News Flash

आधी देश… मग आपण

स्वातंत्र्याचे दोन प्रकार आहेत. देशाचं स्वातंत्र्य आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य. व्यक्तिगत स्वातंत्र्याचा विचार करताना देशाच्या स्वातंत्र्याचा

| August 15, 2014 01:30 am

स्वातंत्र्याचे दोन प्रकार आहेत. देशाचं स्वातंत्र्य आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य. व्यक्तिगत स्वातंत्र्याचा विचार करताना देशाच्या स्वातंत्र्याचा मात्र आपल्याला विसर पडतो. हे टाळण्यासाठी आधी राष्ट्र चालवण्यासाठी घालून दिलेले नियम लक्षात घ्यायला हवे; मगच व्यक्तिगत स्वातंत्र्याचा विचार करायला हवा..
स्वातंत्र्य ही संकल्पना एका मानसोपचार तज्ज्ञाच्या नजरेतून..

माणसाच्या डोक्यातलं विचारचक्र सतत सुरू असतं. मल्टिटास्किंग स्किल सगळय़ांकडे असतंच असं नाही. पण, खरं तर माणूस एका वेळी अनेक कामं करत असतो. एक त्या वेळी तो करत असलेलं काम आणि दुसरं म्हणजे अविरत विचार करणं. अनेक कामं करत असताना त्याचा मेंदू सुरूच असतो. विचार करण्यासाठी. आजच्या धावपळीच्या जीवनात आणि सततच्या ताणतणावामुळे, विचार करण्यामुळे अनेकदा तो ‘मेंटली थकलोय’ असं म्हणतो. पण, मेंदू थकलाय हा केवळ एक विचार आहे. हे प्रत्येकाच्या त्या वेळच्या मन:स्थितीवर अवलंबून असतं. त्यामुळे आजकाल ‘स्पेस’ हा शब्दही अनेकांच्या अतिशय जवळचा झालाय. याला कारणही तसंच आहे. कारण, आजच्या धावपळीच्या जगात माणूस लवकर थकतो, रोजच्या कामाला, रुटीनला कंटाळतो. आणि त्याला हवा असतो तो ब्रेक. या ब्रेकलाच आता नवं नाव पडलंय ते म्हणजे स्पेस. पण, ही स्पेस म्हणजे अनेकांना स्वातंत्र्य वाटतं. असं वाटणं अगदीच चुकीचं नाही. पण कंटाळून, जबरदस्तीने स्पेस घेतली तर मात्र ती उपयोगाची नाही. कंटाळून घेतलेली स्पेस हे स्वातंत्र्य असू शकत नाही. एखाद्या गोष्टीला कंटाळून स्पेस न घेता स्वतमधल्या नव्या गोष्टींचा शोध घेण्यासाठी, तुमच्या आवडीच्या गोष्टींमध्ये काहीतरी नवीन करू पाहण्यासाठी घेतली पाहिजे. कारण कंटाळून घेतलेली स्पेस किंवा ब्रेक हा नकारात्मकतेकडे वळतो. ती माणसाच्या मानसिक अवस्थेसाठी अयोग्य ठरते.
प्रत्येकाची स्वातंत्र्याची व्याख्या व्यक्तिगणिक बदलत जाते. कोणाला एकटेपणात स्वातंत्र्य हवं असतं तर काहींना छंद जोपासताना आपलं स्वांतत्र्य उमगतं. काहींना अशा प्रकारच्या स्वातंत्र्याची गरजच भासत नाही. कारण अशी व्यक्ती जाऊ त्यांच्यात मिसळत असते आणि आनंदी असते. एखाद्या कंपनीत किंवा सोसायटीत किंवा अगदी कॉलेजचं उदाहरणही इथे चालेल. अशा ठिकाणी काही जण असेही असतात जे व्यक्तीनुसार त्यांचा दृष्टिकोन बदलतात. त्यामुळे त्या लोकांना ती व्यक्ती जवळची वाटते. आणि त्या व्यक्तीला वेगवेगळय़ा प्रकारच्या माणसांना भेटल्यामुळे कंटाळवाणं वाटत नाही. म्हणूनच अशा व्यक्तीला तो नेहमीच स्वतंत्र आहे असं वाटत असतं. स्वातंत्र्याप्रमाणेच स्पेस या संकल्पनेची व्याख्याही व्यक्तिपरत्वे बदलत जाते. यात सगळय़ात आधी दोन महत्त्वाचे भाग पडतात; ते म्हणजे स्त्री आणि पुरुष. पुरुषांना टीव्हीसमोर बसण्यासाठी, एकटं राहण्यासाठी, मित्रांसोबत राहण्यासाठी स्पेस हवी असते. याला ते स्वातंत्र्य म्हणतात. तर स्त्रियांना मनसोक्त गप्पा मारण्यासाठी, प्रॉब्लेम्स शेअर करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी स्पेस हवी असते. तिला गप्पा मारायला आवडतं कारण एखाद्याने समजून सांगण्यापेक्षा तिला कोणीतरी समजून घेतंय ही भावना तिच्यासाठी सुखावणारी असते. अशा व्यक्तीला ती प्रतिसाद देते. त्यामुळे स्वातंत्र्याबद्दल मुळातच स्त्री-पुरुषांचे दृष्टिकोन बदलत जातात. त्यांनी घेतलेल्या स्पेसचा त्यांनी फायदा करुन घेतला पाहिजे. ज्यामुळे तुमचा थकवा दूर होईल. पण, ही स्पेस छंद जोपासणारी असावी, मनाचा विकास करणारी असावी. मनाने थकून जाऊ नये. रोजच्या जीवनात आनंदी, उत्साही राहण्यासाठी या स्पेसचा उपयोग करावा. जेणेकरुन तुम्हाला तुमचं जीवनच एक ‘स्पेस’ वाटेल.
ब्रिटिश आपल्याला ‘इन्डिपेंडन्स’ हा शब्द देऊन गेले. पण, या शब्दाचा नेमका अर्थ काय? याचा शब्दश: अर्थ स्वावलंबन होतो. पण, आपण तो स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. स्वातंत्र्य म्हणजे स्वतचं तंत्र. म्हणजे स्वायत्त होणं. त्यामुळे स्वातंत्र्य आणि इन्डिपेंडन्स हे दोन वेगळे शब्द आहेत. एखादा माणूस स्वावलंबी असतो म्हणजे तो कोणावरही अवलंबून नसतो. त्याचं कोणावाचून अडत नाही. पण, असं कोणी नसतं. असलंच तर तो अपवाद ठरेल. मुळात या स्वातंत्र्यात दोन टप्पे आहेत. एक देशाचं स्वातंत्र्य आणि दुसरं व्यक्तिगत स्वातंत्र्य. देशाच स्वातंत्र्य म्हणजे राज्यघटनेने बनवलेले नियम आणि त्याचा आदर करण्याची अपेक्षा. तर व्यक्तिगत स्वातंत्र्य म्हणजे एखाद्याची विचारसरणी आणि वागणूक. ज्यामुळे एखाद्याचं व्यक्तिमत्व घडतं. यात पहिल्या स्वातंत्र्याकडे फारसं कोणाचं लक्ष नाही. प्रत्येकजण स्वतचाच विचार करतोय. एक उदाहरण देतो. गाडी चालवताना एखादा माणूस नियम न पाळता पुढे निघून जातो. पुढे निघून जाणं हे त्याचं स्वातंत्र्य आहे. पण, नियम मोडून स्वातंत्र्याचा उपभोग घेणं हे मात्र देशाचं स्वातंत्र्य नक्कीच नाही. व्यक्तिगत स्वातंत्र्य हे एखाद्याच्या विचारांचा विकास होण्याकरता आहे; नियमांचं उल्लंघन करण्यासाठी नव्हे, हे प्रत्येकाने ध्यानात घेतलं पाहिजे.
देशाचं स्वातंत्र्य हे काही नियम घालून मिळालेलं स्वातंत्र्य आहे, तर व्यक्तिगत स्वातंत्र्य म्हणजे एखाद्याला वाटेल ते करण्याची मुभा असणं. पण सगळ्यात आधी देशाच्या स्वातंत्र्याचा विचार करायला हवा. मग व्यक्तिगत स्वातंत्र्याचा. दुर्दैवाने असा विचार करणारे फार कमी लोक असतात. प्रत्येकजण आपापला विचार करण्यात मग्न असतो. बहुतांश लोक त्यांच्या सोयीने नियमांचं मोजमाप करतात आणि त्यांना ते त्यांच्याच हिशेबाने बदलतात. मध्यंतरी मी एका फोरममध्ये गेलो होतो. तिथे भारतीय माणसाचा एक गुण सांगितला गेला. तो असा की, त्याच्याशी कोणी चुकीचं वागलं तर ते त्याला जराही आवडत नाही. त्याला खूप राग येतो. यात पुढची गंमत अशी की, अमुक एक गोष्ट त्याला चुकीची वाटेल, पण तीच गोष्ट त्याने केली की मात्र तो स्वत:ला सिद्ध करून तो बरोबर कसा हे पटवून देतो. उदाहरणार्थ, रस्त्याने जात असताना एखाद्याने कचरा फेकला आणि तो त्याच्या अंगावर किंवा गाडीवर पडला तर तो चूक. पण, त्या व्यक्तीने स्वत: आजूबाजूला कोणी नाही हे बघून कचरा गुपचूप रस्त्यावर फेकला तर मात्र ते चालून जातं. ही विचारसरणी चुकीची आहे. देशात असेही काहीजण असतात जे दुसऱ्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेण्यामध्येच समाधान मानतात. हे त्यांच्याकडून अजाणतेपणाने होत असतं, पण ते झाल्यावर त्यावर विचार करणं गरजेचं असतं. ते होताना दिसत नाही.
माणसामध्ये इड, इगो आणि सुपरइगो या तीन महत्त्वाच्या गोष्टी असतात. इड ही गोष्ट जन्मत:च माणसात असते. माणसाला जे हवं असतं त्या गोष्टीला इड म्हणतात. पण, तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सगळ्यांना सगळंच हवं असतं. मोठं होत असताना समाजाचं, आपलं हित माणसाला कळायला लागतं. काय चूक, काय बरोबर याची जाणीव होते. सगळंच काही बरोबर आणि चांगलंच करावं या गोष्टीला सुपरइगो म्हणतात. इड आणि सुपरइगो यांना फिल्टर करून माणसाने रिअॅक्ट कसं व्हायचं या गोष्टीला इगो म्हणतात. इगो हा सर्वसाधारणपणे अहंकार या व्याख्येकरता वापरला जातो. इड आणि सुपरइगो या दोन्ही टोकांना माणूस जगू शकत नाही. इगो एखाद्या फळीच्या मधल्या भागाचं काम करतो. ज्याच्या दोन टोकांना इड आणि सुपरइगो आहे. हा इगो कधी इडच्या बाजूने, तर कधी सुपरइगोच्या बाजूने असतो. इगो ही खूप गरजेची आणि महत्त्वाची गोष्ट असते. कारण ती बॅलन्स्ड ठेवण्याची महत्त्वाची भूमिका बजावते. जे योग्य आहे त्यालाच स्थान देते. पण स्वत:च्या गरजेनुसार आणि मेंदूनुसार. मात्र इगोचा बॅलन्स गेला तर एकतर तो इडकडे झुकतो म्हणजे मला हवं म्हणजे हवंच किंवा मला हे करायचंच या अॅटिटय़ूडकडे झुकतो किंवा मग सुपरइगोकडे वळतो म्हणजे परिस्थिती समजूतदारपणे सांभाळण्याकडे झुकतो. पण असं वागायला एखाद्याची मन:स्थिती उत्तम असणं आवश्यक असतं; जी मोजक्यांकडेच असते. हे सगळं सांगण्यामागचं कारण असं की, या तीन गोष्टींनुसार माणूस विचार करत असतो. यामध्ये समतोल असेल तरच अनेक गोष्टी साध्य होतात; नाहीतर विचारांची घडी विस्कटते. तसंच स्वातंत्र्याचं आहे. स्वातंत्र्याबाबतही असा समतोल विचार करता आला पाहिजे.
प्रत्येक वयात ठरावीक स्पेस, स्वातंत्र्य मिळणं आवश्यकच असतं. स्वातंत्र्याचा गैरफायदा घ्यायचा नाहीच, पण त्यासाठी मन मारून एखादी गोष्ट करायची राहून गेली असंही करू नये. नियम सांभाळून स्वातंत्र्याचा उपभोग घ्यायला हरकत नाही. लहान मुलांना खेळण्याचं, थोडं मोठं झाल्यावर मित्र-मैत्रिणींच्या सहवासाचं, तरुणपणी रिलेशनशिपचं, कालांतराने स्वकमाई आणि बचतीचं, ओळख मिळवण्याचं असं प्रत्येक वयातलं स्वातंत्र्य व्यक्तीला मिळायलाच हवं. यामुळेच त्याचा विकास घडत असतो. हे स्वातंत्र्य मिळणं हे एकांतापेक्षा, कोणत्याही स्पेसपेक्षा मोठं असतं. ज्या गोष्टीला आपण स्पेस म्हणतो ती पळवाट आहे. जी तुम्हाला आनंद देते, तुमचा विकास करते, प्रगती करते ती स्पेस उपयोगाची आणि महत्त्वाची.
अनेकदा अनेकांना त्यांच्या ऑफिसातल्या स्वातंत्र्याबद्दल प्रश्न पडतात. त्यांच्या वैचारिक स्वातंत्र्यावर गदा घातली गेली आहे, असा त्यांचा ग्रह होतो. पण जरा विचार केलात तर एक गोष्ट लक्षात येईल की हेही देशाचं स्वातंत्र्य आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य यासारखंच आहे. कंपनीतल्या एखाद्या कर्मचाऱ्याने सर्वप्रथम कंपनीची विचारधारणा लक्षात घेतली पाहिजे. त्याच्या मर्यादा, नियम यांचा अभ्यास करावा. त्यानंतरच तुमचं वैचारिक स्वातंत्र्य येतं. प्राधान्य हे कंपनीलाच असतं. तुमची सर्जनशीलता, तुमच्या संकल्पना कितीही कौतुकास्पद असल्या तरी त्या जोवर कंपनीच्या नियमांमध्ये बसत नाहीत तोवर त्या अवलंबल्या जात नाहीत. असुरक्षितता हा आणखी महत्त्वाचा मुद्दा यामध्ये येतो. एखाद्याच्या असुरक्षित वाटण्यामुळे दुसऱ्याचं स्वातंत्र्य काही वेळा दडपण्याचा प्रयत्न केला जातो. हे प्रकार वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये बघायला मिळतात. मोठय़ा पदावर असलेल्या एखाद्या व्यक्तीला त्यांच्या खालच्या पदावरच्या माणसाच्या बुद्धीमुळे कधीकधी न्यूनगंड येऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या असुरक्षिततेमुळे समोरच्याच्या स्वातंत्र्यावर घाला घातला जाऊ शकतो. अशा व्यक्तीने स्वतची असुरक्षितता त्याचं ज्ञान, व्यक्तिमत्व, आत्मविश्वास या गोष्टी वाढवून दूर केली पाहिजे. आपल्या हाताखालच्या माणसाला डावलून नाही.
‘भारत माझा देश आहे’ या वाक्यात ‘आपला’ऐवजी ‘माझा’ हा शब्द का वापरलाय, असा एक प्रश्न शाळेत असताना एका धडय़ात होता. त्याचं उत्तर असं होतं की, आपण एखादी गोष्ट जेव्हा ‘माझी’ आहे असं म्हणतो तेव्हा तिचा सांभाळ, तिच्याबद्दलचं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, त्याची जबाबदारी हे कैक पटीने जास्त असते; पण जर ‘आपण’ हा शब्द वापरला तर या सगळ्या भावना कमी पडतात. हेच लागू होतं ते स्वातंत्र्याबद्दल. देशाचं स्वातंत्र्य हे ‘माझं’ म्हणून उपभोगलं तर देशावरच्या प्रेमात भरच पडेल. ती गोष्ट ‘माझी’ म्हणूनच आपण तिचा सांभाळ करू. त्यामुळे देशाचं स्वातंत्र्य हे माझंच स्वातंत्र्य आहे, असं प्रत्येकाने समजलं पाहिजे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2014 1:30 am

Web Title: independence day special 3
Next Stories
1 ज्याचे त्याचे स्वातंत्र्य : झंडा ऊंचा रहे हमारा..
2 हमारे हवाले वतन साथीयों…
3 संकल्पनेतलं स्वातंत्र्य
Just Now!
X