मेष ग्रहस्थिती संमिश्र आहे. गेल्या काही आठवडय़ांत जे प्रश्न निर्माण झाले असतील ते सोडविण्याकरिता तुम्हाला सिद्ध व्हावे लागेल. थोडेसे बुचकळ्यात पडल्यासारखे वाटेल. घाई न करता शांतपणे निर्णय घेतलेत तर तुम्ही त्यातून मार्ग काढू शकाल. व्यापार उद्योगात बाजारातील चढउतार आणि स्पर्धकांची तयारी या दोन्हींचा सतत मागोवा घ्या. नोकरीमध्ये वरिष्ठांचे वागणे-बोलणे गूढ वाटेल. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींचे वागणे आणि निर्णय लहानांना पटणार नाहीत. तरुणांनी विवाहसंबंधीचे निर्णय भावनेच्या भरात घेऊ नये.

वृषभ महत्त्वाचे ग्रह चतुर्थस्थानामध्ये असल्यामुळे तुमचा मोहरा तुम्ही गृहसौख्य किंवा घराकरता आवश्यक असणाऱ्या गोष्टींकडे वळवाल. ही तुमची स्वाभाविक आवड असल्यामुळे त्यामध्ये तुम्ही उत्साहाने सहभागी व्हाल. व्यापार उद्योगामध्ये गिऱ्हाईकांना खूश ठेवण्यासाठी व्यावसायिक जागेची सजावट कराल. त्यांना आकर्षित करणारी आश्वासने द्याल. नोकरीमध्ये काम करीत असलात तरी तुमचे लक्ष इतर गोष्टींकडे असेल. घरामध्ये तुमच्या मनाप्रमाणे सजावट, रंगरंगोटी वगैरे गोष्टी कराल.

मिथुन तुमच्या कल्पना इतरांपेक्षा वेगळ्या असतात. त्या साकार करण्याचा तुम्हाला आनंद हवा असतो तसा आनंद तुम्ही घ्याल. पण ते करताना तुमच्या बजेटचा विसर पडू देऊ नका. व्यवसाय उद्योगामध्ये मालाची विक्री आणि नफ्याचे प्रमाण वाढविण्याकरिता एखादा भूलभुलैया निर्माण करणाऱ्या योजनेमध्ये तुम्ही सहभागी व्हाल. कुटुंबीयांसह घरगुती समारंभाच्या निमित्ताने प्रवासाचे योग संभवतात. त्या वेळेला गडबड, गोंधळ टाळा आणि इतर नियोजन केलेत तर त्याचा उपयोग होईल.

कर्क प्रत्येक आघाडीवर तुम्हाला सक्रिय आणि सतर्क व्हावेसे वाटेल. त्याकरता अविरत मेहनत घेण्याची तुमची तयारी असेल. सामूहिक किंवा सामाजिक कार्यात महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाईल आणि तुम्ही ती व्यवस्थित पार पाडाल. व्यापार उद्योगात नवीन योजनेचा प्रारंभ होण्याची शक्यता आहे, परंतु जुन्या पद्धतींना घाईने राम राम ठोकू नका. नोकरीमध्ये महत्त्वाच्या कामगिरीकरता मोठय़ा विश्वासाने आणि आपुलकीने तुमचे नाव सुचवतील. घरामध्ये येणाऱ्या-जाणाऱ्यांचे तुम्ही उत्तम स्वागत कराल.

सिंह ज्यांना तुम्ही आपले म्हणता त्यांच्याकरता काहीही करण्याची तुमची तयारी असते. ज्या व्यक्तींचा तुमच्यापाशी स्वार्थ आहे त्या व्यक्ती तुम्हाला खूश करण्याचा प्रयत्न करतील. व्यापार उद्योगात गिऱ्हाईकांकडून जाहिरात आणि प्रसिद्धीला चांगला प्रतिसाद मिळेल. बँक आणि इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळेल. ज्यांचा जोडधंदा आहे त्यांना त्या माध्यमातून नवीन ऑर्डर मिळेल. नोकरीमध्ये प्रत्येक कामात तुमचा पुढाकार राहील. नवीन वाहन अथवा वास्तू खरेदी करण्याचा मानस असल्यास तो पूर्ण होईल.

कन्या मनाच्या कोपऱ्यात स्वत:ची इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याचा तुमचा इरादा असेल; पण त्यासाठी पैसे खर्च करण्याची तुमची तयारी नसेल. शेवटी तुमचे झुकते माप आनंद साजरा करण्याकडे असेल. व्यापार-उद्योगात जेवढे जास्त काम तेवढी जास्त कमाई असा प्रकार असल्यामुळे तुम्ही भरपूर मेहनत कराल. नोकरीमध्ये कितीही कष्ट पडले तरी कामाचे ठरविलेले उद्दिष्ट गाठण्यात सफल व्हाल. घरामध्ये मोठय़ा खरेदीचा संकल्प पार पडेल. प्रिय व्यक्ती त्यांचे हट्ट तुमच्याकडून पूर्ण करून घेतील.

तूळ तुमची जमाखर्चाची बाजू समसमान ठेवणारे हे ग्रहमान आहे. तुमच्या मनाची द्विधा होईल. एकीकडे मौजमजेचा तुमचा मूड असेल पण खर्चाचा विचार मनात आला की तुमचे पाऊल मागे सरकेल. व्यवसाय-उद्योगात नेहमीपेक्षा जास्त पैसे मिळतील; पण तुमची गरज मोठी असल्यामुळे ते अपुरेच वाटतील. नोकरीमध्ये नेहमीच्या कामाव्यतिरिक्त एखाद्या सामूहिक कार्यक्रमात सामील व्हाल. घरामध्ये प्रत्येक जण आपआपली इच्छा पूर्ण करून घेईल. त्या नादात तुमचे खर्च बजेटबाहेर जातील.

वृश्चिक प्रत्येक गोष्ट तुम्ही नियोजन करून करत असता. पण आता मात्र शिस्तबद्ध आणि काटेकोरपणाचा तुम्हाला कंटाळा येईल. थोडेसे स्वैर जीवन जगण्याचा मोह अनावर होईल. अशा वेळेला पैशाचा आणि वेळेचा तुम्ही जास्त विचार करत राहाल. व्यापार-उद्योगात मोठे बेत करण्यापूर्वी त्यातील जमाखर्चाचा नीट अंदाज घ्या. नोकरीमध्ये स्वयंभू बनलात तर तुमचे काम चांगले होईल. घरामध्ये सगळ्यांशी मिळतेजुळते घेऊन आलेल्या क्षणाचा तुम्ही आनंद घ्याल. तरुण मंडळींच्या प्रावीण्याला वाव देणारा सप्ताह आहे.

धनू स्वप्न आणि सत्य यामध्ये फरक असतो हे आपल्याला माहीत असते तरीही आपण स्वप्न बघायचे थांबवत नाही. अनेक विचार तुमच्या मनात घोळत असतात. आणि जेव्हा त्याला योग्य संधी मिळते त्या वेळी तुमचे मन उचंबळून उठते. आता तुमचा उत्साह ओसंडून वाहील. व्यापार-उद्योगात तुमच्या मालाला बरीच मागणी असेल. गल्ल्यामध्ये पडणारी रक्कम समाधान देऊन जाईल. नोकरीमध्ये जरी तुम्हाला आळस आला असला तरी ज्या कामात तुमचा फायदा आहे अशा गोष्टींना तुम्ही प्राधान्य द्याल.

मकर पैसे खर्च करायचे म्हटले की तुमच्या जिवावर येते, पण या आठवडय़ात जे खर्च होणार आहेत त्यातून तुमचा आनंद वाढण्याची शक्यता असेल. व्यापार उद्योगामध्ये भरपूर काम कराल. दिवसाचे चोवीस तास तुम्हाला अपुरे वाटतील. तणाव घेऊन कोणतेही काम करू नका. नोकरदार व्यक्तींना संस्थेकडून तात्पुरते कर्ज किंवा एखादी सवलत मिळेल. घरामधला माहोल आनंदी आणि उत्साही असेल. स्वत:च्या मर्यादेत राहून तुम्ही घराची सजावट कराल. वाहन व घर खरेदी करताना फार मोठी उडी घेऊ नका.

कुंभ तुम्ही प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक आणि नियोजन करून करता. तुमचे अंदाज थोडेफार मागेपुढे होण्याची शक्यता आहे. त्याला तुमची हौसमौज आणि आपुलकीच्या व्यक्तींवरील प्रेम हेच कारणीभूत असेल. व्यवसाय-उद्योगात जनसंपर्क आणि प्रसिद्धी यामुळे तुमच्या मालाला चांगला उठाव येईल. झालेल्या कामाविषयी तुम्ही समाधान व्यक्त कराल. उधारी मात्र वाढवू नका. नोकरीमध्ये केवळ महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करा. टीमवर्कवर विश्वास ठेवा. घरामध्ये सर्व जण आनंदी आणि उत्साही मूडमध्ये असतील.

मीन स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही याची आठवण ठेवून महत्त्वाची कामे स्वत:च हाताळा, असा ग्रहांचा तुम्हाला सल्ला आहे. व्यवसाय-धंद्यात स्वत:च्या आर्थिक आणि इतर कुवतीचा विचार केल्याशिवाय धोका पत्करू नका. जोडधंद्यात काम स्वीकारताना गरजेपेक्षा जास्त मुदत गिऱ्हाईकांकडून मागून घ्या. नोकरीमध्ये तुमच्या हातून झालेली चूक वरिष्ठांना आवडणार नाही. घरामध्ये कोणतेही मोठे बेत करताना त्यातून खर्चाचा बोजा वाढणार नाही याकडे सतत लक्ष ठेवा.