यंदाच्या वर्षी ७ मार्च रोजी राजधानी नवी दिल्लीमध्ये उत्साह ओसंडून वाहात होता.. देशप्रेमी मोठय़ा संख्येने कॅनॉट प्लेसमध्ये एकत्र आले होते. फ्लॅग फाऊंडेशन ऑफ इंडियाने तयार केलेला आकाराने देशातील सर्वात मोठा तिरंगा- भारतीय राष्ट्रध्वज सन्मानाने डौलात फडकू लागला. या तिरंग्याचे वजनच होते तब्बल ३५ किलो आणि त्याचे एकूण आकारमान होते ऑलिम्पिक आकाराच्या तरणतलावाच्या बरोबर अर्धे म्हणजेच तब्बल ५ हजार ४०० चौरस फूट! तो व्यवस्थित फडकत राहावा, यासाठी तब्बल २०७ फूट उंचीचा एक खास स्तंभ तयार करण्यात आला होता. भारतात प्रथमच राष्ट्रध्वज पूर्ण रात्रभर डौलाने फडकत होता आणि तो तसा फडकत राहावा, यासाठी राष्ट्रध्वजाच्या आचारसंहितेत सुधारणा करण्यात आली होती. संपूर्ण रात्रभर तरुणाई तर तिथे होतीच, पण विविध वयोगटांतील भारतीय नागरिकांनीही त्याचा आनंद लुटला. राष्ट्रध्वजाचा आनंद सामान्य जनतेने लुटावा, यासाठीच फ्लॅग फाऊंडेशनने हा अट्टहास केला होता!
अमेरिकेत टेक्सास विद्यापीठात शिकून भारतात परतलेल्या नवीन जिंदाल या तरुणाने त्यांच्या रायगढ येथील फॅक्टरीमध्ये राष्ट्रध्वज फडकत ठेवला होता. अमेरिकेत सामान्य माणसेही राष्ट्रध्वज सन्मानाने फडकवतात, तीच प्रथा इथेही पाळावी, असा त्यांचा मानस होता. बिलासपूरच्या आयुक्तांनी अशा प्रकारे राष्ट्रध्वज फडकावण्यावर आक्षेप घेतला आणि देशाच्या राष्ट्रध्वज आचारसंहितेनुसार सामान्य भारतीय नागरिक केवळ स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच राष्ट्रध्वज फडकावू शकतात, असेजिंदाल यांना सांगितले.जिंदाल यांनी १९९५ सालच्या फेब्रुवारी महिन्यात या आचारसंहितेलाच आक्षेप घेणारी रिट याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. केवळ या मुद्दय़ावर गप्प न बसता जिंदाल यांनी या प्रकरणी देशभरात सामान्य नागरिकांमध्ये जागृती करण्याची चळवळही हाती घेतली. राष्ट्रध्वजाचा मान सांभाळत, आपला प्राणप्रिय तिरंगा फडकावण्याचा अधिकार प्रत्येक सामान्य भारतीयाला मिळालाच पाहिजे, असे त्यांचे मत होते.
दरम्यान, या रेटय़ामुळे भारत सरकारने या प्रकरणी डॉ. पी. डी. शेणॉय यांची एक समिती नियुक्त केली. या समितीनेही सामान्य भारतीयांना हा अधिकार संपूर्ण वर्षांसाठी मिळावा, अशी शिफारस केली. त्याच वेळेस राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याची जबाबदारीही नागरिकांनी घ्यावी, असे स्पष्ट केले. केंद्रीय मंत्रिमंडळाने ही शिफारस १५ जानेवारी २००२ रोजी झालेल्या बैठकीत स्वीकारली आणि त्या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनापासून म्हणजेच २६ जानेवारी २००२ पासून हा अधिकार सामान्य भारतीय नागरिकांना बहाल केला. त्यासाठी नव्याने ‘भारतीय राष्ट्रध्वज आचारसंहिता २००२’ तयार करण्यात आली.. अखेरच्या सुनावणीच्या वेळेस २३ जानेवारी २००४ रोजी सर्वोच्च न्यायालयानेजिंदाल यांच्या बाजूने निकाल दिला.
यानंतर आणखी एका नव्या संकल्पनेचा उदय झाला तो म्हणजे ‘राष्ट्रध्वज स्मारक’. या संकल्पनेंतर्गत २२ डिसेंबर २००९ रोजी केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने राष्ट्रध्वज स्मारकाच्या ठिकाणी रात्रभर ध्वज फडकावण्यास परवानगी दिली. त्यासाठी पुन्हा एकदा राष्ट्रध्वज आचारसंहितेमध्ये सुधारणा करण्यात आली. रात्रभर मुभा देताना राष्ट्रध्वजाच्या ठिकाणी पूर्णवेळ प्रकाशव्यवस्था चांगल्या पद्धतीने करण्याचे सुयोग्य बंधन घालण्यात आले आहे.. अन्यथा यापूर्वी सूर्योदयाबरोबर फडकावला जाणारा राष्ट्रध्वज सायंकाळी सन्मानपूर्वक उतरवला जात होता! त्यावर अखेरीस शिक्कामोर्तब झाले ते ९ ऑगस्ट २०१० रोजी. कारण या दिवशी बिलासपूर येथील उच्च न्यायालयाने अंतिम निर्वाळा दिला की, रात्रभर राष्ट्रध्वज फडकावत ठेवण्याने राष्ट्रध्वज सन्मान कायदा, १९७१ मधील राष्ट्रध्वजाचा अपमान रोखण्यासंदर्भातील कोणत्याही कायदेशीर तरतुदीचा भंग होत नाही!
दरम्यानच्या काळात वडिलांनंतरजिंदाल स्टील या उद्योगाचे प्रमुख झालेले नवीनजिंदाल तब्बल दोनदा खासदारही झाले. (अलीकडेच झालेल्या कोलगेट घोटाळ्यात त्यांच्या कंपनीचे नाव घेतले गेले. असे असले तरी राष्ट्रध्वजासंदर्भात त्यांनी केलेले काम स्पृहणीय आहे!) राष्ट्रध्वजाच्या संदर्भातील मोहिमेला मिळालेल्या या यशानंतर नवीन जिंदाल यांनी राष्ट्रध्वजाविषयीचे प्रेम देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावे, या उद्देशाने त्यांची पत्नी शालूसोबत फ्लॅग फाऊंडेशन ऑफ इंडियाची स्थापना केली. याच फाऊंडेशनतर्फे हा देशातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज राजधानीमध्ये मध्यवर्ती ठिकाणी यंदा उभारण्यात आला. हा राष्ट्रध्वज म्हणजे भारतीयांनी स्वातंत्र्य मिळविल्यानंतर तिरंग्याच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढय़ाचे प्रतीकच ठरला आहे! आता पुढची जबाबदारी आपली आहे. पूर्वी कागदाचे मिळणारे राष्ट्रध्वजही स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी नंतर फाटलेल्या अवस्थेत रस्त्यावर टाकलेले दिसायचे. आता फरक इतकाच की, त्याबरोबर प्लास्टिकचे ध्वजही रस्त्यावर टाकलेले पाहायला मिळतात. हा आपल्याच राष्ट्रध्वजाचा आपण केलेला अपमान असतो, याचे भान असू द्या! अन्यथा तिरंग्याच्या मिळविलेल्या स्वातंत्र्याला अर्थ राहणार नाही!