‘कॉलेज मिळालंय तुला..’ फोनवरून मिरजेचे माझे काका बोलत होते. हे शब्द ऐकले आणि माझ्या आनंदाला पारा उरला नाही. ‘कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, सांगली’ माझं ड्रीम कॉलेज.

आनंदाच्या भरातच जाऊन अ‍ॅडमिशन करून आले. कॉलेज अ‍ॅडमिशन झालं, पण राहायचं कुठं? मग काही तज्ज्ञ, जाणकार व्यक्तींच्या सल्ल्यावरून बाहेर कुठे सोय होते का बघितलं, पण मनासारखी रूम न मिळाल्याने कॉलेजचंच हॉस्टेल घेऊ या या मतावर आलो. हॉस्टेलची रूम बुक करताना वाटलं यापेक्षा सीईटीचा अभ्यास करणं सोपं होतं.. रूमच्या जवळ बाथरूम नाही ना? रूम स्वच्छ आहे ना? रूममध्ये उजेड येतो ना? बेड चांगला आहे? एक ना दोन हजार प्रश्न. या सर्वाची मनासारखी उत्तरं मिळतील अशी एकपण रूम नव्हती. शेवटी वाटाघाटी करून एक रूम फिक्स केली.
वाटलं, झालं आता सगळं फक्त सामान आणलं की झालं. मग कपडय़ांची, पुस्तकांची बोचकी आणली. अरे पण इथेच कुठे सगळं संपलं? चार वर्षे राहायचं इथं म्हणजे सगळा संसार आणावा लागणार. यादी काढली शेवटी.. साबण, ब्रश, टुथपेस्ट, गादी, बेडशीट, वाटी, ताटली, तेल, कंगवा, पावडर, नेलकटर, आरसा, घडय़ाळ, कॅलेंडर, बादली, दोरी, हँगर, चपलांचे सेट, पर्फ्यूम.. अबब! नंतरचा मोठा धक्का म्हणजे एका दहा बाय दहाच्या रूममध्ये आम्ही चौघी राहणार होतो. सगळय़ा जणी आल्यावर तर फारच मजा! एका कपाटात चौघींचे कपडे मावणं म्हणजे बेडकाने लग्नाचं जेवण जेवल्यासारखं होतं. मध्येच कपाट उघडायचं. नंतर कळायचं की, असंख्य कपडय़ांनी आत घुसमटल्यामुळे केलेला वार होता तो. कॉलेजला जाताना तर चौघींच्या धावपळीत एवढय़ांदा आपटायचो की, त्याची आठवण दिवसभर राहायची. इथे आल्यापासून तर रात्री १० ला झोपायची सवय कुठल्या कुठे गेली. रात्री १२ लापण सकाळच्या १० चाच उत्साह. एकदा तर मी लवकर झोपले, तर माझ्या मैत्रिणीनं रात्री १२ ला उठवलं मला. मी दचकून जागी झाले, तर म्हणते कशी, काही नाही गं गुड नाइट म्हणायचं राहिलं म्हणून उठवलं, आता झोप.
मेसचं खाणं खाणे (आणि पचवणे) हे जर तुम्हाला जमलं, तर तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात आरामात राहू शकता असा माझा स्पष्ट दावा आहे. मेसच्या चपात्या भाजून घ्यायला का तयार नसतात हे मला अजूनही न सुटलेलं कोडं आहे. ‘वदनि कवळ घेता’ या श्लोकाचा अर्थ मला इथं येऊन चांगला कळला. ‘उदरभरण’ करताना काही दगाफटका झाल्यास मदतीला धावून यायला ‘श्रीहरी’ नको का?
होस्टेलवर सुखात राहण्याचा कानमंत्र सांगते. एक वेळ एखादं पुस्तक कमी घेतलं तरी चालेल, पण भूनिंबादी काढा, कुटजारिष्ट, डायझिन झालंच तर झिंटॅक, सिनारेस्ट, ओवा, लिंबू, बडिशेप, खडीसाखर, गूळ या गोष्टींना दिमाखात विराजमान केलं पाहिजे आपल्या कप्प्यात; पण खरं सांगू, ‘हॉस्टेल लाइफ’सारखं लाइफ नाही दुसरं. ना रात्री लवकर झोपायचं टेन्शन, ना लवकर उठायचं. कोणी रागावणारं नाही, कोणी शिस्त लावणारं नाही. अहो, आठवडाभर आंघोळ केली नाही तरी कोणी विचारत नाही. सकाळी आंघोळीला नंबर लागल्यावर दहावीला बोर्डात प्रथम आल्यागत आनंद होतो. माझ्या एका मैत्रिणीने सतत पाच दिवस सकाळी आंघोळ करण्याचा विक्रम केला, तर तिला पार्टी द्यावी लागली सगळय़ांना.
पण हे काहीही असलं तरी खूप काही देऊन जातं ‘हॉस्टेल लाइफ’. आयुष्यभर साथ देणारे जिवलग मित्र इथेच भेटतात. पूर्ण हॉस्टेलच एक कुटुंब बनून जातं. मनाचा उदारपणा वाढतो, जुळवून घेण्याची सवय लागते. अशी एकही गोष्ट/वस्तू नाही जी इथे मिळत नाही. आपल्या गरजा कमी होतात. खर्च बजेटमध्ये येतो. मुख्य म्हणजे प्रत्येकाकडून मिळणाऱ्या ज्ञानामुळे ज्ञानभांडार वाढतं. असे असंख्य फायदे आहेत. मित्रांनो, असं म्हणतात की, आयुष्यात एकदा तरी काशी यात्रेला जावं. मी तर म्हणेन, आयुष्यात एकदा तरी ‘हॉस्टेल लाइफ’ अनुभवावं.
मानसी केळुसकर response.lokprabha@expressindia.com

Central Institute of Fisheries Education Mumbai recruitment 2024
CIFE Mumbai recruitment 2024 : सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! पाहा अधिक माहिती
Indian Institute of Management Mumbai hiring post
IIM Mumbai recruitment 2024 : मुंबईतील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’मध्ये नोकरीची संधी! पाहा माहिती
maharashtrachi hasya jatra fame gaurav more went to cheer mumbai indians
मुंबई इंडियन्सच्या मॅचला पोहोचला हास्यजत्रा फेम गौरव मोरे! फिल्टरपाड्याच्या बच्चनला पाहून नेटकरी म्हणाले, “दादा आज…”
Anand Mahindra Impressed By Urban Art Festival To transformation of Sassoon Docks into Canvas in Mumbai
मुंबईतील कलरफुल आर्ट फेस्टिव्हल पाहून आनंद महिंद्रा झाले प्रभावित; पोस्ट शेअर करीत म्हणाले, निखळ आनंद!