01vijayमेष ज्यांच्याशी तुम्ही पशाचे व्यवहार करणार आहात त्यांच्याशी सडेतोड किंवा काटेकोर राहा. व्यापार-उद्योगामध्ये वसुलीवरून गिऱ्हाईकांशी हितसंबंध बिघडू देऊ नका. कायदेव्यवहारांचे काटेकोरपणे पालन करा. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या आज्ञेचे उल्लंघन झाले तर त्यांना ते आवडणार नाही. सध्या ‘होयबा’चे धोरण ठेवा. नवीन नोकरीच्या कामात एखाद्या मुद्दय़ावरून विलंब होण्याची शक्यता आहे. घरामधल्या व्यक्तींशी वागताना शब्द हे शत्रू आहेत याचा विसर पडू देऊ नका. कारण एखाद्या शब्दाने इतरांचा अहम् सुखावला जाईल. 

वृषभ या आठवडय़ात तुमच्या इच्छा-आकांक्षा लगेच पूर्ण होणार नाहीत. त्याकरिता तुम्हाला तडजोड करावी लागेल. व्यापार-उद्योगात सरकारी किंवा इतर नियमांचे उल्लंघन करून केलेले एखादे काम तुम्हाला महागात पडेल. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन झाले नाही तर त्यांना राग येईल. तुम्हाला मिळणाऱ्या सुविधा आणि अधिकार यांचा योग्य कारणाकरिता वापर करा. घरामधल्या व्यक्तींशी जपून बोला. अन्यथा छोटय़ा-मोठय़ा कारणांवरून राईचा पर्वत व्हायला वेळ लागणार नाही. स्वतच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवा.

मिथुन एखाद्या स्वप्नमयी कल्पनेमध्ये तुम्ही इतके रममाण व्हाल की, तुम्हाला त्या वेळेला व्यवहाराचा विसर पडेल. व्यापार-उद्योगात एखादी कॉपी करण्याचा प्रयत्न कराल, परंतु त्या नादात तुमच्या हातून बेकायदेशीर काम होणार नाही याची दक्षता घ्या. नोकरीमध्ये अतिउत्साहाच्या भरात वरिष्ठांची परवानगी न घेता एखादे काम परस्पर करण्याचा मोह होईल. त्यावरून वरिष्ठांचा पारा चढेल. घरामध्ये मजेच्या वेळेला सर्वजण पुढे असतील, पण खर्चाची जबाबदारी मात्र कोणीच घ्यायला तयार होणार नाही.

कर्क या आठवडय़ात एखाद्या कारणाने आपलीच माणसे विचित्रपणे का वागतात असे कोडे तुम्हाला पडेल. व्यापार-उद्योगातील दैनंदिन प्रगती चांगली असेल. परंतु एखादे जुने प्रकरण अचानक डोके वर काढेल. भागीदारीचे प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही केलेले चांगले काम विसरून जाऊन वरिष्ठ चुकांवर बोट ठेवतील. नवीन नोकरीचा निर्णय घाईत घेऊ नका. घरामध्ये मुलांच्या उपद्व्यापामुळे मोठय़ा व्यक्तींमध्ये वादविवाद होण्याची शक्यता आहे. वडिलधाऱ्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्या.

सिंह ग्रहमान संमिश्र आहे. एक गोष्ट मिळवायला गेली की दुसरी गमवावी लागते असा अनुभव येईल. व्यापार-उद्योगात काहीतरी भव्यदिव्य करून दाखविण्याची इच्छा तुम्हाला स्वस्थ आणि शांत बसून देणार नाही. त्याकरिता एखादी मोठी योजना करत राहाल. परंतु त्या नादात कायदेशीर बाजूकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. नोकरीमध्ये एखादी चांगली संधी किंवा बदल दृष्टिक्षेपात येईल. त्याचा फायदा घेण्यासाठी घरापासून कदाचित लांब राहावे लागेल. कुटुंबाकरिता इच्छा असूनही पाहिजे तेवढा वेळ देऊ शकणार नाही.

कन्या तुमच्या मनामध्ये अनेक इच्छा-आकांक्षा तरळत असतील. व्यापार-उद्योगात महत्त्वाची कामे शक्यतो स्वत:च हाताळा, म्हणजे यशाविषयी खात्री वाटेल. नोकरीमध्ये भरपूर काम कराल. परंतु वरिष्ठांच्या अपेक्षा जास्त असल्यामुळे त्यांचे समाधान होणे कठीण आहे. घरामध्ये तुमच्या शब्दाला मान मिळेल. पण वयोवृद्ध व्यक्तींना एखादा विचार पटवून देताना तुम्हाला तारेवरची कसरत करावी लागेल. प्रिय व्यक्तींच्या लांब जाण्यामुळे तुमच्यात एकाकीपणाची भावना निर्माण होईल.

तूळ एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला करायची नाही असे आपण ठरवितो त्या वेळेला त्याचाच मोह पुन्हा पुन्हा येतो आणि तीच आपल्याला करावीशी वाटते. व्यापार-उद्योगात बरेच काम करायचे तुम्ही ठरवाल. परंतु त्या कामामध्ये येणारे अडथळे पाहिल्यानंतर तुमचे मन वेगळय़ाच कामात रमवाल. नोकरीमध्ये आपण भले आणि आपले काम बरे असा दृष्टिकोन ठेवा. ज्या कामात तुम्ही इतरांवर अवलंबून आहात त्यात ‘भरवशाच्या म्हशीला टोणगा’ असा अनुभव येईल. घरामध्ये विविध कारणांनी पसे खर्च होत राहतील.

वृश्चिक ग्रहमान परस्परविरोधी आहे. प्रत्येक आघाडीवर तुम्हाला सतर्क राहावे लागेल. व्यापार-उद्योगात जमा आणि खर्चाची बाजू समसमान राहील. पण गरजेच्या वेळेला आपल्या हातात पसे होते याचे समाधान लाभेल. सरकारी कामांकडे दुर्लक्ष करू नका. नोकरीमध्ये हाताखालच्या व्यक्तींकडून काम करून घेण्यासाठी युक्तीचा वापर करणे भाग पडेल. वरिष्ठ तुमच्या कामाचा ताणतणाव वाढवतील. घरामध्ये नेहमीची व्यक्ती आजूबाजूला नसल्याने तुम्हाला एकटे पडल्याची जाणीव होईल.

धनू या आठवडय़ात कामाच्या वेळी काम आणि इतर वेळेला थोडीशी मौजमजा करण्याचा मूड असेल. व्यवसाय-उद्योगात कोणतेही काम करण्यापूर्वी त्यातील सरकारी नियम आणि बाजारातील स्पर्धक यांच्याविषयी नीट माहिती घ्या. प्रतिष्ठित व्यक्तींचे तंत्र तुम्हाला सांभाळावे लागेल. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या लहरी स्वभावामुळे आणि संस्थेच्या बदलणाऱ्या धोरणांमुळे तुमची धावपळ उडेल. वरिष्ठांकडे कोणताही हट्ट धरू नका. घरामधल्या बुजुर्ग व्यक्तीची आणि स्वत:ची प्रकृती याविषयी थोडीशी चिंता वाटेल.

मकर नेहमीची कामे करता करता जेव्हा तुम्हाला अवधी मिळेल त्या वेळी तुम्ही जीवनाचा आनंद लुटाल. व्यापार-उद्योगात कामाचा वेग उत्तम राहील. प्रत्येक काम वेळेत आणि तुमच्या पद्धतीने उरकण्याची तुम्हाला घाई असेल. पण त्या नादात सरकारी नियम, कायदेकानू यांचा विसर पडू देऊ नका. नोकरीमध्ये सहकाऱ्यांवर अधिकार गाजवण्याची तुम्हाला खुमखुमी येईल. घरामध्ये लहान मुलांचे उपद्व्याप आणि प्रिय व्यक्तींचे स्वास्थ्य याविषयी चिंता वाटेल. घरगुती खर्चाचा आकडा फुगल्यामुळे थोडेफार रुसवे-फुगवे होतील.

कुंभ एकाच वेळी मौजमजा करायची आणि नेहमीच्या कामाकडे लक्ष द्यायचे असा तुमचा दुहेरी हेतू असेल. व्यवसाय-उद्योगात घाईगडबडीमध्ये सरकारी कामे किंवा कोर्टव्यवहारांकडे दुर्लक्ष झाले असेल तर त्यात लक्ष घालणे भाग पडेल. चालू असलेल्या कामात काही कारणाने स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही याची आठवण येईल. नोकरीमध्ये जी गोष्ट तुम्हाला हवी असेल ती विसरून वरिष्ठ एखाद्या वेगळय़ाच कामात तुम्हाला गर्क ठेवतील. तुमच्या कामात बिनचूक राहा. घरामध्ये एखाद्या व्यक्तीच्या लांब जाण्यामुळे पोकळी जाणवेल.

मीन या आठवडय़ात अशाच मदतीची इतरांकडून परतफेड व्हावी अशी तुम्ही अपेक्षा ठेवाल. क्वचित प्रसंगी तुम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सुनवायला कमी करणार नाही. व्यापार-उद्योगात एखाद्या गिऱ्हाईकांच्या बाबतीत ‘दिसते तसे नसते..’ असा अनुभव येण्याची शक्यता आहे. प्रत्येक काम कायद्याच्या चौकटीत राहूनच करा. नोकरीमध्ये तुमच्या चांगल्या कल्पना वरिष्ठ ऐकून घेतील. पण त्याचे श्रेय द्यायला मात्र तयार होणार नाहीत. घरामध्ये रुसवेफुगवे सहन करावे लागतील.
विजय केळकर