विजया जांगळे – response.lokprabha@expressindia.com

घरी-दारी वावरताना छळणाऱ्या नजरा, एकटी-दुकटीला गाठून केले जाणारे स्पर्श, जवळच्या नातेवाईकांकडून घेतला जाणारा उपभोग या काही अपवादात्मक घटना नाहीत. बहुसंख्य किशोरवयीन मुली याला रोज तोंड देतात. बलात्कार झाला की गदारोळ केला जातो. पण आपल्याच शाळेत, घरात होणारी कोंडी कोण फोडणार? विरारमधील ‘जाणीव’ ही संस्था अशा मुलींना बोलतं करते.

‘एखाद्या मुलाने मला प्रपोज केल्यावर मी त्याला नकार दिला आणि त्याने माझ्या अंगावर अ‍ॅसिड टाकलं तर?’, ‘सेक्स म्हणजे काय? सेक्स झाल्यानंतर नेमकं काय होतं?’, ‘मासिक पाळी आली तर मुलांना का नाही सांगायचं?’, ‘मी पोलिसांकडे तक्रार केली आणि पोलिसांनी साथ दिली नाही, तर?’, ‘आपण एकटे चाललो असताना एखाद्या व्यक्तीने आपल्याला स्पर्श केला तर आपण गप्प का बसतो, तेच कळत नाही’, ‘मला वाईट स्पर्श करणारा जर माझा मामा असेल आणि तो पोलीस असेल, तर मी काय करू?’, ‘जर एका मुलाने सारखं सारखं घरी बोलावलं, चिकटून बसला आणि त्याच्या फोनमध्ये माझा फोटो काढला तर?’, ‘तुम्ही म्हणता, की काही झालं तर आरडाओरडा करायचा. पण शेजारीसुद्धा बघत बसले तर? माझ्या बाबतीत असं झालं आहे.’, ‘आमच्या शेजारचे काका चाळीतल्या एक वर्षांच्या मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करतात, तिच्यासाठी मी काय करू?’, ‘हमारी दुसरी माँ घर में हमारे साथ कुछ गलत करती हो, तो हमे क्या करना चाहिये?’.. प्रश्नांची मालिका वाढतच जाते.

विरारच्या ‘जाणीव ट्रस्ट’ला मुलींनी लिहिलेल्या पत्रांतून अशी अनेक प्रश्नचिन्हं उभी ठाकतात. गप्प बसू नका, बोला, असं आवाहन करत या ट्रस्टचे मिलिंद पोंक्षे आणि आरती वढेर गेली पाच र्वष राज्यभर फिरत आहेत. गावागावांतल्या शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन १२ ते १८ वर्षे वयोगटातल्या मुलींमध्ये शोषण, अत्याचार या मुद्दय़ांवर जनजागृती करण्याचा वसाच या संस्थेने घेतला आहे. व्याख्यान झाल्यानंतर मुलींना आपली भीती, भावना, समस्या, अनुभव मांडणारं निनावी पत्र लिहायला सांगितलं जातं. अशा हजारो निनावी पत्रांतून मुलींच्या समस्या जाणून घेण्याचा, त्या सोडवण्याचा प्रयत्न संस्था करत आहे. अनेकदा अशा व्याख्यानांनंतर मुली प्रत्यक्ष भेटून तक्रारी करतात. धक्कादायक बाब म्हणजे घराच्या भिंतींआड, आपल्याच माणसांकडून होणाऱ्या शोषणाचं प्रमाण घराबाहेरच्या शोषणाएवढंच मोठं असल्याचं यातून निदर्शनास आलं आहे.

घराबाहेर होणारी छेडछाड, पाठलाग, नाक्या-नाक्यांवरच्या भुकेल्या नजरा, संधी साधून केले जाणारे स्पर्श, शेरेबाजी या समस्या पोलिसांपर्यंत पोहोचून न्याय मिळण्याची शक्यता तरी असते. घरातल्या शोषणाची प्रकरणं मात्र घरच्याच माणसांकडून दडपून ठेवली जातात. तक्रार, शिक्षा वगैरे दूरच; अनेकदा मुलींविषयीच अविश्वास व्यक्त केला जातो. अनेक मुली तर पालकांना सांगितल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय असेल, याविषयी खात्री नसल्याने अत्याचार सहन करत राहतात. मोकळेपणाने व्यक्त होण्याएवढं विश्वासाचं नातंही अनेक कुटुंबांत नसल्याचं या व्याख्यानांतून उघडकीस येतं, असं मिलिंद पोंक्षे सांगतात.

‘जाणीव’ने राज्यभरात आजवर ६३० व्याख्यानं दिली आहेत. या व्याख्यानानंतर विद्यार्थिनींनी लिहिलेल्या प्रश्नांची संख्या १६ ते १७ हजारांच्या घरात आहे. कुटुंबातील व्यक्तींकडूनच लैंगिक शोषण झाल्याच्या सुमारे एक हजार तक्रारी ट्रस्टकडे आल्या. पण त्यापैकी केवळ ६० प्रकरणांत पालकांनी आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस ठाणं गाठलं. उर्वरित पालकांनी याविषयी मौनच पाळलं.

यापैकी दोन प्रकरणांत बापाकडूनच मुलीचं शोषण होत होतं. एका प्रकरणात सख्खा भाऊ अत्याचार करत होता आणि उर्वरित प्रकरणांत काका, मामा, चुलत-मावस भाऊ किंवा अन्य नातेवाईक सहभागी होते. ‘जाणीव’ची सुरुवात झाली १२ जुलै २०१५पासून. कॉर्पोरेट कंपनीत समुपदेशक असलेल्या मिलिंद पोंक्षे यांना एका शाळेच्या विश्वस्तांचा कॉल आला. शाळेत एकतर्फी प्रेमातून एका विद्यार्थिनीवर चाकू हल्ला झाला होता. या मुद्दय़ावर एखाद्या मुलीनेच मुलींशी बोलावं, त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन करावं, अशी विनंती विश्वस्तांनी केली. विवा महाविद्यालयाची विद्यार्थिनी आरती वढेरने ७ ऑगस्ट २०१५ ला विरारच्या अनसूया विद्यालयात हे व्याख्यान दिलं. या व्याख्यानानंतर विद्यार्थिनींशी चर्चा करताना या प्रश्नाचं गांभीर्य त्यांच्या लक्षात आलं. असाहाय्य स्थितीतील या किशोरवयीन मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी अन्य शाळा, महाविद्यलयांतही अशीच व्याख्यानं देण्यास त्यांनी सुरुवात केली. व्याख्यानांनंतर मुलींनी लिहिलेल्या पत्रांतून पुढे आलेलं वास्तव भयावह आहे.

घरातले तीन भाऊ शोषण करतात, बाप दारू पिऊन आईला मारहाण करतो, त्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही अशा अनेक तक्रारी या पत्रांतून करण्यात आल्या. खासगी शिकवण्यांमध्ये लैंगिक शोषणाचं प्रमाण मोठं असल्याचंही या पत्रांतून आणि व्याख्यानांनंतरच्या गप्पांतून स्पष्ट होतं. अशा शिकवण्यांमधील शिक्षक एकटय़ा दुकटय़ा मुलीला थांबवून ठेवतात. मुलीने तक्रार केली, तर घरचे अनेकदा विश्वासच ठेवत नाहीत. घरचे तक्रार घेऊन गेले, तर शिक्षक सरळ हात वर करतो. मुलगीच खोटे बोलत आहे, असे सांगून नामानिराळे राहण्याचा प्रयत्न केला जातो.

दरवेळी पूर्ण दोष मुलांचाच असतो, असंही नाही. अनेकदा मुलीही विविध प्रलोभनांना बळी पडून या जाळ्यात अडकतात, असेही पोंक्षे सांगतात. समाजमाध्यमांमुळे तर शोषण, फसवणुकीचे प्रश्न अधिक गंभीर होऊ लागले आहेत. फेसबुकवर मैत्री झाल्यापासून सात दिवसांत मुलगा मुलीचा बेस्टफ्रेंड झालेला असतो. ज्याला प्रत्यक्ष भेटलो नाही, ज्याचं नाव, फेसबुकवरचं छायाचित्र तरी खरं आहे की नाही; हेदेखील माहीत नाही, अशा व्यक्तीला त्या आपल्या आयुष्यातील सर्व लहान-मोठय़ा घडामोडींविषयी सांगू लागतात. भेटायला तयार होतात आणि मग शारीरिक संबंधांसाठी जबरदस्ती झाली की वास्तव समोर येतं. अनेकदा लग्नाचं आमिष दाखवून, महागडय़ा भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने, खूप श्रीमंत असल्याचं भासवून मुलींना फसवलं जातं. छातीवर नाव लिहिलेलं पाहून नाशिकमधील एका मुलीने तिच्या फेसबुक मित्राला भेटण्याची तयारी दर्शवली आणि त्याने शारीरिक संबंधांसाठी जबरदस्ती केल्याचं पोंक्षे सांगतात. रत्नागिरीतल्या एका मुलीचा काका तिचं तब्बल आठ र्वष शोषण करत होता. त्याचं लग्न झाल्यानंतर तिची त्यातून सुटका झाली, असं एका व्याख्यानादरम्यान उघडकीस आलं.

छेडछाड, लैंगिक शोषणाविरोधात ‘जाणीव’ने सुरू केलेल्या या मोहिमेला पोलिसांचंही उत्तम सहकार्य लाभल्याचं पोंक्षे सांगतात. आपल्याबाबत कोणताही चुकीचा प्रकार घडत असेल, तर काय करावं, याचं मार्गदर्शन आरती व्याख्यानात करते. ‘छेडछाड करू पाहणाऱ्या व्यक्तीला नजरेच्या जरबेत ठेवणं आवश्यक आहे. कोणी स्पर्श करू पाहात असेल, तर त्याला पहिल्या स्पर्शातच थांबवा नाहीतर, पुढे त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ  शकतात. स्पष्ट नाही म्हणायला शिका. आवाज हे तुमचं शस्त्र आहे. कोणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी १० वेळा विचार करा,’ असं आवाहन ती मुलींना करते. प्रत्येक व्याख्यानानंतर साधारण १०-१२ तरी तक्रारी येतातच. या तक्रारी २४ तासांत दूर करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न ‘जाणीव’ आणि स्थानिक पोलीस करतात.

काही पत्रांमध्ये शाळेत येता-जाताना छेडछाड होत असल्याचं म्हटलेलं असतं. अनेकदा यात शाळेतले विद्यार्थीच सहभागी असतात. मात्र, अशा प्रकरणांत शाळा जबाबदारी घेण्यास नकार देते. शाळेच्या आवाराबाहेरची घटना असल्यामुळे आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही, असं सांगितलं जातं. अशा प्रकरणांत पत्रात नमूद केलेल्या ठिकाणी किंवा शाळेच्या परिसरात साध्या वेषातील पोलीस पहारा देतात आणि छेडछाड करणारे हमखास तावडीत सापडतात. मुलीने घरात लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार केल्यास साध्या वेशातील पोलीस तिच्या घरी जातात आणि आईला भेटून याची माहिती देतात. शक्य ती सगळी मदत करण्याची तयारी दर्शवतात. मात्र यानंतरही अनेक पालक तक्रारीसाठी पुढे येण्यास कचरतात, असं पोंक्षे यांनी सांगितलं.

मुलींना मोकळेपणाने जगता यावं म्हणून ‘जाणीव’ आपल्या परीने विविध मार्गानी प्रयत्न करत आहे. शाळांमध्ये तक्रारपेटय़ा लावणं बंधनकारक असलं तरी बहुतेक शाळांमध्ये त्या अस्तित्वातच नाहीत. जिथे आहेत, तिथे त्या उघडल्याच जात नाहीत. खरं तर या पेटय़ांची चावी पोलिसांकडे असणं आणि त्या दर १५ दिवसांनी पोलिसांच्या उपस्थितीत उघडून त्यातल्या तक्रारींचं त्वरित निराकरण करणं बंधनकारक आहे. जाणीवने अशा तक्रारपेटय़ा ठिकठिकाणी लावल्या आहेत. शोषणाची समस्या सोडवण्यासंदर्भात सर्वात मोठा अडथळा ठरतो तो व्यक्त न होणं. मुली बोलल्याच नाहीत, तर त्यांचे प्रश्न पुढे कसे येणार? हा अडथळा दूर करण्यासाठी ‘जाणीव’ने ‘चुप्पी तोडो आंदोलन’ हाती घेतलं आहे. त्याद्वारे मुलींना त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांविषयी बोलण्यास, दाद मागण्यास प्रोत्साहन दिलं जातं. ठिकठिकाणी समुपदेशन केंद्र सुरू केली आहेत. गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्येही या संस्थेची नोंद झाली आहे. मुलींनी स्वत:वर नियंत्रण कसं ठेवावं, कोणत्याही घटनेवर प्रतिक्रिया देताना कशाचा विचार केला जावा याचं मार्गदर्शन ‘जाणीव’च्या वतीने केलं जातं.

लैंगिक शोषणाची समस्या सोडवण्यासाठी पालकांची भूमिका महत्त्वाची आहे. पालक प्रगल्भ असणं, त्यांनी पाल्याच्या आयुष्यात नेमकं काय सुरू आहे, याची सतत माहिती मिळवत राहणं, पाल्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची तयारी दर्शवणं आवश्यक आहे. त्यामुळे ‘जाणीव’ व्याख्यानांसाठी पालकांनाही आमंत्रित करण्याचं आवाहन शाळांना करते. बहुतेक शाळा पुरेशी जागा नसल्याची सबब देऊन पालकांना बोलावणं टाळतात. काही शाळांत बोलावूनही पालक उपस्थित राहात नाहीत. काही शाळांत मात्र पालकांची उपस्थिती लक्षणीय असते, असं पोंक्षे सांगतात.

छेडछाड, लैंगिक शोषण हे आपल्याच समाजाचे विकृत पैलू आहेत. त्यामुळे या समस्या दूर करण्यासाठी आपण समाज म्हणून विविध स्तरांवर आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहणं अपरिहार्य आहे. ‘जाणीव’सारख्या अनेक संस्थांचं काम हा याच प्रयत्नांचा एक भाग आहे.