04 March 2021

News Flash

हवे नकाराचे स्वातंत्र्य!

ही स्वातंत्र्ये असली काय आणि नसली काय, आपले आपले चालून जाते! आपणांस कुठे रोज उठून अग्रलेख लिहावयाचे आहेत?

| August 14, 2015 01:28 am

lp10ही स्वातंत्र्ये असली काय आणि नसली काय, आपले आपले चालून जाते! आपणांस कुठे रोज उठून अग्रलेख लिहावयाचे आहेत? ज्यांना लिहायचे ते बुद्धिजीवी त्याची फिकीर करतील आणि बाकीचे त्यांस वृत्तबडवे म्हणतील!

खरे सांगतो,
स्वतंत्रता भगवतीकडे आमचे खूप काही मागणे नाही.
तिचा आम्ही वर्षांतून दोनदा आवर्जून जयोस्तुते करतो. ध्वजा ही राष्ट्राची देवता मानून तिस कडक राष्ट्रीय सलामी देंगे राष्ट्रीय सलामी देतो.
या बदल्यात या भगवतीकडे आम्ही काही मागितले तर त्यात गैर ते काय? बरे आमुचे मागणे काही जास्त नाही, वावगे तर मुळीच नाही.
आम्ही फक्त एवढेच मागतो, की आम्हांस नाही म्हणण्याचे स्वातंत्र्य दे! हे देवी, नाही म्हणू नकोस. आमच्या पदरात ही एवढी हिंमत, आवकत, ताकद घाल!
हवे तर या बदल्यात आम्ही आमची सर्व स्वातंत्र्ये तुझ्यावरून ओवाळून टाकू.
खरे तर तसाही या स्वातंत्र्यांचा आम्हांस फार काही लाभ असतो असे आम्हांस वाटत नाही. म्हणजे उदाहरणार्थ आचार, विचार आणि उच्चार स्वातंत्र्य घ्या. ही स्वातंत्र्ये आम्हांस राज्यघटनेने दिली आहेत असे म्हणतात. ती घटना कुणी पाहिलीय म्हणा? घटना म्हणजे थोडीच श्री महालक्ष्मी माहात्म्य व्रतवैकल्य आणि पूजाविधी पुस्तिका आहे, की दर शुक्रवारी वाचावी? राष्ट्रप्रेमी असण्यासाठी घटना वाचणे आवश्यक नसतेच. किंबहुना आमच्या राष्ट्रप्रेमाचा आणि घटनेचा तसा संबंध नसतोच. त्यामुळे घटनेत म्हटलेय असे कुणी तरी म्हटलेय म्हणून आपणांस आचार, विचार, आविष्कार स्वातंत्र्य आहे म्हणायचे.
बाकी मग या स्वातंत्र्यांचा आणि आमचा तसा काहीच संबंध नाही. तुम्हांस सांगतो, घरात किती वाजता उठायचे, किती वाजता मोरीत अंघोळीकरिता शिरायचे, काय खायचे, खिडकीस पडदे कोणत्या रंगाचे लावायचे आणि हापिसात जाताना खमिस कोणत्या रंगाचे घालायचे हे ठरविणेसुद्धा ज्या पामराच्या हाती नाही, त्यास आचार स्वातंत्र्याचे कवतिक ते काय?
विचार करणे तर आम्ही केव्हाच सोडले. म्हणजे त्या परम निर्मिकाने खास कौशल्यविकास योजनेंतर्गत जो मानवी मेंदू निर्माण केला, तो काय माणसाने विचार करून झिजविण्यासाठी? हे एवढे महत्त्वाचे इंद्रिय ते पुरवून पुरवून वापरायचे की जाया करावयाचे? आम्ही विचार करणे केव्हाच सोडले असून ती सर्व जबाबदारी सरकार व आमुच्या हितासाठी व न्यायासाठी लढणाऱ्या तमाम संघटनांवर सोपविली आहे. त्यांच्याकडे तमाम साधनसामग्री असते. त्यांना रोज सक्काळ सक्काळी दोन दोन बदाम खाणे परवडते. तेव्हा त्यांनी देशहितासाठी देशवासीयांच्या कोणत्या स्वातंत्र्याचे काय काय करावे यावर विचार करावा.
शिवाय रोज सक्काळी नाक्यावर जाऊन चार चवल्या मोजून आम्ही जे सहा पानी वृत्तपत्र घेतो, त्याचप्रमाणे मत्प्रिय केबलवाले दादा यांस महिन्याचे २५० रू. (अक्षरी अडीचशे फक्त!) मोजतो ते काय उगाच? ती पेपरे, ती वृत्तच्यानेले यांनी आम्हांस आमचे विचार सांगावेत, हीच तर आमुची अपेक्षा असते ना?
म्हणजे कसे त्यांनी आम्हांस सांगावे, की यास यास फाशी देणे हे देशाच्या सुरक्षेसाठी योग्य. यावर यावर बंदी घालणे हे देशाच्या हितास बाधक. हा हा प्रकल्प येथे येथे उभारणे हे देशाच्या विकासासाठी पोषक. की संपले! बात खतम!
तसेही आम्हांस मेंदू शिणविण्याकरिता वेगळे विषय असतातच की!
आणि सक्काळी ९.३८ची लोकल मिळेल का? हापिसात आता रजा मिळविण्याकरीता कोणते कारण सांगावे? येताना मेथीची भाजी आणावी की चवळीची? अशा विषयांवर आम्हांलाच विचार करावा लागतो ना! त्या आमच्या विचारस्वातंत्र्यावर तर कोणी टाच आणलेली नाही म्हटल्यावर बाकीचा विचार करण्याची आवश्यकता ती काय?
उच्चार स्वातंत्र्याचे म्हणाल, तर आमचे ओठ कोणी शिवलेत हो? पण बोलणार तरी काय आणि कशाला?
परवाचीच गोष्ट. कचेरीत काय चर्चा रंगली होती ‘होणार सून..’ची. आता या मालिकेने आम्हांस वात आणला आहे. नाही म्हणजे किती दिवस त्या जान्हवीच्या खळीत अडकून पडायचे. तशात आता ती पोटुशी. पटकन मोकळी करावी ना तिला आणि आम्हांलाही. पण नाही. तिची डय़ू डेट आपली वाढतच चालली आहे. तेव्हा आम्ही म्हणालो की बंद करावी ती मालिका. तशा जोशीबाई काय खवळल्या! म्हणाल्या, जमणार नाही! ही मालिका बंद केली तर अशीच दुसरी मालिका काय तुम्ही काढणार आहात का विसूभाऊ? आमची बोलती बंद!
तसे आम्हांला उच्चार स्वातंत्र्य अजिबातच नाही असे नाही. दूरचित्रवाणी संचावर दिसणाऱ्या कोणत्याही राजकीय नेत्याबद्दल आम्ही आमच्या घरात काहीही मतप्रदर्शन करू शकतो. त्याबाबतीत आम्ही कोणास घाबरत नाही! अखेर आपले उच्चार स्वातंत्र्य असे धाडसानेच शाबीत ठेवावे लागते. हिंमत ए मर्दा तो मदद ए घटना म्हणतात ते काही उगाच नाही!
पण तरीही वाटते, की ही स्वातंत्र्ये असली काय आणि नसली काय, आपले आपले चालून जाते! आपणांस कुठे रोज उठून अग्रलेख लिहावयाचे आहेत? ज्यांना लिहायचे ते बुद्धिजीवी त्याची फिकीर करतील आणि बाकीचे त्यांस वृत्तबडवे म्हणतील! आपणांस काय त्याचे?
पण नाही म्हणण्याचे स्वातंत्र्य, ते मात्र आमच्यासारख्या सज्जन सालस मध्यमवर्गीय गृहस्थास हवेच.
ते स्वातंत्र्य असते ना, तर तुम्हांस सांगतो, या या आयुष्याचा स्वर्ग झाला असता! राहत्या खोलीचे नंदनवन झाले असते! किंबहुना ते स्वातंत्र्य असते ना, तर काहीच झाले नसते! आम्ही आपले प्रारंभीच सांगून ठेवले असते की ना मातोश्रींना! आम्हांस या धरतीवर आणू नका! आमचे नाव अंबानींच्या वा किमानपक्षी अदानींच्या रेशनकार्डात टाका!
पण नाही! सरकारी सूतिकागृहातच आम्हांस पहिला टँहॅ करण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर बोलता येईपर्यंत आम्ही ना ना असेच करीत होतो, परंतु आमच्या अडाणी पालकांस ते कधी समजलेच नाही. त्यानंतर आम्ही ना ना म्हणणे जे सोडले ते सोडलेच.
आता शाळा.. मग तिला प्ले स्कूल म्हणा वा अंगणवाडी – ही का लहान मुलांनी जायची गोष्ट आहे? त्या वेळी किती रडलो, भेकलो, एकदा तर चक्क ‘रास्ता रोको’सुद्धा केला! भर रस्त्यात स्वत:ला झोकून दिले! पण काय उपेग झाला? पाठीत चार रट्टे पडले. कोणत्याही आंदोलकांवर अखेर हीच वेळ येते हा आमुचा तेव्हाचा अनुभव!
त्या बालवयात आमचे जे नकाराचे स्वातंत्र्य हरवले ते – नोकरी लागली, लग्न झाले तरी पुन्हा कधी गवसलेच नाही. आता कोणत्याही शहाण्या माणसाला नकाराधिकाराचा पर्याय दिला तर तो सावधान ऐकताच बोहल्यावरून सूंबाल्या नाही करणार? कोण स्वत:हून चतुर्भुज व्हायला जाईल?
पण नाही. हा जालीम समाज त्याला बाकीचे काही नाही, पण लग्न करायला मात्र भागच पाडतो. प्रत्येक विवाहिताने एकदा आपल्याशी ताडून पाहावे, की समाज कसा आपल्या कोवळ्या मनातील नकाराचे बंडखोर रोपटे गाडून टाकून आपणांस लग्नबाजारात उभे करतो! त्या वयात आम्हांस तर असे वाटत होते, की पुरी कायनात पूर्ण शिद्दतीने आम्हांस लग्नवेदीवर चढवण्याची कोशिश करीत आहे!
हाच अनुभव प्रत्येक वेळी.
आम्ही आजवर कोणास बोललो नाही, परंतु आम्हांस जायचे होते ते राजकारणातच! पण पिताश्रींची सदिच्छा की आम्ही खूप अभ्यास करून खूप मोठे व्हावे व कुळाचे नाव रोशन करावे. आता खेचर कुळाचे नाव मोठे करायचे म्हटले तरी होऊन होऊन ते किती मोठे होणार? नको नको म्हणत असतानाही त्यांनी आम्हांस दहावीची ऑक्टोबर परीक्षा द्यायला भाग पाडले.
तेव्हा आम्हांस नकाराचे स्वातंत्र्य असते, तर रामारक्ताची शप्पथ घेऊन सांगतो, आम्ही आज भलेही दहावी नापास असतो, परंतु किमानपक्षी तुलसीभाभींप्रमाणे मंत्री असतो!
आणि एकदा आपण हे नकाराचे स्वातंत्र्य गमावले ना की मग आयुष्याची फक्त ढकलगाडी होऊन जाते. कोणीही यावे आणि आपणांस हवे तिकडे ढकलावे!
मग कँटीनात आपण कटिंगच्या थेंबाला जरी शिवलो नाही, तरी आपल्यालाच सगळ्या सहकाऱ्यांच्या चहाचे बिल भरावे लागते.
मग घरात साध्या रिमोटवरसुद्धा आपला अधिकार राहत नाही. सहकुटुंब-सहपरिवार बसून त्यांना हवी तीच मालिका पाहावी लागते.
मग कचेरीत, अहो विसूभाऊ, मला नं आज जर्रा लौकर जायच्चंय घरी. रात्री नं नाट्काचा प्लान आहे. तुम्ही जरा हे काम बघाल, आज माझ्यासाठी, असे जोशीबाईंनी आठवडय़ातून पाच वेळा म्हटले तरी आपणांस त्यांच्या ओझ्याचे गर्दभ बनावे लागते.
आणि स्वगेही?
तेथे आपण नुसतेच असतो. एक होकारदर्शक यंत्र! नकार देण्याची प्राज्ञाच नसते तेथे!
याला काय स्वातंत्र्य म्हणायचे?
म्हणून हे स्वतंत्रतेदेवी भगवती,
हे श्रीमहन्मंगले, शिवास्पदे शुभदे
आम्हांस नकाराचे स्वातंत्र्य दे!
तिमिरास नाही म्हणण्याचे
शृंखलांना नकार देण्याचे
दबावांना नाकारण्याचे
साऱ्या परतंत्रांना झुगारण्याचे
स्वातंत्र्य दे!
बाई,
आमच्याही आयुष्याला एक
१५ ऑगस्ट दे!
त्याविना किती काळ आम्ही आम्हांला असेच नाकारत बसायचे?
विसोबा खेचर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2015 1:28 am

Web Title: independence day special 22
Next Stories
1 सेन्सॉरची दृष्टी
2 स्त्रियांच्या जगण्यातला ‘अर्थ’
3 ‘वैचारिक स्वातंत्र्या’चं विचारमंथन
Just Now!
X