07 March 2021

News Flash

‘वैचारिक स्वातंत्र्या’चं विचारमंथन

‘जे आहे ते असं आहे’ असा थेट विचार करणारी आजची पिढी. तरुण पिढीचं विचार करण्याचं चक्र खूप वेगाने फिरत असतं.

| August 14, 2015 01:25 am

lp10‘जे आहे ते असं आहे’ असा थेट विचार करणारी आजची पिढी. तरुण पिढीचं विचार करण्याचं चक्र खूप वेगाने फिरत असतं. शिवाय त्याला अनेक कंगोरेही असतात. त्यांच्या ‘वैचारिक स्वातंत्र्या’कडेही बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे.

एक छोटीशी गोष्ट. राजकन्येची म्हणा किंवा परीची. तिला कशाचीही कमी नसते. जे हवं ते समोर हजर. तोंडातून शब्द काढायची खोटी फक्त. मात्र तिच्या बाबतीत एक गोष्ट अगदी कटाक्षाने पाळली जाते, ती म्हणजे लोकांचा कमीत कमी संपर्क. तिला शिक्षण देण्यासाठी येणारे शिक्षक आणि कुटुंब सोडता तिचा बाहेरच्या जगाशी असणारा संपर्क शून्य. त्यात एक गोष्ट अगदी तिच्या मनावर बिंबवली गेली की, शिक्षक आणि घरचे सांगतील तेच योग्य. त्यात तिला सतत कोणी ना कोणी सांगायला असायचंच. त्यामुळे झालं काय, तर स्वत:चा म्हणून असा काही विचार करायचा असतो हे तिच्या गावीही नव्हतं. कारण कळायला लागल्यापासून ‘बाबा वाक्यं प्रमाणम्’ अशी तिची अवस्था. तिचं संकुचित जग आणि ती. डबक्यात असलेल्या माशासारखी तिची ती अवस्था एकप्रकारे मानसिक गुलामगिरीच म्हणायला हवी.
सांगायचा मुद्दा हा की, आपण स्वातंत्र्याचे कितीही गोडवे गात असलो तरीही आपलं संपूर्ण आयुष्य ज्यावर बेतलेलं असतं, ते मूलभूत विचारस्वातंत्र्य आजच्या पिढीच्या आणि सगळ्यांच्याच म्हणा, आयुष्यात नक्की आहे का, हा प्रश्न ज्याचा त्याने स्वत:ला येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विचारायलाच हवा. संविधानात अपेक्षित असणारं स्वातंत्र्य हे मूळ आपल्या मनातल्या विचारांमध्ये दडलेलं असतं. दर स्वातंत्र्य दिनाला फक्त देशभक्तीपर गाणी गाऊन आणि झेंडावंदन करून साजरी करण्याची ही गोष्ट नाही. तर रोजच्या आयुष्यात क्षणाक्षणाला प्रत्यक्षात आणण्याची गोष्ट आहे ती. एकदा का विचारांवर कब्जा मिळवला की पुढची अरेरावीची वाट सोपी असते. कारण इतर कोणत्याही स्वातंत्र्याआधीचं मूलभूत स्वातंत्र्य आहे ते. जिथून व्यक्तीच्या अस्तित्वाला सुरुवात होते आणि ते नसेल तर व्यक्तीचं अस्तित्व संपतंही. माणूस फक्त त्याच्या हाडामांसाच्या असण्यामुळे नाही तर विचारांच्या असण्याने आपलं अस्तित्व टिकवून असतो. किती पैलू असतात स्वातंत्र्याला. मानसिक, भावनिक, आर्थिक, सामाजिक. त्यातही खाण्याचं, शिक्षणाचं, अभिव्यक्तीचं, लैंगिकतेचं, वाचन, लेखन, पाहणं, ऐकणं अ‍ॅण्ड सो ऑन. यातला प्रत्येक पैलू म्हणजे स्वतंत्र लेखाचा विषय आहे. पण या सगळ्या गोष्टींच्याही आधी येतं ते विचारांचं स्वातंत्र्य. आजची पिढी या बाबतीत मागच्या पिढीपेक्षा कितीतरी पुढे आहेच. पण स्वत:मधल्या विरोधाभासांना सामोरं जाताना अजूनही कमी पडतो आम्ही, हे जाणवत राहतं आत.

‘कॅचर इन द राय’मधला होल्डन असो किंवा ‘कोसला’मधला पांडुरंग सांगवीकर. हे दोघंही आजच्या आपल्या पिढीचं प्रतिनिधित्व करतात. दोघंही साधारण एकाच गोष्टीने अस्वस्थ दिसतात. आजूबाजूच्या दांभिकपणाचा तिरस्कार. लोकांचं स्वत: विचार करायचा सोडून कोणी एक म्हणेल त्याच्यानुसार वागणं आणि त्यामुळे मुखवटे घालून फिरायला लागणं. त्यामुळे हे दोघंही कमालीचे घुसमटताना दिसतात आणि म्हणूनच की काय कोण जाणे त्यांच्या मनातली, विचारांतली द्वंद्व आपल्याला ठळकपणे लक्षात येतात. भरकटणाऱ्या होल्डनला त्याचे शिक्षक एक छान उद्धृत सांगतात, ‘अपरिपक्व माणसाचं लक्षण म्हणजे त्याला आपल्या प्रयोजनासाठी उदात्तपणे मरायचं असतं आणि परिपक्व माणसाचं लक्षण म्हणजे त्याला त्याच्या प्रयोजनासाठी नम्रपणे जगायचं असतं.’ आता तुला कसं जगायचंय ते तू ठरव. यातला परिपक्व माणूस ती गोष्ट साध्य करू शकतो. कारण त्याला लक्षात आलेलं मूलभूत विचारांचं स्वातंत्र्य. अगदी साध्या शब्दांत सांगायचं झालं तर माझे विचार समोरच्या व्यक्तीपेक्षा निराळे आहेत, असू शकतात याचं त्याला सतत असलेलं भान. त्यामुळे त्याच्यात आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचं आलेलं कसब. या सगळ्या गोष्टी त्याला त्याचं प्रयोजन साध्य करायला मदत करतात. मला एक व्यवसाय सुरू करायचाय. पण त्यासाठी माझा अ‍ॅटिटय़ूड ‘मोडेन पण, वाकणार नाही’ असा असेल तर काही उपयोग नाही. मात्र तेच मी समोरच्याचे विचार समजून घेऊन त्यानुसार माझ्या फायद्याचं पाहात असेन तरच मी व्यवसायात यशस्वी होऊ शकेन. असा अ‍ॅटिटय़ूड असणारा परिपक्व माणूस होल्डनच्या शिक्षकांना अभिप्रेत असावा बहुतेक.
स्वातंत्र्याच्या जडजंबाल व्याख्या बाजूला ठेवू आपण. रोजच्या भाषेत सांगायचं तर नकोनकोसं केव्हा वाटायला लागतं आपल्याला. विचित्र दडपण आणि कोणीही ऐकून घेत नाहीये ही जाणीव आपल्याला नकोशी करते. याउलट, मोकळी चर्चा, प्रसंगी वादविवाद जास्त बरे वाटतात. कारण तिथे माझ्या समोरच्याचीही काही वेगळी मतं आहेत, असू शकतात आणि माझं आणि त्याचं पटलं नाही तरी काही चूक नाही ही जाणीव आपल्याला आतून मोकळं करते. मुळात आपल्याला एक लिंबूटिंबू म्हणून नाही तर स्वतंत्र व्यक्ती म्हणून मान्यता मिळणं ही गोष्ट आणखीनच सुखावून जाते.
माझ्या मते देव आहे तसा समोरच्याच्या मते तो नसूही शकतो. माझा उपासतापास, व्रतवैकल्य या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही. पण म्हणून उपास करणाऱ्या व्यक्तीच्या श्रद्धेवर टीका करण्याचा अधिकारही मला नाही. मला जी गोष्ट बरोबर वाटते ती समोरच्याला अगदीच चुकीची वाटू शकते हे भान सतत असणं म्हणजे वैचारिक स्वातंत्र्य. असं म्हणतात की, प्रत्येक पिढी येताना आपला असा एक विचार, खासियत किंवा वैशिष्टय़ घेऊन येते. आपल्या आधीची पिढी कुटुंबाला, कुटुंबातल्या एकमताला प्राधान्य देणारी होती. मग भले तो निर्णय त्यांच्या मनाविरुद्ध का असेना. पण आत्ताची पिढी ही व्यक्तिगत विचारांना जास्त प्राधान्य देणारी आहे.
मी नोकरीसाठी बाहेरगावी जाऊ नये, असं माझ्या घरातल्यांचं स्पष्ट मत आहे. पण माझ्यासाठी मी जितकी स्वतंत्र, माझी-माझी राहायला शिकेन तेवढं चांगलंच आहे असे बंडखोर पण त्याच वेळी जबाबदारीचं भान असणारे विचार ही या पिढीच्या विचारांची खासियत आहे. सोशल नेटवर्किंग साइट्सवर सडेतोड व्यक्त होतानाच समोरच्याच्या विचारांचं स्वागत करणारी ही पिढी सामाजिक स्वातंत्र्य जपते. तसंच बाहेरच्या जगात ‘पैसा किती बोलतो’ याचा अंदाज असल्याने ती शक्य तितक्या लवकर आर्थिकरीत्याही स्वतंत्र होताना दिसते.
तर मानसिक, भावनिक स्वातंत्र्यात राहण्याची चवही ही पिढी वेळोवेळी चाखते आणि म्हणूनच समोरच्यालाही ते स्वातंत्र्य मिळण्याबाबत ती सजग असते. काहीशी सॉर्टेड, रोखठोक आहे ही पिढी. एक प्रकारचं टीपकागदी मन आहे आमच्या पिढीचं. जे आहे हे असं आहे. ते तसं का यावर शक्ती खर्च नाही करत ही जनरेशन. याच्या पुढे काय ते बोला असा काहीसा कल दिसतो त्यांचा. जगा आणि जगू द्या हे नैसर्गिक तत्त्व विचारांच्या बाबतीत या पिढीला लागू पडतं. कारण समोरचा माणूस शब्दश: अर्थाने एक स्वतंत्र माणूस आहे, अस्तित्वाने आणि त्याही पलीकडे जाऊन विचारांनी. त्याचे अनुभव, आजूबाजूची परिस्थिती हे पूर्णपणे वेगळं असू शकतं, त्यामुळे त्याची चूक-बरोबर ही गणितं माझ्या उलटीही असू शकतात, हे भान ही पिढी सतत जागं ठेवते.
खरं तर तो जन्माला आला हिंदू म्हणून, पण त्याला पुढे जाऊन ख्रिश्चॅनिटीची तत्त्वं जास्त जवळची वाटत असतील तर असू दे की. त्याच्या नैसर्गिक विचारांनुसार, कलानुसार त्याला जर तो धर्म जवळचा वाटत असेल तर त्यात वावगं काय आहे. माणूस म्हणून तर तो बदलला नाहीये ना. म्हणून त्याला धर्मद्वेष्टा ठरवणारे आपण कोण? असा सहज, प्रॅक्टिकल विचार ही पिढी करू शकते. मी मला हवं तसं वागणार, मी माझ्या मनाचा राजा वगैरे खुळचट कल्पना म्हणजे स्वातंत्र्य नाही. तर ‘समोरच्याला अमुक एक गोष्ट पटते हे मान्य आहे. पण मला असं असं वाटतंय, पूर्ण विचार करून मी हे ठरवलंय आणि मुख्य म्हणजे माझ्या या निर्णयामुळे होणारं नुकसान किंवा फायदा ही दोन्ही माझीच जबाबदारी असेल’ ही जाणीव म्हणजे वैचारिक स्वातंत्र्य. माझ्या वैयक्तिक विचारांच्या पलीकडेही एक परीघ आहे, ज्याच्याशी माझं पटेल किंवा पटणार नाही ही स्पष्ट, प्रखर जाणीव आत्ताच्या पिढीत दिसते. या वैचारिक स्वातंत्र्याचं वैशिष्टय़ म्हणजे याचा प्रवाह बाहेरून आत आणि आतून बाहेर अशा दोन्ही बाजूंनी असतो. यातलं पहिल्या प्रकारातलं वैचारिक स्वातंत्र्य या पिढीत निर्विवाद आहेच. म्हणजे स्वत: सोडून बाकीच्यांच्या बाबतीतल्या विचारस्वातंत्र्याबद्दल. पण स्वत:च्या वैयक्तिक बाबतीत मात्र ही पिढी काहीशी कमी पडताना दिसते.
इतरांचे विचार प्रसंगी मान्य करणारी मी माझ्यामधल्याच विरोधाभासांना का घाबरते, या परिस्थितीत अशी वागलेय तर नंतर मला वेगळं वाटू शकतं हा विरोधाभास पचवण्याचं स्वातंत्र्य मी स्वत:ला देतेय का, मला तिचा खूप राग येतोय पण खरं तर राग येणं योग्य नाही या दोन वेगळ्या प्रतिक्रियात माझी ओढाताण होत राहते. याचा अर्थ मी कुठेतरी मला माझं स्वातंत्र्य देत नाहीये, माझ्या नैसर्गिक प्रतिक्रिया स्वीकारत नाहीये. मी जशी आहे तसं स्वीकारण्यापासून हे स्वातंत्र्य सुरू होतं खरं तर. मला माझ्या मनात येणाऱ्या विचारांचं येणंच चुकीचं वाटत असेल, मी ते विचार आलेच का म्हणून जर स्वत:ला कोसत राहात असेन तर मी चुकतेय कुठेतरी. मी कमी पडतेय मला माझं स्वातंत्र्य देण्यात. मला एखादी गोष्ट ‘वाटते’ तर वाटते. ती चूक, बरोबर, हानीकारक का चांगली हा पुढचा मुद्दा झाला. पण मुळात सुरुवातीला मी माझ्या भावना, विचार जसे आहेत तसे स्वीकारायला शिकायला हवं. तरच मी त्यात काही बदल करू शकेन.
‘त्या’च्याबद्दल आकर्षण वाटायला लागलंय. पण नाही. मला असं वाटूच कसं शकतं? असा विचार करणं चुकीचं आहे. यापेक्षा ती आकर्षणाची भावना अत्यंत नैसर्गिक आहे हे जर मी स्वीकारलं तरच मी त्यावर पुढे जाऊन विचार करू शकेन. ही बाकीच्यांबद्दल असणारी स्वातंत्र्याची सजगता आमच्या पिढीने स्वत:बद्दलही तितकीच दाखवायला हवी. समोरच्या व्यक्तीला कोणत्याही लेबलशिवाय फक्त माणूस म्हणून ही पिढी पाहते, तसंच किंबहुना त्याहून अधिक खोल जाऊन, जितक्या शक्य तितक्या सोलीव नजरेने स्वत:कडे पाहायला शिकायला हवं. स्वत:ला माणूस म्हणून आहे तसं स्वीकारणं हे आजच्या आमच्या पिढीसाठी वैचारिक श्रीमंतीकडे जाणारं आणखी एक पाऊल ठरेल. त्यातूनच घडेल आमची खऱ्या अर्थाने मानसिकरीत्या सशक्त असलेली पिढी. या स्वातंत्र्य दिनासाठीचा हा माझा संकल्प. आणि तुमचा?
रश्मी जोशी – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2015 1:25 am

Web Title: independence day special 25
Next Stories
1 एक भुयारी मार्ग…
2 ई-स्वातंत्र्याची जबाबदारी
3 पेहेरावाचं काय म्हणता राव?
Just Now!
X