संगणकामधून किंवा पेन ड्राइव्हमधून आपल्या दृष्टीने महत्त्वाचा डेटा अचानक मिळेनासा होतो. हा डेटा हरवला म्हणून निराश होण्याचं काहीच कारण नाही. कारण हा डेटा आपल्याला परत मिळवता येऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘हार्ड डिस्कमधील डेटा गेल्याचे दु:ख हे प्रेयसी सोडून गेल्याच्या दु:खापेक्षा जास्त मोठे असते.’’ परवाच एका मुलाचे फेसबुक स्टेट्स वाचले, गमतीचा भाग सोडला तर खरोखर कित्येक वर्षांपासून जपून ठेवलेली माहिती, अनेक आठवणी कुठून कुठून जमविलेले गाण्यांचे कलेक्शन एका क्षणात संगणकातून गेले तर होणारे दु:ख खरेच मोठे असेल, पण या साऱ्यावरही पर्याय आहे. गेलेला सरसकट सगळाच नाही, पण बऱ्यापैकी डेटा आपण नक्की परत मिळवू शकतो.
कसा?
महत्त्वाचे फोटो आपल्या मेमरी कार्डमधून अचानक डिलीट झाले? पेनड्राइव्हमध्ये बराच डेटा होता, परंतु पेनड्राइव्ह संगणकाला जोडल्यावर रिकामा असल्याचे दर्शवितो? आपल्याकडून कधी कोणती महत्त्वाची फाइल चुकून डिलीट झाली तर आपण रिसायकल बिनमधून ती फाइल परत मिळवू शकतो आणि जर ती फाइल रिसायकल बिनमधून पण डिलीट झाली असेल तर? संगणकाची हार्ड डिस्क अचानक करप्ट झाली तर त्यात इतक्या वर्षांपासून साठविलेला डेटा परत मिळविता येतो? या प्रश्नाचे उत्तर आहे हो, परत मिळविता येऊ शकतो आणि बऱ्याचदा कोणतेही पैसे खर्च न करता परत मिळविता येऊ शकतो.
संगणकातून फाइल डिलीट होते म्हणजे नेमके काय होते?
सर्वप्रथम एक गोष्ट जाणून घेऊ या की, संगणकातून आपण कोणतीही फाइल, फोटो डिलीट केला तरी तो पूर्णत: डिलीट होत नाही, आपण एखादी फाइल डिलीट करतो तेव्हा संगणक फक्त आपल्याला त्या फाइलपर्यंत पोचण्याचा मार्ग उपलब्ध करून देत नाही, आणि त्या फाइलने व्यापलेली जागा रिकामी असल्याचे आपल्याला सांगतो, परंतु ती फाइल अथवा डेटा आहे त्याच जागी तसाच असतो जोपर्यंत दुसरी नवीन फाइल त्याची जागा घेत नाही. हे सोप्या दररोजच्या उदाहरणातून आपल्याला समजावून घेता येईल. समजा कपाटातील एक पुस्तक आपल्याला नको आहे, म्हणून आपण रद्दीत द्यायला काढतो आणि रद्दीच्या पिशवीत ठेवतो. परंतु आपल्याला कधीही वाटले की मला ते पुस्तक जवळ असू द्यावे, तेव्हा आपण पुन्हा रद्दीच्या पिशवीतून काढून पुन्हा वापरू शकतो, विन्डोज संगणकात या रद्दीच्या पिशवीचे काम रिसायकल बिन करीत असते. आपण डिलीट केलेली फाइल आपल्याला रिसायकल बिनमधून सहज परत मिळविता येऊ शकते. परंतु आपण रद्दी रद्दीवाल्याला विकली आणि त्यानेही आपल्याकडील रद्दी पुन्हा कागद बनविणाऱ्या कंपनीत विकून टाकली तरी जोवर आपल्या पुस्तकाची पाने रिसायकल होत नाहीत तोपर्यंत आपल्याला आपले पुस्तक परत मिळविता येऊ शकते आणि नेमके हेच काम डेटा रिकव्हरी सॉफ्टवेअर आपल्यासाठी करतात.
डेटा परत कसा मिळविता येतो?
आपल्या संगणकातून अथवा हार्डड्राइव्हमधून गेलेला डेटा आपणास परत कसा मिळेल, किती प्रमाणात डेटा आपणास परत मिळविता येईल? डेटा परत मिळविता येईलही की नाही? ह्यचे उत्तर डेटा नेमका कशामुळे गेला आहे यावर अवलंबून असते.
फाइल डिलीट झाल्यामुळे गेलेला डेटा-चुकून एखादी फाइल अगर फोल्डर डिलीट झाले तर तर बहुतेक वेळेस ते परत मिळविता येऊ शकते, यासाठी डेटा रिकव्हरी सॉफ्टवेअर वापरून आपल्या हार्ड ड्राइव्ह स्कॅन करावा लागतो व आपल्याकडून डिलीट झालेल्या फाइल्स परत मिळविता येऊ शकतात, अर्थातच वर सांगितल्याप्रमाणे त्या फाइल्स जर दुसऱ्या फाइल्समुळे रिप्लेस झाल्या असतील तर मात्र फाइल परत मिळविणे अवघड असते.(आपल्या संगणकातून चुकून एखादी फाइल कायमची डिलीट झाली तर जेव्हा आपल्या लक्षात येईल त्या क्षणी संगणक बंद करावा. त्यातील हार्ड डिस्क काढून ती दुसऱ्या सिस्टमला जोडावी आणि मग डेटा रिकव्हरी सॉफ्टवेअर्सचा वापर करावा. कारण संगणक चालू असताना अनेक फाइल्स तयार होत असतात. त्यामुळे आपल्या जुन्या फाइल्स रिप्लेस होण्याची शक्यता असते.) यामध्ये काही वेळेस काही फाइल्स आध्र्याच रिकव्हर होण्याची शक्यता असते, परंतु काहीच नसण्यापेक्षा किमान गोष्टी आपल्याला परत मिळविता येतात.
फॉरमॅट केल्यामुळे गेलेला डेटा-चुकून आपल्याकडून पेनड्राइव्ह अगर आपली हार्डड्राइव्ह फॉरमॅट होऊन जाते अशा वेळेस गेलेला डेटा परत मिळविणे जरा कठीण असते. कारण फॉरमॅट करताना नवीन प्रकारची फाइल सिस्टम आपण जुन्या फाइल सिस्टमच्या जागी भरत असतो, त्यामुळे चांगल्या रिकव्हरी सॉफ्टवेअर्सचा वापर करून डेटा परत मिळविता येतो. पण हा गेलेला डेटा पूर्णत: परत मिळविता येईलच असे नाही.
हार्डड्राइव्ह खराब झाल्यामुळे गेलेला डेटा- आपली हार्डड्राइव्ह खराब झाली, त्यातील काही भाग बिघडले असतील तर आपण त्यात साठविलेली माहितीही आपल्याला वापरता येत नाही, अशा वेळेस स्वत: त्यात सुधारणा करून चालविण्याचे अजिबात प्रयत्न करू नयेत. यामुळे मिळविता येणारा डेटाही आपण घालवू शकतो. अशी खराब झालेली हार्ड ड्राइव्ह डेटा रिकव्हरी करणाऱ्या कंपनीत द्यावी लागते. या कंपनीत काम करणारे कुशल तंत्रज्ञ विशिष्ट अशा वातावरणात आपल्या हार्डड्राइव्हची सुधारणा करतात व त्याची ईमेज कॉपी काढून त्यातील शक्य तेवढा डेटा आपणास परत मिळवून देतात. या साऱ्यासाठी बऱ्यापैकी वेळ आणि किंमत मोजावी लागते. काही कंपन्या या डेटाच्या क्षमतेवर पैसे आकारतात तर काही कोणत्या प्रकारचा डॅमेज आहे हे पाहून पैसे आकारतात.
फाइल रिप्लेस झाल्यामुळे गेलेला डेटा-अशा प्रकारचा डेटा परत मिळविणे हे केवळ अशक्य असते. असा दावा करणाऱ्या कंपन्यांच्या जाहिरातींना चुकूनही बळी पडू नये.

डेटा रिकव्हरी सॉफ्टवेअर कोणते व कसे वापरायचे?
आपल्या डिलीट झालेल्या फाइल्स परत मिळविण्यासाठी आपण संगणकातील एक्सपर्ट वगैरे असण्याची अजिबात आवश्यकता नाही. संगणकाचे सामान्य पातळीवरील ज्ञान आसणारी कोणतीही व्यक्ती डेटा रिकव्हरी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून डेटा रिकव्हर करू शकते. वापरण्यास अगदी सोप्या अशा काही सॉफ्टवेअर्समध्ये, Wise data recovery software,  Pandora recovery software,  Undelete 360,  Glary undelete, Disk drill,  Recuva ही काही सॉफ्टवेअर्स आहेत. मुख्य म्हणजे ही सॉफ्टवेअर्स इंटरनेटवर मोफत उपलब्ध आहेत. यांपैकी आपणास हव्या त्या सॉफ्टवेअरचे नाव टाकून डाऊनलोड कीवर्ड गुगलवर टाइप केल्यास आपणास हवे ते सॉफ्टवेअर सहज डाऊनलोड करता येईल. ते केल्यानंतर आपल्याला स्कॅन करावयाची हार्डड्राइव्ह संगणकाला जोडावी आणि या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून स्कॅन करायची.. काही काही सॉफ्टवेअरमध्ये या क्रमात थोडाफार बदल होऊ शकतो त्याबद्दलची माहिती ते सॉफ्टवेअर डाऊनलोड करताना आपल्याला मिळतेच. आपणास चांगल्या प्रतीचे डेटा रिकव्हरी सॉफ्टवेअर वापरावयाचे असतील तर त्यासाठी आपल्याला त्या कंपनीला पैसे मोजावे लागतात. परंतु सहसा पेनड्राइव्ह, मेमरी कार्ड यांतील माहिती आपण वर दिलेल्या सॉफ्टवेअरद्वारे सहज परत मिळवू शकतो.
या साऱ्यावर एक उत्तम पर्याय म्हणजे आपल्यासाठी महत्त्वाच्या असणारा डेटा योग्य पद्धतीने जतन करून ठेवण्यासाठी क्लाऊड स्टोअरेज, सीडी, डिव्हीडी, हार्ड डिस्कचा वापर करावा; जेणेकरून आपला डेटा गमावण्याची चिंताच राहाणार नाही.

पेनड्राइव्हमधला हरवलेला डेटो
बऱ्याचदा आपण पेनड्राइव्हमध्ये डेटा घेऊन जातो आणि संगणकाला जोडल्यावर त्यात कोणताच डेटा नाही असे आपणास दिसते. अशा वेळी तो पेनड्राइव्ह फॉरमॅट न मारता पुढील पर्याय वापरून पाहावा –
सर्वप्रथम प्रॉपर्टीजमध्ये जाऊन त्या ड्राइव्हमध्ये किती जागा आहे ते पाहावे. बऱ्याचदा आपण साठविलेली माहिती पेनड्राइव्हमध्येच असते. परंतु आपल्याला त्याचा अ‍ॅक्सेस फक्त काही सिक्युरिटी किंवा सिस्टममधील कारणांमुळे आपणास नाकारला जातो आणि ड्राइव्ह रिकामा दिसतो. प्रॉपर्टीजमध्ये जाऊन आपणास कळले की त्यात डेटा आहे तर पुढील पर्याय अवलंबावा अथवा वर सांगितल्याप्रमाणे डेटा रिकव्हरी सॉफ्टवेअर्सचा वापर करावा.
समजा तुमच्या पेनड्राइव्हचे नाव h  ड्राइव्ह आहे Start -> Run वर क्लीक केल्यानंतर ओपन होणाऱ्या विंडोमध्ये cmd  टाइप करावे. OK वर क्लिक करावे. एक काळ्या रंगाची Command Prompt विंडो आपल्यासमोर उघडेल. त्यामध्ये पुढील कमांड जशीच्या तशी टाइप करावी. अर्थात त्यात च्या जागी तुमच्या हार्ड ड्राइव्हचे जे नाव असेल ते टाइप करायला विसरू नये. attrib -h -r -s /s /d h:.*
त्यानंतर एल्ल३ी१ की दाबावी. तुमच्या हार्ड ड्राइव्हमधील सर्व फाइल्स तुम्हाला पाहता येतील.
प्रशांत जोशी response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व टेकफंडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to get lost data
First published on: 10-07-2015 at 01:08 IST