lp16lp10आज स्त्रिया कमावत्या झाल्या आहेत. आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी झाल्या आहेत. हा स्त्रियांच्या विकासाच्या प्रक्रियेतला एक महत्त्वाचा टप्पा आहे. तो पार केल्यानंतर पुढचा टप्पा आहे, आर्थिक निर्णयप्रक्रियेत स्थान मिळवण्याचा. हे स्थान आपोआप मिळत नाही. ते मिळवावं लागतं.

मोनिकाचं ग्रॅज्युएशन संपत आलं असतानाच एक चांगलं स्थळ आलं. मोनिका आई-वडिलांना सांगत होती की, मला अजून शिकायचंय, मला इतक्यात लग्न नाही करायचं, पण तिचं कुणी ऐकलं नाही. इकडे पदवीची परीक्षा देऊन तिकडे तिला बोहल्यावर चढावंच लागलं. त्यामुळे लग्नानंतर ती नाराजच होती. पण तिच्या नवऱ्याच्या आणि सासरच्या सगळ्याच लोकांच्या प्रेमळ वागण्याने तिचा राग हळूहळू निवळत गेला. मनाविरुद्ध झालेलं लग्न विसरून ती संसारात रमली. वर्षभरात एक मूलही झालं. ते थोडंसं मोठं झाल्यावर मोनिकानं ब्युटी पार्लरचा कोर्स करायचं ठरवलं. नवऱ्यासकट घरातल्या सगळ्यांनीच प्रोत्साहन दिलं. तिच्या शिकण्याच्या इच्छेचं कौतुकही केलं. करून करून ब्युटी पार्लरचाच कोर्स करणार आहे ना, करू देत मग. त्यात काय एवढं, असा दृष्टिकोन त्यामागे होता. त्यानुसार मोनिकाचा ब्युटी पार्लरचा कोर्स झाला. मग कुटुंबाच्याच एका रिकाम्या गाळ्यात तिनं स्वत:चं पार्लर सुरू केलं. वर्ष-दोन वर्षांतच तिचं पार्लर घरातल्या कुणाच्याही अपेक्षेपेक्षा तुफान चांगलं चालायला लागलं. मोनिकाचं कामातलं कौशल्य, तिचा बोलका स्वभाव, मोक्याच्या ठिकाणी असलेली पार्लरची जागा अशा सगळ्या गोष्टी त्यासाठी जुळून आल्या होत्या. मोनिका अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळवायला लागली असली तरी तुझे पैसे तुझ्याजवळच ठेव, घर चालणार ते माझ्याच पैशावर असं तिच्या नवऱ्यानं स्पष्ट सांगितलं होतं. मग काय, मोनिकानं ते पैसे पार्लरमध्ये गुंतवायला सुरुवात केली. शिवाय अधूनमधून तिला स्वत:ला हवीच असलेली एखादी वस्तू घरात यायला लागली. स्थिरस्थावर झालेला संसार, पाचेक वर्षांचा मुलगा, घरातून मिळालेला पाठिंबा, उशिरा सुरुवात करूनही व्यवसायात मिळालेलं यश, त्यातून आलेली आत्मनिर्भरता यांचं तेज मोनिकाच्या चेहऱ्यावर दिसायला लागलं. दोन वर्षांपूर्वीपर्यंत प्रत्येक गोष्टीत नवऱ्याचा सल्ला विचारणारी मोनिका लहानसहान निर्णय स्वत:चं घ्यायला लागली. पण हे सगळं होत असताना तिच्या नवऱ्याच्या मनात मात्र हातातून काही तरी निसटून चाललंय अशी भावना निर्माण व्हायला लागली. त्यातून त्याची चिडचिड वाढायला लागली. सगळं नीटनेटकं हवं तसं सुरू असताना त्याला काय खटकतंय, काय सलतंय ते मोनिकाला समजेना. असेच सहा महिने गेले आणि अचानक मोनिका तिच्या सगळ्या क्लायंट्सना सांगायला लागली की, आणखी दोन तीन महिन्यांनी ती पार्लर बंद करणार आहे, तेव्हा दुसरं पार्लर शोधा. एक-दोन जणींनी खोदून खोदून विचारल्यावर तिनं त्यांना एवढंच सांगितलं की, तिला तिसरा महिना सुरू झाला होता. तिनं हे इतरांना सांगितलं नाही पण तिला माहीत होतं की आणखी दोन-तीन महिनेच ती काम करू शकत होती. त्यानंतर मात्र तिला घर, आधीचा लहान मुलगा, बाळंतपण आणि पार्लर हे सगळं सांभाळणं शक्य नव्हतं. बराच काळ तिला तिच्या सासूबाईंनी घरसंसार सांभाळायला सहकार्य केलं होतं. पण नुकत्याच त्या गेल्या होत्या. घरातली बाकीची कामं सांभाळायला बाई ठेवायचा पर्याय तिच्या नवऱ्यानं साफ धुडकावून लावला होता. त्यामुळे पार्लर बंद करणं हा एकमेव पर्याय तिच्यापुढे उरला होता. खरं तर ते पार्लर म्हणजे तिला तिची स्वत:ची ओळख देणारं, तिच्यापुरता जगण्याचा अर्थ देणारं, तिच्या कौशल्याला वाव देणारं तिचं विश्व होतं. आपण कुणी तरी असावं हे तिचं स्वप्न तिथं प्रत्यक्षात आलं होतं. त्यातून मिळणारा पैसा ही तिच्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट नव्हती. पण स्वत: मिळवलेल्या पैशाने तिची मान तिच्या स्वत:च्या मनातच स्वत:समोरच ताठ झाली होती. पण त्या पैशांनीच सगळं बिनसलं होतं. आपलं आर्थिक स्वावलंबन मोडून काढण्यासाठी आपल्यावर आणखी एक मूल लादलं गेलंय हे तिला समजत होतं, पण त्याविरुद्ध ती काहीही करू शकली नाही की बोलूही शकली नाही.
प्रीतीची गोष्ट आणखीनच वेगळी. लग्नाच्या आधीपासूनच ती शिक्षिकेची नोकरी करत होती. लग्न झाल्यावर पुढच्याच महिन्यात दोन तारखेला पगार झाला का, असं तिच्या नवऱ्याने विचारलं. पगार बँकेच्या अकाऊंटमध्ये जमा व्हायचा. हे कळल्यावर तिच्या नवऱ्याने ताबडतोब तिचं ऑनलाइन अकाऊंट सुरू केलं. त्याचा पासवर्ड वगैरे स्वत:कडेच ठेवला. इंटरनेटचं आपल्याला काही कळत नाही म्हणून प्रीतीनेही फारसं लक्ष घातलं नाही. पगार झाल्यावर लगेचच तो तिच्या अकाऊंटमधून परस्पर फिरवला जाऊ लागला. प्रीतीला तिला लागतील ते पैसेही नवऱ्याकडूनच मागून घ्यावे लागायचे. तिनं तिच्या पैशांबद्दल विचारलं की नवरा म्हणायचा ते पैसे मी आपल्या संसारासाठीच गुंतवतो आहे वेगवेगळ्या ठिकाणी. पण तू हे पुन्हा पुन्हा का विचारतेस. तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? नसेल तर तसं सांग आणि इथून पुढे ते गुंतवणुकीचं वगैरे तुझं तू बघत जा.. हे असं बोलणं एकल्यावर प्रीतीला पुढे काही बोलताच यायचं नाही. पण तिचा सगळा पगार नेमका कुठे गुंतवला जातो हेही तिला कळायचं नाही. नवऱ्याची खासगी नोकरी, त्याच्या पगाराबद्दल विचारलं की अशीच उडवाउडवीची उत्तरं मिळायची. घरात लागेल ते सगळं तुला मिळतं ना, मग कशाला हव्यात तुला चौकशा, असंही तिला ऐकायला मिळायचं.
गीताच्या नवऱ्याने तिला एकदा बँकेत नेलं. एका फॉर्मवर सह्य करायला सांगितल्या. तिथले सुटाबुटातले-टायवाले फाडफाड इंग्रजी बोलणारे बायका-पुरुष, एसीचा गारवा, मंद सुवास या सगळ्याचं तिच्यावर एवढं दडपण आलं की तिनं मुकाटय़ानं सह्या करून टाकल्या. घरी आल्यावर त्याबद्दल नवऱ्याला विचारलं, पण तुला काय करायचंय असं तो नेहमीप्रमाणे खेकसला. ती गप्प बसली. पण काही महिन्यांनी तिचं नाव विचारत पोलीस घरी आले तेव्हा तिला सगळा प्रकार उलगडला. फक्त महिलांच्याच नावावर वाहनकर्ज देण्याची कसली तरी बँकेची योजना होती. तिच्या नवऱ्याने कुणाशी तरी संबंधितांशी संगनमत करून गीताच्या नावावर दोन लाखांचं वाहनकर्ज घेतलं होतं. त्याच्या फॉॅर्मवर तिच्या सह्या घेतल्या होत्या. ते पैसे मिळवून परस्पर उडवले होते. हप्ते थकल्याने वाहन उचलायला बँकेची माणसं आली तेव्हा वाहनाचा पत्ता नव्हता. त्यामुळे बँकेला फसवलं म्हणून पोलीस आणि बँक गीताच्या मागे हात धुवून लागले होते. आधीच गीताला बँकेची भीती वाटायची. म्हणून बँकेची पायरी चढण्यापेक्षा ती गाठीशी अडीअडचणीला थोडासा तरी पैसा हवा म्हणून तिच्या धुण्या-भांडय़ाच्या कामाच्या पैशातून पै पै जमवून थोडं थोडं सोनं घेऊन ठेवायची. तर तिचा नवरा ते सोनंही तिच्या नकळत गहाण ठेवून पैसे काढायचा.
एका नामांकित म्युच्युअल फंड कंपनीत काम करणारी एक तरुणी. पाचेक र्वष ती तिथं काम करत होती. एकदा तिला तिच्या मित्रमंडळींमधल्या कुणी तरी सहज विचारलं की तुझ्या इन्व्हेस्टमेंट कशाकशांत आहेत? म्युच्युअल फंडात काम करणाऱ्या व्यक्तीची गुंतवणूक स्मार्ट असणार, अशी विचारणाऱ्याची अपेक्षा होती. पण त्या तरुणीने उत्तर दिलं, बँकेच्या एफडीजमध्ये मी पैसे गुंतवलेत. कारण मी कमावलेले पैसे कुठे गुंतवायचे, ते माझे वडीलच ठरवतात. मी काही त्यात लक्ष घालत नाही.
याउलट काही उदाहरणं बचत गटातल्या स्त्रियांची देता येतील. महाराष्ट्रातल्या बहुतांश खेडय़ांमध्ये हळूहळू बचतगटांचं जाळं विणलं गेलं आहे. काही ठिकाणी त्यामागे एनजीओ आहेत, काही ठिकाणी राजकीय पक्ष आहेत. त्यांनी जाणीवपूर्वक हस्तक्षेप करीत हे बचत गट निर्माण केले आहेत. ग्रामीण स्त्रियांनीही त्याला मोठा प्रतिसाद दिला आहे. या बचत गटामधून स्त्रियांनी लहान लहान प्रमाणात म्हणजे सुरुवातीला अगदी महिन्याला पाच-दहा रुपये पैसे साठवायला सुरुवात केली. त्यातून त्यांना त्यांच्या बचत गटाचं बँकेत खातं उघडता आलं. मुलांच्या शाळेच्या फिया भरणं, आजारपणं अशा इमर्जन्सीला त्यांना बचत गटातून कर्ज मिळायला लागलं. काही बचत गटांनी आपापले डेअरीसारखे उद्योग उभारले. तर काही बचत गटांनी महिलांना त्यांचे त्यांचे छोटे छोटे उद्योग उभारायला र्कज दिली. त्या उद्योगांतून मिळणाऱ्या पैशातून घरातल्या खर्चाना हातभार लागायला लागला. त्यातून त्या बाईची तिच्या घरात पत वाढली. अडीअडचणीला ती तिच्या यंत्रणेतून पैसा उभा करू शकते ही गोष्ट तिचं तिच्या घरातलं महत्त्व वाढवणारी ठरली.
एका खात्यापित्या घरातली तरुणी. शिक्षण संपल्यावर तिला तिच्या सुदैवाने चांगली नोकरी मिळाली. ती चांगले पैसे मिळवायला लागली. पण दर महिन्याला तिच्या खात्यात जमा होणारी रक्कम तिला कशासाठीच लागत नव्हती. पैसे तसेच पडून राहायला लागले. त्या पैशांचं काय करायचं, हा तिलाही प्रश्नच होता. तिच्यापुढची ही ‘समस्या’ तिच्या आसपासच्या ‘गरजू’ मंडळींनी हेरली. त्यांनी वेळोवेळी रडून रडून आपले वेगवेगळे प्रश्न सांगून तिच्याकडे पैसे मागायला सुरुवात केली. तिनंही मोठय़ा मनाने त्यांच्या गरजांसाठी मदत केली. वर्षभराने तिने आपले पैसे परत मागायला सुरुवात केल्यावर ‘तुला ना संसार, ना खर्च.. तुला कशाला लागतात पैसे? थांब थोडे दिवस’ असं म्हणत जो तो टाळायला लागला. आणखी थोडय़ा दिवसांनी तिनं पुन्हा जोर लावल्यावर तिचे हजारो रुपये आज शंभर, उद्या दोनशे असं करत रडतरखडत कसे तरी, कधी तरी परत आले. ते कसे संपले ती तिलाही कळलं नाही.
आर्थिकदृष्टय़ा वेगवेगळ्या स्तरांतल्या स्त्रियांच्या या कहाण्या.
स्त्रियांचं पैसे मिळवणं आता अप्रूपाची गोष्ट राहिलेली नाही. त्या शिकतात, नोकरी करतात, पैसे मिळवतात. आर्थिक पातळीवर त्या स्वावलंबी झाल्या आहेत. पण ते पैसे खर्च करण्याचा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा तो आपला स्वत:चा निर्णय असायला हवा, असा त्यांचा आग्रह असतोच असं नाही. उदाहरणच द्यायचं तर पैसे गुंतवायचे असतात तेव्हा नवरा सांगेल त्या ठिकाणी सह्य़ा करून मोकळं होणं ही वृत्ती खूपदा आढळते. नात्यातला विश्वास ही त्यामागची भावना असते ही गोष्ट खरी आहे. पण तो जितका आवश्यक तितकंच आपण मिळवत असलेल्या पैशांबाबत आपण सजग असणंही आवश्यकच असतं. पैसे गुंतवण्याचे मार्ग कोणकोणते आहेत, त्यातले कोणते मार्ग अवलंबायला हवेत, कोणते टाळायला हवेत, कोणते धोक्याचे आहेत, कोणते धोक्याचे नाहीत या सगळ्याची माहिती असणं आवश्यक असतं. पण स्त्रिया त्यात रस घेतातच असं नाही. नवऱ्याने किंवा जवळच्या कुणीही इतरांनी पैशाचा प्रश्न भावनांशी जोडल्यावर या दोन गोष्टी वेगळ्या आहेत हे स्पष्ट करण्याऐवजी त्या गप्प बसून स्वत:ची कुचंबणा करून घेतात. अर्थात सरसकट सगळ्याच जणी अशा असतात असं नाही. पण त्यांना खूपदा त्याबद्दल स्पष्टपणे बोलता येतंच असं नाही हेही तितकंच खरं.
आर्थिक स्वातंत्र्य मिळवल्यानंतर त्या पैशांचं काय करायचं हा आर्थिक जबाबदारीचा भाग झाला. आपल्या पैशांचं काय करायचं, हे आपणही ठरवायला हवं. काही स्त्रियांना ते ठरवण्याची संधी मिळते पण अनेकींचा त्या दिशेने अजून प्रवास व्हायचा आहे. तो होणं ही त्या स्त्रीची स्वत:ची आणि काळाची गरज आहे. आर्थिक निर्णयप्रक्रियेतला सहभाग वाढवणं हा त्यांच्या आत्मनिर्भरतेचा पुढचा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com