01vijayमेष चतुर्थ स्थानातील गुरू वक्री होणार आहे. राशीच्या भाग्य स्थानात बुध प्रवेश करेल. त्यापूर्वी तो गुरूशी त्रिकोण करेल. इच्छा आहे तेथे मार्ग आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून सिद्ध करून दाखवाल. व्यापार-उद्योगात जरी आर्थिक आणि इतर परिस्थिती कठीण असली तरी तुमच्या धडपडय़ा स्वभावामुळे नवीन काम मिळण्याची शक्यता आहे. कारखानदारांना पूर्वीपेक्षा वेगळ्या बाजारपेठेचा शोध घ्यायला अनुकूल वातावरण निर्माण होईल. नोकरीमध्ये महत्त्वाच्या कामामध्ये वरिष्ठांचा सल्ला व मार्गदर्शन उपयोगी पडेल. 

वृषभ तृतीय स्थानातील गुरू वक्री होणार आहे. राशीच्या अष्टम स्थानात बुध प्रवेश करेल. त्यापूर्वी तो गुरूशी त्रिकोण करेल. घाण्याला जुंपलेला बैल व्हायला कोणालाच आवडत नाही. सध्या तुम्ही अशा मन:स्थितीत असाल, पण कर्तव्यातही कसूर झालेली तुम्हाला आवडत नाही. कामाबरोबर आराम करायचा तुमचा मानस राहील. व्यापार उद्योगात कामाच्या मानाने कमाई कमी असल्याने तुमचे समाधान होणार नाही. घरगुती समारंभ, छोटी ट्रीप यामुळे चांगला बदल होईल. त्यात खर्च मात्र प्रमाणाबाहेर वाढेल.

मिथुन धन स्थानातील गुरू वक्री होणार आहे. राश्याधिपती बुध सप्तम स्थानात प्रवेश करेल. त्यापूर्वी तो गुरूशी त्रिकोण करेल. वातावरणामध्ये फारसे चैतन्य नसेल. पण तुम्ही मात्र जीवनाचा आस्वाद घेण्याच्या मूडमध्ये असाल. त्यामुळे दैनंदिन कामाकडे दुर्लक्ष होईल. व्यवसाय-उद्योगामध्ये तुमची इच्छा असो वा नसो स्पर्धकांच्या पाऊलावर पाऊल ठेवून काही गोष्टी कराव्याशा वाटतील. नोकरीमध्ये सहकारी आणि मित्रमंडळी यांना खूश ठेवलेत तर तुमचा कामाचा तणाव काही प्रमाणामध्ये कमी होऊ शकेल.

कर्क राशीतील गुरू वक्री होणार आहे. राशीच्या षष्ठम स्थानात बुध प्रवेश करेल. त्यापूर्वी तो गुरूशी त्रिकोण करेल. या आठवडय़ात तुम्ही तुमच्या आर्थिक मर्यादेत राहून काम करायचे ठरवाल. त्या दृष्टीने आकडेमोडही कराल, पण आयत्या वेळेला खर्चाचा मोह आवरू शकणार नाही. व्यवसाय उद्योगामध्ये नवीन वर्षांकरता एखादी गिऱ्हाईकांना आकर्षित करणारी योजना तुमच्या मनात घोळेल. सुरुवातीला त्यात बरीच गुंतवणूक करावी लागणार आहे. घरामध्ये नवीन कार्यक्रमाच्या निमित्ताने वेगळ्या वातावरणात रमाल.

सिंह व्यय स्थानातील गुरू वक्री होणार आहे. राशीच्या पंचम स्थानात बुध प्रवेश करेल. त्यापूर्वी तो गुरूशी त्रिकोण करेल. सर्व ग्रहमान तुमच्या आनंदी आणि उत्साही राहण्याच्या स्वभावाला खतपाणी घालणारे आहे. व्यापार-उद्योगामध्ये काही तरी नवीन करावे असा विचार तुम्ही करीत असाल आणि तेवढय़ातच जुन्या ओळखीच्या व्यक्ती भेटतील आणि त्यांच्याकडून तुम्हाला एखादी दिशा मिळेल. नोकरीत संस्थेमध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये तुमचा पुढाकार राहील. घरामध्ये नवीन जागा, वाहन किंवा प्रवासाचे बेत ठरतील.

कन्या लाभ स्थानातील गुरू वक्री होणार आहे. राशीच्या चतुर्थ स्थानात बुध प्रवेश करेल. त्यापूर्वी तो गुरूशी त्रिकोण करेल. महत्त्वाचे ग्रह हळूहळू चतुर्थ स्थानात येत आहेत. त्यामुळे खूप कष्ट न घेता ज्या गोष्टी तुम्हाला सहजगत्या मिळतील त्यावर तुम्ही समाधान मानाल. व्यवसाय-उद्योगात छोटा प्रवास, महत्त्वाच्या गाठीभेटी वगैरे कामे आठवडय़ाच्या सुरुवातीला उरका. नोकरीमध्ये प्रत्येक कामाकरिता वरिष्ठ घाई करतील. पण तुम्ही मात्र तुमच्याच पद्धतीने कामे कराल. घरामध्ये पाहुण्यांची ये-जा राहील.

तूळ दशम स्थानातील गुरू वक्री होणार आहे. राशीच्या तृतीय स्थानात बुध प्रवेश करेल. त्यापूर्वी तो गुरूशी त्रिकोण करेल. सर्व ग्रहमान तुमच्या स्वाभाविक वृत्तीला अनुसरून असल्याने प्रत्येक गोष्टीत आपला पुढाकार असावा असे तुम्हाला वाटेल. ज्यांच्याकडे विशेष प्रावीण्य आहे त्यांना ते इतरांसमोर प्रदर्शित करण्याची चांगली संधी उपलब्ध होईल. कलाकार, खेळाडू आणि भाषा क्षेत्रात काम करणाऱ्यांना स्पृहणीय काम केल्याचा आनंद मिळेल. व्यापार-उद्योगात तुमच्या क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडींचा तुम्ही मागोवा घ्याल.

वृश्चिक धन स्थानातील गुरू वक्री होणार आहे. राशीच्या धन स्थानात बुध प्रवेश करेल. त्या पूर्वी तो गुरूशी त्रिकोण करेल. तुमच्या दूरदर्शी विचारांना आणि कृतीला भरपूर वाव देणारे हे ग्रहमान आहे. त्याचा जास्तीत जास्त फायदा उठवा. व्यापार-उद्योगात ज्या कामात तणाव निर्माण झाला होता त्यात अनपेक्षित मार्गाने तुम्हाला मदत मिळेल. बँक किंवा आर्थिक संस्थेकडून मदतीचे आश्वासन मिळेल. काहींना थोडय़ा कालावधीकरिता परदेशी जाण्याची संधी मिळेल. घरामध्ये हसतेखेळते वातावरण असेल.

धनू अष्टम स्थानातील गुरू वक्री होणार आहे. तुमच्याच राशीत बुध प्रवेश करेल. त्यापूर्वी तो गुरूशी त्रिकोण करेल. गेल्या काही आठवडय़ात कळते पण वळत नाही अशी तुमची स्थिती झाली होती. त्यातून आता सुटका होण्याची चिन्हे नजरेच्या टप्प्यात येतील. व्यापार-उद्योगात पेरल्याशिवाय उगवत नाही याची आठवण ठेवून न कंटाळता तुमचे प्रयत्न चालू ठेवा. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमची अडचण समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्याचे मान्य करतील. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये पूर्वी लांबवावा लागलेला कार्यक्रम ठरेल.

मकर सप्तम स्थानातील गुरू वक्री होणार आहे. राशीच्या व्यय स्थानात बुध प्रवेश करेल. त्यापूर्वी तो गुरूशी त्रिकोण करेल. या आठवडय़ात सभोवतालच्या व्यक्ती तुम्हाला न जुमानता मनोरंजनाच्या आणि मौजमस्तीच्या कार्यक्रमात सामील करून घेतील. त्याचा सुरुवातीला तुम्हाला राग येईल, पण नंतर त्यामुळे बरे वाटेल. व्यापार-उद्योगात हातामध्ये भरपूर पैसे शिल्लक राहत नाहीत, अशी तक्रार तुम्ही करीत राहाल. नोकरीमध्ये जी गोष्ट वरिष्ठांना आवडते ती देऊन तुम्ही तुमचा फायदा करून घ्याल.

कुंभ षष्ठम स्थानातील गुरू वक्री होणार आहे. राशीच्या लाभ स्थानात बुध प्रवेश करेल. त्यापूर्वी तो गुरूशी त्रिकोण करेल. एखाद्या गोष्टीकरिता आपण बरेच प्रयत्न करीत असतो, पण आपल्याला सहजगत्या यश मिळत नाही. याउलट काही वेळेला विनासायास आपली कामे होऊन जातात. ह्य आठवडय़ात असा योगायोग चालून येईल. व्यक्तिगत सरकारी आणि कोर्ट व्यवहारांना गती मिळेल. घरामध्ये नातेवाईक आणि मित्रमंडळींचा एखाद्या निमित्ताने मेळावा आयोजित केला जाईल. त्या घरातील इतर सदस्यांनाही सामील करून घ्याल.

मीन पंचम स्थानातील गुरू वक्री होणार आहे. राशीच्या दशम स्थानात बुध प्रवेश करेल. त्यापूर्वी तो गुरूशी त्रिकोण करेल. जी गोष्ट आपल्याला मनापासून आवडते ती करायला मिळणे यालाच आपण आजकालच्या जीवनात नशीब म्हणतो. असा नशिबाचा छान अनुभव देणारा हा आठवडा आहे. व्यवसाय-उद्योगात बाजारपेठेतील आपली प्रतिष्ठा वाढवण्याकरिता नवीन दालन उघडायचा संकल्प कराल. घरामध्ये बुजुर्ग व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा प्रसंग साजरा होईल.