दख्खनच्या पठारावर राहणाऱ्या तुलनेत सुखासीन लोकांनी नव्हे, तर सह्य़ाद्रीच्या कडेकपारीत राहणाऱ्या रांगडय़ा, राकट, कणखर लोकांनी शिवाजी महाराजांना त्याच्या स्वराज्याच्या कामात मोलाची साथ दिली..

भूतकाळात घडलेल्या एखाद्या घटनेकडे जेव्हा आपण इतिहास या दृष्टिकोनातून पाहतो, त्या वेळी एखाद्या अभ्यासकाच्या मनात पहिला विचार येतो की, ही घटना कशी घडली असेल, कोणती कारणे यामागे असतील.. राजकीय की सामाजिक? आíथक की सांस्कृतिक? एखाद्याच्या विषयाच्या अभ्यासानुसार, ज्ञानाच्या व्याप्तीनुसार अनेक कारणे सांगता येतात. मात्र एक विषय असा आहे की, ज्याकडे सहसा कुणाचे लक्ष जात नाही, कारण त्या विषयाचा एखाद्या घटनेशी वा प्रसंगाशी काही संबंध असेल याची जाणीव भल्या भल्या संशोधकांपाशीही कधी कधी नसते.
भूगोल हा एक असा विषय की, ज्याकडे आपण केवळ स्वाभाविक दुर्गमतेच्या किंवा हवामानाच्या संदर्भात पाहत असतो. एखाद्या स्वाभाविक भागात राहणाऱ्या लोकांच्या प्रकृती अन् मनोवृत्तीवर भौगोलिक संदर्भाचा परिणाम होत असेल याकडे बहुतांश वेळा आपले लक्षही वेधले जात नाही. इतिहासाची संगती लावताना, एखाद्या घटनेचा अन्वय लावताना, त्या त्या प्रसंगातील दुव्यांची साखळी तयार करताना आपण नेमका भूगोल विसरतो. चूक अक्षम्य तर खरीच, मात्र ती होते. देवाला जाताना श्रीफळ विसरावे ती गत होते.
सतराव्या शतकातील- शिवकाळातील- दख्खनच्या इतिहासाचा विचार करताना जाणवते की, हा कालखंड साऱ्याच दृष्टिकोनातून निश्चितच क्रांतिकारी ठरला. दख्खनच्या व दक्षिणेच्या राजकीय पटलावर मराठय़ांचे वाढते प्रस्थ ही या काळातील वैशिष्टय़पूर्ण घटना म्हणावी लागेल. या सामाजिक व राजकीय बदलांचे परिणाम स्थानिक, सामाजिक, आíथक, धार्मिक जीवनावर उमटणे हे अतिशय स्वाभाविक होते. या संदर्भात विचार करताना शिवकालीन समाजाचा गावगाडा कसा चालत होता हे जाणून घेणेही रंजक ठरेल.
मध्ययुगात किंवा प्राचीन काळातही गाव अथवा खेडे हा सामाजिक, राजकीय व आíथक व्यवहारांचा केंद्रिबदू होता. शेती हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा प्रमुख मार्ग होता. त्याचमुळे तिथल्या लोकसंख्येचे प्रमाणही आजच्या खेडय़ाच्या तुलनेत अधिक होते. या वसाहती कशा निर्माण झाल्या याचे तर्कशुद्ध उत्तर देणे काहीसे कठीण आहे. मात्र लोकांनी स्वत:हून किंवा राजाज्ञेवरून जंगले तोडून, पाणवठे पाहून खेडी वसवली असावीत असे स्थूलमानाने सांगता येते. सतराव्या शतकात या वृत्तीला राजकीय किनार लाभलेली दिसते. राजकीय फायद्यासाठी किंवा सरकारी प्रलोभनांच्या आशेने खेडय़ांची पुनर्वसाहत झालेली या काळातील अनेक उदाहरणे आढळून येतात.
खेडे हा त्या काळातील एक व्यवस्थित जुंपलेला व न कुरकुरत चालणारा गाडा होता. खेडय़ांचे नियोजन साधारणपणे दिवाणसत्ता, गोतसत्ता, धर्मसत्ता व व्यापारी सत्ता या चार अतिशय प्रबल अशा घटकांच्या माध्यमातून होत होते. राजाची, जातसंस्थांची व व्यापाऱ्यांची कारभारी मंडळी यांच्या परस्परातील प्रभावी अशा समन्वयामुळे हा गावगाडा सुरळीत सुरू होता. ही झाली बाह्य़ रचना. या रचनेखेरीज तत्कालीन समाजाची वीण सुरक्षित राखण्यासाठी गावकामगारांची वा बलुतेदारांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती. अगदी नेमक्याच शब्दात सांगायचे झाले तर वतनदार, मिरासदार, बलुतेदार व उपरी यांना गावगाडय़ाची चार चाके असे मानता येते.
सरकारकडून एखाद्याला मिळालेली देणगी म्हणजे वतन व ती उपभोगणारा तो वतनदार. त्याचे पालनपोषण सारा गाव करीत असे. किंबहुना ते त्याचे हक्कच होते. या बदल्यात साऱ्या गावाचा कारभार सक्षम व कार्यक्षम करण्याची जबाबदारी त्या वतनदाराची होती. सारावसुली व गावचा विकास ही त्याची दोन प्रमुख कामे होती. या वतनसंस्थेमार्फत केंद्रीय सत्तेचे विकेंद्रीकरण साधण्यात आले होते. स्थानिक बाबींचा निकाल जेथल्या तेथे होऊन केंद्रीय सत्तेकडे जाण्यास लागणारा विलंब टाळला जावा असा या व्यवस्थेमागचा उद्देश होता. पाटील, कुलकर्णी, शेटे, महाजन, देशमुख, देशपांडे हे गावचे प्रमुख वतनदार होते. यापकी पाटील हा ग्रामसभेचा प्रमुख होता व त्याला जणू गावचा राजा असल्यासारखा मान होता.
सतराव्या शतकामध्ये शिवछत्रपतींनी मराठी सत्तानिर्मितीचा डाव मांडला तेव्हा मात्र मूळ ढाच्यात बदल करण्याइतका वेळ अन् कोणत्याही प्रकारचे पाठबळ त्यांच्यापाशी निदान सुरुवातीच्या काळात तरी नव्हते. नंतरच्या काळात त्यांच्यापाशी जेव्हा आíथक, सामाजिक व राजकीय सुबत्ता आली, तेव्हा त्यांनी अतिशय कुशलतेने व दूरदृष्टीने नानाविध प्रकारच्या प्रशासकीय अन् आíथक सुधारणा घडवून आणण्याचा नि:संशयपणे प्रयत्न केला. याचमुळे शिवपूर्वकाल व शिवकाल यातील ग्रामजीवनाचे चित्र फारसा बदल न करताही रेखाटता येते. स्वये शिवछत्रपती हे राजकीय क्रांती घडवून आणण्याच्या उद्योगात निमग्न असल्यामुळे समाजसुधारकी विषयांना हात घालणे त्यांना त्यांच्या दृष्टीने हाताशी असलेल्या इतर विषयांच्या मानाने तितकेसे महत्त्वाचे वाटले नसावे.
दुसऱ्या शब्दात असेही म्हणता येईल की, परंपरागत चालत आलेल्या सामाजिक संकेतांना वा रूढीविचारांना बदलाच्या नावाखाली हादरवून सोडण्याऐवजी, त्यांच्या कार्यपद्धतीत बदल करण्याऐवजी वा त्यांना समूळ नष्ट करण्याऐवजी त्यांनी या साऱ्याचा आपल्या राष्ट्रउभारणीच्या कामामध्ये अतिशय कुशलतेने उपयोगच करून घेतला.
शिवपूर्वकालात वा शिवकालातही राज्याचे आíथक जीवन खेडय़ावरच अवलंबून होते. किंबहुना खेडे हा या आíथक स्रोतांचा मूळ झरा होता असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. वर म्हटल्याप्रमाणे शेती हा प्रमुख व्यवसाय व शेतकरी हा या साऱ्याच सामाजिक व आíथक बाबींचा आस होता. खेडय़ाचे, महालाचे वा सुभ्याचे सारेच सांस्कृतिक, सामाजिक अथवा आíथक व्यवहार याच शेतकऱ्याला केंद्रिबदू मानून करण्यात येत होते. अलुतेदार व बलुतेदारांसारख्या गावगाडय़ाची चाके मानल्या जाणाऱ्या व्यक्तीही त्यांच्या योगक्षेमासाठी शेतकरी व पर्यायाने शेतीवर पूर्णतया अवलंबून होत्या. शेती व शेतकरी हे चक्र जर कुण्याही कारणाने रूंधल्यासारखे झाले, तर सगळा गावगाडाच करकरून थांबण्याची भीती केवळ स्थानिक प्रशासकांनाच नव्हे तर प्रादेशिक वा केंद्रीय राजसत्तेलाही होती. त्यामुळे काही अपवादात्मक राज्यकाल सोडले तर शेतकऱ्याची जपणूक करण्याचीच परंपरा व धोरणे साऱ्याच राजसत्तांनी राबवलेली आपल्या नजरेस पडतात. शेतकऱ्यांचा योगक्षेम म्हणजेच राज्याचा योगक्षेम ही भावना साऱ्याच राज्यकर्त्यांमध्ये दृढ होती व यासाठी सारेच वतनदार व राज्यकत्रे दक्ष होते. निजामशाहीचा वजीर मलिक अंबर याने सुरू केलेली जमीन मोजणीची व सारा आकारणीची पद्धत अगदी शिवकालातही अस्तित्वात होती ही बाब याच विचारपद्धतीचे द्योतक मानावयाला हवे.
शेतीखेरीज व्यापारावरही राज्याची आíथक मदार अवलंबून होती. राज्याच्या अभिवृद्धीसाठी व्यापारी हे शेतकऱ्यांइतकेच आवश्यक आहेत ही धारणा राज्यकर्त्यांच्या मनी सतत जागी होती. यासाठी व्यापाऱ्यांना निरनिराळ्या सवलती व व्यापारी मार्गाना लाभलेले संरक्षण या बाबींवर तत्कालीन राज्यकर्त्यांचा कटाक्ष होता. याचे सर्वात लक्षवेधक उदाहरण म्हणजे इ.स. पूर्व २५० पासून सातवाहनांच्या काळात व्यापारामुळे भरभराटीला आलेली कोकणातील अनेकविध बंदरे अन् त्या व्यापाराला व व्यापारी महामार्गाना संरक्षण देण्यासाठी निर्माण झालेले सह्य़ाद्रीतील गिरिदुर्गाचे जाळे. हे सतराव्या शतकापर्यंत अव्याहतपणे सुरू होते. सतराव्या शतकातील दख्खनचा इतिहास जर ध्यानी घेतला तर उत्तम उत्पन्नाचा व राजकीयदृष्टय़ा बराचसा स्थिर समाजजीवनाचा प्रदेश म्हणूनच मध्ययुगीन महाराष्ट्राकडे पाहिले जात होते.
स्थिरतेच्या या तकलुपी कल्पनेस सतराव्या शतकाच्या मध्यंतरास शिवछत्रपतींनी छेद दिलेला आपल्याला दिसतो. याच कालखंडात कुणाला कल्पनाही करवणार नाही अशा भूप्रदेशात त्यांनी आपल्या राजकीय व लष्करी हालचालींना सुरुवात केलेली आपल्या दृष्टोत्पत्तीस येते. तेथे एक प्रश्न सहजच मनी उभा राहतो की, हे असे या पद्धतीचे काही करावे, परकीय राजवटींना आव्हान देत स्वत:चे, स्वधर्माचे राज्य उभे करावे असे त्यांच्या मनी का आले असेल? त्या कालखंडाचा विचार करता काही तुरळक उदाहरणे सोडली तर या कालखंडाचा इतिहास हा सदैव स्वत:कडे कमीपणा घेत, अपमान सहन करीत स्वत:ची वतनदारी वाचवावी याच हेतूने प्रेरित झालेला दिसतो. मग त्यासाठी स्वत:च्या स्वत्त्वाची, स्वत:च्या राष्ट्राची आहुती द्यायला लागली तरीही हरकत नाही अशा प्रकारच्या प्रवृत्तींनी व स्वार्थी विचारांनी वेढलेला दिसतो.
या जागी थोडेसे विषयांतर करावेसे वाटते. ज्या कालखंडाविषयी आपण बोलतो आहोत त्या कालखंडात स्वत:च्या पराक्रमाने रणांगणे गाजविणारी सारीच घराणी ही सह्यद्रीच्या मातीत वाढलेली होती. सह्यद्री पर्वत भारताचा मेरूदंड म्हणून आपले महत्त्व अतिप्राचीन कालापासून ठसवीत आलेला आहे. महाराष्ट्राच्या प्राचीन कालखंडाचा विचार केला तर, सातवाहनांपासून ते शिवछत्रपतींपर्यंतच्या अठराशे वर्षांच्या इतिहासात जवळजवळ प्रत्येक राजकुळाने सह्यद्रीच्या खांद्याचा आधार घेत आपापल्या साम्राज्यांचा विस्तार करतानाच त्या साम्राज्याला स्थिरताही बहाल केलेली दिसते. दक्षिणोत्तर सहाशे मल पसरलेला हा पर्वत एका बाजूला सिंधुसागर तर दुसऱ्या बाजूला काळ्याकभिन्न पाषाणाचे दख्खनचे पठार असा भूगोल मांडून बसलेला दिसतो. सह्यद्रीचे रूप रौद्र आहे. त्याचा स्वभाव रौद्र आहे. त्याच्या कुशीत जन्मलेल्या कन्यापुत्रांनी अन् मुक्तपणे वाहणाऱ्या जलस्रोतांनी त्यांच्या सुपीक तीरांवर एतद्देशीय साम्राज्यांना जन्म दिला. त्यांचे पालनपोषण केले. वाहत्या जळासोबत त्यांची कीर्ती दिगंतराला नेली. हे सारेच सह्यद्रीच्या साक्षीने घडले होते. या रौद्रभीषण सह्यगिरीच्या मस्तकावर बांधलेल्या गिरिदुर्गानी या साम्राज्यांच्या पराक्रमाला स्वत:च्या दुभ्रेद्यतेची अन् अजेयतेची जोड दिली.
एक गोष्ट निर्वविादपणे सांगता येते की, भूगोल व भौगोलिक परिस्थिती ही त्या त्या प्रदेशाची वा देशाची मानसिकता घडवतात. त्या त्या देशाचा इतिहास घडवतात. त्या त्या देशीच्या माणसांचे स्वत्त्व घडवतात. त्या त्या देशाचे व्यक्तिमत्त्व घडवतात. जितकी अवघड भौगोलिक परिस्थिती तितकीच दुर्दम्य इच्छाशक्ती तेथील माणसांना लाभते. त्या त्या देशीचा भूगोल तिथल्या माणसांच्या जीवनाला सामाजिक, आíथक, सांस्कृतिक व राजकीय आयाम प्रदान करतो. ज्या ज्या वेळी आपण इतिहासाचा विचार करतो तेव्हा त्या इतिहासामागील भौगोलिक पलू जर ध्यानी घेतला नाही तर तो विचार र्सवकष ठरत नाही.
उपरोक्त कारणांमुळे जेव्हा सतराव्या शतकातील मराठय़ांच्या इतिहासाची मीमांसा करण्याचा आपण प्रयत्न करतो तेव्हा त्या ऐतिहासिक कारणांमागचा वा प्रसंगांमागचा भूगोल विसरणे ही घोडचूक ठरते. शिवछत्रपतींनी जेव्हा एका विवक्षित भौगोलिक प्रदेशात स्वराज्याचा डाव मांडला, तेव्हा तेथल्या सामाजिक जीवनाला, सर्वसामान्यांच्या मानसिकतेला, राजकीय व आíथक अवस्थेला स्पर्श करणाऱ्या भौगोलिक मर्यादांचे आकलन त्यांना निश्चितपणे झालेले होते. सह्याद्रीच्या भूगोलाचा अन् त्या भौगोलिक परिसीमांमध्ये राहणाऱ्या जनसामान्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा वापर करीत त्यांनी हा डाव मांडला. सह्याद्रीच्या भूगोलाचा नेमका वापर करीत त्यांनी आधीच विकसित असलेल्या गनिमी काव्याच्या युद्धपद्धतीला भूगोलाने बहाल केलेल्या तिथल्या सामान्यजनांच्या मानसिक व शारीरिक कणखरपणाची नेमकी जोड दिली. या सर्वसामान्य लोकांचा नेमका उपयोग केला अन् ध्येयासक्ती व ध्येयसिद्धी म्हणजे काय ते अवघ्या जगाला दाखवून दिले.
तत्कालीन आíथक परिस्थितीचा विचार केला तर मराठय़ांच्या या स्वातंत्र्ययुद्धात सह्यद्रीच्या याच भूगोलाने मदत केल्याचे आपल्याला दिसते. अतिशय अवघड भौगोलिक प्रदेश अन् तेवढेच अवघड ऋतुमान या दोहोंच्या मेळातून जे काही उत्पन्न हाती लागेल व ज्यातून रोजच्या गरजा भागविणेही कठीण अशी तिथल्या सर्वसामान्य माणसाची अवस्था होती. त्यातूनही परकीय राज्यकर्त्यांचे पोटावर अन् मनावर होणारे आघात यामुळे या प्रदेशात राहणाऱ्या मात्र दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला इथला माणूस पुरता गांजलेला होता. अस्मानी अन् सुलतानी असे दोन्ही आघात झेलत असताना त्यांच्या उत्थानासाठी कुणी उभे ठाकते आहे याची जाणीव होताक्षणी आपल्या सर्वशक्तीनिशी तो सर्वसामान्य माणूस शिवछत्रपतींच्या पाठीशी उभा राहिला अन् त्यांनी हाती घेतलेले कार्य यशस्वी होण्यात मग कोणतीही अडचण आली नाही.
येथे शिवछत्रपतींचा उल्लेख करण्याचे कारण असे आहे की, आपण मराठय़ांच्या काळातील भौगोलिकतेचा जनमानसावर व अर्थकारणावर होणारा परिणाम याची चर्चा करीत आहोत. त्यामुळे ज्या भौगोलिक परिस्थितीत राहणाऱ्या माणसाने त्यांना या कार्यात मदत केली ती मानसिकता सह्यद्रीच्या अन् सिंधुसागराच्या साहचर्याने या जनसामान्यांमध्ये निर्माण झालेली होती. याहूनही दोन पावले पुढे जाऊन सांगायचे झाले तर दख्खनच्या पठारावर राहणारी अन् तुलनेत काहीसे सुखासीन जीवन जगू शकणाऱ्या माणसांची मदत शिवछत्रपतींना त्यांनी अंगीकारलेल्या कार्यात कधीच झाली नाही. सह्यद्रीच्या कुशी-खांद्यावर राहणाऱ्या राकट, कणखर अन् शेंडी तुटो की पारंबी, मात्र हाती घेतलेल्या कामाला पाठ दाखवायची नाही अशा रांगडय़ा वृत्तीच्या सर्वसामान्य मावळ्यांनी व कुणब्यांनीच या देवकार्यात शिवछत्रपतींना जिवेप्राणे शेवटपर्यंत साथ दिली.
ज्या प्रदेशात या देवकार्याने जन्म घेतला व जे उत्तरोत्तर प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वृद्धीते पावले, त्याचे मूळ हे त्याचा ध्यास धरणाऱ्यांच्या पराक्रमात तर होतेच; मात्र त्या पराक्रमाला, त्या दृढनिश्चयाला खतपाणी घालणाऱ्या सह्याद्रीच्या अन् सिंधुसागराच्या प्रादेशिक दुर्गमतेतही होते. भूगोलाच्या कुशीतच इतिहास जन्म घेत असतो हे एक दुर्लक्ष न करता येण्याजोगे अन् विसरता न येण्याजोगे ऐतिहासिक सत्य या निमित्ताने आपल्या सामोरे येते.

शिवछत्रपतींपर्यंतच्या अठराशे वर्षांच्या इतिहासात जवळपास प्रत्येक राजकुळाने सह्यद्रीच्या खांद्याचा आधार घेत आपापल्या साम्राज्यांचा विस्तार करतानाच त्या साम्राज्याला स्थिरताही बहाल केलेली दिसते.
डॉ. मिलिंद पराडकर