26 February 2021

News Flash

स्वतंत्र हे मन

स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय हे आपल्यातल्या किती जणांना माहीत असते? स्वातंत्र्य हवे असेल तर निर्णयाची जबाबदारीही घ्यावी लागते याचे भान किती जणांना असते?

| August 14, 2015 01:31 am

lp10स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय हे आपल्यातल्या किती जणांना माहीत असते? स्वातंत्र्य हवे असेल तर निर्णयाची जबाबदारीही घ्यावी लागते याचे भान किती जणांना असते? स्वातंत्र्य ही कुणाकडून घेण्याची गोष्ट नाही तर ती मनाची एक अवस्था आहे हे आपल्याला माहीत असते का?

आपला देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. इंग्रजांचे आपल्यावरचे नियंत्रण त्या दिवशी अधिकृतपणे संपले. आपण आपली स्वत:ची राज्यघटना तयार केली आणि नागरिकांना काही मूलभूत स्वातंत्र्ये दिली. विचार, अभिव्यक्ती, संचार, धार्मिक आचार अशा अनेक विषयांमध्ये स्वातंत्र्य प्राप्त झाल्याने नागरिकांना आपला विकास साधण्याची संधी निर्माण झाली.
दुसऱ्याच्या (दुसऱ्या देशाच्या) नियंत्रणातून मुक्ती मिळवणे म्हणजे स्वातंत्र्य असा राजकीय स्वातंत्र्याचा अर्थ आहे. स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थच मुळी आपल्याला हवे तसे विचार करण्याचा, बोलण्याचा आणि वागण्याचा हक्क आणि शक्ती असणे असा आहे. दुसऱ्या व्यक्तीच्या किंवा परिस्थितीच्या ताब्यातून किंवा हस्तक्षेपातून मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य.
स्वतंत्र असणे ही एक मानसिक स्थिती आहे. विशेषत: गेल्या आणि या शतकात या मुक्त, स्वतंत्र मानसिकतेला खूप महत्त्व प्राप्त झालेले दिसते. स्वतंत्र मानसिकता म्हणजे आपला आपण विचार करून निर्णय घेणे, त्यांची आपल्या मनाप्रमाणे अंमलबजावणी करणे. दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला आपण बांधील नाही, तसेच कोणालाही आपल्याला जाब द्यायचा नाही अशी स्थिती म्हणजे स्वातंत्र्य, ही व्यक्तिस्वातंत्र्याची आजची संकल्पना आहे.
यातूनच व्यक्तिवादाचा जन्म होतो. पाश्चिमात्त्य संस्कृतीमध्ये या व्यक्तिवादाचा पुरस्कार झालेला आढळतो. पौर्वात्य संस्कृतीमध्ये मात्र एका माणसाच्या स्वातंत्र्यापेक्षा समूहाचा, गटाचा, समाजाचा विचार केला जातो आणि परस्परावलंबित्वाला महत्त्व दिले जाते.
लहान मुलाची वाढ होताना त्याचा स्वाभाविकपणे स्वतंत्र विचार आणि आचाराच्या दिशेने प्रवास होतो. कुमारवयात मुलांची विचारक्षमता वाढते. अमूर्त (abstract) संकल्पना समजू लागतात. तसेच याच वयात स्वत:च्या आयुष्यातले काही महत्त्वाचे निर्णय उदा. शिक्षण, करिअर इ. घेण्याची त्यांच्यावर वेळ येते. यातून मुले स्वतंत्रपणे विचार करायला आणि निर्णय करायला लागतात. तसे जमले तर त्याला स्वत:ची ओळख प्राप्त होते, आत्मविश्वास वाढतो आणि जगाला सामोरे जाण्याचे बळ येते. आईवडिलांवर सतत अवलंबून राहण्याची गरज भासत नाही. याउलट एखाद्या १४-१५ वर्षांच्या मुलाला सतत आई-वडिलांचा हस्तक्षेप सहन करावा लागला, ते त्याच्यावर अतिनियंत्रण ठेवू लागले तर हा स्वातंत्र्याचा अनुभव मिळत नाही. मनात असुरक्षिततेची भावना वाढीस लागते. बंडखोरी निर्माण होते. उदासीनतेचा आजार होऊ शकतो.
असे स्वाभाविकपणे अनुभवला येणारे स्वातंत्र्य अर्थातच हवे हवेसे असते. मानसशास्त्राच्या दृष्टीने या संदर्भात विविध मतप्रवाह आढळून येतात. काही जणांच्या मते स्वातंत्र्य नसतेच मुळी! आजूबाजूची परिस्थिती तसेच आनुवंशिकतेसारखे जीवशास्त्रीय घटकच माणसाचे आचारविचार ठरवतात. त्यामुळे एखादी व्यक्ती स्वत:च्या वागण्याला विशेष जबाबदार ठरू शकत नाही.
याउलट काही मानसशास्त्रज्ञांच्या मते आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर आपली प्रगती करण्यास प्रत्येकजण स्वतंत्र आहे. आपल्यातील सर्व क्षमतांचा परिपूर्ण विकास करणे त्याच्या हातात असते. असे करताना त्याच्या निर्णयांची आणि वर्तनाची पूर्ण जबाबदारी त्याची असते. त्यामुळे त्याला असलेल्या माहितीचे विश्लेषण करून योग्य निवड करायची असते. तोच त्याच्या स्वातंत्र्याचा अर्थ असतो. निर्णय करणे, त्यावर कार्यवाही करणे याचे स्वातंत्र्य असणे याची दुसरी बाजू म्हणजे योग्य निर्णय करणे, आपल्या जीवनमूल्यांचा विचार करून निर्णय करणे होय. म्हणजेच हे स्वातंत्र्य अर्निबध नाही, तर जबाबदारीचे आहे. स्वनियंत्रण आणि जबाबदारीची जाणीव यातून नैतिक आणि कायदेशीर बंधने तयार होतात आणि ती स्वीकारलीही जातात. योग्य निर्णय करताना आपल्या परिस्थितीचा विचार करावा लागतो, आपल्या कुटुंबाचा, नातेसंबंधांचा विचार करावा लागतो. म्हणजेच एकीकडे काही बंधने येतात. नोकरी परगावी करू की नको, मग माझ्या म्हाताऱ्या आई-बाबांकडे कोण पाहील, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तरीही चांगली संधी आहे म्हणून नोकरी स्वीकारायचे ठरवले तर, जबाबदार व्यक्ती आई-वडिलांची सोय करून जाते, तसेच सतत संपर्कात राहते.
आपले काम व्हावे म्हणून लाच द्यावी लागणार असे लक्षात आल्यावर त्या बाबतीत निर्णय घेण्याचे आपल्याला स्वातंत्र्य आहे. लाच द्यायची की नाही हे ठरवायचे आहे. निर्णय खूप अवघड आहे. केलेल्या निर्णयाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी असेल तर योग्य निर्णय घेतला जाईल, तसेच मनात अपराधीपणाची भावना राहणार नाही.
एखादा निर्णय चुकला तर त्याचीही जबाबदारी घेणे हा स्वातंत्र्याचा खरा अर्थ आहे. या स्त्रीबरोबर लग्न करण्याचा आपला निर्णय चुकला म्हणून घटस्फोट घेण्याचा निर्णय करणे हा अधिकार आहेच पण त्याबरोबर त्याचे होणारे परिणाम भोगण्याची उदा. मुलांपासून दूर राहण्याची तयारी करावी लागते. स्वातंत्र्य उपभोगताना जबाबदारी टाळली तर त्यातून अपराधीपणाची भावना निर्माण होते, मनात राग निर्माण होतो, निराशा येते.
माझे विचार व्यक्त करण्याचे मला स्वातंत्र्य आहे असे म्हणत सोशल मीडियावर अनेक मते मांडली जातात. त्या वेळेस कधी कधी माहिती तपासून घेणे, भाषेवर ताबा ठेवणे, अफवा न पसरवणे अशा अनेक जबाबदाऱ्या टाळल्या आहेत असे लक्षात येते.
विविध प्रकारची माहिती, मतप्रवाह आज आपल्याला ऐकायला, पाहायला मिळतात. आपल्याला निर्णयस्वातंत्र्य आहे. योग्य काय अयोग्य काय हे ठरवण्याचे, विचार करण्याचे स्वातंत्र्य आहे, तशीच विचार करणे ही जबाबदारी आहे. त्या जबाबदारीपासून दूर पळाले की प्रचार प्रसाराला बळी पडण्याची शक्यता वाढते. अतिरेकी विचारसरणीला अनुयायी यातून मिळतात. त्या विचारसरणीसाठी दहशतवादी कारवायांमध्ये सामील होतात. मिळालेल्या स्वतंत्र्याचा असाही उपयोग केला जातो.
‘माझा मी स्वतंत्र आहे.’ याचा अर्थ मी एकटा आहे असा होत जातो. कौटुंबिक, सामाजिक कोणत्याच बंधनांमध्ये अडकायचे नाही असे मानणारा सगळ्यांपासून दूर जातो आणि त्याला लवकर निराशा येते. तारुण्यातच अतिचिंता, उदासीनता, व्यसनाधीनता असे अनेक मानसिक विकार होतात. कधी कधी आत्महत्याही केली जाते.
स्वातंत्र्य मानसिक आरोग्याशी निगडित आहे. स्वतंत्र व्यक्ती मानसिकदृष्टय़ा अधिक सक्षम असते. निवडीचे स्वातंत्र्य असेल तर आयुष्याची गुणवत्ता वाढते. आपल्या विकासासाठी स्वातंत्र्याची आवश्यकता असते. शिक्षण, करिअर, लग्न, घर, नोकरी, व्यवसाय प्रत्येक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य व्यक्तीला प्रगतिपथावर नेते. आज प्रत्येक क्षेत्रात निवड करण्यासाठी खूप गोष्टी उपलब्ध आहेत. समजा बाजारात स्मार्ट फोन घ्यायला गेले तर आज पंचवीस प्रकार उपलब्ध आहेत. निवडीचे स्वातंत्र्य असल्यामुळे असे वाटते की खरेदीतही खूप समाधान मिळेल. पण जितक्या अधिक वस्तू उपलब्ध तितका मनाचा गोंधळ जास्त. मग खरेदी केल्यावर वाटत राहते, ‘तो दुसरा फोन याच्यापेक्षा जास्त चांगला होता. मी तो का नाही घेतला?’ कधी कधी खरेदी करतानाच अनिश्चितता वाटत राहते आणि कोणता फोन घेऊ हे ठरवणेच अशक्य बनते. घरी आल्यावर वाटते ‘अरे त्या दुसऱ्या कंपनीचा फोन घ्यायला हवा होता. एक चांगली संधी गेली.’ आपल्याकडे सगळे उत्तम प्रतीचे हवे असे वाटणाऱ्यांच्या अपेक्षा कधीच पूर्ण होत नाहीत. या सगळ्यातून स्वत:लाच दोष दिला जातो. मन समाधानी होऊ शकत नाही आणि खरेदीतला आनंद संपून जातो. शास्त्रीय संशोधनाने हा मुद्दा सिद्ध केला आहे की संख्येने कमी पर्याय असतील तर निवडीचे स्वातंत्र्य वापरून केलेल्या निर्णयातून समाधान जास्त मिळते.
स्वातंत्र्याच्या अतिरेकातून उपभोगवाद निर्माण होतो. हवे तसे वागण्याचा मला अधिकार आहे, अशी समजूत होते. यातून नैतिक मूल्ये, कायदेशीर बंधने, समाजाच्या आणि कुटुंबाच्या मर्यादा कशाचेही भान राहात नाही. स्वैराचार वाढतो. गुन्हेगारी आणि समाजविघातक वृत्ती बळावतात.
स्वातंत्र्याच्या कल्पनेतच स्वनियंत्रण अध्याहृत आहे. स्वत:च्या अचारविचारावरील नियंत्रण गेले की मानसिक विकार होतात. ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर (Obsessive compulsive disorder) या आजारामध्ये एकच विचार मनात पुन:पुन्हा येत राहतो, त्यातून खूप भीती आणि बेचैनी निर्माण होते. रुग्णाला वाटू लागते की आजूबाजूला खूप घाण आहे, काही स्वच्छ नाही. तो विचार नियंत्रणात यावा यासाठी एकच कृती उदा. हात धुणे, पुन:पुन्हा केली जाते. स्वत:च्या विचारांवर ताबा राहिला नाही की कधी कधी विचित्र विचार मनात ठाण मांडून बसतात, त्यांवर पूर्ण विश्वास बसतो. सगळे जण आपल्या विरुद्ध आहेत, आपल्या जिवावर उठले आहेत असे वाटू लागते, विविध भास होऊ लागतात आणि स्किझोफ्रेनियाचे निदान केले जाते.
मानसिक विकारांवर उपचार करतानासुद्धा व्यक्तीला असलेले विविध विषयांतील स्वातंत्र्य आणि त्यातून येणारी जबाबदारीची जाणीव याचा उपयोग करता येतो. हळू हळू आपल्या विचारांना आणि वर्तनाला आपणच कसे जबाबदार आहोत हे उदा. अतिचिंता करणाऱ्या किंवा उदासपणाचा आजार असलेल्या व्यक्तीला मानसिक उपचारातून कळले तर ते विकार दूर होण्यास मदत होते. आपल्या मनात सतत येणाऱ्या निराशावादी विचारांची जबाबदारी रुग्ण घ्यायला शिकतो. त्या विचारांची दिशा बदलून मनात आशा निर्माण करण्यासाठी स्वत: प्रयत्न करतो. आपल्या मनात सतत चिंता असते, कारण आपण सतत असुरक्षिततेची भावना बाळगतो. ‘काही वाईट होणार नाही ना? माझे काही चुकत नाही ना? आणखी किती संकटांना तोंड द्यायचे?’ अशा प्रकारचे विचार आपणच करतो आहोत, हे कळणे महत्त्वाचे असते. मानसोपचारांमध्ये स्वत:च्या आचारविचारावरचे स्वनियंत्रण म्हणजे काय हे शिकवले जाते.
मुक्ती ही बंधनापासून असते, अन्याय अत्याचारापासून असते, गुलामगिरीपासून असते. स्वातंत्र्य हे जगण्याचे असते, एक चांगले आयुष्य जगण्याचे स्वातंत्र्य. हे स्वातंत्र्य आपल्या सुदैवाने आपल्याला आज आहे. त्याचा योग्य उपयोग करणे आपल्या हातात आहे.
डॉ. जान्हवी केदारे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2015 1:31 am

Web Title: independence day special 19
Next Stories
1 बाजारू स्वातंत्र्य
2 स्वातंत्र्याची ऐशीतैशी
3 हवे नकाराचे स्वातंत्र्य!
Just Now!
X