आलामांडा ही बहुगुणी वनस्पती अशी आहे की, तिला वेलीसारखे किंवा झुडपासारखेही वाढवता येते. साधारण बोगनवेलीसारखी वाढ असणारी ही वनस्पती आहे. अशा वनस्पतींना इंग्रजीत रँब्लर (rambler) अशी संज्ञा आहे. रँब्लर ही संज्ञा साधारणपणे वेल-गुलाबांना वापरली जाते. आलामांडाला सर्वसंमत असे मराठी भाषेतील नाव नाही; परंतु काही ठिकाणी आलामांडाला मराठीत कर्णफूल असे संबोधले जाते. आलामांडाचे इंग्रजीतील साधारण नाव आहे 'Golden Trumpet'. आलामांडा आता भारतातील बागांत सर्वत्र सापडत असला तरीही ह्य़ा वनस्पतीचे मूळ स्थान भारत नाही; तिचे मूळ स्थान दक्षिण अमेरिकेतील ब्राझिल, मेक्सिको आणि अर्जेटिना येथे आहे. आलामांडाचे कूळ आहे Apocynaceae. खूरचाफा किंवा देवचाफाही ह्य़ाच कुळातील आहे. परंतु खुरचाफ्याच्या काही जातींची फुले सुगंधी असली तरीही आलामांडाच्या कुठल्याही जातीतील फुलांना सुगंध नसतो. आलामांडाच्या पानांना, बुंध्याला किंवा इतर कोणत्याही भागाला इजा झाली तर जखमेतून दुधासारखा पांढरा चीक निघतो. ज्या लोकांची त्वचा संवेदनशील असते त्यांना हा चीक त्वचेवर लागल्यास थोडा फार त्रास सहन करावा लागतो; परंतु त्वचा लालसर होऊन खाज येणे इतपतच हा त्रास असतो. आलामांडाची मूळ जात आपल्या बागांतून दिसू लागली ती म्हणजे Allamanda cathartica. ह्य़ा जातीच्या झाडांची वाढ खूप जलद होते. ह्य़ा जातीत फुले साधारण वर्षभर फुलत असतात. फूल सोनेरी पिवळ्या रंगाचे व साधारण भोंग्याच्या आकाराचे असते. फुलाचा भोंग्यासारखा भाग जरा तपकिरी रंगाचा असतो. फुलाला पाच पाकळ्या असतात आणि फूल लांब देठाचे असते. बहुतेक जातीतील पाने गुळगुळीत असतात, मात्र काही जातींत पानांवर आणि कोवळ्या फांद्यांवर विरळ अशी पांढरट लव असते. Allamanda blanchetii ह्य़ा जातीची फुले जांभळट रंगाची असतात. ह्य़ाच जातीला काही ठिकाणी Allamanda violacea असेही नाव सांगितले जाते. Allamanda neriifolia ह्य़ा जातीची वाढ झुडपासारखी पण पसरट अशी होते. ही जात इतर जातींपेक्षा खुजी असते. ह्य़ाच जातीत चंदेरी पानांचीही एक पोटजात उपलब्ध आहे. सध्या भारतातील अनेक नर्सरींमधून आलामांडामध्ये अनेक रंगांच्या फुलांच्या जाती, पोटजाती सध्या उपलब्ध आहेत. नियमित छाटणी करून आलामांडाला झुडपासारखे वाढवता येते. वेलीसारखे वाढवायचे असल्यास कमानीवर किंवा पडदीवर (trellis) वाढवावी. जमिनीपासून एकच बुंधा, साधारण ३ ते ४ फूट उंचीपर्यंत ठेवून, वरील बाजूस फांद्यांचा झुपका ठेवल्यास हा प्रकारही फार छान दिसतो. ही वनस्पती रोग व कीटक ह्य़ांना बिलकूल दाद न देणारी आहे. गुरे-ढोरेही ह्य़ा वनस्पतीला शिवत नाहीत. हिची अभिवृद्धी छाटकलमांपासून, म्हणजे फांद्यांचे तुकडे लावून सहज प्रकारे करता येते. क्वचितप्रसंगी आलामांडाला फलधारणाही होते. फळ काटेरी असून ते दोन शकलांमध्ये दुभंगते. आत तपकिरी रंगाच्या, चपटय़ा बिया असतात. ह्य़ा बिया लावूनही आपल्याला नवी रोपे बनवता येतात. नंदन कलबाग - response.lokprabha@expressindia.com