चित्रपटसृष्टी म्हटलं की गॉसिप आलंच. हिंदी सिनेमाच्या क्षेत्रात या गॉसिपला चांगलाच ‘भाव’ असतो. तुलनेत मराठी सिनेमांमध्ये आत्ता कुठे गॉसिप पिकायला सुरुवात झाली आहे.

हॉलीवूडपासून बॉलीवूड/ टॉलीवूडपर्यंत ‘चालणारे’ हुकमी नाणे म्हणजे गॉसिप. अर्थात कुचाळक्या. चित्रपट हे अनेक कला व विज्ञान यांच्या मिश्रणातील माध्यम असून जनसामान्यांकडून मिळणाऱ्या प्रतिसादावरून हा व्यवसाय पावले टाकत असला तरी त्यात ‘गॉसिप -गंमत -गोष्टी’चे आपले स्थान आहे, एक रंग आहे. गॉसिप सिनेपत्रकारितेचा जणू श्वास आहे.
कलाकारांचे आपसातील बदलते/ बिघडते नातेसंबंध, प्रेमाचे मधुर संबंध, लग्नाच्या अक्षता असे करता करता घटस्फोटाची ठिणगी, कुठे विवाहबाहय़ संबंध, तर कुठे विवाहाशिवाय संबंध, काहींना दुसरे, तिसरे इतकेच काय चौथे लग्नही शक्य. एखाद्या धाडसी अभिनेत्रीचा वयाने खूप लहान असणारा प्रियकर, कुठे टॉपलेस फोटो फीचरची धूम, एखादीचा आपले शरीरसौष्ठत्व दाखवून देण्याचा नेटका व चक्क आकर्षकपणे जमून आलेला फोटोपेज प्रयत्न. कुठे तो (नायक) व ती (नायिका) यांच्या प्रणयात दंग झालेल्या अदा, तर कुठे तो (अर्थात नायकच) व पुन्हा ‘तो’च (येथे सहनायक) यांच्या समलिंगी संबंधांची चर्चा. कधी तर कळते, ती (अर्थात नायिका) व ती (कुठे ‘अशीच एक नायिका,’ अथवा सेक्रेटरी, जिच्याशी मन-भावना जुळल्या म्हणूनच तर..) असेही संबंध! कधी बेधडक वक्तव्यांची मुलाखत. त्यात प्रणयापासून (अर्थात सेक्सपासून) व्यक्तिस्वातंत्र्यापर्यंतचे तिचे बोल. दीपिका पदुकोणचा ‘माय चॉइस’ हे ताजे सनसनाटी उदाहरण आहे.
या साऱ्याचा अभिनयाशी संबंध नाही, पण सिनेमाच्या जगातले हे सगळय़ात आकर्षण. त्यात आणखी कुठे लपलेले/ दडलेले वगैरे असे काही जाणून घेणारा असा समाजात अक्षरश: प्रचंड मोठा वर्ग आहे. चित्रपट पाहणारे या कुचाळक्यात जरा जास्तच रस घेतात, पण कधी तरी चित्रपटाच्या वाटेला जाणारेही, यावर मस्त तोंडसुख घेतात. दुसऱ्याचे काय बरे चालले आहे हे जाणून घेणे ‘मानवी स्वभाव’ आहे. चित्रपट कलाकारांच्या बाबतीत तर त्यांचा अभिनय, त्यांची बौद्धिक वाढ, त्यांची नवनवीन अनुभवांमुळे बदलती मानसिकता, त्यांची चित्रपट स्वीकारायची पद्धत, एखादी आव्हानात्मक व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्यांनी केलेले चिंतन/ मनन/ वाचन अशा ‘गंभीर गोष्टीं’पेक्षा त्यांच्या प्रेमप्रकरणे, छुपे संबंध, त्यांचे कपडे, पेज थ्री पार्टीतील त्यांचे ‘पिणे’ व मग खाणे-वागणे, त्यांच्या खुमासदार मुलाखती यांना महत्त्व आहे. सिनेमा ‘पाहण्याची गोष्ट’ असल्याने असे सर्वत्र ‘पाहणेच’ आले.
चित्रपट कलाकाराच्या ‘गॉसिप्सच्या खेळी’ला केवढी सुपीक जमीन व मोकळे वातावरण आहे ते.. एखाद्या हॉलीवूड अभिनेत्रीने सातवे लग्न केले तर ती खूप मोठी खमंग बातमी असते, एखाद्या कतरिना कैफने विदेशात समुद्रकिनारी बिकिनीत रणबीर कपूरसोबत ‘सुट्टीचा आनंद’ घेतल्याबाबत केवढे कुतूहल.. असे आपल्या मराठी चित्रपटसृष्टीबाबत का बरे होत नाही?
मराठीत गॉसिपच नाही असे कोणीही धाडसी विधान करू नये. आता तर मराठीत इतके व असे मोकळे वातावरण आहे की, काही कलाकार उपग्रह वाहिनीच्या एखाद्या स्त्री प्रतिनिधीलाही सवयीने सहज ‘हग’ (म्हणजे गले लगना) करतात आणि एखादीला हीच आपल्या कामाची खरी पावती वाटते अथवा वाटू शकते. ती सुखावते/ शहारते व त्याची परतफेड म्हणून त्या हिरोला आपल्या उपग्रह वाहिनीवर पुन:पुन्हा चमकवते. ही कुजबुज व त्यामागची वृत्ती व कृती म्हणजेही गॉसिपचा एक रंगच! तात्पर्य, मराठीतले गॉसिफ या स्तरावरही रंगतेय म्हटल्यावर त्यात तो व ती यांचे प्रेम/ छुपे प्रेम/ बसलेले प्रेम/ फसलेले प्रेम/ बाहेरचे आकर्षण/ एकाच संसारात असूनही व्यावसायिक जगात मात्र ‘आपले मार्ग वेगळे, मित्र-मैत्रिणीही वेगळय़ा, इतकेच नव्हे तर व्हॉटस्अ‍ॅपवरचा ग्रुपही वेगळा.. हे तर काहीच नाही, दूरवरच्या प्रवासातही ते दोघे स्वतंत्र (विमानात..होय,) तेथे राहणेही स्वतंत्र.. असो, यासह घटस्फोट, दुसरे लग्न, पुन्हा तिसरे लफडे हे आहेच. एकीकडे हे खूप खासगी (पण त्यातच तर चित्रपटरसिकांना चर्चेचे खाद्य मिळते.) याशिवाय दुसरीचा चित्रपट जमल्यास तिसरीने पळवणे, एखादीला ‘तूच या चित्रपटात आहेस’ असे आश्वासन कायम असतानाच प्रत्यक्षात चित्रीकरण मात्र दुसरीवर झालेदेखील असा प्रकार. दोन नायकांमधला कधी भूमिकेच्या लांबी/रुंदीवरून छुपा संघर्ष (त्यापेक्षा भूमिकेची खोली महत्त्वाची असते हे त्यांना सांगावेसे वाटते) कधी चक्क ‘एखाद्या अभिनेत्रीचा सहवास त्याला जास्त का यावरून आतल्या आत जळफळाट, तर कधी मानधनावरून धुसफुस.. सर्वसामान्य माणूस जसा वागतो तशीच ‘कलाकार मंडळीही वागतात, कारण तोंडाला रंग लावल्यावर ते कलाकार असतात आणि त्यांच्यातला माणूस लोभ/ मोह/ ईष्र्या/ मत्सर अशाच भावनांनी जगत असतो. मराठीच्या पडद्यावर आता बिकिनीदेखील ‘छान’ स्थिरावली आहे व त्यासाठीची मानसिक परिपक्वता दाखवण्यात ‘आपल्या मराठी तारका’ यशस्वी ठरत आहेत. प्रगती म्हणतात ती हीच.
गॉसिप्सला हवेहवेसे असणारे केवढे तरी ‘पौष्टिक खाद्य’ असूनही त्याचे पीक का काढले जात नाही?
पूर्वी मराठी चित्रपटाची पार्टी रात्रौ अकरा वाजता ओसरे, आता काही कलाकार त्या वेळी पार्टीला येतात. काहींची ती सवयच झाली. पूर्वी अशा ‘पार्टी’त नाचकामाची ‘साधी कल्पना’ही कोणी करीत नसे, आता काही पाटर्य़ात ‘बेन्जो तो मंगता है भिडू’ असे झाले आहे व पहाटे फक्त चार वाजेपर्यंत नाचकाम सुरू असते. नाचायचे तर ‘वेळ’ कशाला पाळा.
पूर्वी सुश्मिता सेन हिंदीच्या एखाद्या पार्टीत ‘आली रे आली’ की, तिच्या उंचीला नवीन फॅशनचे वस्त्र कसे शोभते हे कौतुकाचे वाटे. आता आपल्या पल्लवी सुभाष, रेशम टिपणीस, क्रांती रेडकर, ऊर्मिला कोठारे, सई ताम्हणकर या तर जणू आजच संध्याकाळी मॉलमध्ये आलेल्या अगदी नवीन फॅशनच्या वस्त्रात मराठीच्या पार्टीत येतात.
पूर्वी ‘झटपट करू दे खटपट’ या चित्रपटात सरला येवलेकर व शलाका या गाण्यातील पावसात चिंब झाल्या म्हणून केवढा गहजब झाला, अरे ‘भिजलेली नटी’ हे ‘गल्लापेटी’चे विशेष आकर्षण असते हे का विसरता? आता ‘मितवा’मधले स्वप्निल जोशी व सोनाली कुलकर्णी यांच्या चुंबनदृश्याचा गोडवा काय सांगावा? तसे चविष्ट दृश्य पाहण्यासाठी आता हिंदी चित्रपटाला जाण्याची गरजच ती काय? पुन्हा तेच.. प्रगती.
‘हिप्प हिप्प हुर्ये’ चित्रपटासाठी रेड बिकिनीत सुरेख दर्शन घडवणाऱ्या स्मिता गोंदकरने ‘पप्पी दे पारूला’ हा गीतसंग्रह व ‘वॉन्टेड बायको नंबर वन’ या चित्रपटासाठी ‘फिरून एकदा’ आकर्षक बिकिनीत आपल्या सुडौलपणाचे दर्शन घडवले. सई ताम्हणकरने ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘अशाच एका बेटावर’ अशा चित्रपटांतून ‘बिकिनी’त दर्शन घडवले नसते तर ते आश्चर्याचे ठरले असते. बासू चटर्जीच्या ‘शौकीन’ची ‘रिमेक’ असलेल्या ‘काय राव तुम्ही’मध्ये बिकिनीरूपाची गरज होतीच, ती नियती जोशीने किती सहज पूर्ण केली. हीसुद्धा ‘प्रगती’च हे पुन्हा सांगायला हवे काय?
आता ‘सडेतोड’ मतांचे बोलाल तर ‘जास्तच पैसे देणाऱ्या उमेदवाराचा मी प्रचार करेन, मग पक्ष कोणताही का असेना’ असे ‘मत’ व्यक्त करून सई ताम्हणकरने कशी छान ‘खळबळ’ उडवली. तर एखादा ‘चिकना’ हिरो एखाद्या पार्टीतून निघताना एखाद्या नवतारकेला टॅक्सी/ रिक्षातून जायची वेळ येऊ नये म्हणून थोडासा वळसा घेऊन आपल्या गाडीतून तिला घरी सोडतो.. ही मात्र गती.
गॉसिप छानसे शिजावे असा हा ‘खेळ’ रंगतोय, तरी मराठीत गॉसिपची ‘चव’ नाही, का बरे? त्यातली गती व प्रगती कशी दिसत नाही?
मराठी प्रसारमाध्यमांतही ‘स्टोरी तशी खरी’च्या सेटवर पूजा सावंतच्या सहवासात अनिकेत विश्वासराव खूप मोकळेपणाने वावरतो यापेक्षा सिद्धार्थ मल्होत्रा व आलिया भट्ट यांच्या काही ‘खिचडी पक रही है’ हे जास्त ‘जागा’ मिळवते. वरुण धवन कोणाकडे आकर्षित झाला आहे हे चारही दिशांनी माहीत पडते, तसे मेधा धाडे ही ‘सुपर स्टार’ या मराठी चित्रपटाची नायिका विवाहबद्ध झाली हे देखील समजू देत..
मराठी चित्रपट व त्याचे प्रत्यक्षातले जग हे कौटुंबिक वातावरण, मैत्रीचे नाते याने व्यापलेले आहे, त्यामुळे येथे गॉसिपची मुळे रुजली नाहीत. एखाद्या ‘तो व ती’च्या बा चित्रीकरण स्थळावरच्या चित्रीकरणानंतरच्या ‘भेटीगाठी’ची युनिटमध्ये कुजबुज असते, पण ही चर्चा पूर्वी प्रसारमाध्यमात येत नसे. हॅण्डसम नितीश भारद्वाज व आकर्षक वर्षां उसगावकर ‘पसंत आहे मुलगी’च्या चित्रीकरणाच्या वेळी खूप जवळ आले, यावरून पिकणाऱ्या कंडय़ा त्यांनी नाकारल्या नाहीत, त्या त्यांनी ‘मस्त’ एन्जॉय केल्या (तो वर्षांचा स्वभावच). त्यावरून दोघांनीही छानशा मुलाखतीही दिल्या (नितीश त्यात पारंगत).
आजच्या आंतरजाल/ व्हॉॅटस्अप काळातील रसिकांनीही शशांक केतकर व तेजश्री प्रधान लग्नानंतर ‘पहिल्या वर्षां’तच ‘कितने पास, क्यूं कितने दूर’ हे जाणून घेण्यात विशेष रस हो. ‘मितवा’त प्रेमिक साकारताना स्वप्निल जोशी व सोनाली कुलकर्णी आपल्या भूमिकांत इतके व असे रमले की, ‘मिक्ता’त त्यांचे वावरणे अगदी तसे तर जाणवले पण दुबईवरून एकाच विमानातून सहप्रवाशी बनून ते मुंबईपर्यंत आले. हिंदीच्या कोणत्याही कलाकारांबाबत ‘विमानतळा’वर असे काहीही ‘दिसले रे दिसले’ की ती इंग्रजी वृत्तपत्राच्या पुरवणीची ‘खमंग बातमी’ असते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण एका नामवंत छायाचित्रकाराने दोन-तीन जणांना चक्क ‘चोवीस तास’ विमानतळावर तैनात केले आहे. रणबीर कपूर-कतरिनाने विदेशात जाण्या-येण्याचे लपवण्याची कितीही काळजी घेतली तरी ते का बरे ‘लपत’ नाही हे समजले ना आता? मराठी कलाकारांना हे सगळं म्हणजे, त्यांच्या खासगी आयुष्यात खूपच नाक खुपसल्यासारखे, कान लावल्यासारखे व डोळे ठेवल्यासारखे वाटते. अरे, एकदा ‘सेलेब्रिटीज’ झाल्यात की फारसे काही खासगी राहात नाही. आजचे मराठी कलाकार ‘सेलेब्रिटी’ कधी झाले हे त्यांनाही समजलेले नाही. अनेकांना ते ‘सुखावते’ मात्र!
मराठी प्रसारमाध्यमांचा ढाचा ‘उल्टा/पुल्टा’ झाला तर मराठी चित्रपटसृष्टीतील गॉसिपची गंमत/ रंगत/ संगत ‘चव्हाटा’ गाजवू शकेल. मराठीत, खूप खूप जुन्या आठवणींचा ‘फ्लॅशबॅक’ (‘प्रभात’च्या काळातील चित्रपट कसे आशयसंपन्न होते), ‘वेगळ्या वळणा’च्या मराठी चित्रपटाचे कौतुक (‘ख्वाडा’, ‘नागरिक’, ‘बरड’, ‘सिटिझन्स’ अशा चित्रपटांमुळे ते ‘वळण’ आणखी सकारात्मक वातावरण आणते.), आगामी चित्रपटासंदर्भात भरभरून गोडी/गुलाबी, बासुंदी/श्रीखंडी अशा ‘एकतर्फी/ एकाकी’ मुलाखती (बऱ्याचदा ‘बोलबच्चन’पणा हो, या सुमधुर मुलाखतीतील गुण बऱ्याचदा चित्रपटात ‘दिसत’च नाहीत.) प्रसिद्धीमाध्यमाकडून आलेल्या चित्रपटाच्या मुहूर्तापासून एका आठवडय़ात सहा कोटी कमावले अशा ‘पेरलेल्या बातम्या’ (अरे, त्यातून निर्मिती खर्च, पूर्वप्रसिद्धी, पाटर्य़ा आणि आयकर वगैरेतून गेलेला पैसा हे सगळे ‘कापून’ जे उरतात ती त्या चित्रपटाची खरी कमाई व खरी किंमत असते हे ‘सत्य’ सांगा. उगाच आपले, वीस-पंचवीस कोटी कमाईच्या आरोळ्या ठोकता) हे सगळं झाल्यावर गॉसिप येते.. हिंदी चित्रपटसृष्टी नेमकी ‘उलटी चाल’ खेळते. तेथे रणवीर सिंग-दीपिकात ‘कुछ तो पक रहा है’ हे गॉसिप अगोदर येते व मग ते कोणत्या चित्रपटातून एक साथ भूमिका करीत आहेत हे समोर आणले जाते. हिंदीतील गॉसिपसाठी खूपच मोठी ‘यंत्रणा’ आहे, तेथे ‘गॉसिप’ हा एकूणच चित्रपटनिर्मिती प्रक्रियेतील एक ‘महत्त्वाचा घटक’ मानला जातो, कलाकारही गॉसिप पचवायला मानसिक व भावनिकदृष्टय़ा सक्षम असतात, तेथे काही वेळा गॉसिपची पातळी घसरते (म्हणूनच तर प्रचंड रागावून/ वैतागून / चिडून रेखाने सत्तरच्या दशकात प्रसारमाध्यमाशी ‘अबोला’ धरला, तेव्हा तिच्याशी एकरूप/ एकनिष्ठ असलेला अमिताभही त्याच ‘चाली’ने गेला). गॉसिप ही व्यावसायिक रणनीती, कलाकारांच्या खासगी आयुष्यात ‘तडमडण्याचा’ प्रसारमाध्यमांनी परस्पर करून घेतलेला समज व हक्क आणि ‘यादेखील मार्गाने फोकसमध्ये राहता येते/ राहायला पाहिजे’ अशी बऱ्याच मुख्य प्रवाहातील आघाडीच्या कलाकारांची मानसिकता, या साऱ्याची ‘मिलावट’ म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीचे गॉसिप! तेथे सुतावरून स्वर्ग गाठला जातो. ऐश्वर्याच्या इमारतीबाहेर ‘आशिक दीवाना’ सलमान खान रात्रभर दारू ठोसून ओरडत राहिला ही ‘ब्रेकिंग न्यूज’ चर्चेत असतानाच ऐशने आपली आई वृंदा हिचा सल्ला व साथीने त्याला ‘जाहीरपणे सोडचिठ्ठी’ देत खळबळही उडवली. ‘गॉसिपच्या बाजारात’ अशा चविष्ट गोष्टीत आणखी हिंग, मिरी, तिखट टाकले जाते. म्हणूनच तर समाजातला सुज्ञ माणूस सहज विचारतो, अरे ते कलाकारांच्या लफडय़ाबाबत इतके घाण घाण वाट्टेल ते छापून येते ते खरे असते काय? तेव्हा त्याच ‘मराठी आम आदमी’ला वाटत असते ‘आपले’ मराठी कलाकार वाह्य़ात नाहीत, ते ‘सामाजिक चौकट’ मोडणार नाहीत. एक-दोघे बिघडले असतील, पण सगळेच तसे नाहीत हो.. हा त्यांचा भाबडेपणा झाला, आता ‘परिस्थिती’ फारच बदलली/ बिघडली आहे, दोघी-तिघींना ‘भर पार्टी’त बीअर वा ब्रिझरचे घोट घ्यायला काहीही गैर वाटत नाही. सिनेमाच्या जगात दारू पाण्यापेक्षाही जास्त वाहते त्यामुळे त्याचे ढोस घेण्यात गैर ते काय? ‘मती गुंग झाली की काय?
‘गॉसिप’ ही मराठी चित्रपटसृष्टीची मूळ ‘संस्कृती’ नसली तरी तो माणसाचा स्वभाव आहे. चित्रपटावर गंभीर चर्चा वगैरे ‘कालबा’ झाले हो, ज्यांना करायची ते करतात. नवीन पिढीला सगळे कसे झटपट/ चटपटीत/ गरम हवे. त्यांच्या वृत्तीला सई ताम्हणकरचा ‘झपाटा’ खूप आवडतो. समाजाची वृत्ती-दृष्टी बदलताना त्यात सिनेमाचे जग व कलाकारांचे रंग-ढंग याकडेही ‘नवीन नजरेने पाहिले’ जाऊ लागलंय. पूर्वी सुलोचनादीदींचे सोवळेपण, कौटुंबिक प्रतिमा याच्याशी समाज जोडला गेला, अलका आठल्येच्या ‘सोशिक प्रतिमे’शीही समाजाने आपलेपण मानले, वर्षां उसगावकरच्या उत्स्फूर्तपणात समाजाने आपलाही आनंद मिळवला, अश्विनी भावेची विविधता, दादा कोंडकेंचा भाबडेपणा, अशोक सराफचे विनोदाचे अचूक टायमिंग अशा किती तरी गोष्टींशी समाजाने आपलेपण दाखवले..
आजच्या कॉफी, पिझ्झा, मसाला ग्रिल, आलु-टिक्का अशा पदार्थावर ‘ताव’ मारणाऱ्या पिढीला मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरसह गॉसिपही हवे.. त्याची भूक बदलली आहे, त्याला थाई, इटालियन फूडचीही सवय लागली आहे. तर मग त्याला मराठी चित्रपटसृष्टीकडून चार रिळाांची प्रगती झाली, महाबळेश्वरला चित्रीकरण झाले, चित्रपट प्रदर्शनाची तारीख ठरली अशा ‘जुन्या वळणा’च्या बातम्यांची अपेक्षा असेलच कशी? त्यांना भूषण प्रधानच्या ‘कंपनी’साठी कोण बरे आसुसलेले आहे, वैभव तत्त्ववादीसोबत फ्लर्ट करायला कोणाला आवडते, दुबईतील चित्रीकरणाच्या वेळी कोण कोणाबरोबर मुद्दाम वेळ काढून शॉपिंगला गेले होते, कोणाच्या बरे ‘नवीन संसारात’ धुसफूस सुरू आहे (असे व्हायला नको हो. पण पत्रकारिता जगवायची तर काही तरी ‘भलतेच’ घडायला हवे.. असे म्हणतात. आज मीडियाला ‘व्यक्ती’ महत्त्वाची नाही, ‘स्टोरी’ला ‘मूल्य’ आहे.) कोणता मराठी हिरो, आपणच ‘अभिनयाची शाळा’ काढल्यागत एक-दोन नवतारकांना धडे देतो, कोणती विवाहित अभिनेत्री.. फारच खासगी होत चालले आहे का हो? पण एकदा का ‘सेलेब्रिटीज’चा शिक्का बसला रे बसला की, तुम्ही नवीन गाडी कोणती घेतली यापासून ‘तुमचे’ सगळेच ‘सार्वजनिक’ होते ना, तसेच तुमचे रिश्ते/ नातेही ‘माध्यमा’त येऊ शकतात, आजच्या पिढीला ते रुचकर वाटते, त्याला फक्त मराठी चित्रपट पाहण्यात रस नाही. त्याचा मराठी चित्रपटसृष्टीतील एखादी रसिली ‘प्रेम कहाणी’ ही व्हाटस्अपवरून ‘फॉरवर्ड’ करायची असते.
मला, या नवीन पिढीचे एक आवडते. ते इतिहासात डोकावतात (राजा परांजपे, राजा ठाकूर यांच्या चित्रपटांचा ते आस्वाद घेतील) पण त्यांना ‘रोजच्या जगण्या’त ‘पडद्यामागे काय बरे पिकतंय’ हे हवे. त्यात त्यांचा ‘फुल्ल टू टाइमपास’ असतो.