23 September 2020

News Flash

१५ ते २१ ऑगस्ट २०१४

मेष - काही कर्तव्ये अशी असतात की ज्यातून आपल्याला फारसा आनंद मिळत नाही, परंतु ती टाळताही येत नाही.

| August 15, 2014 01:06 am

मेष काही कर्तव्ये अशी असतात की ज्यातून आपल्याला फारसा आनंद मिळत नाही, परंतु ती टाळताही येत नाही. अशा प्रकारची कर्तव्ये या आठवडय़ामध्ये तुमच्या मागे लागतील. व्यापार उद्योगात पूर्वी एखादा करार करण्यामध्ये त्रुटी राहिल्या असतील तर त्याची जाणीव होईल. नोकरीमध्ये दुसऱ्यावरी जो विसंबला त्याचा कार्यभाग संपला याचा अनुभव येईल. स्वयंभू बनणे चांगले. घरामध्ये जोडीदाराच्या स्वास्थ्यामुळे त्रास संभवतो. मुलांच्या प्रगतीविषयी चांगली बातमी कळेल. तरुणांनी अतिधाडस करू नये.

वृषभ सत्ता आणि स्पर्धा या दोन्ही गोष्टी आल्या की त्याला कोणतेच नीतिनियम नसतात. एकीकडे तुमचा उत्साह ओसंडून वाहत असेल तर दुसरीकडे स्पर्धक तुमच्यावर मात करण्याचा प्रयत्न करतील. अशा संघर्षांतून तुम्हाला वाटचाल करायची आहे. नोकरीच्या ठिकाणी एखाद्या चांगल्या कल्पनेचे भांडवल करून गुप्त शत्रू श्रेय घेण्याचा प्रयत्न करतील. म्हणून तुमच्या कामात गुप्तता राखा. घरामध्ये कोणी तुम्हाला विरोध केलेला खपणार नाही. याच कारणावरून थोडासा दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे.

मिथुन एखादे काम असे असते की ज्यामध्ये आपल्या एकटय़ाचे कौशल्य महत्त्वाचे नसते तर आपण कोणावर तरी अवलंबून असतो. या आठवडय़ात मात्र याच कारणावरून तुमची थोडीशी निराशा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वयंभू बनणे चांगले. व्यवसाय उद्योगात कोणतेही मोठे निर्णय घेणे सध्या तरी टाळा. अनोळखी गिऱ्हाइकांशी भावनेच्या भरात फार मोठे सौदे करू नका. नोकरीमध्ये हितशत्रू तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय स्वत:कडे घेण्याची शक्यता आहे. घरामध्ये प्रिय व्यक्तींच्या स्वास्थ्याविषयी चिंता वाटेल.

कर्क ग्रहमान तुम्हाला कोडय़ात टाकणारे आहे. माणसांना जपणे, त्यांचा आनंद वाढविणे या सर्व गोष्टींमध्ये तुमचा हात कोणी धरू शकत नाही. व्यापार-उद्योगामध्ये पूर्वीच्या ओळखी आणि चांगले हितसंबंध, जाहिरातबाजी यामुळे गिऱ्हाइकांना तोटा नसेल. एखादा नवीन उपक्रम सुरू करण्याचा तुमचा इरादा असेल. नोकरीमध्ये संस्थेतर्फे एखादी स्पर्धा किंवा योजना आयोजित केली गेली असेल तर त्यात विजयी व्हाल. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामधल्या व्यक्तींना खूश ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या तत्त्वांशी तडजोड कराल.

सिंह ग्रहस्थिती थोडीशी सुधारण्याची लक्षणे दिसू लागल्यामुळे तुम्ही उत्तेजित व्हाल. मोठय़ा योजनेचा विचार करा. पण हे सर्व करताना अति घाई संकटात जाई हे विसरू नका. व्यापार-उद्योगात मोठय़ा योजनेच्या श्रीगणेशा करण्याचा तुमचा मूड असेल. त्याकरता जादा भांडवलाची उभारणी करावी लागेल. स्वत:ची मर्यादा विसरू नका. नोकरीमध्ये प्रचंड उत्साहाने काम कराल. घरामध्ये प्रत्येकाचे लाड पुरवण्याकरता तुम्ही सिद्ध व्हाल. त्यांच्या आवश्यक त्या गरजा भागवाल. सामूहिक कामात सक्रिय बनाल.

कन्या व्यापार-उद्योगात जास्त पैसे मिळविण्याचा मोह अनावर होईल. त्या नादामध्ये फार मोठा धोका पत्करू नका. नोकरीमध्ये अधिकार आणि सवलतींचा योग्य कारणाकरता उपयोग करा. घरामध्ये सर्वाची हौस पुरवण्याचे तुमचे धोरण असेल. पण त्याकरता शक्यतो उधार-उसनवार करू नका. वडिलोपार्जित प्रॉपर्टी आणि जुने प्रश्न अचानक डोके वर काढतील. ज्या व्यक्तींशी तुम्ही व्यवहार करणार आहात, त्याच्या विश्वासार्हतेसंबंधी माहिती मिळवा. नातेसंबंध व पैसा यांची गल्लत होऊ देऊ नका.

तूळ एखाद्या समस्येविषयी आपल्याला पूर्वी कधी तरी धोक्याची सूचना मिळाली असेल त्यावर काहीतरी ठोस करायचे असेही आपण ठरविलेले असते. पण नंतर त्याचा विसर पडतो. आता या गोष्टीची तुम्हाला तातडीने आठवण येईल. व्यवसाय-उद्योगात भागीदारीसंबंधी काही प्रश्न असतील तर त्यावर निर्णय घेणे आवश्यक होईल. नोकरीमध्ये चांगले काम विसरून वरिष्ठ चुकांवर बोट ठेवतील. घरामध्ये जोडीदाराशी तात्त्विक मुद्यावरून वादविवाद होतील. मशिनवर काम करताना व वाहन चालविताना धोका पत्करू नये.

वृश्चिक बऱ्याच प्रयत्नांनंतर हाताबाहेर गेलेली परिस्थिती तुम्ही नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न कराल. परंतु एखाद्या अनपेक्षित घटनेमुळे पुन्हा एकदा तुमचे लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे. दुसरा पर्यायही हातात ठेवा. व्यापार-उद्योगात मध्यस्थांवर अवलंबून ठेवलेल्या कामात गडबड गोंधळ होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये तुमच्या कामाचा उत्साह जरी चांगला असला तरी वरिष्ठ वेगळ्याच कामाला महत्त्व देतील. स्वत:ची प्रकृती सांभाळा. घरामध्ये पूर्वी ठरविलेले बेत काही कारणाने बदलावे लागतील.

धनू पैसा ही एक अशी गोष्ट आहे की जी माणसाला स्वस्थ बसू देत नाही आणि मोह निर्माण करते. तुम्ही करीत असलेल्या आर्थिक व्यवहाराविषयी सावधान राहणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मैत्री आणि पैसा यामध्ये तुम्ही जर गल्लत केलीत तर त्यातून जुने हितसंबंध तुटण्याची शक्यता आहे. व्यापार-उद्योगात जादा कमाईकरता भलत्याच व्यक्तींशी संगत ठेवू नका. नोकरीमध्ये सहकाऱ्यांच्या बाबतीत खाने दाने के साथी असा अनुभव येईल. घरामध्ये प्रत्येक व्यक्तीचे हट्ट पुरविणे कठीण असेल. आप्तेष्ट व नातेवाईक यांच्याशी जपून बोला.

मकर इकडे आड तिकडे विहीर अशी तुमची परिस्थिती होणार आहे. ज्या कामात तुम्ही स्वत: लक्ष घालाल, त्याला चांगला वेग मिळेल. पण ज्याकडे तुमचे दुर्लक्ष झाले होते, त्यामध्ये गुंतागुंत निर्माण होईल. व्यापार-उद्योगात तुमचा मोह आवरणे अत्यावश्यक आहे. नोकरीमध्ये थोडय़ा वेळामध्ये तुम्हाला बरीच कामे करायची असतील तरीही मधूनच मौजमजा करण्याची इच्छा जागृत होईल. अचानक बदली होण्याची शक्यता आहे. घरामध्ये मोठय़ा खरेदीचे आणि छान छान कार्यक्रम ठरतील, पण बजेटचा नीट अंदाज घ्या.

कुंभ मनाच्या कोपऱ्यात खूप चांगले काम योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी तुमच्याकडे नवीन कल्पना असतील. परंतु ज्यांच्याकडून प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असेल, त्यांच्याकडून तो न मिळाल्यामुळे तुम्हाला एकाकी पडल्यासारखे वाटेल. व्यवसाय-उद्योगामध्ये कोणत्याही एका व्यक्तीवर प्रमाणाबाहेर अवलंबून राहिलात तर भरवशाच्या म्हशीला टोणगा असा प्रकार होईल. नोकरीमध्ये सहकाऱ्यांच्या वागण्या-बोलण्याकडे जास्त लक्ष न देता तुम्ही तुमच्याच पद्धतीने काम कराल. घरामध्ये बरेच कार्यक्रम ठरतील.

मीन परिस्थिती जरा सुधारते असे वाटून तुम्ही सुस्कारा टाकता, तोच एखादे नवीन प्रकरण उद्भवल्यामुळे पुन्हा एकदा तुमचे मन बिथरून जाईल. अशा वेळी तुमचे खरे हितचिंतक तुम्हाला उपयोगी पडतील. व्यवसाय-उद्योगात स्पर्धकांशी तुलना न करता आपल्या मर्यादेत राहून काम करा. नोकरीमध्ये सहकाऱ्यांचा चेहरा आणि मुखवटा यातील भेद लक्षात येईल. तुमचे काम काळजीपूर्वक हाताळा. घरामधील सदस्यांचा तुम्हाला आधार वाटेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2014 1:06 am

Web Title: horoscope 23
Next Stories
1 १८ ते २४ जुलै २०१४
2 २७ जून ते ३ जुलै २०१४
3 २० ते २६ जून २०१४
Just Now!
X