scorecardresearch

Premium

संगीत : न संपणारे किस्से.. गाण्यांचे

कर्णमधुर, सुश्राव्य गाणी हा एकेकाळच्या हिंदी सिनेमांचा प्राणच. आजही त्यातली कित्येक गाणी अवीट गोडीने गायली जातात. अशाच काही गाण्यांच्या आठवणी-

संगीत : न संपणारे किस्से.. गाण्यांचे

कर्णमधुर, सुश्राव्य गाणी हा एकेकाळच्या हिंदी सिनेमांचा प्राणच. आजही त्यातली कित्येक गाणी अवीट गोडीने गायली जातात. अशाच काही गाण्यांच्या आठवणी-

‘आजची महागाई ही उद्याची स्वस्ताई असते..’ एक ‘कल्पनारम्य सत्य’. अन् ‘कधीही पुरत नाही तो पगार..’ हे सामान्य माणसाचं ‘व्यावहारिक सत्य’. आज मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा बघायला तिकिटाचे दोनशे-तीनशे रुपये मोजावे लागतात. पन्नास-साठ वर्षांपूर्वी पाच आण्याच्या (१९५७ नंतर नवे एकतीस पैसे!) तिकिटांत सिनेमा पाहायला मिळायचा.. अन् तेव्हाही तिकिटांचा काळाबाजार व्हायचा! (काळाबाजार, भ्रष्टाचार हे.. ऐतिहासिक सत्य!) आजच्या पिढीचा यावर विश्वास बसणार नाही. ‘जनरेशन गॅप’ म्हणतात ती हीच असावी!
‘दिन है सुहाना आज पहेली तारीख है..’ हे साठ वर्षांपूर्वी – १९५४ साली आलेल्या, ‘पहेली तारीख’ या चित्रपटातील किशोरकुमारनं गायलेलं अफलातून गाणं, रेडिओ सिलोनवर (आता श्रीलंका) दर महिन्याच्या एक तारखेला सकाळी लागतं. पहिल्या तारखेला होणाऱ्या पगाराची किमया सांगणारं, सहा मोठी कडवी असलेलं कदाचित त्याकाळी हे सर्वात मोठं गाणं असावं. दर वर्षी एक जानेवारीला मात्र हे गाणं पूर्ण लावलं जातं. या भन्नाट गाण्याचं संगीत सुधीर फडके यांचं. चित्रपटाचे दिग्दर्शक होते राजा नेने. (ज्यांनी १९४४ साली ‘रामशास्त्री’ दिग्दर्शित केला होता. नंतरच्या काळात त्यांचा पु.लं.च्या ‘तुझे आहे तुजपाशी’मधला ‘काकाजी’देखील स्टेजवर पाहिल्याचं आठवतंय.) त्या चित्रपटात त्यांनी निरुपा रॉयबरोबर भूमिकाही केली होती. हे गाणं लिहिलं होतं कमर जलालाबादी यांनी. या गाण्याच्या शेवटी, सिनेमा थिएटर बाहेरच्या तिकिटांच्या काळाबाजाराची, ‘पांच आने का दस आना..’ ही धंद्यातली पंचलाइन येते. हा रुपये-आण्याचा हिशेब, नंतरच्या ‘चलती का नाम गाडी’ (१९५६) मध्ये किशोरकुमारनं चालूच ठेवला.. ‘लेकिन पहले दे दो मेरा, पांच रुपैय्या बारा आना!’ किशोरकुमारचं हे असं ‘रुपये-आणे’वाल्या, दोन गाण्यांचं एकमेव उदाहरण असावं. ‘मि. अ‍ॅण्ड मिसेस 55’ (१९५५) या गुरुदत्तच्या चित्रपटातील ओ. पी.नय्यरच्या रफी-गीता दत्तच्या ‘जाने कहां मेरा जिगर गया जी..’ या गाण्यातून, जॉनी वॉकर प्रेयसीला विनंती करतो, ‘ले ले दो चार आने, जिगर मेरा फेर दें!’ हृदयाची किंमत ‘दो चार आने’ एवढं पैशाचं मोल.. वा गमतीशीर स्वस्ताई! त्या काळी याचकाची मागणीदेखील, ‘ओ बाबू, एक पैसा दे दे,’ (वचन) अथवा ‘तुम एक पैसा दोगे, वो दस लाख देगा,’ (दस लाख) अशी असायची. आजच्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या जमान्यात, ‘तुम एक रुपिया दोगे, वो दस करोड देगा,’ अशी शंभरपट महागाईशी जुळवून घेणारी असेल! ‘आमदनी अठ्ठन्नी, खर्चा रुपैय्या’ हे पृथ्वीराज कपूर आणि कंपनीचं गाणं ‘तीन बहुरानियां’ (१९६८) या जेमिनीच्या चित्रपटात होतं. २००१ साली याच मुखडय़ाच्या नावाचा सिनेमादेखील येऊन गेला. थोडक्यात ‘आमदनी अन् खर्चा’चं हे व्यावहारिक ‘त्रिकालबाधित सत्य’ चालूच राहणार!
१९५७ साली हा सोळा आण्याचा- चौसष्ट पैशांचा- रुपया, शंभर पैशांचा झाला! चवन्नी-अठ्ठन्नी, म्हणजे चार-आठ आणे, तर आता चलनातूनदेखील बाद झालेत. पण हिंदी गाण्यांच्या संदर्भात, दोन दिग्गजांच्या अहंकाराची एक कटू आठवण मागे सोडून गेलेत. ‘उनकी तो इंडस्ट्री में चवन्नी की भी कीमत नही,’ यावर ‘क्यूं, लता को हटाने की कीमत चवन्नी भी नहीं?’ ही कडवट प्रतिक्रिया दुसऱ्या कुणाची असणार? त्यामुळे पन्नास र्वष एका इंडस्ट्रीत राहून ओ. पी.- लताचं एकही गाणं निर्माण नाही झालं! या ‘इगोबाजीत’ नुकसान रसिकांचं झालं. असो. हे तसं विषयांतरच.. चवन्नी-अठन्नीमुळे झालेलं. तर मूळ मुद्दा एव्हढाच, जमाना कुठलाही असो, रुपये- आणे- पैसे हिंदी चित्रपटांच्या गाण्यांतदेखील सातत्यानं येत असतात. शेवटी दुनियेत पैसा महत्त्वाचा.. अगदी माणसापेक्षा. हे ‘चिरंतन सत्य’देखील अशा गाण्यांतून समोर येत असतं. ‘सरगम’ (१९५०) चित्रपटासाठी ‘बाप भला ना मैय्या, सबसे बडा रुपैया..’ हे पैशाच्या मागे धावणाऱ्या दुनियेचं गाणं सी. रामचंद्र यांनी दिलं होतं अन् ते गायलं होतं, खुद्द अण्णा चितळकर, महम्मद रफी अन् लताने! ‘सबसे बडा रुपैया’ या नावाचा चित्रपटदेखील पी. एल. संतोषींनी (१९५५) काढला होता. कालांतराने याच मुखडय़ाचं गाणं ‘सबसे बडा रुपैया’ (१९७५ / सं. बासू मनोहारी)मध्ये खुद्द मेहमूदनं गायलं.. ‘बट द होल थिंग इज दॅट के भैय्या, सबसे बडा रुपैया!’ रुपये-आणे-पैशांचा हा सारा धमाल ‘विनोदी’ अवतार. या वा अशा कुठल्याही विनोदी गाण्यांचं पडद्यावरील सादरीकरणदेखील महत्त्वाचं असतं. पण बरेचदा काही गाणी आणि त्याचं सादरीकरण यांची गफलत झालेली पडद्यावर दिसते. मग गंभीर-हृदयस्पर्शी गाणंदेखील ‘विनोदी’ म्हणून पडद्यावर समोर येतं तेव्हा, आपलीच विकेट जाते!
‘अजहूं न आए.. बालमा, सावन बीता जाए,’ हे रफी अन् सुमन कल्याणपूरकरचं अजरामर क्लासिकल गाणं, ‘सांज और सवेरा’ (१९६४) मधलं. गुरुदत्त आणि मीना कुमारी प्रमुख भूमिकेत अन् हृषीकेश मुखर्जी दिग्दर्शक. साहजिकच अशा गाण्याविषयी काही अपेक्षा असतेच.. पण हृदयाला भिडणारं हे गाणं पडद्यावर मेहमूद-शुभा खोटेवर ‘विनोदी’ करून टाकलं आहे. बुढ्ढय़ा ‘खाँसाहेबांचं’ वेषांतर करून मेहमूद शुभा खोटेला हे गाणं शिकवत, खांद्यावर तानपुरा घेऊन उटपटांग नाचत, तिला पटवत, तिच्या आईला बनवतो, ही त्या काळातल्या बऱ्याच सिनेमातली टिपिकल सिच्युएशन. एरवी विनोदी क्लासिकल गाण्यांत असतो तसा ‘टच’देखील या गाण्यात नाही. शंकर-जयकिशन यांनी तशी गाणी या दोघांसाठी अन् इतरांसाठी देखील त्या काळात दिली होती. पण हे गाणं मात्र नाही पटलं.. अपेक्षाभंग होतो! एरवी हे गाणं नुसतं ऐकावं अन् दाद द्यावी, बस!
अशी दुसरीदेखील वेगळ्या कारणांसाठी विरस करणारी बरीच गाणी आहेत. ‘देख कबीरा रोया’ (१९५७) या अमिया चक्रवर्तीच्या सिनेमांतलं ‘हमसे आया ना गया, तुमसे बुलाया ना गया’ हे तलतचं गाणं कधी विसरता येईल? पडद्यावर अनुपकुमार हे गाणं शुभा खोटेला, डायनिंग टेबलवर ठेका धरून वाचत म्हणून दाखवतो अन् ती गोंधळलेल्या भावनेनं ते ऐकत असते! त्याचा त्या गाण्यातील अभिनय, हावभावदेखील भूमिकेला अनुरूप होते. अनुपकुमार एरवी उत्तम विनोदी अभिनेता. (आठवा.. ‘मन्नू, तेरा हुवा अब मेरा क्या होगा?’ हे त्याचं किशोरकुमार बरोबरचं ‘चलती का नाम गाडी’मधलं भन्नाट डय़ूएट) याच सिनेमांतल्या मन्नादांच्या ‘कौन आया मेरे मन के द्वारे.’ या क्लासिकल गाण्याचंदेखील तेच होतं. अनुपकुमार तानपुरा घेऊन गात असतो, अधनंमधनं दुसरीकडे असलेल्या अमितावर कॅमेरा. (पुन्हा अनुपकुमार या गायक-नायकाला तलत अन् मन्ना डे, असे दोघांचे आवाज, हे गौडबंगाल आहेच!) या दोन्ही गाण्यांतल्या भावनांचा सिच्युएशनशी तसा काही संबंध नव्हता. ती निव्वळ गाणी म्हणून चित्रपटांत येतात. त्यामुळे तसा या दोन्ही अप्रतिम गाण्यांवर अन्यायच झाला! मुळांत या चित्रपटाचा अंडरकरंट विनोदाचा. पण टायटलपासूनच भट्टी बिघडलेली. अमिया चक्रवर्ती (‘सीमा’, ‘पतिता’ त्यांचेच) असून, हे विशेष. मात्र याच चित्रपटांतील ‘तीन नायिकांची एका पाठोपाठ एक अशी (बॅक-टू-बॅक) एकत्र तीन गाणी’ हा आजवरचा एकमेव प्रयोग असावा. तीनही गाणी अप्रतिम. ‘मेरी बीना तुमबीन रोए..’ (अमितासाठी, लता), ‘अश्कों से तेरे हमने तस्वीर बनाई है..’ (अनिता गुहासाठी, आशा) अन ‘तू प्यार करे या ठुकराए..’ (शुभा खोटेसाठी पुन्हा लता) ही तीनही गाणी ‘सजना .. सजना’ या अलापींत शेवटी एकत्र गुंफणं, ही सारी मदनमोहनचीच करामत! एका पाठोपाठ एक अशी दोन गाणी, पट्कन आठवतात ती ‘गाइड’ (१९६५) मधली ‘मोसे छल किये जाये’ (लता), अन ‘क्या से क्या हो गया’ (रफी) ही बर्मनदांची गाणी. ‘देख कबीरा रोया’ हा अनुपकुमार, जवाहर कौल, दलजीत आणि शुभा खोटे, अमिता, अनिता गुहा या त्या काळात फारसं ‘मार्केट’ नसलेल्या कलाकारांचा एका चांगल्या करमणूकप्रधान थीमवरचा बिघडलेला चित्रपट, फक्त त्यातील एकसे एक गाण्यांसाठी लक्षात राहतो. त्यासाठी मदनमोहनला सॅल्युट! याच मदनमोहनचा केवळ सर्व अप्रतिम गाण्यांसाठीच कायम मनात ठसलेला चित्रपट म्हणजे, ओम प्रकाशने निर्माण केलेला, माला सिन्हा-भारत भूषणचा ‘जहां आरा’ (१९६८). हा सिनेमा एरवी ‘तलत’चा म्हणून लक्षात राहतो खरा, पण तलतच्या चार गाण्यांबरोबरच रफीचीदेखील तितक्याच ताकदीची दोन गाणी आहेत. ‘किसी की याद में दुनियाको हैं भूलायें हुवे..’ अन् सुमन कल्याणपूरकर बरोबरचं ‘बाद मुद्दत से ये घडम्ी आयीं..!’ असे मदन मोहनचे अनेक चित्रपट आहेत. संगीताच्या त्या सुवर्ण काळातल्या सुपर-स्टार्सचे किती सिनेमे त्याला मिळाले? पण हे या चित्रपटसृष्टीत नेहमीच घडत आलंय.
‘देख कबीरा रोया’ मधली शुभा खोटे ही चेहऱ्याचा अतिशय गोडवा असलेली, टपोऱ्या डोळ्यांची, मेहमूदबरोबर जोडीने धमाल उडविणारी गुणी अभिनेत्री, नायिका म्हणून त्या काळी फार पुढे आली नाही. तरी नूतनबरोबर असूनदेखील ‘अनाडी’, ‘सीमा’ (बात बात में रुठों ना..) मध्ये भाव खाऊन गेली. हल्लीच्या छोटय़ा पडद्यावरची (एका लग्नाची तिसरी गोष्ट) हीच ती ‘गोड आजी.’ याच शुभा खोटेचं ‘दीदी’ (१९५९) मधलं सुनील दत्तबरोबरचं, ‘तुम मुझे भूल भी जाओ, तो ये हक हैं तुमको..’ हे सुधा मल्होत्रा (‘शुक्रतारा मंदवारा..’ अरुण दातेंबरोबर सुरुवातीला गायलेली) अन् मुकेश यांनी गायलेलं द्वंद्वगीत साहीर लुधियानवी यांचं. त्या काळात साहीर अन् सुधा एकमेकांच्या प्रेमात होते, असं म्हणतात.. अन् असंही म्हणतात की या गाण्याचं संगीतही सुधा मल्होत्राचंच होतं! तसं या चित्रपटाला संगीत एन. दत्ता यांचं होतं. पण या चित्रपटक्षेत्रांत अशा गोष्टी घडतच असतात. सुरुवातीला पडद्यावर दिसलेली सुधा मल्होत्रा नंतर ‘धूल का फूल’, ‘बरसात की रात’, ‘काला पानी’, ‘अब दिल्ली दूर नहीं’ वगैरे चित्रपटांत गायली. पण तिचं वरचं ‘दीदी’मधलं साहीरचं द्वंद्वगीत आजही तितकंच अर्थपूर्ण वाटतं, हृदयाला भिडतं. त्या काळातल्या इतरही काही प्रसिद्धीच्या झोतात नसलेल्या गायिका, त्यांच्या केवळ एकाच गाण्यासाठी देखील कायमच्या स्मरणात राहतील.. अन् त्याचं कारणदेखील विशेष आहे.
‘तुम अपना रंजो गम, अपनी परेशानी मुझे दे दो..’ हे ‘शगुन’ (१९६४) मधलं गाणं जगजीत कौरनं गायलं खय्यामच्या- तिच्या पतीच्या- संगीत दिग्दर्शनात. तर ‘कुछ और जमाना कहेता है, कुछ और ये जिद्द मेरे दिल की..’ हे ‘छोटी छोटी बातें’ (१९६९) मधलं गाणं मीना कपूरनं गायलं तिच्या पतीच्या- अनिल विश्वास- संगीत दिग्दर्शनात! ही दोन्ही गाणी अन् त्या गायिका, या गाण्यांसाठी कायम स्मरणात राहतील. खय्याम अन् अनिल विश्वास तर तसेही ग्रेटच! त्या आधीची गीता दत्त मात्र पाश्र्वसंगीताच्या क्षेत्रात आपलं नाव कमावून होती. तिचं या क्षेत्रातील स्थान निर्विवाद. अतुलनीय. तिचं सर्वोत्तम एक गाणं कुठलं, हे ठरवणंदेखील तिच्यावर अन्याय करणारं होईल. गुरुदत्तच्या- तिच्या पतीच्या- चित्रपटात तिची गाणी असणं हे साहजिकच. ‘साहिब बीबी और गुलाम’मध्ये ती मीनाकुमारीसाठी गायली, तर आशा-वहिदा रहेमानसाठी. पण तत्पूर्वी ती वहिदासाठी देखील गायली.. अन् गुरुदत्त-वहिदा संबंधांत त्याकाळी ‘फिल्मी कुजबुज’ होतीच. ‘कागज के फूल’मधील, केवळ पाश्र्वभूमीवर असलेलं, ‘वक्त ने किया क्या हंसी सितम..’ हे हिंदी सिने संगीतातील ‘माईल-स्टोन’ गाणं. बर्मनदांचं संगीत, फोटोग्राफी, अभिनय, दिग्दर्शन.. सगळ्याच दृष्टीनं. सिनेमा अभ्यासणाऱ्यांच्या दृष्टीनं ‘मस्ट.’ पण गम्मत म्हणजे हे गाणं मुळात या सिनेमासाठी लिहिलेलंच नव्हतं! कैफी आझमींचं हे काव्य ऐकल्यावर, गुरुदत्तनं ते आधीच स्वत:च्या चित्रपटासाठी राखून ठेवलं होतं. नंतर कधी उपयोग करता येईल या दृष्टीनं. ‘कागज के फूल’च्या पटकथेत ते नंतर इतक्या चपखलपणे बसवलं की, हे गाणं सर्व दृष्टीनं अजरामर झालं! गुरुदत्त-वहिदाच्या सिनेमास्कोप फ्रेमच्या पाश्र्वभूमीवर गीतादत्तचं गाणं, हा काव्यात्म न्यायच म्हणायचा! असं देखील याच चित्रपटसृष्टीत घडतं. ‘कागज के फूल’ काय, ‘प्यासा’ काय, गुरुदत्तच्या या अप्रतिम सिनेमांचा, बर्मनदांच्या संगीताशिवाय वेगळा विचार होऊ शकत नाही. अन् ‘देख कबीरा रोया’, ‘जहां आरा’ केवळ मदन-मोहनसाठी लक्षात राहतात! ही त्या संगीतकारांची ताकत. आज असे किती संगीतकार आढळतात?
आता जमानाच बदललाय. आज एका चित्रपटासाठी तीन-चार संगीतकार हे सोयीचं अन् सवयीचं झालंय. पण एकच संगीतकार वा संगीतकार जोडी असण्याच्या संगीताच्या त्या सुवर्णकाळात, एका चित्रपटाला चार वा अधिक संगीतकार असणं, हे देखील घडलं. ‘पठाण’ (१९६२) या मुमताज, सिद्धू, (‘मुझे जिने दो’चा व्हिलन?) प्रेमनाथ यांच्या चित्रपटासाठी किमान चार संगीतकार तरी होतेच. जिमी, फकीर मुहम्मद असर, ब्रिजभूषण अन् श्यामबाबू. त्यातील तलतची दोन सुरेख गाणी आज जवळपास विस्मृतींतच जमा झाली आहेत. ‘आजा के बुलातें हैं ये अश्क हमारे..’ (जिमी), अन् ‘चांद मेरा बदलो में खो गया, मेरी दुनिया में अंधेरा हो गया..’ (फकीर मुहम्मद असर ) ही ती तलतची गाणी. अन लताची ब्रिजभूषणने दिलेली लोरी, ‘सो जा सलोने सो जा, निंदिया तुम्हे बुलायें..’ तर कुठल्याही उत्तम ‘लोरी’च्या तोडीची. पण ‘सी’ ग्रेड सिनेमा आणि नांव नसलेले संगीतकार, त्यामुळे अशी गाणी अन् संगीतकार विस्मरणातच जाणं, हेदेखील याच चित्रपटसृष्टीतील अटळ सत्य.
संगीताच्या त्या सुवर्णकाळाच्या अखेरीस ‘मनहर’ हा गायक प्रकाशात आला. तो वेगळाच किस्सा. त्या काळाला ‘गोल्डन’ का म्हणतात ते अधोरेखित करणारा. हृषीकेश मुखर्जींच्या ‘अभिमान’ (१९७३) साठी बर्मनदांचं ‘लुटे कोई मन का नगर बनके मेरा साथी..’ हे गाणं मुळात लताबरोबर मुकेश गाणार होता. पण काही कारणाने ते शूटिंगपूर्वी मुकेशच्या अनुपस्थितीमुळे रेकॉर्ड होऊ शकत नव्हतं. म्हणून मुकेशच्या आवाजाशी साधम्र्य असणाऱ्या मनहरच्या ‘डमी’ आवाजात ते रेकॉर्ड करायचं ठरलं. शूटिंग पार पडलं. नंतर खऱ्या रेकॉर्डिगच्या वेळेस मुकेशनं ते ‘डमी’ गाणं ऐकलं तेव्हा तो बर्मनदांना म्हणाला, ‘‘मनहर इतकं छान गायला असताना, पुन्हा रेकॉर्ड कशासाठी ?’’.. अन् नंतर लता-मनहरचंच ते गाणं हिट झालं ! असं देखील इथं घडतं.
तत्पूर्वी हृषीदांच्याच ‘आनंद’ (१९७०) साठी ‘टायटल-साँग’ म्हणून सलील चौधरींनी ‘जिंदगी कैसी है पहेली, हा..य’ हे योगेश यांचं मन्नादांच्या आवाजात रेकॉर्ड केलेलं अप्रतिम गाणं, जेव्हा राजेश खन्नानं ऐकलं तेव्हा त्याने हृषीदांकडे, ते पूर्ण गाणंच त्याच्यावर चित्रित करण्याविषयी आग्रह धरला. हृषीदांनी तो त्याचा हट्ट पुरवला. सिनेमाच्या पटकथेत असं फिट्ट बसवलं.. त्या गाण्याचं खरंच सोनं झालं! मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर हातात चपला घेऊन पाण्यातून क्षितिजाकडे जाणारा..‘उद्याच्या मृत्यूची कल्पना’ असणारा आनंद.. ! ‘वोही चुनकर खामोशी, यूं चले जायें अकेले कहां..’ म्हणणारा आनंद! या टप्प्यावर व्यवहार नाही! केवळ टायटल्सच्या पाश्र्वभूमीवर असणार होतं ते गाणं, असं अजरामर झालं.
सुरुवातीच्या ‘रुपये- आणे- पैसे’ या ‘व्यावहारिक सत्या’पासून दूर, भरकटत, मजरूह सुलतानपुरी म्हणतात तसं, ‘एक दिन बिक जायेगा माटी के मोल, जग में रह जायेंगे प्यारे तेरे बोल’ (मुकेश /धरम करम /१९७५) या ‘अंतिम सत्या’पर्यंत आलो. इथं या अंतिम टप्प्यावर ‘पैसा-धन-दौलत’ निर्थक. गुलझार हेच वेगळ्या पद्धतीनं मांडतो, ‘नाम गुम जायेगा, चेहेरा ये बदल जायेगा, मेरी आवाजही पेहेचान है.. गर याद रहें !’ (लता-भूपेंद्र / किनारा / १९७७) दोन्ही गाणी आर. डी. बर्मनची ! सचिनदा गेले.. कालांतराने पंचम- आर.डी.- देखील गेला. म्हणून हे ‘बोल आणि आवाज’ महत्त्वाचे. हेच आठवणींत उरतात.. गर याद रहें!
वाढत्या महागाईत आपल्याला श्रीमंत करून सोडणारी त्या सुवर्ण युगांतली अशी अजरामर गाणी, अन् अशा गाण्यांचे गाण्यांतूनच उलगडत जाणारे.. विचित्र, विशिष्ट, रमणीय, अविस्मरणीय.. न संपणारे किस्से!

manoj jarnage patil
“बाकीचं नंतर बघू, आधी माझ्या किडन्या तपासा”, मनोज जरांगेंच्या किडनीचा नेमका घोळ काय?
tanushree dutta on rakhi sawant
“तिने पाच लग्नं केलीत, पण…” तनुश्री दत्ताची राखी सावंतवर टीका; म्हणाली, “तिला पुरुष…”
ramdas kadam on uddhav thackeray aaditya
“आदित्यसाहेब आणि त्यांचा बाप…”, रामदास कदमांची टीका; म्हणाले, “…आता दोघंही पळतायत!”
Actor Vijay Antony reacts on Daughter Meera suicide
“मी तिच्याबरोबर मेलो,” १६ वर्षीय मुलीच्या आत्महत्येनंतर अभिनेत्याची भावुक पोस्ट; म्हणाला, “जिथे जात, धर्म, पैसा…”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-07-2014 at 01:15 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×