दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित ‘लव्ह सेक्स और धोखा’ या चित्रपटाचा प्रमुख साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या कनू बहल यांचा ‘तितली’ हा पहिला सिनेमा लौकरच प्रदर्शित होतो आहे.

हिंदूी चित्रपटांसाठी २०१४ हे वर्ष फारसे चांगले ठरले नाही असे म्हणावे लागेल. अर्थात बडय़ा स्टार चित्रपटांना प्रेक्षकांनी बऱ्यापैकी प्रतिसाद दिला असला तरी प्रेक्षक आणि समीक्षकांनी गौरविलेल्या आणि उत्तम कथा-पटकथा असलेल्या हिंदी चित्रपटांची संख्या यंदा विरळाच होती. असे असले तरी डिसेंबर महिन्यात आमिर खानची प्रमुख भूमिका असलेला ‘पीके’ या बिगबजेट, बहुचर्चित चित्रपटासह आणखी १२ चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. भोपाळ वायू दुर्घटनेवरील ‘भोपाळ : ए प्रेयर फॉर रेन’ या चित्रपटाबरोबरच सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘मुंबई पुणे मुंबई’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या ‘मुंबई दिल्ली मुंबई’ या चित्रपटांनी डिसेंबरचा पहिला शुक्रवार उजाडला आहे. अन्य चित्रपटांची नावे तेवढी चर्चेत नसली तरी या नाताळच्या शुक्रवारी म्हणजेच २५ डिसेंबर रोजी ‘तितली’ हा थोडासा वेगळा म्हणता येईल असा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या वर्षी प्रदर्शित झालेल्या बिगबजेट आणि बडय़ा स्टार कलावंतांच्या चित्रपटांपेक्षा खरे तर तुलनेने खूपच छोटय़ा बजेटच्या आणि प्रेक्षकांना फारसे ठाऊक नसलेल्या कलावंतांचे खूप चित्रपट आले; परंतु कमी बजेटमुळे त्यांच्या प्रदर्शनांसाठी अनेकांना चित्रपटगृहे मिळाली नाहीत. मिळाली त्यांना प्रेक्षकांना सोयीच्या खेळांच्या वेळा मिळाल्या नाहीत. ‘तितली’ या आगामी हिंदी चित्रपटाबाबत असे घडू नये अशी आशा करायला मात्र वाव आहे.

दिल्ली शहरातील मोटारी चोरणाऱ्या टोळी चालवणारे कुटुंब अशी ख्याती असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे जीवन हे त्या व्यवसायाशी कसे निगडित असते हा तितलीचा विषय आहे. तितली म्हणजे फुलपाखरू. असून हे चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखा असणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित ‘लव्ह सेक्स और धोखा’ या चित्रपटाचा प्रमुख साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या कनू बहल यांचा ‘तितली’ हा लिखित-दिग्दर्शित पहिला चित्रपट आहे. कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा हा चित्रपट दाखविण्यात आला. कान चित्रपट महोत्सवाच्या मुख्य स्पर्धेत समाविष्ट न होऊ शकलेले परंतु निवड समितीच्या निकषांच्या कसोटीला खरे उतरणारे असे चित्रपट ‘अनसर्टन रिगार्ड’ या वैशिष्टय़पूर्ण विभागांतर्गत निवड करून दाखविले जातात. ‘तितली’ हा कनू बहल लिखित-दिग्दर्शित चित्रपट या विभागात या वर्षीच्या महोत्सवात दाखविण्यात आला.

कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘रेड कार्पेट’ समारंभात हॉलीवूड तसंच बॉलीवूडमधील मधील असंख्य नटय़ा झगमगीत व आकर्षक पेहरावात सहभागी होतात आणि त्याची छायाचित्रे भारतातील समस्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकतात. यापलीकडे कान महोत्सवाचे महत्त्व अथवा वैशिष्टय़ सर्वसामान्यांना फारसे माहीत नसते; परंतु जगभरातील महोत्सवांमध्ये अतिशय मानाचे स्थान पटकाविलेल्या या महोत्सवातील मुख्य स्पर्धेत निवडता न आलेले, परंतु त्याच तोडीचे असे चित्रपट अनसर्टन रिगार्ड या वैशिष्टय़पूर्ण विभागांतर्गत दाखविले जाणे हा खचितच बहुमान आहे आणि ‘तितली’ चित्रपटाला तो मिळाला आहे.

तितली या तरुण मुलाला आपल्या कुटुंबाच्या या पारंपरिक, परंतु अनधिकृत व्यवसाय आणि त्याच्याशी संबंधित अन्य गुन्हेगारी स्वरूप याचा तिटकारा आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचे तो ठरवितो; परंतु त्याचे दोन भाऊ तितलीचे मनसुबे विफल ठरवितात आणि तितलीची इच्छा नसतानाही त्याचे नीलू या मुलीशी लग्न लावून देतात. उद्विग्न झालेला तितली आणि आपली स्वप्ने साकार करण्याचा प्रयत्न करणारी नीलू अशी अनोखी जोडी जमते आणि मग तितली आयुष्याचा सामना कसा करतो असे थोडक्यात कथानक आहे. दिबाकर बॅनर्जी आणि यशराज फिल्म्स बॅनर यांनी एकत्रितरीत्या या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

शशांक अरोरा या नवोदित कलाकाराने तितली ही प्रमुख भूमिका साकारली असून शिवानी रघुवंशी या नवोदित अभिनेत्रीने नीलू ही व्यक्तिरेखा साकारली आहे. रणवीर शौरी, अमित सियाल, दिग्दर्शक कनू बहलचे वडील ललित बहल यांनी अन्य प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. यशराज फिल्म्स बॅनरचा पाठिंबा आणि ‘कान’ महोत्सवात झालेली निवड या पुण्याईवर हा चित्रपट प्रेक्षकांसमोर मोठय़ा प्रमाणावर झळकून हिंदीच्या तद्दन चित्रपटांपेक्षा वेगळे स्थान प्रेक्षकांच्या मनात निर्माण करू शकतो का ते लवकरच समजेल.