08 July 2020

News Flash

घडलंय-बिघडलंय : पडद्यामागेही तेच..?

मराठी मालिकांमधली आजची सगळ्यात हिट जोडी कोणती, असा प्रश्न विचारला, तर एका झटक्यात उत्तर मिळेल. बरोब्बर.. ‘होणार सून मी या घरची’ मालिकेचे श्री आणि जान्हवी.

| March 6, 2015 01:08 am

मराठी मालिकांमधली आजची सगळ्यात हिट जोडी कोणती, असा प्रश्न विचारला, तर एका झटक्यात उत्तर मिळेल. बरोब्बर.. ‘होणार सून मी या घरची’ मालिकेचे श्री आणि जान्हवी. अर्थात, शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान ही जोडी. प्रेक्षकांच्या जबरदस्त प्रतिसादामुळे ही मालिका आजही नंबर वनवर आहे. अनेक ट्रॅक आणत ही मालिका वेगवेगळ्या वळणांवर जात असते. प्रत्येक ट्रॅकला प्रेक्षकांची पसंतीही मिळते; पण सध्या मालिकेत चालू असलेला श्री-जान्हवीच्या विरहाचा ट्रॅक प्रेक्षकांना बघवेनासा झालाय. कारणही तसंच आहे. इतक्या गोड जोडीमध्ये टोकाची भांडणं नकोशी वाटतात प्रेक्षकांना; पण एक आतली खबर अशी आहे की, या दोघांचं खऱ्या आयुष्यातही फारसं पटताना दिसत नाहीये. याचं नेमकं कारण अजूनही गुलदस्त्यातच आहे. शिवाय मध्यंतरी याबाबत दोघेही बोलते झाले होते. ‘‘असं काही नाही,’’ असंही ते म्हणाले होते; पण चित्र फारसं बदललेलं दिसत नाही. तूर्तास तरी दोघांचं पटत नाही हे कारण ऐकण्यात आलंय. पटत नसल्यामुळेच दोघं वेगवेगळे राहत असल्याची बातमी कानावर पडली आहे. वेगळे म्हणजे प्रकरण घटस्फोटापर्यंत गेलेलं नाही, हे आधीच सांगितलेले बरे. नाही तर चाणाक्ष, हुशार प्रेक्षक वेगवेगळे अंदाज लावायला दिरंगाई करत नाहीत. अधिक सांगणे न लगे. दुबईतल्या एका पुरस्कार सोहळ्यातही ते अँकरिंगशिवाय कुठेही एकत्र दिसले नाहीत म्हणे. तर मुद्दा असा आहे की, सध्या मालिकेतही त्यांच्या न पटण्याचा, वेगळे राहण्याचा ट्रॅक सुरू आहे. या ट्रॅकबाबत प्रेक्षक हरतऱ्हेने व्यक्त होताना दिसतोय. ‘तुम्ही प्लीज एकत्र या’, ‘असे भांडू नका’, ‘तुमच्यात गैरसमज झालाय’ अशा नानाविध प्रतिक्रिया उमटतायत. या प्रतिक्रियांमागे प्रेक्षकांचं प्रेमच आहे, यात शंका नाही. ते दोघे मालिकेत एकत्र येतीलही, कारण शेवटी ती मालिका आहे. नायक-नायिका एकत्र येणारच, कारण एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीचा एक फंडा सर्वश्रुत आहेच. ‘अंत भला तो सब भला.’ तर, श्री-जान्हवी तर एकत्र येणारच. प्रश्न उरतो तो शशांक आणि तेजश्रीचा. यांचं काय होणार, हा प्रश्न. तर यांच्यातले मतभेद हेही एक कारण आहे त्यांच्यात खटके उडण्याचं, असंही समजलंय. जसं मालिकेतल्या श्री-जान्हवी यांच्यातले गैरसमज दूर होऊन ते पुन्हा एकदा संसारात आनंदाने नांदू लागतील तसे शशांक आणि तेजश्री यांचंही व्हावं, हीच काय ती प्रार्थना करू शकतो. श्री-जान्हवी साकारताना जसे हे दोघे खऱ्या आयुष्यात एकमेकांच्या प्रेमात पडले तसेच मालिकेप्रमाणे दोघांमधले गैरसमजही कधी दूर होतील, हा प्रश्न आहेच. तर असो, श्री-जान्हवीप्रमाणे शशांक-तेजश्रीमधलाही दुरावा संपावा, ही प्रेक्षकांची इच्छा..!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2015 1:08 am

Web Title: honar sun mi hya gharchi
टॅग Bollywood
Next Stories
1 ट्रॅव्हलॉग : प्रवासातले अनुभव
2 पर्यटन : पर्यटनाचा गुरुमंत्र माहीत आहे?
3 ट्रॅव्हलॉग : तुम्हीच व्हा तुमचे टुर ऑपरेटर
Just Now!
X