lp22lp10मुलीचं लग्नाचं वय झालं की, तिच्या घरात लग्नाविषयीची भुणभुण सुरू होते. येता-जाता तोच विषय घरात ठाण मांडून बसलेला असतो. घरचे-दारचे असंख्य स्थळं सुचवत असले तरी कोणाशी, कधी, का, केव्हा, कसं लग्न करायचं हे ठरवण्याचं स्वातंत्र्य सर्वस्वी त्या मुलीचं असतं.

एका मैत्रिणीला मुलगी झाली म्हणून तिला भेटायला गेले. तान्हुल्या मुलीचं दोन्हीकडचे आजी-आजोबा कौतुक करत होते. इतर नातेवाईकही तिथे होते. बोबडय़ा शब्दांमध्ये बोलणं, वेगवेगळे आवाज काढणं, मैत्रिणीला ‘आता हे कर, ते नको करूस’ असा सल्ला देणं वगैरे असा नातेवाईक आणि मित्रपरिवाराचा मस्त कल्ला चालला होता. खरं तर दवाखान्यात अशा कल्ल्याला जागा नाही, पण आनंदाच्या क्षणी थोडंफार चालून जातं. या सगळ्या आवाजात शांत होती ती मैत्रीण. पडून राहिली होती पलंगावरच. मुलीला बघून झाल्यावर मैत्रिणीजवळ गेले. तिला आनंद होताच पण, एका वेगळ्या प्रकारची चिंता, विचार तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. याबाबत तिला विचारलं. ती म्हणाली, ‘माझ्या मुलीकडे बघून मला खूप आनंद झालाच आहे. पण, मी विचार करतेय तो पंचवीस एक वर्षांनंतरचा. हिचं शिक्षण, लग्न वगैरे.’ त्यावर काहीही न बोलता मी तिथून निघाले. तिचे विचार कदाचित तिथे थांबले असतील पण, माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं. एखाद्या घरात एखादी मुलगी जन्माला आली की वेगळंच वातावरण असतं. ‘पहली बेटी धन की पेटी’ म्हणत तिचं स्वागत होतं. पण, या जगातल्या तिच्या पहिल्याच दिवशी तिच्या पालकांना तिच्या लग्नाचा विचार यावा? शिक्षणाचा विचार मनात येणं स्वाभाविक आहे. तो मुलगा असेल तरीही येतोच. पण, मुलीबाबत लग्नाचाही विचार यावा हे कुठे तरी न पचणारं होतं. न पटणारं नाही.
मी किंवा माझ्यासारख्या इतर अनेकींच्या बाबतीत असाच विचार झाला असेल का, शिक्षणाइतकंच लग्नाची चिंता जन्माच्या वेळी व्यक्त केली असेल का, आता जसं वेगाने धावणाऱ्या काळाकडे बघून घाबरायला होतं तसं तेव्हाही झालं असेल का, असे अनेक प्रश्न एकामागे एक असे डोक्यात येऊ लागले. लहान असताना ‘हे कर आणि हे करू नकोस’ या दोन वाक्यांची पारायणं होत असतात. मोठे होत जातो तसं याचं प्रमाण कमी होत जातं. अठरावं र्वष उलटून गेलं की मुलीच्या लग्नाचाच जास्त विचार केला जातो, हे चित्र आजही दिसेल. मग भलेही त्याचं स्वरूप बदलत चाललं असेल पण, विचार मात्र होतोच. हे विचारचक्र आई-वडील, नातेवाईक, शेजारीपाजारी, ओळखीचे यांच्या डोक्यात सुरू असतं. त्याच विचारांनी वागायचं की नाही हे त्या मुलीने ठरवायला हवं की नको? ते त्या मुलीचं स्वातंत्र्य आहे की नाही? स्वातंत्र्य.. ‘स्वतंत्र भारताची मी स्वतंत्र नागरिक आहे’ हे वाक्य अनेकदा बोललं जातं. या वाक्यात स्वातंत्र्य उपभोगण्याचा हक्क जितका आहे तितकीच जबाबदारीही आहेच. पण, खरंच हे स्वातंत्र्य मुलींना त्यांच्या लग्नाबद्दल मिळतं का? मग ते लग्न न करण्याचं स्वातंत्र्य असो किंवा लग्न करण्याचं. लग्न न करण्याच्या स्वातंत्र्याची छटा पूर्ण वेगळी आहे. त्यात वादविवाद, विचारभेद, दृष्टिकोनातलं वैविध्य असे अनेक पैलू येतात. पण, लग्नाला तयार असलेल्या मुलीचं काय? लग्नाला होकार किंवा नकार देण्याचं स्वातंत्र्य दिलं म्हणजे खूप स्वातंत्र्य दिलं, असा आविर्भाव आणला जातो. एकदा का मुलीने होकार दिला की पुढे तिच्या स्वातंत्र्याचा फारसा विचार होतो की नाही, हा प्रश्न उरतोच.
मध्यमवर्गीय घरात सर्वसाधारणपणे मुलीच्या लग्नाचा विचार ती मोठी होते तसतसा होत असतो. फरक इतकाच की, हा विचार ती ‘सेटल’ होते तेव्हाच तिच्यापर्यंत थेट पोहोचतो. शिक्षण, उच्चशिक्षण, इंटर्नशिप, ट्रेनिंग वगैरे करून मुलगी नोकरीला लागली की तिच्या लग्नाचे वेध आई-वडिलांपेक्षा तिच्या नातेवाईक आणि शेजाऱ्यापाजाऱ्यांनाच लागलेले असतात. या मनुष्यस्वभावाला औषध नाही. मुलगीही लग्न करण्यासाठी होकार देते. पण, एकदा का हा होकार दिला की पुढचे असंख्य प्रश्न येतातच. ‘विवाह मंडळात नाव नोंदवायचं का’, ‘मॅट्रिमोनी साइटवर रजिस्टर करू या का’, ‘ओळखीतलं बघू या का एखादं स्थळ’, ‘बघण्याचा म्हणजे ‘कांदे-पोहय़ांचा’ कार्यक्रम करू या का’, ‘आता सुरुवात केली की चोवीस-पंचविसाव्या वर्षांपर्यंत होईलही’ वगैरे वगैरे.. या प्रश्नांमध्येच पालकांच्या आणि घरातल्या वडीलधाऱ्यांच्या सगळ्या गोष्टी छुप्या पद्धतीने ठरलेल्या असतात. फक्त त्या थेट बोलल्या जात नाहीत. कारण त्यांनाही त्यांच्या मुलीचं मन जपायचं असतं. हे मन जपणं आजकाल घराघरांत दिसतं, ही त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणावी लागेल. ‘नाव नोंदवू या’, ‘साइटवर रजिस्टर करू या’, ‘बघण्याचा कार्यक्रम तर करावाच लागेल’, देशमुख मावशींनी सांगितलेलं स्थळ चांगलं आहे’, ‘आम्ही स्थळं बघायला सुरुवात करतोय’ या त्या छुप्या पद्धतीने ठरलेल्या गोष्टी असतात. या सगळ्यात कोणालाही दोष देता येत नाही. देऊही नये. जो-तो आपापल्या स्वातंत्र्याचा झेंडा मिरवत असतो.
या सगळ्यात मुलगी काय आणि कोणत्या पद्धतीने विचार करते हेही तितकंच किंबहुना जास्त महत्त्वाचं आहे. लग्नाला कधी तयार व्हायचं हे तिनेच ठरवलं पाहिजे. यात फक्त शिक्षण-करिअर हे मुद्दे नसून लग्नासाठी आवश्यक असणारी मानसिक तयारीही आवश्यक असते. ती असल्याशिवाय पुढे जायचं नाही, हा निर्णय तिच्या बाजूने योग्यच ठरतो. एखादीने लग्नाला होकार दिला म्हणजे लगेच एका वर्षांत तिला लग्न झालेलं चालणार आहे असं होत नाही. तिने तिचं लग्नाचं वय ठरवलेलं असतं. तिने कितव्या वर्षी लग्न करायचं हे ठरवण्याचं स्वातंत्र्य सर्वस्वी तिला आहे. लग्न कोणाशी करायचं हे तर तिनेच ठरवायला हवं. मुलाच्या कोणत्या गुणांकडे बघून त्याला होकार द्यायचं हे स्वातंत्र्यही तिला आहेच. काही मुली दिसण्याला प्राधान्य देतात, काही स्वभावाला, तर काही आर्थिक परिस्थितीला. कशाला प्राधान्य द्यायचं याचंही तिला स्वातंत्र्य आहे. लग्न कशा पद्धतीने व्हायला हवं म्हणजे कोर्ट मॅरेज की थाटात हे ठरवण्याचंही तिला स्वातंत्र्य आहे. लग्न कधी करायचं यापासून ते लग्नाला कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही इथपर्यंत ठरवण्याचं तिला स्वातंत्र्य असतं, असायला हवं. ‘तुझ्या सगळ्या मैत्रिणींचं लग्न झालं. तुझं वय उलटून चाललंय’ हे ठळक कारण घरच्यांकडून नेहमी दिलं जातं. पण, त्या मुलीनेही लग्नाच्या वयाबाबत काही ठरवलं असेलच, याचा विचार सहसा होताना दिसत नाही. स्वातंत्र्य उपभोगण्यासह जबाबदारीही येतेच. त्यामुळे लग्नाच्या बाबतीत स्वातंत्र्याचा मुद्दा पुढे नेत एखादी मुलगी निर्णय घेत असेल तर त्याच्या बऱ्या-वाईट परिणामांची जबाबदारीही तिनेच घ्यायला हवी.
प्रेमविवाहात काही गोष्टी आणखी वेगळ्या पद्धतीने पुढे येतात. यामध्ये तिने मुलगा निवडण्याचं स्वातंत्र्य घेतलेलंच असतं. त्यामुळे पुढच्या सगळ्या गोष्टी पालकांची जबाबदारी आणि निवड असणार, हे अलिखित स्वरूपात ठरलेलं असतं. ‘मुलगा निवडलास ना, मग आता पुढचं आम्हाला ठरवू दे’ असा विनंतीवजा दम त्यात असतो. पण मुलगा निवडला आणि घरी त्याच्याविषयी सांगितलं याचा अर्थ ती मुलगी लग्नाला अगदी दोनेक महिन्यांत तयार आहे असा होत नाही. कोणाशी लग्न करायचंय हे तिने ठरवलेलं असलं तर कधी करायचं हे ठरवण्याचाही तिला अधिकार आहे. एखादी मुलगी तेविसाव्या वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असेल, पण तिला लग्न सव्विसाव्या वर्षी करायचं असेल तर हे सर्वस्वी तिचं स्वातंत्र्य आहे. हा तीन वर्षांचा वेळ काही तरी विचार करूनच तिने घेतलेला असू शकतो, याचा विचार करायला हवा. आर्थिकदृष्टय़ा सक्षम असणं ही सध्याच्या काळातली महत्त्वाची बाब आहे. आता मुलीही आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी होऊ लागल्या आहेत. त्यामुळे अर्थातच मुलगाही आर्थिक बाजूने किती भक्कम आहे हे बघण्याचं मुलींना स्वातंत्र्य आहे. मुलींनी प्रेमविवाह ठरवला असला तरी लग्नाची घाई न करण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण त्यांच्याकडे असतं. आपण कितीही आधुनिक विचारांचे झालो असलो तरी लग्न करून शेवटी मुलीलाच मुलाच्या घरी नांदायचं असतं. त्यामुळे लग्नानंतर तिचं घर, रोजचं वेळापत्रक, सभोवतालची माणसं, राहणीमान यात थोडा फरक पडतोच. यात महत्त्वाचं ठरतं, सासरच्या लोकांशी जमवून घेणं. प्रेमविवाह ठरवल्यानंतर लग्नासाठी मुली वेळ घेतात ते सासरच्या लोकांना जाणून घेण्यासाठी. भविष्यात खटके उडू नयेत म्हणून लग्नाआधीच तिथली माणसं समजून घेणं हे मुलींना महत्त्वाचं वाटतं. मुलीच्या तोलामोलाचा आहे, जातीतला आहे, दिसायलाही बरा आहे अशी मोजपट्टी लावून मुलाला होकार देण्याचे सल्ले मुलीकडचे तिला देत असतात. हे चुकीचं आहे. अनेकदा घरच्यांची मोजपट्टी आणि मुलीची मोजपट्टी यात पुष्कळ तफावत असू शकते. आर्थिकदृष्टय़ा सक्षम होईपर्यंत लग्नासारखी मोठी जबाबदारी नाकारण्याचंही मुलींना स्वातंत्र्य आहे.
आपलं स्वातंत्र्य उपभोगताना पालकांचा, नातेवाईकांचा, कुटुंबाच्या स्वातंत्र्याचा अधिक्षेप केला जातोय का, त्याचाही मुलींनी विचार करणं गरजेचं आहे. कारण मुलगी तिच्या लग्नाचे निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे तसंच मुलीचे आई-वडील या नात्याने त्यांना याबाबतचं स्वातंत्र्य आहे. मुलीने काय करावं-काय करू नये हे सांगण्याचंही त्यांना स्वातंत्र्य आहे. एखाद्या कुटुंबात मुलीला लहानपणापासून वागणं-बोलणं ते शिक्षण, करिअर निवडीपर्यंतचं स्वातंत्र्य दिलं गेलं असेल तर लग्नाच्या वेळेपर्यंत ते टिकलं पाहिजे. म्हणजे लहानपणापासून सगळ्या गोष्टींमध्ये स्वातंत्र्य उपभोगत निर्णय घेणाऱ्या मुलीकडून तिच्या विशीच्या काळात स्वातंत्र्य हिरावून घेतलं जात असेल तर ते चुकीचं आहे. स्वातंत्र्याचा गैरफायदा घेत ‘लग्न करणार नाही असं सांगणं’, ‘वाटेल तेव्हा लग्न करणार असं सांगणं’, ‘परस्पर लग्न करून येणं’ अशी बोथट विधानं करण्याला स्वातंत्र्य म्हणता येणार नाही, पण स्वातंत्र्यासोबतच हक्क, अधिकार आणि जबाबदाऱ्या यांची माहिती, ज्ञान असणं म्हणजे खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा उपभोग घेतल्यासारखं आहे. आपल्याकडे कुटुंबव्यवस्था महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना आपसूकच कुटुंबाचा विचार सगळ्यात आधी केला जातो; पण हा विचार करत असताना स्वातंत्र्याचा हक्क बजावण्यापासून वंचित राहायचं असं अजिबातच नाही. समतोल हा अनेक गोष्टींमध्ये साधावा लागतो. ‘मल्टिटास्किंग’चं कौशल्य स्त्रियांमध्ये उपजतच असतं. त्यामुळे एकाच वेळी जबाबदारीने अनेकांचा विचार करण्याची क्षमता मुलींमध्ये नक्कीच असते. त्यांनी त्यांचा इतर क्षेत्रांप्रमाणे लग्नाचाही हक्क बजावणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी योग्य वेळी योग्य ठिकाणी समतोल साधत त्यांच्या स्वातंत्र्याचा वापर केलाच पाहिजे.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com