lp50‘हिंदी सिनेमाला रिमेकचे आकर्षण भलतेच आहे हे यंदाच्या वर्षी अनेक रिमेक हिंदी सिनेमांनी सिद्ध केले. त्यातही खासकरून दाक्षिणात्य भाषांतील चित्रपटांचे हिंदी रिमेक सर्वाधिक असतात हे प्रेक्षकांनाही आता चांगलेच माहीत झाले आहे. ‘दृश्यम’ या नावाचा मूळ मल्याळम भाषेतील प्रचंड गाजलेल्या सिनेमाचा त्याच नावाचा हिंदी रिमेक दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी केला आहे.
बहुतांशी मूळ दाक्षिणात्य चित्रपट हे प्रचंड व्यावसायिक यश मिळविलेले असले आणि मल्याळमव्यतिरिक्त तामिळ आणि तेलुगू भाषेतील सिनेमांचेच प्रामुख्याने हिंदी रिमेक केले जातात. परंतु, ‘दृश्यम’ हा त्याला अपवाद ठरला आहे. सुप्रसिद्ध दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलालने मल्याळम सिनेमात प्रमुख भूमिका साकारली होती. हिंदी रिमेकमध्ये ही भूमिका अजय देवगणने साकारली आहे. निशिकांत कामत यांनी यापूर्वी ‘फोर्स’ हा रिमेक केला होता आणि तो चांगलाच यशस्वी ठरला होता. त्यानंतर ‘दृश्यम’ हा त्यांचा रिमेक असलेला दुसरा सिनेमा आहे.
मूळ मल्याळम ‘दृश्यम’च्या नावावर अनेक विक्रम नोंदले गेले आहेत हेही अधोरेखित करणे आवश्यक ठरते. मल्याळम सिनेमांतील सर्वाधिक गल्ला गोळा करणारा चित्रपट अशी ‘दृश्यम’ या चित्रपटाची ओळख निर्माण झाली आहे. सुमारे साडेचार कोटी रुपये खर्च करून बनविण्यात आलेल्या या चित्रपटाने तब्बल ६६ कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला होता अशी नोंद आहे. फक्त चित्रपटगृहांतील तिकीट विक्रीतून या सिनेमाने तब्बल ५० कोटी इतका गल्ला गोळा केला होता. २६ दिवसांत १० हजार खेळ असाही एक विक्रम या चित्रपटाने केला. त्यामुळेच की काय मूळ चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक जीतू जोसेफ यांच्या मूळ कथेला अजिबात धक्का न लावता त्या कथेवर आधारित पटकथा आणि संवाद लेखन उपेंद्र सिधये यांनी केले आहे.
विजय साळगावकर नावाचा एक केबल ऑपरेटर व्यावसायिक आपली बायको नंदिनी आणि दोन मुली यांच्यासोबत सुखाने नांदतो आहे. केबल ऑपरेटर या व्यवसायाव्यतिरिक्त फक्त टीव्हीवर सिनेमा पाहण्याचा विजयला विलक्षण नाद आहे. विजयच्या लहान मुलीच्या बाबतीत एक अप्रिय घटना घडते आणि त्यानंतर विजयची बायको नंदिनी आणि मुलगी यांच्या हातून एका व्यक्तीची हत्या घडते. आपल्या कुटुंबाला वाचविण्यासाठी विजय साळगावकर पुढे जे काही करतो त्या घटनांभोवती सिनेमा फिरतो.
साधेसे कथानक, पण उत्तम कलावंत, घटनांची उत्तम तऱ्हेने केलेली गुंफण आणि उत्कंठावर्धक मांडणी यामुळेच कदाचित सुपरडुपरहिट झालेल्या मूळ मल्याळम चित्रपटाचा आधी कन्नड, तेलुगू आणि नंतर तामिळमध्ये रिमेक झाला नसता तरच नवल. तामिळ रिमेकमध्ये प्रमुख भूमिका कमल हासनने केली आहे. अजय देवगणव्यतिरिक्त तब्बूनेही या हिंदी रिमेकमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
‘डोंबिवली फास्ट’ या मराठी सिनेमाच्या दिग्दर्शनाद्वारे निशिकांत कामत यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. तर ‘दृश्यम’चे पटकथा-संवाद लेखन करणारे उपेंद्र सिधये यांनी यापूर्वी ‘मुंंबई मेरी जान’ या निशिकांत कामत यांच्याच सिनेमाचे सहलेखक म्हणून काम केले आहे. सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ या सिनेमाच्या बाबतीत नमूद करणे अतिशय आवश्यक आहे. ते म्हणजे ‘किल्ला’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रचंड गाजलेल्या मराठी सिनेमाचे दिग्दर्शक अविनाश अरुण यांनी हिंदी ‘दृश्यम’चे छायालेखन केले आहे. मूळचे छायालेखक असलेल्या अविनाश अरुण यांनी ‘किल्ला’द्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. निशिकांत कामत, उपेंद्र सिधये आणि अविनाश अरुण असे हे ‘मराठी कनेक्शन’ ‘दृश्यम’साठी एकत्र आले आहेत.
या सिनेमासाठी ‘एक सो एक’ राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या व्यक्ती एकत्र आल्या आहेत हे या सिनेमाचे वैशिष्टय़ म्हणता येईल. अजय देवगणला ‘जख्म’ आणि ‘लीजेण्ड ऑफ भगतसिंग’ या सिनेमांसाठी तर तब्बूला ‘माचिस’ आणि ‘चांदणी बार’ या सिनेमांसाठी राष्ट्रीय पारितोषिक मिळाले होते. तर त्याचबरोबर निशिकांत कामत यांना ‘डोंबिवली फास्ट’ या सिनेमासाठी सवरेत्कृष्ट मराठी चित्रपटाचे राष्ट्रीय पारितोषिक मिळाले होते. त्याशिवाय या सिनेमाच्या निमित्ताने राष्ट्रीय पारितोषिक विजेते सुप्रसिद्ध लेखक-गीतकार-दिग्दर्शक गुलजार यांनी हिंदी ‘दृश्यम’साठी गीतलेखन केले असून राष्ट्रीय पारितोषिक विजेते संगीतकार विशाल भारद्वाज यांनी संगीत केले आहे. मागच्या वर्षी अविनाश अरुण यांना ‘किल्ला’साठी राष्ट्रीय पारितोषिक मिळाले होते, तर हिंदी ‘दृश्यम’चे संकलक आरिफ शेख यांना ‘समय- व्हेन टाइम स्ट्राइक्स’ या हिंदी सिनेमासाठी २००४ साली सवरेत्कृष्ट संकलकाचे राष्ट्रीय पारितोषिक मिळाले होते.
सुनील नांदगावकर – response.lokprabha@expressindia.com