05 April 2020

News Flash

सामूहिक अपयशाचे वर्तमान

निमित्त वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com िहगणघाटमधल्या प्रकरणाने सगळ्या महाराष्ट्राच्या काळजाला हात घातला. दिल्लीमधलं बलात्कार प्रकरण घडलं तेव्हा केवढं हे क्रौर्य असं म्हणत प्रत्येक जण हळहळला

निमित्त
वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com

िहगणघाटमधल्या प्रकरणाने सगळ्या महाराष्ट्राच्या काळजाला हात घातला. दिल्लीमधलं बलात्कार प्रकरण घडलं तेव्हा केवढं हे क्रौर्य असं म्हणत प्रत्येक जण हळहळला होता. सहाएक महिन्यांपूर्वी हैद्राबादच्या डॉक्टर महिलेला अत्याचार करून जिवंत जाळलं गेलं तेव्हा देशभर प्रत्येक आईबापाला शाळा-कॉलेजसाठी, कामकाजासाठी बाहेर पडणारी आपली लेक सुरक्षित घरी येईल ना याची यापुढच्या काळात रोज काळजी करत बसावं लागणार आहे, याची अघोरी जाणीव झाली. त्या प्रकरणातल्या विषण्णतेची तीव्रता थोडी कमी होते आहे असं वाटेपर्यंत हिंगणघाट प्रकरण.. आधीच्या प्रकरणांमधलं क्रौर्य कमी होतं असं म्हणावं की काय इतकी क्रौर्याची परिसीमा या प्रकरणात गाठली गेली आहे. आडगावात राहून शिक्षणासाठी, आयुष्याला आकार देण्यासाठी, काहीतरी करून दाखवण्यासाठी धडपडणाऱ्या, त्यासाठी संघर्ष करणाऱ्या गावोगावच्या मुलींच्या पालकांच्या मनोधैर्याचं खच्चीकरण करणारी ही घटना. महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत पोहोचण्यासाठी या सावित्रीच्या लेकींना किती आणि कशी धडपड करावी लागते, हे ज्यांना माहीत असेल त्यांना या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात येईल.

आर्थिक परिस्थितीमुळे, घरापासून लांब असलेल्या महाविद्यालयामुळे सामाजिक सुरक्षेचा मुद्दा पुढे करून आधीच मुलींच्या शिक्षणाला घरातूनच विरोध केला जातो. त्यातूनही एखादी शिकते, प्राध्यापक होते, तर तिच्या वाटय़ाला हे क्रौर्य? आपल्याला आवडणारी मुलगी आपल्याला नाही म्हणते या रागातून तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळायचं? तिची वाचा, दृष्टी जावी, दात जळून जावेत, अन्ननलिका जळून जावी अशा अमानुष पद्धतीने एखाद्या मुलीला जाळून टाकणारी ही िहसा एखाद्या पुरुषाच्या मनात निर्माणच कशी होते? ‘छपाक’ प्रदर्शित होण्याआधी जेएनयूमध्ये गेलेल्या दीपिकाला ट्रोल करणारे, तेवढय़ा कारणासाठी ‘छपाक’ मी पाहणार नाही, तुम्हीही पाहू नका असा प्रचार करणारे आता काय म्हणणार आहेत? सगळं वादाचं राजकारण, सगळे वादग्रस्त सामाजिक प्रश्न एका पारडय़ात घातले तरी स्त्रियांविरोधातील हिंसेचं पारडं जड होईल, इतका हा गंभीर प्रश्न आहे. आणि याचं उत्तर तुमच्या-आमच्यातच आहे. आपणच, आपल्या समाजानेच पुरुषांच्या या मानसिकतेला, त्यांच्यामधल्या िहसेला जन्म दिला आहे, जोजावलं, पोसलं आहे. त्यामुळे अशी प्रकरणं घडणं हे आपलं सगळ्यांचंच सामूहिक अपयश आहे.

व्यक्ती ज्या समाजात वावरत असते, त्या समाजातूनच ती घडत असते. तिच्या घडण्याच्या प्रक्रियेत तिच्या आत जे काही पोहोचतं, तेच उद्या तिच्या वर्तनाच्या माध्यमातून बाहेर पडणार आहे याचा विचार होतो का? कोणत्या पातळीवर होतो? शहरांमध्ये, मध्यमवर्गात काही प्रमाणात परिस्थिती बदलली असली तरी अजूनही खूप मोठा वर्ग असा आहे जो स्त्रीकडे बघण्याच्या आधुनिक दृष्टीपासून कोसो दूर आहे. त्या त्या जाती, जमाती, त्यांच्या प्रथा-परंपरा आजही स्त्री कनिष्ठ आणि पुरुष श्रेष्ठ हेच लहानपणापासून पुरुषाच्या मनावर बिंबवतात.

अनेक जाती-जमातींमध्ये आज अशी परिस्थिती आहे की मुली चांगल्या शिकल्या आहेत, चांगलं अर्थार्जन करत आहेत आणि मुलं मात्र तुलनेत फारशी शिकलेली नाहीत. जातीतच लग्न करावं लागणार असेल तर अशा आपल्याहून कमी शिकलेल्या मुलांशी लग्न करायला मुली तयार होत नाहीत, हा सध्या बऱ्याच ठिकाणी संघर्षांचा मुद्दा आहे.

म्हणजे शिक्षणामुळे जो अवकाश मिळतो आहे, त्यातून स्त्रिया प्रगती करीत आहेत, पुढे जाऊ पाहत आहेत, बदलांसाठीची लवचीकता स्वत:मध्ये बाणवत आहेत, आणि पुरुष मात्र आपली मानसिकता बदलायला तयार नाहीत. पुरुषप्रधान संस्कृतीने त्यांना आजपर्यंत जो कम्फर्ट झोन तयार करून दिला आहे, मुलींच्या शिक्षणामुळे, त्यांच्या प्रगतीमुळे या कम्फर्ट झोनला बसणारे धक्के पुरुषांना सहन होत नाहीत की स्वीकारताही येत नाहीत. त्यामुळे तिने दिलेल्या नकारावर त्यांची टोकाची िहसक अशी प्रतिक्रिया येताना दिसते.

कुणी म्हणेल की, िहगणघाटमधलं मुलीला पेट्रोल टाकून जाळण्याचं प्रकरण अपवादात्मक आहे. सरसकट सगळे पुरुष असं वागत नाहीत. हे खरंही आहे, पण रोजच्या जगण्यातल्या लहान लहान गोष्टींमधून पुरुषाचा अहं सुखावला जाणं आणि त्यासाठी स्त्रीने तडजोडी करणं या गोष्टी अगदी सहज घडत असतात.

टीव्ही हा आज सामान्य माणसाच्या मनोरंजनविश्वाचा अपरिहार्य भाग आहे. या टीव्हीवर रोजच्या रोज संस्कृतीचं दळण दळणाऱ्या मालिका स्त्रीने आई, बहीण, बायको, सासू या वेगवेगळ्या रूपांमध्ये पुरुषाचा अहं गोंजारणं कसं आवश्यक आहे, एखाद्या पुरुषाच्या संदर्भात स्त्रीच स्त्रीची शत्रू कशी असते, असले क्लिशे सातत्याने आणि वेगवेगळ्या पद्धतीने दाखवताना दिसतात. ‘कबीर सिंग’सारख्या चित्रपटातून दिला जाणारा प्रेमाबद्दलचा संदेश काय होता? या सगळ्याचा जो काही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होत असेल, त्याची जबाबदारी कुणाची?

आज शाळांमधून लहान मुलांना लैंगिक शोषणासंदर्भात जागरूक केलं जातं. ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ हे त्यांना समजेल अशा भाषेत, समजेल अशा पद्धतीने शिकवलं जातं. त्यामुळे लैंगिक शोषण झाल्यावर त्याबद्दल कसं बोलायचं हे समजत नसलेली, मिटून जाणारी मुलं अशी परिस्थिती आज राहिलेली नाही. अगदी थोडय़ा प्रमाणात का होईना लहान मुलं लैंगिक शोषणावर व्यक्त व्हायला लागली आहेत. तशीच आज गरज आहे मुलांना शालेय पातळीपासूनच स्त्री-पुरुष समानतेची शिकवण देण्याची. स्त्रीकडे बघण्याचा आधुनिक दृष्टिकोन त्यांच्यापर्यंत त्याच्या वयाला झेपेल अशा भाषेत पोहोचवण्याची. बहुतांश कुटुंबांना ‘मुलगी नको, मुलगा हवा’ असंच वाटत असतं, हाच संदेश लहानपणापासून त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल तर मुलगा म्हणून, पुरुष म्हणून आपणच श्रेष्ठ आहोत, हेच आपसूक त्यांच्या मनावर बिंबवलं जात असणार.

दुसरीकडे मुलींच्या बाबतीतही काय चित्र आहे? मुलीच्या लग्नाचं वय १८ वरून २१ करण्याची चर्चा सुरू झाल्यावर अस्वस्थता निर्माण झाली आहे. लग्नाचं कायदेशीर वय १८ असताना आजही गावपातळीवर १४-१५ व्या वर्षी मुलींची लग्नं होतात. कायदा पाळून १८ व्या वर्षांनंतर मुलीचं लग्न करतात, त्यांना कधी एकदा मुलीचं लग्न करून देऊन आपण आपल्या डोक्यावरची जबाबदारी उतरवतो असं झालेलं असतं. लग्न म्हणजे आयुष्याचं सर्वस्व, मुलीने जे काही करायचं ते लग्न करण्यासाठी या मानसिकतेमधून पालकांनीही बाहेर येण्याची गरज आहे. आज मुली शिकत आहेत, स्वत:च्या पायावर उभ्या राहू पाहात आहेत, पण हे प्रमाण वाढलं, त्या अधिकाधिक स्वावलंबी व्हायला लागल्या तर त्याचा परिणाम अर्थातच पुढच्या पिढय़ांवर होईल, पुरुषप्रधान मानसिकतेवर होईल आणि स्त्रीकडे बघण्याचा वरचष्मा असलेला दृष्टिकोन बदलेल अशी आशा आहे. तोपर्यंत तरी अशी प्रकरणं ही आपल्या सामूहिक अपयशाचीच उदाहरणं मानायला हवीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2020 1:04 am

Web Title: hinganghat woman lecturer set ablaze by stalker 2
Next Stories
1 स्मरण सांगाती
2 राशिभविष्य : दि. १४ ते २० फेब्रुवारी २०२०
3 भानावर आणणारे प्रतिबिंब
Just Now!
X