01 March 2021

News Flash

चित्ती असावे सावधान..!

एखाद्यानं इतक्यात लग्न करायचं नाही असं म्हटलं की त्याला वेगवेगळे लोक वेगवेगळे प्रश्न विचारून भंडावून सोडतात.

| August 14, 2015 01:21 am

lp21lp10एखाद्यानं इतक्यात लग्न करायचं नाही असं म्हटलं की त्याला वेगवेगळे लोक वेगवेगळे प्रश्न विचारून भंडावून सोडतात. पण लग्न कधी करायचं हे ठरवण्यासाठी, त्यावर विचार करण्यासाठी एखाद्याला खरोखरच वेळ हवा असेल तर तो द्यायला हवा. पण ही मानसिकताच आपल्या समाजात नाही.

कौटुंबिक समारंभांना जायचं म्हटलं की सध्या धडकीच भरते. पहिला आणि शेवटचा प्रश्न ठरलेला. काय मग लग्न केव्हा? हे इथवरच थांबत नाही, तर गाडी प्रश्नांच्या प्लॅटफॉर्मवरून पुढे सल्ल्यांवर घसरते आणि मग पुन्हा एकदा निश्चय करावा लागतो, यापुढे कौटुंबिक कार्यक्रमांना जाणं बंद. पण आपल्याला ध्यानात कोण घेतो? अरे मस्त स्वातंत्र्यात जगतोय आम्ही, कशाला उगाच बेडय़ा घालता? वय आहे ते, वाढणारच. पण म्हणून काय ‘उरकून’ टाकायचं?
लग्नाला नाही म्हणत नाहीए, पण आणखी थोडा वेळ द्या, एवढंच म्हणणं आहे. कारण त्याला कारणं पण तशी आहेत. ‘शादी का लड्डू खाये वह भी पछताये, जो न खाये वह भी पछताये’, हे समजण्याइतपत मोठे झालोय आता आम्ही. एकीकडे बॅचलर लाइफ एन्जॉय करताना दुसरीकडे तिशीकडे झुकलो तरी हक्काचा माणूस अजून मिळाला नाही याची खंत पण आहेच की. पण आशा सोडणार नाही, शोध सुरू आहे. घरच्यांनी त्यांच्या कर्तव्यपूर्तीसाठी पिच्छा पुरवला असताना कधी कधी त्यांचा राग येत असला तरी, ‘तुझी निवड तू कर’, ही दिलेली मोकळीक जबाबदारीची जाणीवही करून देत असते. मुलींचं लग्न लावून देणं, ही पालकांची जबाबदारी असते. पण सून म्हणून योग्य मुलगी घरात आणणं ही त्याहून मोठी जबाबदारी आपल्या मर्जीने लग्न करणाऱ्या मुलांवर असते. आजच्या डिजिटल युगात शहरातील पालक मुलाच्या समजूतदारपणाचा आणि स्थैर्याचा विचार करून लग्नाचं स्वातंत्र्य देत असल्याचं चित्र काही प्रमाणात दिसतंय, पण ग्रामीण भागातही हीच परिस्थिती आहे, असं विधान करणं धाडसाचं ठरेल.
जानेवारी १८९१ मध्ये संमतीवयाचे बिल ब्रिटिश सरकारने चर्चेसाठी आणले होते. आईवडिलांनी लहान मुलामुलींना विवाहाची बळजबरी करू नये आणि त्यांची समज व शरीराची योग्य वाढ झाल्यावरच त्यांच्या संमतीने विवाह व्हावा अशी मुख्यत: त्या बिलाची धारणा होती. सनातनी लोकांचा त्याला विरोध होता आणि सुधारकांचा त्याला पाठिंबा होता. आता भारतीय विवाह कायद्यानुसार लग्नासाठी मुलाचे २१ आणि मुलीचे १८ वय निर्धारित करण्यात आले आहे. पण लग्नासाठी गुडघ्याला बाशिंग बांधणाऱ्या नवरोबांचे व हळद पिऊन गोरी होण्याची घाई असणाऱ्या पोरींचे बोहल्यावर चढण्याचे वय आता वाढले आहे. ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या विवाह जुळविणाऱ्या संस्थेने महानगरांत केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. मुंबई, बंगळुरू, दिल्ली, गुजरात, चेन्नई या शहरांत केलेल्या पाहणीत मुलींची लग्ने आता २८व्या, तर मुलांची लग्ने आता तिशीत होऊ लागली आहेत.
लग्नाचे वय वाढले आणि आपला साथीदार निवडण्याचे स्वातंत्र्य मिळाले असले, तरी त्या वर्गाची विचारसरणी काय आहे? कारण या विचारसरणीच्या वर्गामध्येही दोन गट पडतात. एक गट, जो धावत्या जगासोबत स्पर्धा करण्यासाठी, ऐहिक सुख मिळवण्यासाठी आटापिटा करतोय आणि दुसरा, जो या सगळ्याच्या पलीकडे जाऊन समाजातील भंपक गोष्टींना बळी न पडता आपली तत्त्वं जपत प्रत्येक क्षण, स्वप्नं जगता यावीत म्हणून मनासारखा साथीदार शोधण्यासाठी वेळ घेतोय.
यामध्ये प्रेम या व्याख्येलाही विशेष महत्त्व आहे. कारण आपण कोणत्या वयात प्रेमात पडतोय यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. त्यामुळे कदाचित प्रेमात पडताना समोरच्या व्यक्तीची पाश्र्वभूमी काय आहे हे लक्षात येत नाही. पण जसजसे आपण नात्यामध्ये पुढे सरकतो त्याला जगण्याचे इतर नियमही लागू होतात. आणि मग प्रेमभंग, आर्थिक स्थैर्य किंवा कमी वयात लग्न झालंच तर कधी कधी संशय आणि त्यातून घटस्फोट या गोष्टीही येऊ शकतात. अशा वेळी आपल्या आधीच्या पिढीने लग्न हा जगण्याचा आणि संस्कृतीचा एक भाग म्हणून त्याचा स्वीकार केला आणि त्याचं ते काटेकोरपणे पालन करत असल्याचं दिसतं. परंतु, आजची पिढी तोच कित्ता तंतोतंत गिरवेल असं नाही.
आजची पिढी अस्थिर आहे. त्यांच्या स्वातंत्र्याची व्याख्या वेगळी आहे. आणि ती व्याख्या योग्य आहे की अयोग्य आत्ताच सांगणे कठीण आहे. कारण त्यासाठी त्यांना वेळ द्यावा लागेल. कदाचित आणखी वीस वर्षांनंतर त्यांच्या स्वातंत्र्याच्या व्याख्येचं विश्लेषण समाज करू शकेल.
भारत सरकारच्या २०११ सालच्या अधिकृत आकडेवारीनुसार दर एक हजार पुरुषांमागे केवळ ९४० महिला आहेत. आता तुम्हीच सांगा जर त्या उरलेल्या ६० लोकांमध्ये आमचा नंबर लागत असेल, तर कसं होईल आमचं लग्न बुवा. कारण लग्नाच्या बाजारात (हा शब्द अनेकांना खटकेल पण मॅट्रिमोनी साइट्सवर जाऊन बघा एकदा. तुम्हाला मस्तपैकी कस्टमाइज करून मुलींसमोर सादर केलं जातं.) उभा असलेला मुलगा एखाद्या बर्गरचं आयुष्य जगत असतो. तुम्ही त्यात कितीही गोष्टी भरा, समोरच्या पार्टीला त्या कमीच वाटत असतात. मुलगा मितभाषी, उच्चशिक्षित आहे, कौटुंबिक पाश्र्वभूमी चांगली आहे, घरातील लहान-मोठय़ा भावंडांची लग्नं झालेली आहेत, लग्नानंतर राजा-राणीसारखा संसार करण्यासाठी स्वत:च्या नावावर घर आहे (तेही मेट्रो सिटीमध्ये), चांगला पाच आकडी पगार आणि बँकबॅलन्सही चांगला आहे, कुठलंही व्यसन नाही, दिसायला पण बरा आहे, स्वत:ची निदान दुचाकी तरी सध्या आहे आणि थोडय़ाच दिवसात चारचाकी गाडीही दारात उभी राहील, दोन-चार परदेश वाऱ्याही झालेल्या आहेत, निरीश्वरवादी नाही, आपला धर्म आणि जातीतला आहे, ही यादी संपता संपत नाही. आता मुलीच्या घरच्यांच्या एवढय़ा अपेक्षा असताना. मुळात उशिरा बोहल्यावर चढणाऱ्या अनेक मुलांच्या अपेक्षा या पठडीतल्या मुलांपेक्षा थोडय़ाफार वेगळ्या असतात हे मान्य. मग हे स्वातंत्र्य त्याला जोपासायचे असेल तर. म्हणूनच आपल्या व्याख्येत बसणारी योग्य साथीदार मिळवण्यासाठी मागितलेला तो वेळ असतो.
समाज बदललाय असं आपण हल्ली म्हणतो, पण भारतीय समाज हा जेव्हा ‘लग्न’ या गोष्टीपाशी पोहोचतो तेव्हा त्याला त्याच जुन्या गोष्टीत रमायला आवडतं. समारंभ, कौटुंबिक जबाबदारी, मुलं-बाळं आणि आयुष्याच्या शेवटापर्यंत ‘साथ जिएंगे-साथ मरेंगेचं वचन’. लग्न झालं की मुलगी आपल्या सर्व आवडीनिवडी, इच्छा-आकांक्षा, ध्येय, विचारसरणी, जबाबदाऱ्यांना तिलांजली देऊन मुलाच्या गळ्यात पडते. नवरा जी सांगेल ती पूर्व दिशा. हे असं का असावं? इतर ठिकाणी स्वातंत्र्याच्या गप्पा मारणारा समाज अथवा मुलं-मुली नेमकी या ठिकाणी असं का वागतात?
स्वतंत्र विचार करणारी, स्वत:च्या सामाजिक, आर्थिक जबाबदारीचं भान असणारी मुलगी ही आपली ओळख लग्नानंतरही कायम ठेवावी असं का नाही वाटत मुलींना? अनेक मुलींना वाटतंही असेल, पण पुन्हा आपला समाजच या स्वातंत्र्याच्या आडवा येतो. एकदा का लग्न झालं, की मुलगी मुलाच्या दावणीलाच बांधलेली असली पाहिजे. माहेरी स्वयंपाकघरात पाऊल न ठेवलेल्या मुलीने मुलाच्या घरात मात्र ते सर्व शिकून जेवणासह धुणीभांडी आणि इतरही कामं केली पाहिजेत, असा नियम असतो. आपण यासाठी आणतो का जोडीदाराला घरी? आईवडिलांना याची जाणीव असणं गरजेचं आहे. कदाचित आईवडिलांच्या पिढीतर्फे हा बदल लगेच स्वीकारला जाणार नाही; पण त्याची जाणीव आजच्या पिढीने त्यांना करून देणं गरजेचं आहे. मुलाच्या लग्नाचा प्रश्न आला, की सासू-सुनेच्या नात्याचा प्रश्न ऐरणीवर असतो. त्या एकमेकींना समजून घेतील की नाही? म्हणजे पुन्हा मुद्दा एका स्त्रियांनी एकमेकींना समजून घेण्याचा आहे; पण या सगळ्यात बळी जातो तो पुरुषांचा. अशा वेळी जर पुरुषांच्या मानसिकतेत काळानुरूप बदल होत असेल तर स्त्रियांच्या मानसिकतेतही तो बदल नको का व्हायला?
एका विशिष्ट वयात विशिष्ट मूल्यांचा आग्रह आणि श्रद्धांच्या पुरस्काराबरोबरच प्रत्येक विचारसरणी ही माणसाला जीवनदृष्टी व विश्वदृष्टी देत असते. या जीवनदृष्टी व विश्वदृष्टीमुळे माणसाला त्याचे जीवन अर्थपूर्ण वाटू लागते. आपल्या अस्तित्वाला, जगण्याला काही प्रयोजन आहे असा विश्वास त्याला वाटू लागतो. हा विश्वास निर्माण होणं खूप गरजेचं आहे. उशिरा लग्न करताना मुलांच्या मनात अशा अनेक गोष्टी पक्क्या झालेल्या असतात. आपल्याला नक्की काय विचारसरणीची मुलगी हवी आहे. तिची सामाजिक, आर्थिक आणि महत्त्वाचं म्हणजे राजकीय जाण काय आहे. तो एकाचं दुकटं होणं पुढे ढकलंत असतो, कारण त्याच्या विचारांशी सुसंगत व्यक्ती त्याला अद्याप मिळालेली नसते. लग्न झाल्यावरपण मुक्ती मिळेल असं नाही. जबाबदाऱ्या वाढतच राहतात. मुलगी लग्न करून घरी येते; पण आजही मुलाला घरजावई बनवून घ्यायला कोणी तयार होत नाही. मुलाने मुलीपेक्षा जास्त कमवावं. त्यामुळे कमी पगाराची नोकरी असलेली मुलगी बघा. जास्त पगार असलेल्या मुली कमी पगार असलेल्या मुलांशी कधीच लग्न करत नाहीत. त्यांना वेगळ्या धर्माचा, खालच्या जातीचा मुलगापण नको असतो. मुलींना लग्नाच्या बोहल्यावर चढताना ज्या समस्यांना सामोरं जावं लागतं, तेच पुरुषांच्या बाबतीतही होतंच, हे आपण कधी समजून घेणार? कारण आज जी कुटुंबव्यवस्था आपल्याकडे टिकून आहे त्यामध्ये स्त्रियांइतकाच पुरुषांचाही तितकाच वाटा आहे.
दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हादेखील आदर्श सहजीवनाकडे नेणारा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो हे लग्नसंस्थेच्या जोखडात अडकलेल्या भारतीय समाजाला हळूहळू ध्यानात येत आहे. तसेच कायद्याच्या नजरेत ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मधील नातेसंबंध हे अवैध ठरू शकत नाही. दुर्दैवाने आपल्याकडे हा पर्याय फार उशिरा म्हणजे जेमतेम पाच-सात वर्षांपासून व्यवहारात आला, चर्चेत आला. आपल्या संस्कृतीत तो पचनी पडणारा नाही. त्यामुळे या पर्यायाला तितकीशी समाजमान्यता अजूनही मिळालेली नाही व गैरसमजुतीही दूर झालेल्या नाहीत. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ आपल्या भारतीय संस्कृतीतील विवाहसंस्थेच्या चौकटीत बसत नाही. तसेच पुन्हा ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मधील जोडप्याला ‘कायदेशीर विवाहित’ दर्जा देण्याचा बाष्कळ प्रयत्न चालला आहे. त्यांना जर पुन्हा लग्नाच्याच जोखडात बांधून ठेवायचे असेल, तर या नात्याच्या व्याख्येलाच तडा जाईल हे त्यांच्या ध्यानात कसे येत नाही? हीच बाब समलिंगी विवाहाबाबत म्हणता येईल. त्यांना त्यांच्या नैसर्गिक इच्छा-आकांक्षांपासून जबरदस्तीने दूर नेण्याचा प्रयत्न करून आपण आपल्याच अडचणी वाढवत आहोत, कारण त्यामुळे दोघांपैकी कुणाचाही भविष्यकाळ सुखकर असू शकत नाही; पण ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ असो वा ‘समलिंगी विवाह’, दोन्ही नात्यांमध्ये आपल्या स्वातंत्र्याचा आग्रह धरताना इतर कुणाला त्याची इजा पोहोचणार नाही आणि समाजामध्ये त्याबाबत नकारात्मक वातावरण निर्माण होणार नाही, ही आजच्या पिढीची जबाबदारी आहे; पण हे तपासून पाहू द्यायला मागची पिढी त्याविषयी फार उत्सुक दिसत नाही. त्यामुळे त्याबाबतीतले पूर्ण स्वातंत्र्य मुलांना अजून मिळालेले आहे असं चित्र सध्या तरी दिसत नाही.
आपला समाज कुटुंबसंस्थेतील बदलाच्या एका महत्त्वाच्या वळणावर येऊन उभा राहिला आहे. आजचे कायदे स्त्रियांच्या बाजूने अधिक सक्षम झाले आहेत. त्यामुळे एखाद्या मुलीने माझी फसवणूक झाली, जोडीदार मानसिक /शारीरिकदृष्टय़ा अपंग/कमजोर आहे, वाईट सवयी/संशयी, तापट स्वभावाचा आहे, अशा शंका उपस्थित केल्या, तर त्याचा त्रास केवळ मुलीलाच नाही, तर मुलालाही सहन करावा लागतो, त्याची परिणती घटस्फोटातही होते, कारण फसवणूक मुलींचीच होते असे नाही, तर मुलांचीही होते. बराच खर्च करून झालेल्या अशा लग्नातील फसवल्या गेलेली व्यक्ती आयुष्यातून उद्ध्वस्त होतात. वर्तमानपत्र, टीव्ही, इंटरनेट या माध्यमांतून स्त्रीच्या मानसिकतेची दुसरी बाजूही लोकांच्या समोर येऊ लागली आहे. अशा वेळी मुलाला लग्नाचे स्वातंत्र्य असेल तर या गोष्टी टाळता येऊ शकतात.
मुळात प्रश्न केवळ स्वत:च्या स्वार्थासाठीच्या स्वातंत्र्याचा नसून ते स्वातंत्र्य नेमकं कशासाठी मागितलं जातंय याचा आहे. आपल्या मर्जीने लग्न करताना त्यांना आपल्या विचारांशी, ध्येयाशी तडजोड करायची नाहीए. स्वार्थीपणा हा केवळ आर्थिक बाबतीत नाही, तर विचारसरणीच्या बाबतीतही असतो हे आजच्या काळातही सिद्ध करून विचारांना कृतीची जोड देण्याचा तो एक प्रयत्न आहे. लग्नासाठी आजची पिढी जो वेळ मागतेय तो कितपत सत्कारणी लागतोय आणि खरंच त्यातून काही सकारात्मक बदल घडून येत आहेत का, समाज म्हणून आपण प्रगल्भ होतोय का, याचा अंदाज काही वर्षांनंतर येईल; पण त्यासाठी आजच्या पिढीला त्यांच्या संकल्पना राबवण्याची, वेगळी वाट चोखाळून पाहण्याची संधी पालकांनी द्यायला हवी. मुलांनीही त्या संधीचा योग्य वापर करून जबाबदारीचे भान ठेवून वागले पाहिजे, तरच या लग्न-स्वातंत्र्याचा वैयक्तिकदृष्टय़ा त्यांना आणि समाजाला फायदा होईल.
प्रशांत ननावरे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2015 1:21 am

Web Title: independence day special 29
Next Stories
1 इतरांचीच लगीनघाई
2 नांदा सौख्यभरे
3 एकला चलो रे…
Just Now!
X