01 March 2021

News Flash

एकला चलो रे…

वयाच्या ठरावीक टप्प्यावर सगळेच करतात म्हणून अनेक जण लग्न करतात. तर मोजकेच काही जण लग्नाच्या बाबतीत कमालीच्या डोळसपणे विचार करून लग्न न करण्याचा निर्णय घेतात.

| August 14, 2015 01:18 am

lp10वयाच्या ठरावीक टप्प्यावर सगळेच करतात म्हणून अनेक जण लग्न करतात. तर मोजकेच काही जण लग्नाच्या बाबतीत कमालीच्या डोळसपणे विचार करून लग्न न करण्याचा निर्णय घेतात. काय असते ही निर्णयप्रक्रिया? आणि असा निर्णय घेताना त्यांना कशाकशाला तोंड द्यावं लागतं?

डोंट गेट मॅरीड क्योंकि तुम्हारे सारे दोस्त मॅरीड है,
या क्योंकि तुम आंटीज के सवालों से परेशान हो.
डोंट गेट मॅरीड क्योंकि व्हॅलेण्टाइन पे लोनली लगता है.
डोंट गेट मॅरीड क्योंकि छोटी बहन भी लाइन में है..
या ये सोच के कि ओल्ड एज में कंपनी मिलेगी..
टाइमेक्स कंपनीच्या घडय़ाळाची ही जाहिरात, जाहिरात म्हणून पाहायला खूपच छान वाटते. या जाहिरातीच्या अखेरीस म्हटलं आहे ‘गेट मॅरीड व्हेन यू फाइंड समवन हू डिझव्हर्ड यूवर टाइम..’ पण खरंच का प्रत्यक्षात असा ‘वन हू’ मिळतो का? किंवा तो हवाच कशाला? मग स्वत:चा वन हू स्वत:च होता येणार नाही का? पण मग एखादी मुलगी (किंवा मुलगादेखील) मला इतक्यात लग्न नाही करायचं किंवा मला लग्नच नाही करायचं असा स्टॅण्ड घेते तेव्हा हा विचार किती सहजगत्या स्वीकारला जातो?
त्याचं उत्तर आपल्या सोकॉल्ड समाजरचनेत दडलेलं आहे. प्रत्येक भारतीयाला घटनेने अनेक प्रकारची स्वातंत्र्यं बहाल केली आहेत. अर्थातच त्याबरोबर अनेक जबाबदाऱ्यांचं भानदेखील अध्याहृत आहेच. पण भारतीय समाज हा केवळ या घटनेच्या चौकटीत जगत नसतो. भारतीय समाजमनाला आणखीन एका अदृश्य चौकटीचा आधार घेण्याची कायमची सवयच लागली आहे. ती म्हणजे वर्षांनुवर्षांच्या विचारसरणीतून तयार झालेल्या सोकॉल्ड संस्कृतीची आणि त्यातून जोपासल्या गेलेल्या सामाजिक रचनेची आणि त्यातून येणाऱ्या बंधनांची.
आणि या रचनेने मुलीला ‘परक्याचं धन’ वगैरे गोंडस विशेषणं लावत किंवा ‘मुलगा म्हणजे वंशाचा दिवा’ अशा कोंदणात बसविल्यामुळे लग्न हे केलंच पाहिजे हे आपल्यावर िबबवलं गेलं आहे. पण लग्न केल्याने जसं काही आपले हात आकाशाला टेकत नाहीत (म्हणजे तसं अनेकांना वाटत असेलही कदाचित), तसचं लग्न न केल्याने काही आकाश कोसळत नाही. पण तरीदेखील लग्न न करण्याच्या विचारांचं सहजगत्या स्वागत करण्याची आपल्या समाजाची मानसिकता नाही. इतकंच काय तर मला आत्ता तरी लग्न करायचं नाही अशा निर्णयाचादेखील सहज स्वीकार करताना दिसत नाही.
लग्न करण्यामागचा प्रत्येकाचा वेगवेगळा हेतू असतो. कोणाला कुटुंबाची ऊब हवी असते, कोणाला चूलमुलांची आवड असते. लग्न करायचं की नाही, हा निर्णय अशा अनेक प्राथमिकतांवर अवलंबून असतो. अशी मंडळी कमावती झाली की गृहस्थाश्रमात प्रवेशकर्ती होतात. लग्नासोबत कमिटमेंट येते, सिक्युरिटी येते, सोशल स्टेटस येतं. त्याचबरोबर भारतीय समाजात मुलीच्या नशिबी लग्न आणि लग्नाबरोबर येणाऱ्या आनुषंगिक घटकांची एक भली मोठी यादीच असते. सौभाग्य लेणं, नावात-जागेत बदल, नव्या नात्यांची बाय डिफॉल्ट येणारी अ‍ॅटचमेंट, लाइफस्टाइलला मिळालेली कलाटणी, अशी ही न संपणारी यादी असते.
मग मुळात लग्न कशासाठी करायचं. ज्या व्यक्तीशी लग्न करायचं, त्या व्यक्तीबरोबर कम्पॅटीबिलिटी असायला हवी, समजून घेणं हवं, आयुष्याकडून असणाऱ्या अपेक्षांमध्ये त्याची पूरक साथ हवी, आपल्या आवडीनिवडींना त्याचा तिचा पाठिंबा हवा वगैरे वगैरे. हे आता सर्वानाच पटण्यासारखे आहे.
मग लग्न न करण्याचा प्रश्न येतो कसा?
येथे मात्र वेगवेगळे गट दिसून येतात. एका गटाला यातील काहीच नको असते. तो या वाटेलाच जात नाही. स्वत:च्या बळावर स्वत:च सारं काही पूर्ण करीत एकटय़ाने आयुष्य जगण्याची त्यांची तयारी असते. ते एकटेच राहतात. तर एखाद्याला अथवा एखादीला कसलीच तडजोड नको असते आणि हे सारं मिळण्यासाठी वयाच्या अथवा अन्य भौतिक, आर्थिक परिमाणांचं बंधन नसतं. ते कोणत्याही टप्प्यावर लग्न करू शकतात किंवा न करतादेखील राहतात. लग्न होण्यासाठी त्यांचा कसलाही आटापिटा नसतो. तर तिसरा गट करिअरच्या आयुष्याच्या एखाद्या विवक्षित टप्प्यावर इतका पुढे निघून जातो की समाजाच्या पारंपरिक गणितात त्याला लग्न करणं अवघड होऊन जातं. आणि पुन्हा स्टेटसचा मुद्दादेखील असतोच.
मग अशा तीनही केसमध्ये निर्णयाचं स्वातंत्र्य कितपत असते. आणि ते घेतलंच तर समाजाच्या कितपत पचनी पडते? का त्या स्वातंत्र्याची किंमत मोजावी लागते? अर्थातच या वेळी हे मुद्दे घटनेच्या चौकटीतून सामाजिक चौकटीत येऊन विसावतात. आज तरी आपल्या समाजात हे इतकं काही सोपं नाही. मुंबई पुण्यासारख्या शहरातून अशी उदाहरणं नक्कीच सापडतील यात शंका नाही. पण जेथे सारं गावंच तुमची कुंडली मांडून बसलेलं असते, तेथे काय करणार? शहरातदेखील असे निर्णय घेणाऱ्यांची मानसिक कुचंबणा करणारे कमी नसतात.
सर्वाचीच लग्न लावायचा ठेकाच घेतल्यासारखे वावरणाऱ्या भोवतालच्या समाजाला सतत मग अशा लोकांच्या लग्नाची काळजी असते. मुलींच्या बाबतीत तर ही बाब आणखीनच टोकाला जाण्याची शक्यता असते. पण मग त्याबाबतीतल्या तिच्या स्वातंत्र्याचा थेट अधिक्षेप केला जातो. तिच्या सोशल लाइफचा वापर करीत आरोप किंवा मोठय़ाने कुजबुज हा त्यातील हमखास आढळणारा प्रकार. घरी येणाऱ्या जाणाऱ्यांवर लक्ष ठेवणाऱ्यांची कमी नसते. मग तिच्या रोजच्या आयुष्यापासून ते तिच्या लैंगिक गरजांपर्यंत सारं काही चवीने चर्चिताना आपण तिच्या स्वातंत्र्याचा अधिक्षेप करतो आहोत हे ते अनेकांच्या गावीच नसते.
आजकाल लग्न न करण्याच्या निर्णयाला काही प्रमाणात समाज स्वीकारतो आहे, पण घरातून असणारा विरोध हा या सर्वात कळीचा ठरू शकतो. मग एखादीला त्यासाठी आपल्या आईवडिलांपासून वेगळंदेखील राहावं लागण्याची उदाहरणदेखील दिसतात. अशा वेळी तिच्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेमुळे आईवडिलांच्या स्वातंत्र्याचा अधिक्षेप करत नाही का? असा एक कळीचा प्रश्न हमखास विचारला जातो. पण खरं सांगायचं तर तसं काही होत नसतं. कारण आईवडिलांच्या संकल्पना या सामाजिक बंधनांच्या चौकटीने बांधलेल्या असतात. त्यामुळे मुळात ते स्वत:च निर्णयाचं स्वातंत्र्य घेत नसतात.
आता दुसरा मुद्दा येतो तो आजच्या स्वतंत्र विचारांच्या आणि महत्त्वाकांक्षा असणाऱ्या मुलींचा. तिला चूलमूलपेक्षा करिअर, सोशल स्टेटस, स्वत:चे छंद जोपासत फुलफिल लाइफ जगावेसे वाटत असेल तर अशा आयुष्याला पूरकपणे साथ देणारा जोडीदार मिळणार नसेल तर तिने केवळ जनरीत म्हणून लग्न करावं का? तीने ठरविलेल्या गणितात कोणी बसत नसेल तर मग तोपर्यंत अविवाहित राहण्याचं स्वातंत्र्य तिने घेऊच नये का? यातील मानसिक आंदोलनांकडे जरा वेगळ्या पद्धतीने पाहायची गरज आहे. एका ठरावीक मर्यादेनंतर आपल्याशी जुळणारा असेल कोणी तर मिळेल, त्यासाठी धावपळ का करायची, असेल कोणी तर जुळतील सूर, नसेल तर मग राहू दे असेच, असा विचार करणाऱ्यांची संख्यादेखील आज वाढते आहे. सर्व काही मोजूनमापून ठरवूनदेखील जर लग्न यशस्वी होत नसतील तर मग आपण आपल्या संकल्पनांसाठी स्वत:ला का खेचायचे. कदाचित वयोमानानुसार आपला निर्णय बदलेलदेखील. बदलेल तेव्हा पाहू. पण त्यासाठी आताचं माझं आयुष्य का म्हणून वाया घालवू. लग्न नको असे म्हणणाऱ्या अनेकींचा आजचा स्टॅण्ड काही प्रमाणात तरी असाच आहे.
सतत पुढे केला जाणारा दुसरा मुद्दा येतो तो उतारवयातील साथीचा. आता हादेखील काहीसा स्वार्थच म्हणावा लागेल. आपल्या समाजात केवळ अशा काही कारणांसाठी आज साऱ्या तडजोडी स्वीकारत आयुष्य कंठणारे काही कमी नाहीत. तर दुसरीकडे आयुष्याच्या सायंकाळी ‘इतक्या लवकर लग्नात अडकले नसते तर कदाचित मी आणखी काय काय केलं असते’ असे उसासे सोडणारेदेखील कमी नाहीत. मग आजच्या जगण्यातून योग्य ती बचत केली आणि उतारवयाची सोय लावली की मग हा सोकॉल्ड मुद्दादेखील कुचकामी ठरतो.
अर्थात हे स्वातंत्र्य घेताना त्याची किंमत मात्र मोजावी लागते. जर एखाद्या मुलीने लग्न न करण्याचा निर्णय घेतलाच तर तिला स्वत:च्या घराचं संपूर्ण नियोजन करावं लागतं. घरून पािठबा नसेल किंवा मोठय़ा/धाकटय़ा भावाने घराचा ताबा घेतला असेल तर तिला स्वत:चा निवारा स्वत:च शोधावा लागतो. खरं तर आज दोघांच्या उत्पन्नातूनदेखील स्वत:चं घर विकत घेणं आणि सांभाळणं अवघड होताना दिसतं. मग अशा महागाईच्या काळात आणि वाढत्या स्पर्धेच्या युगात गरजेची असणारी आर्थिक स्थैर्यता कितपत शक्य आहे? म्हणजेच तिला तिच्या एकटीने राहण्याची आर्थिक किंमत मोजावी लागते. जगण्यासाठीच्या व्यावहारिक गरजा आहेत त्या स्वबळावर पूर्ण करण्याची ताकद असावी लागते. आणि एखादीला परिस्थितीवश हे करायची ताकद नसेल तर मात्र नाइलाजास्तव लग्नाच्या बंधनात पडावं लागतं. मुंबई, पुण्यासारख्या शहरात तर आर्थिकदृष्टय़ा हे परवडणारं नसतं, त्यामुळे अशी कुचंबणा झालेली घरं अनेक आहेत. म्हणजेच लग्न न करण्याच्या स्वातंत्र्याची व्यावहारिक किंमत बरीच मोठी असते. छोटय़ा गावातून सामाजिकतेचंच बंधन इतकं असतं की अशा निर्णयाप्रत येण्याची बिशादच होत नाही. मग या दोन्ही ठिकाणी तिच्या स्वातंत्र्याचा तो थेट अधिक्षेपच नाही का होत?
लग्न न करण्याच्या निर्णयाचा आणखीन एक गंभीर परिणाम असतो तो म्हणजे गृहीत धरलं जाण्याचा. ऑफिस, घर, सामाजिक काम अशा ठिकाणी तुम्हाला गृहीत धरण्याची प्रवृत्ती बळावते. तुला काय काम आहे, ना घर ना संसार. कधी कधी या प्रतिक्रीया टोमण्यांपर्यंतदेखील जाते. किंवा घर संसाराच्या चर्चेत आपल्या मतावर ‘संसार कर, मग कळेल’ अशी खोचक प्रतिक्रियादेखील ऐकावी लागते. असो, पण अशा वक्तव्यांकडे कीती लक्ष द्यायचं हे आपल्या हाती असतं असं मला तरी वाटतं.
पण लग्न न करण्याच्या स्वातंत्र्याबरोबरच रिजिड होण्यचा आणि स्वैराचाराच्या धोक्यांना सामोरं जाण्याची शक्यता असते. मी माझ्या कष्टाने हे घर बांधलंय, सर्वाना वाढवलंय, मार्गाला लावलंय अशा पद्धतीची कुटुंबप्रमुखाची सुभाषितं आपण ऐकली आहेतच. पण मग उद्या स्वत:चं आयुष्य स्वत: सावरणाऱ्या मुलीला हीच वृत्ती टाळण्याची गरज असते. अन्यथा कालांतराने लोक तुम्हाला टाळायला लागतात.
दुसरा धोका स्वैराचाराचा. लग्न न करण्याच्या निर्णयाकडे बहुतांशपणे आपल्याकडे स्वैराचार म्हणूनच पाहिलं जातं. हा एक मोठा गैरसमज आहे. स्वैराचारच करायचा असेल तर लग्न केलं काय आणि न केलं काय? खर तरं तिला हवं असतं ते स्वातंत्र्य. कमिटमेंटमध्ये न अडकणं त्यात अपेक्षित असतंच, पण ते करताना स्वत:ची स्वत:शीच कमिटमेंट जोपासायची असते. ती तिला पुरती उमजलेली असते पण इतरांनी हे समजून घेण्याची कुवत आजतरी फारशी दिसत नाही. कोठे थांबायचं, कुठली तडजोड करायची आणि कुठली नाही याची मानसिक तयारीदेखील तेवढीच असावी लागते. अन्यथा नैराश्य सारं काही संपवून टाकू शकतं.
अशा साऱ्या घटकांवर विचार केला तर लग्नाबाबतीत जमेल तर करू विचार किंवा नाहीच करायचं या निर्णयाचं स्वातंत्र्य एखादीला खरंच अनुभवता येतं का, हा प्रश्न आजतरी पुरता सुटलेला नाही असंच वाटतं. कदाचित अनेकांना (आपल्या संस्कृतीनुसार लग्न करणं कसं गरजेचं आहे, चांगलं आहे असं म्हणणाऱ्यांना) हे सारं अतिनकारात्मक वाटेल. स्वातंत्र्यापेक्षा उगाच फालतू थेरं वाटतील. पण येणाऱ्या परिणामांची जबाबदारी कणखरपणे स्वीकारण्याची तयारी असेल तर हे स्वातंत्र्य का स्वीकारायचं नाही? अर्थात हे सारं सध्यातरी एका वर्गापुरतं, ज्यांच्या हाती व्यावहारिक आयुष्य एकटय़ाच्या बळावर जगण्याची धमक आहे तेथपर्यंतच मर्यादित आहे.

लग्न न करणाऱ्यांचे उतारवयातील घर..
लग्न न करण्याचा निर्णय घेणाऱ्यांना ज्या काही गोष्टी अगदी नियमितपणे ऐकवल्या जातात त्यात उतारवयात सोबत हवी हा मुद्दा अग्रक्रमावर असतो. म्हणूनच लग्न न करण्याचा निर्णय घेतलेल्या तिशीतल्या काही समविचारींनी एकत्र येऊन उतारवयातील घरांची सोय आतापासूनच सुरु केली आहे. सर्वाना हिमालयाची ओढ असल्यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी जागा घेतली आहे. आणि त्यानुसार सारी पुढील प्रक्रीया सुरु केली आहे. एकटय़ाने राहण्याच्या स्वातंत्र्यासाठी अशी तरतूद करण्याची दूरदृष्टी सर्वानाच असायला हवी हेच यातून जाणवते.
डॉ. प्रीती पटेल – response.lokprabha@expressindia.com
शब्दांकन – सुहास जोशी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2015 1:18 am

Web Title: independence day special 32
Next Stories
1 आम्हाला स्वातंत्र्य कधी मिळणार?
2 क्राइम टाइम, प्राइम टाइम…!
3 गुरुपरंपरा : एक विचार
Just Now!
X