04 March 2021

News Flash

पेहेरावाचं काय म्हणता राव?

कपडे ही माणसाची जितकी मूलभूत गरज आहे तितकीच ती त्याची वैयक्तिक गोष्ट आहे. पण समाजात वावरताना कुणी काय घालायचं, विशेषत: स्त्रियांनी काय घालायचं आणि काय

| August 14, 2015 01:22 am

lp20lp10कपडे ही माणसाची जितकी मूलभूत गरज आहे तितकीच ती त्याची वैयक्तिक गोष्ट आहे. पण समाजात वावरताना कुणी काय घालायचं, विशेषत: स्त्रियांनी काय घालायचं आणि काय नाही याचे आडाखे इतके ठरलेले असतात की स्त्रियासुद्धा या मुद्दय़ाकडे मोकळेपणाने बघू शकत नाहीत हे लक्षात येतं.

नेहमीप्रमाणेच खणखणीत गजर वाजला. तो एकच असा क्षण असतो, ज्या क्षणी मोबाइल फेकून द्यावासा वाटतो. तो तसा मलाही वाटलाच; पण मग आठवलं की, हा फेकला तर नवीन मिळणार नाही. हे रोजचं होतं म्हणा. मोठ्ठा आळस देऊन अंथरुणातून उठले. आजूबाजूला बघितलं. कुणीच नव्हतं. स्वयंपाकघरातून कुकरच्या शिट्टय़ांचा आवाज आला. हां! म्हणजे आई आहे याची खात्री पटली. आईला जाऊन घट्ट मिठी मारली, सकाळची गरजेची कामं आटोपली. आता दोन महत्त्वाची कामं उरली होती. एक म्हणजे बॅग भरणं आणि दुसरं म्हणजे कपडे शोधणं. त्यातलं बॅग भरण्याचं काम त्यामानानं सोपं होतं; पण कपडे..! मी मुद्दाम दुसऱ्या कामाला लागले. कपाट उघडून त्यासमोर विचार करत उभी राहिले. कुठल्या कपडय़ात मी बारीक दिसते, कुठल्या कपडय़ात जाड, मग ट्रेनमधून जाताना बायका माझ्याबद्दल काय कुजबुजतील मी हे कपडे घातले तर? किंवा रस्त्यात लोक माझ्याकडे कुठल्या नजरेने बघतील? एवढे सगळे विचार करून एक कपडय़ांचा जोड काढला आणि घातला. एवढं होईपर्यंत कळलं की, माझी नेहमीची ट्रेन चुकली आणि त्यानंतरच्या ट्रेनमध्ये जायला मला अजिबात आवडायचं नाही, कारण त्या लेडीज स्पेशल ट्रेनमध्ये बायकांचे भरमसाट ग्रुप्स आणि त्यांचे त्यांच्या नणंदा, जावा, सासवा, भाच्या, भाचरे, नवरे यांवरचे असंख्य गॉसिप्स; पण आज काही पर्यायच नव्हता. मनाची तयारी करून निघाले. न विसरता सोबत हेडफोन्स घेतले. त्यांची फार गरज होती आज. गाणी ऐकत ऐकतच ट्रेनमध्ये चढले. कितीही जागा असली तरी बायकांना कमीच. घरात फारच अ‍ॅडजस्ट करावं लागत असल्यामुळे त्याचा सगळा वचपा बायका ट्रेनमध्ये काढतात बहुधा. ढिम्म हलत नाहीत. तरी बरं, ट्रेन लेडीज स्पेशल. असो.. धक्के मारत मारत आत पोहोचले. मोकळी, चांगली जागा बघून उभी राहिले. एवढय़ा गडबडीत माझे हेडफोन्स अस्ताव्यस्त झाले. ते शोधता शोधता बायकांचं बोलणं कानावर पडलंच.
‘‘काय घातलंय बघ तिने.. केवढंसं आहे ते..’’
‘‘मी म्हणते एवढंसं घालायचं होतं तर घातलं तरी कशाला..???’’
मी घाबरून माझ्याकडे पाहिलं. मला माहीत होतं, मी काय घातलंय. तरी उगीच खात्री करून घेण्यासाठी स्वत:वरच नजर टाकली. सुटकेचा नि:श्वास. माझ्याबद्दल बोलत नव्हत्या. मग मी आजूबाजूला पाहिलं. माझ्यामागे खिडकीजवळ एक मुलगी बसलेली होती. तिने वन पीस घातला होता. स्लीव्हलेस आणि गुडघ्याच्या बराच वर होता; पण तिला छान दिसत होता. छान बारीक होती ती आणि कॅरीसुद्धा छान करत होती; पण यांना काय त्याचं? सकाळ आणि पुढचा दिवस नको का चांगला जायला? आता ती कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणारी असेल तर तिचा तो युनिफॉर्म असेल.
‘‘युनिफॉर्म असेल अहो..’’
मला जरा हायसं वाटलं हे ऐकून. कुणी तरी होतं; पण त्यांचंच पुढचं बोलणं ऐकून माझा भ्रमनिरास झाला.
‘‘हल्ली ना ऑफिसवाल्यांनाही हे असंच हवं असतं. माझी भाची आहे ना..’’
सुरूच झाल्या. यांचं सगळीकडे कुणी ना कुणी तरी कसं काय असतं बुवा..
‘‘हो का?’’
त्या काकूंना त्यांची ‘भाची’ काय घालते यात भारी रस होता.
‘‘हो. त्यांच्या ऑफिसमध्येसुद्धा हे असंच चालतं..’’
‘‘काय सांगता?’’
नुकतंच कुठल्या तरी श्लोकांचं पुस्तक वाचून झालेल्या काकू मैदानात उतरल्या. दहा वेळा तरी त्या पुस्तकाला त्यांनी नमस्कार केला असेल. कधी एकदा वाचून होतंय आणि यांच्यात सामील होतेय या भावनेने वाचलेलं पुस्तक पुन्हा पर्समध्ये ठेवत त्या बोलायला लागल्या.
‘‘काय बाई, या आजकालच्या मुली. काय घालावं हे कळतच नाही त्यांना. त्यांचे आईबाबा सांगत नाहीत का त्यांना?’’
त्या काकूंना मुलगी नसूदेत अशी मी मनोमन प्रार्थना केली.
‘‘ऐकायला हवं ना पण आईबाबांचं..’’ दुसऱ्या लगेच बोलल्या.
स्वानुभवावरून बोलत असणार.
‘‘मग पुरुषांच्या नजरा जाणार नाहीत तर काय यांच्याकडे? काही झालं की, मग त्यांना उगीच दोष.’’
या वाक्याने तर मला प्रचंड राग आला. म्हणजे करून सवरून दोष स्त्रियांचा? हा म्हणजे काही काही वेळेला कुणा एकाचाच दोष नसतो. त्या दोषासाठी बरीच कारणं असतात; पण त्यातलं कपडे हे कारण असावं हे मला पटत नव्हतं. कुठले कपडे घालावेत हे ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे. ते त्याला उपभोगू द्यावं. हे सगळं माझ्या ओठावर होतं; पण ते तिथेच राहिलं. बोलले असते तर अजून एक विषय मिळाला असता त्यांना बोलायला. ‘आजकालच्या मुलांना मोठय़ांशी बोलायची शिस्त नाही वगैरे वगैरे..’ माझं स्टेशन आलं, मी उतरले. मला माहीत होतं की, आज माझ्या डोक्यातून हा विषय काही जायचा नाही. मी विचार करत करत रस्त्यावरून चालत होते.
अश्मयुगाचा विचार केला असता तेव्हा कपडय़ांचा शोध त्यामानाने उशिरा लागला आणि जेव्हा लागला तेव्हाही ते लोक गरजेचे भाग झाकण्याएवढेच कपडे घालत होते. हळूहळू वस्त्र ही माणसाची संस्कृती बनली आणि पुढे गरज. आता कपडे म्हणजे लोकांना बोलायचा विषय आणि त्यावरून माणसाचं स्टेटस ठरवायची गोष्ट. म्हणजे माणूस शिकलेला नव्हता तेव्हा त्याला काय झाकायचं याचं ज्ञान होतंच की! तेव्हा कुणावर अतिप्रसंग ओढावले नसतील? उलट तेव्हा ज्याच्यासोबत संभोग करण्याची इच्छा निर्माण व्हायची त्याच्यासोबत करण्याची मुभा होती. अर्थात कालांतराने ते वैज्ञानिकदृष्टय़ा हानिकारक आहे हे सिद्ध झालंच आणि त्यावर उपायही आले; पण सांगण्याचा मुद्दा हा की, जसे आपण सुशिक्षित होत गेलो तसे ‘झाकलेल्या गोष्टी जास्त आकर्षित करतात’ हे विसरत गेलो आणि समाजाच्या दडपणाखाली पेहेरावाचं स्वातंत्र्य गमावून बसलो.
आजही कुठे लग्नाला जायचं असेल तर लोक काय कपडे घालून येतील या अंदाजाने आपण आपल्या कपडय़ांची निवड करतो. साधं पार्टीला जायचं तरी त्यात आपणच कसे शोभून दिसू याचा विचार. मला वाटतं कधी तरी आपण लोकांच्या दिसण्यात यावं यासाठीही वेगवेगळ्या कपडय़ांचा आधार घेतला जातो. पुन्हा खरंच काय घालायचं या स्वातंत्र्यावर मुरडच. कुठलीही गोष्ट करताना ‘लोक काय म्हणतील?’ हा प्रश्न आपल्याला सतत भेडसावत असतो; पण या प्रश्नामुळे आपण आपलं स्वातंत्र्य धोक्यात आणतो त्याचं काय? याचा अर्थ कसेही कपडे घालावेत असा नाही. जागेचं, वेळेचं, लोकांचं भान ठेवून कपडय़ांची निवड करावी, तेही आपल्या स्वातंत्र्याला धक्का लागू न देता. चुरशीचं काम आहे; पण जमलं ना तर एक चांगली विचारसरणी घडेल यात शंकाच नाही.
बरं राहता राहिला प्रश्न पुरुषांचा. ज्या पुरुषांचा स्वत:वर ताबा नसेल त्यांना कपडय़ांची गरज काय? मला आमच्या एका मॅडमनी एका बौद्ध तपस्व्याची गोष्ट सांगितली. ती इथे आठवली. त्यात दोन तपस्वी निघालेले असतात. त्यांना एक नदी पार करून पलीकडे जायचं असतं. त्या नदीकाठी त्यांना एक स्त्री दिसते. ती त्यांना विनंती करते की, मला ही नदी ओलांडता येणार नाही. तरी कृपया मला तुमच्या पाठीवरून पलीकडे घेऊन चला. त्यांच्यातला एक तपस्वी तिला भर पावसात आपल्या पाठीवर घेऊन नदी पार करतो. तिला नदीकाठी सोडून ते आपल्या आश्रमात पोहोचतात तेव्हा दुसरा तपस्वी त्याला विचारतो, की तू असं कसं काय तिला पाठीवर उचलून घेतलंस. तेव्हा पहिला म्हणतो, अरे मित्रा, मी तिला नदी ओलांडल्यावर लगेचच पाठीवरून खाली उतरवलं. तू तिला अजून तुझ्या खांद्यावर वागवतो आहेस. आपण कुठला तपस्वी व्हायचं हे आपल्या हातात आहे, नाही का? निसर्गाने आपल्याला दिलेलं एक शरीर आहे. ती एक रचना आहे. ती थोडय़ाफार फरकाने सगळ्यांची सारखीच आहे. मग जे निसर्गत: आहे त्याची लाज का वाटावी? हे शरीर कितपत झाकावं आणि कितपत झाकू नये हे ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे. हा, आता यात भान इतकंच ठेवलं पाहिजे की, आपल्या शरीराला ज्या कपडय़ाची सवय आहे, जे कपडे त्या शरीराला शोभून दिसतात त्यांनी ते तसे घालावेत. आपण जे काही घालू ते आपल्याला कॅरी करता आलं पाहिजे. ते जर येत नसेल तर लोकांच्या नजरा आपल्याकडे जास्त वळतात. आता ज्यांना वळवायच्या असतील त्यांचं स्वातंत्र्य काही आपण हिरावून घेऊ शकत नाही. जिथे आपण सुरक्षित आहोत याची आपल्याला खात्री आहे तिथे आपली हौस पुरवावी. सगळीकडेच काही आपल्याला तपस्वी भेटणार नाहीत. तपस्वी नसणाऱ्यांशी कसं वागावं हे आपल्याला माहीत असलं म्हणजे झालं. नऊवारीपासून ते शॉर्ट्सपर्यंतचा प्रवास हा केवळ आपल्याला पेहेरावाचं स्वातंत्र्य होतं म्हणूनच झाला, नाही तर आजही आपल्याला नऊवाऱ्या नेसून ट्रेनने प्रवास करावा लागला असता. आपल्या कम्फर्टनुसार आपण नऊवारीला ड्रेस हा पर्याय शोधलाच ना? प्रत्येकाची कम्फर्टेबल वाटण्याची पद्धत वेगळी असू शकते. कपडय़ांची नेमकी गरज ओळखली पाहिजे.
आता सकाळी मीही कपडे घालताना केलेला विचार मला आठवला. तो चुकीचा कसा होता हे विचारानिशी पटलं. हे मला आईने काय किंवा दुसऱ्याने काय कितीही वेळा सांगायचा प्रयत्न केला असता तर पटलं नसतं. जेव्हा स्वत: अनुभवलं तेव्हा पटलं. विचार करत करत मी कॉलेजमध्ये पोहोचले. आत शिरल्या शिरल्या गेटजवळ प्रचंड गर्दी जमलेली होती. गर्दीतून वाट काढत काढत पुढे गेले. पथनाटय़ाची स्पर्धा चालू होती. त्यातलंच एक पथनाटय़ सुरू होतं. ट्रेनचा सीन आणि एक मुलगी दुसऱ्या मुलीच्या कानात सांगत होती..
‘‘ए.. ती बघ तिने नऊवारी नेसालीये..’’
‘‘अय्या!!! हो..! काय बाई, आजकालच्या मुलींना कुठे काय घालायचं काही कळतच नाही.’’
ती नऊवारी नेसलेली मुलगी पुढे आली आणि त्या मुलींना कपडे घालण्याच्या स्वातंत्र्यावर डोस द्यायला लागली. मला मनापासून हसायला आलं. त्यातलं एक वाक्य ऐकलं आणि मनात पक्कं बसवलं. ‘‘स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. जबाबदारीने केलेली कृती म्हणजे स्वातंत्र्य. अशा स्वातंत्र्याचं भान अंगभर गुंडाळलं, नेसलं की त्याचं ओझं होत नाही.’’ मी असं भान नेसायचं ठरवलं आणि खऱ्या अर्थाने दिवसाला सुरुवात केली.
ऋतुजा फडके – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2015 1:22 am

Web Title: independence day special 28
Next Stories
1 चित्ती असावे सावधान..!
2 इतरांचीच लगीनघाई
3 नांदा सौख्यभरे
Just Now!
X