे. यामुळे शालेय मुले तणावात पिचली जात आहेत. खेळणे.. व्यायाम करणे या गोष्टींना दुय्यम महत्त्व आले आहे.
गुबगुबीत लठ्ठ मुलं म्हणजे सुदृढ बालक असा गोड गैरसमज पालकांमध्ये रुजला आहे. त्यांना पाहिजे ते देणे, त्यांचे हट्ट पुरवणे म्हणजे योग्य संगोपन करणे असे आजकालच्या पालकांना वाटते.
नोकरी-धंद्यामुळे आपल्या मुलांकडे लक्ष देऊ न शकल्यामुळे ते त्यांची भरपाई त्यांना चमचमीत पदार्थ, वेगवेगळी इलेट्रॉनिक खेळणी देऊन करण्याचा प्रयत्न करतात.
मुलांना प्रेझेन्टस नको असतात. त्यांना आपल्या आई- बाबांचा प्रेझेन्स हवा असतो त्यांना खेळण्याचा नाद नको असतो. त्यांना आपल्या मम्मी-पप्पांचा संवाद हवा असतो. ते त्यांना न मिळाल्यामुळे ही मुले एकलकोंडी होतात, मानसिकदृष्टय़ा कमजोर होतात.
जेव्हा जीवनात संघर्षांचे क्षण येतात तेव्हा अशा मुलांमध्ये, युवकांमध्ये जास्त तणाव निर्माण होतो आणि त्याचा हृदयावर परिणाम होऊ शकतो. व्यायामामुळे शारीरिक कणखरतेसोबतच मानसिक कणखरतासुद्धा येते. पालकांनी स्वत:च्या खाण्यापिण्याकडे, आपल्या मुलांच्या खाण्यापिण्याकडे, खेळण्याकडे, आरोग्याकडे लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे.
आपण आपल्या जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. अमेरिकेने दाखवून दिले आहे की, जीवनशैली, आहार, व्यायाम, विहार या गोष्टी बदलल्या की हृदयविकाराचे प्रमाण कमी होते. अमेरिकेत हे प्रमाण पाच ते सहा टक्क्यांनी कमी झालेले आहे.
भारतात प्रमाण जास्त का?
भारतात हृदयविकाराचे प्रमाण पश्चिमात्य देशांपेक्षा अधिक आहे. आनुवंशिकता एक प्रमुख कारण असून इतर कारणेसुद्धा मोठय़ा प्रमाणात आढळतात.
निरक्षरता आणि अज्ञान याचे प्रमाण भारतात अधिक असल्यामुळे हे आजार कसे होतात, ते कसे टाळावेत याचे ज्ञान, माहिती पुष्कळदा लोकांना नसते.
हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणे दिसू लागली तरीही त्याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे हा आजार बोकाळतो आणि नंतर भयंकर स्वरूपात प्रकटतो.
तसेच दारिद्रय़ाचे प्रमाण भारतात अधिक असल्यामुळे स्वास्थ्य, आरोग्य यासारख्या गोष्टींकडे सर्वसामान्य गरीब लोक प्राधान्य देत नाहीत..!
भारताची लोकसंख्या प्रचंड वाढल्यामुळे मूलभूत सुविधांवर खूपच ताण येत आहे. नोकऱ्या कमी, व्यवसायातील स्पर्धा, अडथळे, लालफितीची अडवणूक, सामाजिक विषमता यामुळे जीवन फारच तणावपूर्ण झालेले आहे.

या सर्व गोष्टी मनुष्याला अति रक्तदाब आणि हृदयविकाराच्या जाळय़ात ओढतात. हृदयविकार टाळण्यासाठी जी राजकीय इच्छाशक्ती किंवा शासकीय मदत लागते ती या समाजाला मिळत नाही. राष्ट्रपातळीवर जे रोगप्रतिबंधाचे किंवा रोग कमी करण्याचे जे कार्य व्हायला पाहिजे ते त्या प्रमाणात होत नाही ही राजकीय उदासीनता भारतात हृदयविकाराचे प्रमाण वाढायला काही प्रमाणात कारणीभूत आहे.
महत्त्वाचे म्हणजे हृदयविकार होण्यास कारणीभूत असलेले जे नेहमीचे धोक्याचे घटक आहेत (Conventional Risk Factors) त्या सर्व घटकांचे प्रमाण भारतीयांमध्ये जास्त आहे. म्हणजे धूम्रपान, तंबाखूचे सेवन, उच्च रक्तदाब, मधुमेहाचे प्रमाण, लठ्ठपणा, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव या सर्व गोष्टी भारतीयांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात.
त्याव्यतिरिक्त काही विशिष्ट अशा धोक्याच्या घटकांचे प्रमाण फक्त भारतीयांतच आढळते. ते म्हणजे होमोसिस्टिनचे? अधिक प्रमाण, फायब्रोजेनचे अधिक प्रमाण, विशिष्ट प्रकाराची चरबी (LP (a), small dense LDL) Triglyceride ट्रायग्लिसराईडचे अधिक प्रमाण, इन्सुलिन रेझिस्टंस् (Insulin Resistance) या सर्व घटकांचे प्रमाण भारतीयांमध्ये अधिक प्रमाणात आढळते. बार्कर सिद्धांताप्रमाणे (Barker Hypothesis) गर्भवती स्त्रियांमध्ये जर सकस आहाराची कमतरता असेल तर तिला होणाऱ्या अर्भकात मोठेपणी रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार होण्याचे प्रमाण अधिक असते. कुपोषणामुळे स्वादुपिंड आणि मूत्रपिंडाची वाढ योग्य होत नाही. स्वादुपिंडामधील B-cells ची संख्या कमी झाल्याने पुढे त्यांना मधुमेह होऊ शकतो आणि किडनीच्या अयोग्य (Less nephrons) विकासामुळे रक्तदाब वाढू शकतो.
थोडक्यात हृदयविकाराचे प्रमाण भारतात प्रचंड वाढत आहे. आपण वाढत्या शहरीकरणाची किंमत मोजत आहोत. शहरीकरणामुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत. त्यातच खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयी, आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची बेदरकार वृत्ती, नोकरी आणि व्यवसाय यामधील स्पर्धा, त्यातून होणारा ताणतणाव, इतर रिस्क फॅक्टर्समुळे आधीच आनुवंशिक असलेल्या हृदयविकाराला झपाटय़ाने वाढायला हातभार लागत आहे.
डॉ. गजानन रत्नपारखी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2015 1:20 am

Web Title: heart diseases
Next Stories
1 अन्न हे पूर्णब्रह्म
2 लहान माणसाचं मोठं काम…
3 ब्लॉगर्स कट्टा : नांदत्या गोकुळातले दिवस
Just Now!
X