मेष राशीच्या व्ययस्थानात खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. स्वभावत: तुम्ही खूप भावनाशील नाही; परंतु एखाद्या प्रसंगामुळे किंवा घटनेमुळे असे होण्याची शक्यता आहे. व्यवसाय-उद्योगात बरेच काम करण्याची इच्छा असेल; पण प्रत्येक गोष्टीकरिता इतरांवर अवलंबून राहावे लागल्यामुळे अडखळल्यासारखे वाटेल. काही कामे पैशाअभावी लांबवावी लागतील. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या आज्ञा तंतोतंत पाळा. अधिकाराचा गैरवापर करू नका. घरामधील सदस्याच्या प्रकृती किंवा प्रगतीविषयी चिंता वाटेल.

वृषभ राशीच्या लाभस्थानात चंद्रग्रहण होणार आहे. सभोवतालच्या व्यक्तींशी तुम्ही सहसा वादविवाद करीत नाही किंवा हितसंबंध बिघडू देत नाही. मात्र त्यांच्या बोलण्या-वागण्यामुळे तुम्ही कोडय़ात पडाल, कारण तेच एखादा प्रश्न उकरून काढण्याची शक्यता आहे. व्यापार-उद्योगामध्ये काम चांगले होईल; पण मैत्री आणि पैसा याची गल्लत होऊ देऊ नका. नोकरीमध्ये सहकाऱ्यांच्या खोचक बोलण्याने चिथावून न जाता सत्य परिस्थिती जाणून घ्या. घरामध्ये वादाच्या वेळेला दहा आकडे मोजणे चांगले.

मिथुन राशीच्या दशमस्थानामध्ये चंद्रग्रहण होणार आहे. सकृद्दर्शनी सर्व काही ठीक वाटेल; परंतु जवळचे मित्र, नातेवाईक किंवा जोडीदाराशी काही कारणाने तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमची मते सावधतेने व्यक्त करा. व्यापार- उद्योगात स्पर्धक तुमच्याविषयी कंडय़ा पिकवून तुमच्या गिऱ्हाईकांचा गैरसमज निर्माण करतील. तुम्ही शांत राहा. नोकरीमध्ये वरिष्ठांना खूश करण्याच्या नादात बढाया मारल्या तर तुमची जबाबदारी वाढेल. घरातील लहानमोठय़ा व्यक्तींशी तात्त्विक मतभेद होतील.

कर्क राशीच्या भाग्यस्थानात चंद्रग्रहण होणार आहे. आपुलकीच्या व्यक्तींच्या बाबतीत विचित्र अनुभव देणारा सप्ताह आहे. त्यांच्याकडे लक्ष दिले नाही, तर त्यांना राग येईल आणि जास्त काळजी घेतलीत, तर त्याचे त्यांना महत्त्व वाटणार नाही. यासाठी तुम्हाला खुबीने वागणे आवश्यक आहे. व्यापार-उद्योगामध्ये कामाविषयी व्यावहारिक बाजू समजून घेतली, तर फायद्याचे प्रमाण वाढेल. नोकरीमध्ये कामाच्या वेळेला आपले कोणी नसते असा अनुभव येईल. प्रिय व्यक्ती किंवा नातेवाईक यांच्या स्वास्थ्याविषयी काळजी घ्या.

सिंह राशीच्या अष्टमस्थानात चंद्रग्रहण होणार आहे. भावना वगैरे गोष्टींमध्ये तुम्ही सहसा अडकून पडत नाही, तर तुमचे काम बेधडकपणे चालू ठेवता. आता मात्र घडलेल्या घडामोडींचा तुम्ही विचार कराल. स्वत:ला सावरून नव्या उमेदीने कामाला लागाल. व्यापार-उद्योगात नवीन व्यक्तींशी हितसंबंध जोडावेसे वाटतील. नोकरीमध्ये जे अधिकार, सवलती मिळालेल्या आहेत त्यांचा योग्य वापर करा. सहकाऱ्यांच्या बोलण्याला भुलून जाऊ नका. घरामधल्या एखाद्या व्यक्तीच्या स्वास्थ्याची चिंता वाटेल.

कन्या राशीच्या सप्तमस्थानात चंद्रग्रहण होणार आहे. जेव्हा एक दार बंद होते तेव्हा दुसरे उघडते असा अनुभव देणारे ग्रहमान आहे. व्यापार-उद्योगामध्ये पूर्वी बराच काळ चालत असलेले काही हितसंबंध संपुष्टात येण्याची नांदी होण्याची शक्यता आहे. ज्यांचा जोडधंदा आहे त्यांनी पैशाचे व्यवहार जपून करावेत. नोकरीमध्ये महत्त्वाची कामे स्वत:च हाताळा. व्यक्तिगत जीवनामध्ये अनोळखी व्यक्तींशी बोलताना- वागताना सावध दृष्टिकोन ठेवा. घरामध्ये जोडीदाराशी क्षुल्लक कारणांवरून वाद होतील.

तूळ राशीच्या षष्ठस्थानात चंद्रग्रहण होणार आहे. ग्रहमान चकवा निर्माण करणारे आहे. ज्या गोष्टीत तुम्ही लक्ष घालण्याची गरज नाही त्यातच तुम्हाला लक्ष घालावेसे वाटेल. त्यामुळे महत्त्वाच्या कामात दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. व्यवसाय- धंद्यामध्ये जादा पैशाची कुमक आवश्यक ठरेल; प्रतिस्पर्धी आणि गुप्तशत्रू तुमच्याविषयी अफवा पसरवण्याची शक्यता आहे. त्याचा मागोवा घ्या. नोकरीमध्ये आपण बरे आणि आपले काम बरे हा दृष्टिकोन तुम्हाला उपयोगी पडेल. घरामध्ये केलेल्या कामाचे श्रेय न मिळाल्यामुळे तुम्हाला वाईट वाटेल.

वृश्चिक राशीच्या पंचमस्थानात चंद्रग्रहण होणार आहे. ज्या व्यक्तींवर तुम्ही जास्त विसंबून राहाल त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे तुमची निराशा होईल; पण अचानक काही वेगळ्या मार्गाने तुम्हाला मदत मिळू शकेल, त्याचा फायदा घ्याल. व्यापार-उद्योगात जे काम तुम्ही बरेच वर्षे करीत आहात ते बंद करून त्याऐवजी दुसरे काम तुम्हाला करावेसे वाटेल. नोकरीमध्ये वरिष्ठांनी दिलेल्या सूचना आयत्या वेळी बदलल्यामुळे कोणत्या कामाला किती महत्त्व द्यायचे याविषयी मनात गोंधळ असेल.

धनू राशीच्या चतुर्थस्थानात चंद्रग्रहण होणार आहे. घरामधील एखाद्या सदस्याच्या वागण्या- बोलण्यामुळे किंवा तातडीच्या प्रश्नामध्ये तुमचे लक्ष तिकडे वेधले जाण्याची शक्यता आहे. जमीनजुमला किंवा वस्तू खरेदी करण्यापूर्वी कागदपत्रांची नीट शहानिशा करा. व्यवसाय- उद्योगामध्ये मोठय़ा जोमाने काम कराल; पण त्यामानाने पैशाचे समाधान नसेल. नोकरीमध्ये जादा काम करावे लागेल. वरिष्ठांना शब्द देण्यापूर्वी आपण तो पाळू शकू की नाही याचा विचार करा. नातेवाईक व आप्तेष्टांशी जपून वागा.

मकर राशीच्या तृतीयस्थानात चंद्रग्रहण होणार आहे. कोणताही निर्णय घेताना तुम्ही सावध असता; पण या आठवडय़ामध्ये विचार करण्यापेक्षा कृती करण्याची तुम्हाला घाई असेल. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवून पैशाची उधार- उसनवारी करू नका. वाहन चालवताना किंवा मशीनवर काम करताना बेसावध राहणे धोक्याचे ठरेल. व्यापार-उद्योगात शक्यतो नवीन करार करू नका. नोकरीमध्ये सहकाऱ्यांचा चेहरा आणि मुखवटा यातील भेद लक्षात येईल. घरामध्ये भावंडांसंबंधी अर्धवट बातमी कळाल्यामुळे चिंता वाटेल.

कुंभ राशीच्या धनस्थानात चंद्रग्रहण होणार आहे. व्यवसाय क्षेत्रात काही तरी चांगले काम करावेसे वाटेल, परंतु खेळत्या भांडवलाअभावी त्यावर मर्यादा येईल. जेवढे काम मिळेल त्यावर तुम्हाला समाधान मानावे लागेल. नोकरीमध्ये वरिष्ठ चांगले काम सोडून चुकांवर बोट ठेवतील. घरामध्ये क्षुल्लककारणावरून कोणाशी तरी मतभेद होतील, त्याचा तुम्ही विचार करीत बसाल. नवीन जागा खरेदीसंबंधी निर्णय घाईगडबडीने घेऊ नका. जुने इस्टेटीचे प्रश्न अचानक डोके वर काढतील.

मीन तुमच्याच राशीत चंद्रग्रहण होणार आहे. कोणी तुमच्याविरुद्ध काही बोलले, की ती गोष्ट तुम्ही मनावर घेऊन त्याचा विचार करीत बसता. तुमचा वेळ आणि शक्ती फक्त दैनंदिनीवर केंद्रित करा. व्यवसाय-उद्योगात कामाचा वेग हळूहळू वाढत राहील. जोडधंद्यात गिऱ्हाईकांना वेळेवर काम करून देण्यावर भर ठेवा. नोकरीमध्ये तुमच्या परोपकारी वृत्तीचा सहकारी आणि वरिष्ठ गैरफायदा घेतील. घरातील व्यक्तींशी बोलताना जपून, नाही तर राईचा पर्वत व्हायला वेळ लागणार नाही.