News Flash

कथा : यथार्थ

आज रविवारची सकाळ आहे, म्हणूनच तर रोज साडेसहाच्या ठोक्याला उठणारा मी आज निवांत साडेआठ वाजता उठतो आहे. आमच्या पत्नीला रविवार असो का सोमवार, सगळे दिवस

| May 30, 2014 01:23 am

आज रविवारची सकाळ आहे, म्हणूनच तर रोज साडेसहाच्या ठोक्याला उठणारा मी आज निवांत साडेआठ वाजता उठतो आहे. आमच्या पत्नीला रविवार असो का सोमवार, सगळे दिवस सारखेच. त्यामुळे शेजारी पलंग अर्थातच रिकामा. मी हळूच उठलो आणि पत्नी नावाच्या प्राण्याची चाहूल घेत चालू लागलो. किचनमध्ये तिची पाठमोरी आकृती नजरेस आली. ओटय़ाजवळ उभं राहून कसलं तरी महत्त्वाचं काम उरकण्यात बाईसाहेब दंग आहेत. मी तिला पाठीमागून हलकेच मिठी मारली, ती किंचित सुखावली, पण माझ्या मनातला हेतू स्पष्ट होता- ‘मी उठलोय, चहा कर’ हे न सांगताही मी सांगितले होतं. मलाही अपेक्षित उत्तर आलं- ‘‘चहा करते आहे, तुम्ही पटकन उरकून घ्या.’’
‘‘अगं, पण उरकून जायचं कुठं आहे. आज तर रविवार.’’ मी तिला आठवण करून द्यायच्या आत तिनं मला आठवण करून दिली- ‘‘संध्याकाळी पाव-भाजी करायची हे रात्री ठरलंय, त्यामुळे पटकन आवरा. चहा घ्या आणि भाजी आणून द्या.’’
मीही- ‘आठवलं मला’, या आविर्भावात असतानाच प्रत्येक स्त्रीचे आवडतं वाक्य तिने माझ्यावर फेकलं- ‘‘चला, मला बरीच कामं आहेत.’’
नवरा-बायकोच्या खेळात बायकोच अम्पायर असते. त्यामुळे मी तिथून काढता पाय घेतला आणि बेसिनजवळ आलो. प्रात:र्विधी उरकून चहाचा घोट घेत वर्तमानपत्र घेताच बाई साहेबांनी तो माझ्या हातातून काढून घेतला- ‘‘सतत काय तो पेपर.’’
मी किंचित नाराजीने तिच्याकडे बघितलं. तीही लगेच बॅकफूटवर गेली आणि लाडाने म्हणाली, ‘‘भाजी आणून द्या, मग दिवसभर आहेच पेपर, टीव्ही, मॅच.’’
‘‘बरं-बरं.’’ म्हणत मी शेवटचा घोट घेतला आणि गाडीची चावी घेऊन बाहेर पडलो. (गाडी म्हणजे माझी चार चाकी, दुचाकी हाणत मी गाडीने आलो असं पुणेकर सांगतात.)
असो, रस्त्यावर विशेष गर्दी नव्हती. रविवार सकाळ म्हटल्यावर गर्दी नसणारच. मी पार्किंगचा विचार करत होतो. मंडईला लागूनच मटण, माशाची दुकाने होती आणि रविवार सकाळी तिथे हमखास गर्दी असते. मंडईला लागून असलेल्या रस्त्यावर पार्किंग मिळाली तर खास असा विचार गाडी चालवता चालवता माझ्या डोक्यात चालू होता. मी मला पाहिजे त्या रस्त्यावर गेलो आणि आश्चर्य काय! अख्खा रस्ता रिकामा होता. जणू काही तो माझीच वाट बघत होता. मी एका राजाच्या आविर्भावात गाडी लावली आणि बाहेर उतरून पार्किंगची पावती असे ओरडून आधी पैसे घेणाऱ्या पोऱ्याला शोधू लागलो. दूपर्यंत कोणीही नव्हते. दोन मिनिटे वाट बघून मी हातातली पिशवी आणि बायकोने दिलेली भाज्यांची लिस्ट सांभाळत मंडईत शिरलो.
खरं सांगायचं झालं तर मला भाजी निवडून वगैरे घेता येत नाही, त्यामुळे मी एक भाजीवाला ठरवलेला आहे जो बरी भाजी देतो. मीही बटाटे इत्यादी घेताना त्यांनी टाकलेले एक दोन बटाटे बाजूला काढून दुसरे घेतो आणि हे दाखवायचा प्रयत्न करतो की मलाही समजतं. एक फ्लॉवरचा गड्डा, अर्धा किलो कोबी, सिमला मिरची, कांदे, बटाटे, मटार, टमाटे, गाजर, बीट अशी जोरदार खरेदी मी केली होती, पांढराशुभ्र मुळा दिसला म्हणून तोही घेतला, मला केळ्यांची भजी आवडतात म्हणून यादीत नसतानाही डझनभर तीही घेतली. प्लास्टिकचा वापर मी कटाक्षाने टाळतो. त्यामुळे घरून नेलेल्या दोन कापडी पिशव्या भाजीवाल्याच्या हातात दिल्या. तो भाज्या पिशव्यांमध्ये भरू लागला आणि मी मनातल्या मनात किती झाले असतील याचा अंदाज घेत पाचशेची नोट खिशातून बाहेर काढली. त्यांनी नोटेकडे काहीसं चमकून बघितलं. मी मस्करीच्या सुरात त्याला म्हटलं, ‘‘खरी आहे बाबा.’’ तो- ‘‘काय सायेब, गरिबाची थट्टा करता, खूप दिसानंतर इवढी मोठ्ठी नोट पाहिली म्हनून डोलं विस्फारलं.’’ मग त्याने स्वत:च्या चंचीत बघितलं आणि अतिशय अदबीने म्हणाला- ‘‘सायेब, सुट्टे दिले तर मेहेरबानी.’’ मी- ‘‘बरं, किती झाले?’’ त्याने पुटपुटत हिशेब लावला आणि ६८ रुपये झाल्याचे सांगितलं. मी आश्चर्याच्या सुरात जणू ओरडलोच. तो- ‘‘सायेब, तुमी नेहमीचे गिराहिक, जास्त घेनार नाई, पण सायेब, महागाई वाढत चालली बगा, तुमी दोन रुपये कमी द्या.’’ मी आजतोवर कधीही बटाटे किती रुपये किलो, पालक जुडी केवढय़ाची हे प्रश्न विचारले नव्हते. कारण हे प्रश्न मला कधी पडलेच नाहीत, पण तरीही एक अंदाज होता की मी घेतलेल्या ह्य भरमसाट भाज्यांचे अंदाजे ३००-३५० रुपये होतील म्हणून. पण त्याने सांगितलेल्या रकमेत आणि माझ्या अंदाजात प्रचंड तफावत होती, त्यामुळे मला विचारणं भाग होतं- ‘‘बटाटे कसे लावलेस?’’
तो- ‘‘जास्त नाई लावले सायेब, बटाटे ४ रुपये किलो, अर्धा किलो कोबीचे ३ रुपये, मटारचे..’’
मला चक्कर आल्यासारखे झाले, पण मी ही बाब त्याच्या नजरेस येऊ दिली नाही आणि बस बस म्हणत पन्नासची एक आणि दहाच्या दोन नोटा त्याच्या हातावर ठेवल्या. त्यांनी सुटे परत करण्यासाठी आपल्या चंचीत हात घातला पण मी त्याला सुटे तू ठेव असा इशारा केला आणि आनंदाने गाडीच्या दिशेने चालू लागलो.
गाडी उघडून मी शेजारच्या सीटवर पिशव्या ठेवल्या आणि गाडी सुरू करीत पावती फाडणाऱ्या मुलाला शोधू लागलो, पण तो काही दिसला नाही. मीही जास्त खोलात न शिरता त्यालाही रविवारची सुट्टी असेल असा कयास बांधला आणि गाडीचा गीयर बदलत तिला वेग दिला. तिच्या वेगाबरोबरच माझ्या मनातल्या विचारांनाही वेग आला. भाजी एवढी स्वस्त कशी, ती खराब किंवा सडकी तर नाही ना, ह्य विचाराने मन काहीसं बेचैन झालं. मनातले संभ्रम दूर सारण्यासाठी मी एक-दोन वेळा शेजारच्या सीटवर आसनस्थ भाज्यांच्या पिशव्यांकडे निरखून बघितले, पिशवीतून डोकावत एकूण एक भाजी मी ताजी आहे असाच इशारा देत होती. शेवटी मी हा विचार मनातून झटकून देण्याचा प्रयत्न करू लागलो. खिशातली पाचशेची नोट जी भाज्यांसाठी घेतली होती ती अजूनही खिशातच होती, तिच्या अस्तित्वानेच कदाचित मी झालेला प्रकार विसरू शकत नव्हतो. अचानक मला पुढे पेट्रोल पंप दिसला. अनायासे पाचशे खिशात आहेत, पेट्रोल भरून घेऊ या असा विचार करीत मी गाडी पंपासमोर नेऊन उभी केली आणि नोट बाहेर काढून सेल्समनला देत थट्टेने म्हणालो, ‘‘टँक फुल कर.’’ मला माहीत होतं की इतक्या पैशात ६ लिटर पेट्रोल भरले जाईल. सेल्समनने माझ्या वाक्यावर काहीच प्रतिसाद न देता माझा पूर्ण विचका करून टाकला. मी खजील झालो होतो, पण काहीच झाले नाही ह्य आविर्भावात इकडे तिकडे बघू लागलो. बघता बघता माझी नजर फिरणाऱ्या आकडय़ांवर पडली, २५.. २६.. २७ वर आकडा स्थिर झाला, म्हणजेच गाडीत २७ लिटर पेट्रोल भरले गेले होते, म्हणजेच त्या सेल्समनला माझी थट्टा समजली नव्हती, म्हणजेच आता मला ७७ गुणिले २७च्या हिशोबांने दोन हजार रुपयांच्यावर द्यावे लागणार होते.. मला काही सुचेनासे झाले, मस्करीची कुस्करी ह्य म्हणीचा अर्थ मला नीट समजला होता. तो गाडीच्या दिशेने येत होता, मला जणू दहा फुटांचा राक्षसच येतो आहे असा भास व्हायला लागला. त्याला थट्टा समजली नाही म्हणून त्याला ओरडावं का स्वत:लाच दोष द्यावा ह्य द्विधा मन:स्थितीत असतानाच त्याने पन्नासची नोट माझ्या हातावर ठेवली आणि एक रुपया सुट्टा आहे का असे विचारले. मी त्याच्याकडे नुसता आ वासून बघत राहिलो. मी स्वप्न तर बघत नाही ना, म्हणून हातावर हलकेच चापटी मारली आणि हे स्वप्न नाही हे समजून घेतले. बरं, मला पेट्रोलचा वासही येत होता, स्वप्नात कुठे वास येतात? माझी काहीच हालचाल नाही हे बघून त्याने आता सविस्तर सांगितले- ‘‘चारशे पन्नास रुपये नव्वद पैसे झाले साहेब, माझ्याकडे सुट्टे नाहीत म्हणून विचारलं. एक रुपया सुट्टा.. नसला तर राहू द्या.’’
मी कोडय़ातून बाहेर आल्याप्रमाणे हालचाल करत खिशातून एक रुपया काढून त्याच्या हातावर टेकवला आणि भूत बघून पळतो त्याप्रमाणे तेथून गाडी पळवली. गाडीच्या वेगापेक्षा माझ्या मनातल्या विचारांचा वेग कैकपटीने जास्त होता. घरातून बाहेर पडल्यापासून जे काही घडत होतं सगळंच अचंबित करण्यासारखं होतं. मी दुसऱ्या दुनियेत तर आलो नाही ना असं मला वाटू लागलं, पण आजूबाजूचा परिसर सगळा माझ्या ओळखीचाच वाटत होता. इकडे तिकडे बघण्याच्या नादात मी सिग्नल तोडला आहे हे समोर ‘गाडी बाजूला घ्या’ असे हातवारे करीत असलेल्या पोलिसामुळे मला समजले. मी मुकाटय़ाने गाडी बाजूला लावली. ‘‘साहेब, सिग्नल तोडलात.’’
मी- ‘‘हो, माहीत आहे, जरा विचारात गुंतलो होतो म्हणून अनवधानाने..’’
‘‘..तरी आता दंड भरावा लागेल साहेब,’’ त्याने माझं वाक्य अध्र्यावर थांबवून विधान केले. पटकन मनात विचार आला खिशात पन्नासच रुपये आहेत तेवढे ह्यच्या हातावर टेकवून निघावं, कारण सिग्नल तोडला म्हणून हा दोनशेची पावती फाडणार. तेवढे पैसे नाही म्हणून लायसन्स ठेवून घेणार. मग लायसन्स परत आणायला आणखी एक चक्कर.. पण आमचे संस्कार आडवे आले, पैसे घेणं जेवढा मोठ्ठा गुन्हा, पैसे चारणंही तेवढाच मोठ्ठा गुन्हा असा अव्यवहारी समज असणारा मी संस्कारांच्या समोर नतमस्तक झालो आणि अतिशय अदबीने हवालदाराला सांगितलं, ‘‘चूक तर झाली आहे, दंड तर भरलाच पाहिजे, तुम्ही पावती फाडा.’’
आत्तापर्यंतचे माझं निरीक्षण आहे, पोलिसांचे चेहरे कायम निर्विकार असतात. हा पोलीसही माझ्या निरीक्षणाला छेद न देणाराच होता. त्याने यंत्रवत पावती लिहिली आणि फाडून माझ्या हातात दिली. सकाळी बाहेर पडल्यापासून अनेक धक्के बसत होते, त्यात हा आणखी एक धक्का होता. पावतीवर दंडाची रक्कम रुपये वीस एवढीच होती. मात्र ह्यावेळेस एक शून्य लिहायचा राहून गेला आहे का, असा विचारही मनात आला नाही माझ्या. मी पन्नासची नोट त्याला दिली, त्याने दिलेल्या दहा-दहाच्या तीन नोटा खिशात ठेवल्या आणि घराकडे निघालो.
घरी आल्या आल्या जे काही घडले ते लगेच बायकोला सांगावे का नाही हे समजत नव्हते, कारण जे काही घडले होते त्यावर अजूनही माझा विश्वास बसत नव्हता. मग तिने विश्वास ठेवावा ही अपेक्षा करणेही चुकीचेच होते. उगीच आपले हसू व्हायचे म्हणून तूर्त तरी शांत राहावे असे मनाशी पक्के केले. घरात आलो, भाजीच्या पिशव्या बायकोच्या हाती दिल्या आणि शांतपणे सोफ्यावर बसलो. बायकोने पाण्याचा पेला हातात दिला आणि प्रेमानी ‘दमलात ना?’ असे विचारले. मी पाणी पिता पिता मान डोलावून होकार दिला. तिने रिकामा पेला माझ्या हातातून घेतला आणि म्हणाली, ‘‘आता आराम करा आणि हो पेपरही वाचा. परत त्याच त्याच बातम्या.’’ मी- ‘‘म्हणजे?’’
ती- ‘‘म्हणजे पेट्रोलचे भाव परत वाढलेत. गेल्या दोन महिन्यांत तीन वेळा, म्हणजे तीच तीच बातमी नाही का म्हणायची? ऐंशी झाले बहुतेक लिटरमागे.’’
‘‘काय..?’’ मी नेहमीप्रमाणेच प्रतिक्रिया दिली, पण आजच्या प्रतिक्रियेत आनंदाची भावना जास्त होती, यथार्थात आल्याचा आनंद, पण तो आनंद बघण्यासाठी माझी बायको तिथे नव्हती. वर्तमानपत्र समोर ठेवून ती केव्हाच किचनमध्ये निघून गेली होती महत्त्वाची कामे उरकायला. मी पटकन पेपरमध्ये डोकं खुपसून आजच्या जगात काय चालले आहे ते वाचण्यात गुंग झालो.

घरी आल्या आल्या जे काही घडले ते लगेच बायकोला सांगावे की नाही हे समजत नव्हते, कारण जे काही घडले होते त्यावर अजूनही माझा विश्वास बसत नव्हता. मग तिने विश्वास ठेवावा ही अपेक्षा करणेही चुकीचेच होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2014 1:23 am

Web Title: husband and wife
टॅग : Lifestyle,Story
Next Stories
1 बर्डस् अँड बीज्
2 नाकपुराण
3 ब्लॉगर्स कट्टा : ते छप्पन्न आणि मी
Just Now!
X