सुमारे ३५ वर्षांपूर्वीची गोष्ट, नोकरीनिमित्त बोरीबंदर, मुंबई इथे रेल्वेने जायला लागायचे. त्या वेळी प्रथम वर्गात एवढी गर्दी नसायची. त्या दिवसांचा प्रसंग अजून मला आठवतो. माझी बॅग भरून त्यात जेवणाचा डबा, रेल्वेचा तिमाही प्रथम वर्गाचा पास, पैसे तसेच ऑफिसचे काही महत्त्वाची कागदपत्रे ठेवून प्रवासास सुरुवात केली. गाडी डोंबिवली, ठाणे, दादर व बोरीबंदर मुंबई अशी थांबणारी पकडली होती. गाडी सायन स्टेशन पास झाली व मी माझी बॅग घेऊन उठलो व माझे सासरे, जे माटुंगा रेल लाइनच्या लगतच एका बंगलीवजा घरात राहतात त्यांना बॅग हलवून अच्छा करायला गेलो अन् माझी बॅग रेल्वेच्या खांबावर आपटली आणि खाली पडली. मला मोठी चिंता लागून राहिली, कारण माझ्या सर्व चीजवस्तू त्या बॅगेतच होत्या. दादरला गाडी थांबली. मी तसाच उतरलो व दुसऱ्या गाडीने माटुंगा स्टेशनवर आलो व रेल्वे ट्रॅक साइडनी चालायला लागलो. बॅग कुठे दिसतेय का बघायला. तेवढय़ात मला रेल्वेचा एक गँगमन दिसला. मला पाहून तो विचारू लागला आपलं काय हरवलंय? त्यावर त्याला मी झालेला प्रकार कथन केला. त्यावर त्याने मला त्याच्या पाठीमागून येण्यास सांगितले. मी त्याच्या मागून गेलो आणि काय आश्चर्य त्यांनी मला माझ्या सासऱ्यांच्या घरात आणले. माझी बॅग सासऱ्यांच्या घरात ठेवली होती. ती त्यांच्या समक्ष माझ्या स्वाधीन करून मला सुखद धक्का दिला. आणि वर म्हणतो कसा, आत सर्व गोष्टी बरोबर आहेत ना? हे सर्व पाहून मला त्याच्या प्रामाणिकपणाचे अतिशय कौतुक वाटले. मी त्याला धन्यवाद देत काही बक्षीस द्यावे म्हणून पैसे पुढे केले तर म्हणतो कसा, आम्हाला रेल्वे पगार देतेय की, आणि ते पैसे नाकारले. मग माझे सासऱ्यांच्याकडे चहा फक्त त्यांनी घेतला. असे प्रामाणिक लोक रेल्वेमध्ये आहेत, याचा अभिमान वाटला!
– ग. द. लागू, डोंबिवली