lp12lp10अलीकडे ‘हे करू नका, ते करू नका’, ‘यावर बंदी, त्यावर बंदी’ असे दबाव माझ्या दृष्टीने चिंताजनक नसून ‘या, मनाची कवाडे उघडा, तुमच्या क्षमता विस्तारा, अधिक काम करा व फक्त कामच करा,’ असे म्हणणाऱ्या नव्या वर्चस्वी, पाशवी, धूर्त हुकूमशाहीची भीती जास्त वाटते.

कलावंतांना स्वातंत्र्य असावे की नसावे, किती असावे, कितपत नसावे आदी चर्चा कला, राजकारण, न्याय व विधि किंवा कायदेशास्त्र यांच्या अंगाने सुरू होऊन आता काही हजार र्वष झाली आहेत. ज्ञानाच्या प्रत्येक शाखेत नव्याचा येणारा प्रत्येक कवडसा केवळ अंधाराचाच नव्हे, तर आधीच्या उजेडाचा सामना करून व्यक्त होत असतो. म्हणजे अनेक वेळा हा खेळ उजेडा विरुद्ध उजेड असाही असतो.
इथल्या तुकारामाच्या बुडवलेल्या वह्य़ा असोत किंवा तिथल्या गॅलिलिओला अलीकडची चर्चची मान्यता असो; प्रस्थापित व्यवस्थेच्या, मग ती कायद्याची असो वा संस्कृतीची, प्रश्न विचारणारे वा तिच्या कमीपणावर भाष्य करणारे लेखन वा कला (कृती) ही त्या-त्या समाजातील प्रस्थापितांच्या रोषाला कारण ठरते. बुडवलेल्या सर्व वह्य़ा जरी तरंगत नसल्या तरी ज्या वाचतात त्या भिजक्या व अस्पष्ट वह्य़ांच्या अक्षरांतून माणसाला पुढच्या जगाची नवी दालने व त्यांच्या खिडक्या दिसतात. त्या उघडून बाहेरचे जग पाहण्याला बळ मिळते.
इतिहासात वारंवार अशा घटना घडूनही आपण कलावंत, लेखक, शास्त्रज्ञ आदी सर्जनशील व्यक्तींच्या स्वातंत्र्याबद्दल पुन:पुन्हा चर्चा का करतो? ‘द अदर’ (‘The other’- समाज, विशिष्ट व्यवस्था, कुटुंबीय आदी.) आणि ‘व्यक्ती’ यांच्यातील सत्तासंघर्षांत त्या-त्या काळातील समाजाचे व्यक्तिस्वातंत्र्य अवलंबून असते. हा संघर्ष जितका तीव्र तितके स्वातंत्र्य अधिक व संघर्ष जेवढा सौम्य तितके ते कमी असा सोपा नियम मात्र येथे लागू होत नाही. र्सवकष संघर्ष व लोकांचा पाठिंबा यावर ते अवलंबून असते, असे म्हणणेही धाडसाचे ठरेल. विशेषत: कला व विज्ञानाच्या अनेक प्रयोगांमध्ये ते-ते प्रयोग सर्वसामान्यांच्या प्रशंसेस पात्र होतील अशा अर्थाचे मुळीच नसतात. बदामीच्या देवळातील सरस्वतीची नग्नता बहुजनांनी फूल वाहून स्वीकारलेली असते, तर हुसेनसाहेबांच्या सरस्वतीची नग्नता सहन न झाल्याने तेच बहुजन त्यांना हद्दपार करून त्यांच्यावर जाहीरपणे थुंकण्यात काहीच वावगे मानत नाहीत. म्हणजे एकीकडे स्वातंत्र्याची पूजा, तर दुसरीकडे स्वातंत्र्याची गळचेपी असा नियम कसा तयार होतो?
स्वातंत्र्याची कल्पना कोणत्याही काळात ही मुख्यत: राजकीय असते. (‘फ्री विल’- मुक्त इच्छा हा स्वतंत्र तात्त्विक मुद्दा आहे. त्यावर वेगळे व सविस्तर भाष्य करावे लागेल.) मानवी समाजाची सांस्कृतिक वाढ मुख्यत: मानवी इच्छांचे दमन व नियमन करून झाली. फ्रॉइडच्या ‘अबोधाचा मुद्दा’ जरी क्रांतिकारक वाटत असला तरी आपल्याकडे उपनिषदातील यम-यमीचा संवाद असो वा कृष्णाची रासलीला असो; अशा अनेक पौराणिक व दंतकथांतून मानवी इच्छांचे व म्हणून स्वातंत्र्याचे नियमन व व्यवस्थापन करण्यात आले. कार्ल मार्क्‍स व एंगल्स यांनी लिहिलेल्या ‘कुटुंबसंस्था, खासगी मालमत्ता व शासन संस्था’ या पुस्तकात नियमनाच्या साधनातून एका बाजूला खासगी मालमत्ता व दुसरीकडे शासन संस्था अशी दमन प्रक्रिया कशी निर्माण होते याचे विवेचन आले आहे. स्वातंत्र्याची मेख म्हणूनच खासगी मालमत्तेच्या निर्माणात अवलंबून आहे. स्वाभाविकच खासगी मालमत्तेच्या संचयात वा निर्माणात वा भांडवलशाहीच्या व्यवस्थेत ज्या-ज्या गोष्टी प्रश्न विचारतात त्या सर्व गोष्टींचे स्वातंत्र्य आपोआपच संकुचित होताना कसे दिसते, याचे वर्णन ल्योतारच्या (Lytord) ‘अर्थशास्त्रातील लैंगिक जीवनेच्छा’ या निबंधात आले आहे.
असे जरी असले तरी आज माझ्यासमोर एक वेगळा व नवाच प्रश्न वारंवार येतोय आणि तो स्वातंत्र्याच्या पारंपरिक कल्पनांपेक्षा पूर्णत: वेगळा आहे. तो प्रश्न मुख्यत: दिवसेंदिवस अधिकाधिक मुक्त होत चाललेल्या आपल्या सद्य अर्थव्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या अतिस्वातंत्र्याच्या स्फोटाबद्दल आहे. या प्रश्नाकडे दोन पद्धतीने पाहता येईल. यापैकी पहिलं म्हणजे, सध्या आपल्याला वारंवार देण्यात येणारे वस्तूंच्या निवडीचे अनेक कित्येकदा शेकडो पर्याय. मग तो खाण्याचा पदार्थ असो किंवा मोबाइल असो. ज्या-ज्या वेळी अशा भल्याथोरल्या पर्यायांची जंत्री समोर येते त्या-त्या वेळी गोंधळ उडून आपण ज्या पर्यायाला जाहिरात वा अन्य साधनांद्वारे अधिकाधिक ठसवले गेले आहे; अशाच पर्यायाचा स्वीकार करतो. अशी शेकडो सर्वेक्षणे व अभ्यास झाले आहेत. म्हणजेच एका बाजूला पर्यायाचे स्वातंत्र्य, तर दुसऱ्या बाजूला मानसिक गोंधळ निर्माण करून भपकेदार व बेगडी मालाला प्राधान्य द्यावयास लावणे म्हणजे स्वातंत्र्याचा संकोच करणे असे हे दुहेरी शस्त्र आहे. निवडणुकांमध्ये अलीकडे ज्या इव्हेंट मॅनेजमेंटचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जातो तिथे अशाच प्रकारे एका बाजूला मतस्वातंत्र्य अबाधित आहे असं दाखवून दुसऱ्या बाजूला आपले मतच बदलण्यात आलेले असते. डार्विनने त्याच्या उत्क्रांती सिद्धांतात अशा पद्धतीने प्रथम व्यक्तीचे व नंतर समूहाचे स्वातंत्र्य कसे संपविले जाते याची अनेक उदाहरणं दिली आहेत.
दुसऱ्या बाजूला प्रश्न आहे मुक्त अर्थव्यवस्थेच्या बेबंद मुक्तपणाला प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य येथील कलावंत, विचारवंत, लेखक, तत्त्वज्ञ यांना आहे किंवा नाही? मुक्त अर्थव्यवस्थेच्या निर्मितीत वर सांगितलेल्या अबोधाचे नियमन नव्हे तर विमोचन करून व्यवस्थेला पाठबळ देण्यात येते. माणसाच्या इच्छा मुक्त करून त्यांच्या प्रत्येक कृतीला प्रलोभन दाखवून बाजार चालवणे, उठवणे व विस्कटणे अशी क्रिया अविरत चालू असते. आपल्या आजूबाजूला गेल्या काही वर्षांत उभे राहिलेले असंख्य मॉल्स ही या मुक्त व्यवस्थेची प्रतीके आहेत. अशा अर्थव्यवस्थेत खरे म्हणजे स्वातंत्र्याचा संकोच व्हावयास नको. कारण ही व्यवस्थाच मुक्ततेच्या पायावर उभी आहे. तरीदेखील आपल्यासमोर व अनुभवात जे येत आहे ते विपरीत आहे. उदाहरणार्थ- कामगार कल्याणाचे कायदे संपून कामगार चळवळीचे दमन करण्याचे कायदे आणणे किंवा झाडे कापून, जंगले उद्ध्वस्त करून उद्योगाचे दिवे लावणे व अशा सर्व कृतींविरोधात आवाज उठवणाऱ्यांना प्रथम प्रगतीविरोधी व म्हणून देशविरोधी ठरवून त्यांच्या मुसक्या आवळणे हा मुक्ततेतील स्वातंत्र्याचा संकोच आहे.
आज जगभरच्या कलावंतांना, लेखकांना व विचारवंतांना मुक्त अर्थव्यवस्थेतील गळचेपीबद्दल मुख्यत: प्रश्न पडला आहे. आपल्याकडे रस्त्यावर नाटक करणाऱ्यांना देशविरोधी मानणे नवे नाही. रशियामध्ये पुतीन यांच्या व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या ‘पुसी रायट्स’ या तरुण-तरुणींच्या संघटनेबद्दल गेली दोन-तीन र्वष जे छापून येत आहे ते भयंकर आहे. अलीकडेच ‘पुसी रायट्स’च्या एक सदस्या नादिया तोलोकोन्निकोवा (Nadya Tolokonnikova) व प्रख्यात विचारवंत स्लोवेझ झिझेक यांच्याबरोबर तुरुंगातून केलेल्या पत्रव्यवहाराचा संवाद सिद्ध करण्यात आला आहे. त्या संवादात मुख्यत: नव्या मुक्त जगात बदल करू इच्छिणाऱ्या व शोषिताच्या बाजूने कलाकृती निर्माण करणाऱ्या कलावंतांच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नाची चर्चा करण्यात आली आहे. या चर्चेत एके ठिकाणी एका पत्रात झिझेक म्हणतात, ‘भांडवलशाहीच्या या अवस्थेत व्यवस्था केवळ सर्वव्यापीच नव्हे तर ती आता व्यक्तिपातळीवर भिनली आणि विणली गेली आहे. त्यामुळे एका बाजूला आपल्याला सतत आपण फारच मुक्त आहोत असे आभास होत राहतात, परंतु वस्तुस्थितीत आपण गुलामगिरीचे आयुष्य कंठत असतो.’
असे उठावाचे प्रयत्न करणाऱ्या विविध कलावंतांशी मी अनेकदा बोलत असतो. मग ते ऑक्युपाय वॉलस्ट्रीटमध्ये गाणी म्हणणारी युवक असोत किंवा ऑक्युपाय माद्रीदच्या प्रचंड मोर्चात सहभागी होऊन रस्त्यावर ग्राफिटी करणारे चित्रकार असोत किंवा जर्मनीत चान्सेलर मार्केल यांच्या कारभाराविषयी प्रश्न विचारणारे गुरिला कलावंत असोत; अशा अनेकांविषयी बोलत असताना मला स्वातंत्र्याविषयी एक विचित्र प्रश्न वारंवार पडतो. अलीकडे ‘हे करू नका, ते करू नका’, ‘यावर बंदी, त्यावर बंदी’ असे दबाव माझ्या दृष्टीने चिंताजनक नसून ‘या, मनाची कवाडे उघडा, तुमच्या क्षमता विस्तारा, अधिक काम करा व फक्त कामच करा,’ असे म्हणणाऱ्या नव्या वर्चस्वी, पाशवी, धूर्त हुकूमशाहीची भीती जास्त वाटते. ‘करू नका’ म्हणणाऱ्यांपेक्षा ‘फक्त काम करा, सतत काम करा व फक्त कामच करा,’ असे म्हणणाऱ्या समाजात स्वातंत्र्य आणि कला या दोहोंचा विध्वंस अटळ आहे. नव्या अर्थव्यवस्थेत फक्त ‘काम करा’ असे सांगताना ‘काम कोणते करा’ हेही सांगण्यात येते. म्हणजेच ‘काय करा व काय करू नका’ हे सांगण्यात येते. म्हणजेच ‘जे विकते तेवढे करा’ आणि ‘जे विकत नाही ते करू नका’ असे सांगण्यात येते. नवी कला, नवी कविता, नवे नाटक, नवा सिनेमा हा प्रस्थापित सौंदर्यव्यवस्थेला, सौंदर्यानुभवाला, नवे वळण व नवे रूप देणारा असल्यामुळे तो विकला जाईल याची कोणतीही शाश्वती नसते. असे न विकले जाणारे मुक्त अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने टाकाऊ तर असतेच, परंतु वज्र्यही असते. हा स्वातंत्र्याचा सर्वात मोठा संकोच आहे. हा लेख लिहीत असताना माझ्यासमोरील टेलिव्हिजन स्क्रीनवर जगप्रसिद्ध समकालीन चित्रकार डेमिअन हर्स्ट याच्या चित्रांचे भाव पडल्याची बातमी आहे. गेल्या काही वर्षांत चित्रकलेला बाजाराने गिळंकृत केल्यानंतर कला ही कला न राहता विनिमयाची वस्तू किंवा शेअर मार्केटचा एक शेअर असे तिचे स्वरूप झाले होते. हर्स्ट यांचीच चित्रे गगनाला भिडणाऱ्या भावाला विकली जात होती. कारण चित्रे नव्हे तर ते शेअरच विकले जात होते. जेव्हा कला बाजारू बनते तेव्हा स्वातंत्र्य आणि विवेक या दोहोंचा ऱ्हास होतो; खरी चिंता ही आहे.

गेल्या काही वर्षांत चित्रकलेला बाजाराने गिळंकृत केल्यानंतर कलेचे स्वरूप विनिमयाची वस्तू किंवा शेअर मार्केटचा एक शेअर असे झाले होते. कला बाजारू बनते तेव्हा स्वातंत्र्य आणि विवेक या दोहोंचा ऱ्हास होतो; खरी चिंता ही आहे.
संजीव खांडेकर – response.lokprabha@expressindia.com