मेष ग्रहमान तुमच्या कामाला गती आणणारे आहे. तुमचे घर आणि करिअर या दोन्ही आघाडय़ांवर तुम्ही सतर्क बनाल. एखादे काम होत नाही असे पाहिल्यानंतर धोका पत्करण्याकडे तुमचा कल राहील. व्यापार आणि उद्योगात आर्थिकदृष्टय़ा चांगल्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळतील. नोकरीमध्ये तुमच्या सुखसोयी वाढल्यामुळे बरे वाटेल. घरामध्ये महत्त्वाच्या आणि चांगल्या गोष्टींची नांदी होईल. गुरूने राशीबदल करून चतुर्थस्थानात प्रवेश केला आहे. हे गुरूचे भ्रमण कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने सौख्यकारक ठरेल.

वृषभ होणारे ग्रहबदल तुमच्या दृष्टीने चांगले ठरणार आहेत. गुरूने राशीबदल करून तृतीयस्थानात प्रवेश केला आहे. तेथे त्याचे भ्रमण एक वर्षांहून अधिक काळ असल्यामुळे तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत. षष्ठस्थानातील शनीमुळे आलेली निराशा कमी करायला त्याचा उपयोग होईल. व्यापार-उद्योग आणि कारखानदारीत सफल झाल्यामुळे बाजारपेठेत तुमची प्रतिमा उजळून निघेल. नोकरीतल्या कामात जादा अधिकार मिळून परदेशवारीकरिता निवड होईल. घरातील लांबलेले शुभकार्य निश्चित होऊन ते पार पडेल.

मिथुन गुरूने राशीबदल करून धनस्थानात प्रवेश केला आहे. तेथे त्याचे वास्तव्य आता पुढील एक वर्षांहून अधिक काळ असेल. या दरम्यान तुमच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावणाऱ्या चांगल्या घटना घडतील. व्यवसाय-उद्योगातील प्राप्तीचे प्रमाण वाढेल. नोकरीमध्ये पगारवाढ किंवा पदोन्नती यासंबंधी मिळालेले आश्वासन पूर्ण होईल. बेकार व्यक्तींना काम मिळेल. तरुणांचे कौटुंबिक जीवनात पदार्पण होईल. घरामध्ये शुभकार्य ठरेल किंवा पार पडेल. तुमच्या इच्छा आणि आकांक्षा वाढतील. 

कर्क तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणाऱ्या घटना घडतील. गुरूसारखा भाग्यवृद्धी करणाऱ्या ग्रहाने तुमच्याच राशीमध्ये प्रवेश केला आहे. त्याचे वास्तव्य तेथेच एक वर्षांहून अधिक कालावधीसाठी असेल. या दरम्यान तुमच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या आणि चांगल्या घटना घडायला सुरुवात होईल. व्यापार उद्योगातील विस्ताराच्या कल्पना साकार होतील. नोकरीत बढती आणि परदेशगमनाचे योग संभवतात. घरामध्ये काही कारणाने लांबवलेल्या कार्याना मुहूर्त लाभेल. तरुणांचे वैवाहिक जीवनात पदार्पण होईल.

सिंह तुमच्या आनंदी उत्साही आणि दिलदार स्वभावाचे तो इतरांना दर्शन घडेल. व्यापारामध्ये एखादा मोठा प्रोजेक्ट तुमचे लक्ष आकर्षित करेल. नोकरीमध्ये स्वत:चे महत्त्व आणि अधिकार वाढवण्याकरिता वरिष्ठांची खुशामत कराल. घरामध्ये पूर्वी ठरलेला एखादा मेळावा किंवा शुभसमारंभ पार पडेल. गुरूने राशीबदल करून व्ययस्थानात आगमन केले आहे. तेथे त्याचे वास्तव्य एक वर्षांहून अधिक काळ असेल. या दरम्यान तुम्हाला तुमच्या महत्त्वाकांक्षी स्वभावावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

कन्या तुमच्या जीवनामध्ये सौख्यकारक बदल घडण्याची नांदी होईल. व्यापार-धंद्यात कामाचा वेग वाढेल. नोकरीमध्ये कंटाळवाणे काम संपेल. व्यक्तिगत जीवनातील तणाव कमी होईल. गुरू राशीबदल करून लाभस्थानात आला आहे. तेथे त्याचे वास्तव्य एक वर्षांहून अधिक काळ असेल. या दरम्यान व्यापार-धंद्याच्या क्षेत्रात मोठे बदल झाल्यामुळे तुमचे कष्ट कमी होतील आणि मिळालेल्या पैशाचा उपभोग घेऊ शकाल. नोकरीमध्ये जरी कष्ट असले तरी त्याचा मोबदला मिळाल्याचे समाधान लाभेल. पगारवाढ होईल.

तूळ तुमच्या इच्छा आकांक्षा पल्लवित करणारे ग्रहमान आहे. त्यामुळे विपरीत परिस्थितीतून काहीतरी चांगले घडेल असा आशावाद तुमच्यात निर्माण होईल. व्यवसाय-धंद्यात धाडसी निर्णय घ्यावेसे वाटतील. नोकरीमध्ये अन्यायाचा कंटाळा येईल. गुरूसारखा भाग्यवर्धक ग्रह राशीच्या दशमस्थानात आला आहे. तेथे त्याचे वास्तव्य एक वर्षांहून अधिक काळ असेल. हा संपूर्ण कालावधी तुमच्या दृष्टीने चांगला व महत्त्वपूर्ण ठरेल. नोकरीमध्ये प्रगतीला नवीन दिशा मिळेल. काहींना परदेशी जाण्याची संधी प्राप्त होईल.

वृश्चिक ग्रहमान तुमच्यामध्ये नवचैतन्य आणेल. व्यापार, नोकरी आणि व्यक्तिगत जीवनात आलेली मरगळ काही प्रमाणात कमी होईल. भाग्यवर्धक ग्रह गुरूने भाग्यस्थानात प्रवेश केला आहे. तेथे त्याचे वास्तव्य पुढील एक वर्षांहून अधिक काळ असेल. गेल्या एक वर्षांच्या काळात त्याने आणि व्ययस्थानातल्या शनीने तुमची प्रचंड गैरसोय केली होती. आता गुरू बदलामुळे या संपूर्ण कालावधीमध्ये तुमच्या जीवनामध्ये अडून राहिलेल्या काही कामांना वेग येईल. नोकरीमध्ये केलेल्या कष्टाचे चीज होईल.

धनू जे महत्त्वाचे बदल नजीकच्या भविष्यात घडणार आहेत त्याची नांदी होईल. नोकरी, व्यवसाय आणि व्यक्तिगत जीवनात आपली मर्यादा ओळखून वागणे चांगले. अचानक उद्भवणाऱ्या खर्चाची तरतूद करावी लागेल. घरामध्ये जोडीदाराशी किरकोळ खटके उडतील. गुरू राशीबदल करून अष्टमस्थानात गेला आहे. त्याचे वास्तव्य तेथे एक वर्षांहून अधिक काळ असल्यामुळे तुमच्यावर काही मर्यादा येतील. व्यापार-उद्योगात आर्थिक आणि इतर धोके वाढू देऊ नका. विद्यार्थ्यांनी अभ्यासात काटेकोर राहावे.

मकर ग्रहस्थिती तुम्हाला अनुकूल असल्यामुळे तुमच्यामध्ये जोम आणि उत्साह दिसून येईल. व्यापारीवर्ग आणि कारखानदार एखाद्या मोठय़ा प्रकल्पासंबंधी नियोजन करतील. नोकरीमध्ये वरिष्ठांची संमती घेण्यापूर्वीच निर्णय कृतीत आणण्याची तुम्हाला घाई असेल. गुरू राशिबदल करून सप्तमस्थानात येऊन पोहोचला आहे. आता पुढील एक वर्षांमध्ये तुम्हाला सर्वागीण प्रगतीचा अनुभव घेता येईल. व्यापार-उद्योगात विस्ताराच्या योजना सफल होतील. विद्यार्थ्यांना प्रगतिकारक वर्ष आहे.

कुंभ ग्रहमान संमिश्र आहे. सतत जाणवणाऱ्या दगदग आणि धावपळीचा तुम्हाला कंटाळा येईल. व्यापार, उद्योग आणि नोकरीत या तीनही आघाडय़ांवर तुम्हाला सक्रिय राहावे लागेल. घरामध्ये एखादी महत्त्वाची जबाबदारी नजरेच्या टप्प्यात येईल. गुरूने राशीच्या षष्ठस्थानात प्रवेश केला आहे. तेथे त्याचे वास्तव्य आता पुढील वर्षभर राहणार आहे. या कालावधीमध्ये तुम्हाला प्रकृती आणि स्पर्धा यासंबंधी आवश्यक ती काळजी घ्यावी लागेल. नोकरीमध्ये तुमचे प्रावीण्य वाढविणे आवश्यक आहे. घरामध्ये विनाकारण खर्च वाढतील.

मीन व्यावसायिक किंवा व्यक्तिगत जीवनात भागीदारीसंबंधी जर काही प्रश्न निर्माण झाले असतील तर ते पुन्हा नव्याने डोके वर काढतील. नोकरीमध्ये सहकारी आणि वरिष्ठांशी अदबीने बोला. घरामधल्या महत्त्वाच्या प्रश्नांना सामोरे जावे लागेल. गुरू राशीबदल करून पंचमस्थानात आला आहे. तेथे त्याचे भ्रमण आता एक वर्षांहून अधिक काळ असेल. तुमचा ताणतणाव कमी होईल. व्यवसाय आणि नोकरीच्या क्षेत्रातील अवघड प्रश्नांची हळूहळू उकल होईल.