मागच्या पिढय़ांनी संघर्ष करून मिळवलेल्या स्वातंत्र्याबद्दल आजच्या पिढीला नेमकं काय वाटतं?

प्रत्येक दिवशी कोणता तरी ‘विशिष्ट दिवस’ (डे) साजरा करण्याची सवय लागलेल्या आजच्या पिढीसाठी ‘स्वातंत्र्य दिन’ हादेखील एक ‘डे’ होऊन गेला आहे. आपल्या देशाबद्दल अभिमान बाळगण्याचा हा दिवस. त्यासाठी मग तिरंगी कपडय़ांची खरेदी, फेसबुकवर कव्हर फोटो अपलोड करणं, स्वातंत्र्यसैनिकांचे प्रेरणादायी प्रसंग शेअर करणं, आयपॉडमध्ये देशभक्तिपर जुन्या गाण्यांचं फोल्डर टाकणं आणि व्हॉट्स अॅपवर झेंडावंदनाचे फोटो, गेल्या सत्तर वर्षांतल्या स्वातंत्र्याचा आढावा घेणारे मेसेज टाकणं हा अलीकडच्या काळातील ट्रेंड.
६७ वर्षांपूर्वी स्वतंत्र झालेला भारत आणि आत्ताचा भारत यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. उदाहरणादाखल फोनचा ‘चैन ते गरज’ हा प्रवास हा फरक स्पष्ट करण्यासाठी पुरेसा आहे. मात्र, आपल्या पणजोबा किंवा आजोबांनी देशासाठी ‘स्वातंत्र्य’ मिळवलं म्हणजे नेमकं काय केलं याचं उत्तर आजच्या पिढीला सापडत नाही. सत्तर वर्षांनंतरही ज्या देशात मूलभूत सुविधा मिळू शकत नाहीत, त्या स्वातंत्र्याचा काय उपयोग, असा सवाल मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयात प्रथम वर्षांला शिकणारा अनिकेत गणपत्ये करतो. आई-वडिलांची पिढी जेव्हा मोठय़ा अभिमानाने जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळेतील शिक्षणाच्या दर्जाबद्दल सांगते तेव्हा आत्ताच्या खासगी किंवा इंटरनॅशनल म्हणवणाऱ्या शाळेच्या शिक्षणाचाही दर्जा सुधारण्याऐवजी अधिक का खालावत चालला आहे याचे उत्तर सापडत नाही, असंही अनिकेत सांगतो. मूलभूत गरजांची वानवा, सामाजिक जाणिवांचा अभाव आणि सांस्कृतिक वारशांची पडझड या मधल्या काळातच झाली. त्यामुळे देशाच्या आजच्या दैनावस्थेला गेल्या ६७ वर्षांच्या काळातील तीन पिढय़ाच अधिक कारणीभूत आहेत, असा ठपका आजच्या पिढीनेच त्यांच्यावर ठेवला तर ते वावगं ठरू नये. आजची पिढी (१६ ते ३० वयोगट) अद्याप आपली छाप मागे सोडून जाण्याच्या प्रयत्नात आहे, पण त्याआधीच त्यांना दोषी ठरवले जात आहे. आमच्याकडून देशभक्ती, संस्कृतिरक्षणाच्या अपेक्षा करायच्या आणि स्वत: मात्र क्षणोक्षणी असंवेदनशील वर्तन करायचे याला काय अर्थ आहे, असं अंधेरी येथील भवन्स महाविद्यालयाचा विद्यार्थी निहार सावंत म्हणतो. भ्रष्टाचार, संसदेतील नेत्यांचे वागणे, गरीब-श्रीमंतांमधील वाढलेली दरी आणि धर्माच्या बाजारीकरणाची बोलकी उदाहरणे यासाठी बोलकी आहेत.
निर्मला निकेतन कॉलेज ऑफ होम सायन्स आणि सोशल वर्कची विद्यार्थिनी असलेल्या शिवानी गुरामला वाटतं, प्रत्येक पिढीची एक ओळख असते. आजच्या पिढीची ओळख ‘डिजिटल पिढी’ आहे. ही त्यांची चूक नसून त्यांना काळानुरूप मिळालेली संधी आहे. तंत्रयुगात वावरताना मागील गोष्टींचं अप्रूप वाटणं कमी झालं तर त्यात गैर काय? आज महिला, अल्पवयीन मुले, ज्येष्ठ नागरिक सुरक्षित नाहीत. त्यावर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न आजची पिढी करत आहे, ही त्याची सकारात्मक बाजू आहे.
आसनगाव येथे राहणारी अॅनेट सबॅस्टियन सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यात व्यस्त आहे. ती म्हणते, अभ्यासाव्यतिरिक्त इतर काही करायला आजच्या पिढीला वेळच नाही. चांगल्या गोष्टी म्हणून आम्ही ज्या काही ऐकतो, त्या गोष्टी केवळ पुस्तकांपर्यंतच मर्यादित राहिल्या आहेत. त्या करायला गेलं की, हे कालबाह्य़ झालं आहे, असं आम्हाला सांगितलं जातं. मग आम्ही त्या चांगल्या गोष्टी केल्या नाहीत आणि कालसुसंगत वागलो तर त्यात नक्की दोष कोणाचा याचं उत्तर कुणाकडेच नाही. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग यांचे आदर्श आम्हाला ठेवायला सांगितले जातात. परंतु त्यांच्या आदर्शाचं पालन आमच्या आधीच्या पिढीने केलं आहे का? सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई, सरोजिनी नायडू यांच्या कहाण्या ऐकवल्या जातात, परंतु आजच्या स्त्रीकडे जिथे केवळ उपभोग्य वस्तू (तिने यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली असली तरी) म्हणून पाहिले जाते, तिथे आदर्श स्त्री म्हणून वागल्यास पुन्हा तिलाच सतीसावित्री म्हणून हिणवले जाते, असे का?
बंगळुरू येथील ‘पॉलिटिकल कोशण्ट’ या संस्थेची संस्थापक सदस्य सुरभी एच. आर. विद्यार्थिदशेपासूनच राजकारण जवळून पाहत आहे. सुरभी म्हणते, स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्याची अमुक एक व्याख्या कुणालाच करता आलेली नाही. त्यामुळे प्रत्येक पिढी तेव्हाचे सामाजिक, राजकीय आर्थिक भाग ठेवून आपापल्या पद्धतीने त्याकडे बघते, हे आपण मान्य करायला हवे. ब्रिटिशांनी सुरू केलेली रेल्वे, डाक सेवा आजही सक्षमपणे सुरू आहे. गेल्या सत्तर वर्षांच्या काळात अशी एखादी कोणती सेवा देशाच्या नागरिकांसाठी निर्माण केली गेली आहे. काही सेवा काळानुरूप आल्या आणि त्यांची वाताहतसुद्धा झाली. त्याउपर जे आहे तेच टिकवण्यात आधीच्या पिढीला जमले नाही, त्याबद्दल नव्यांना दोष देण्यात अर्थ नाही.
नवीन पिढीवर मोबाइलहॉलिक असा आरोप केला जातो. परंतु आधीची पिढी जी आता मोबाइल वापरू लागली आहे, त्या मोबाइलचा वापर ते कशासाठी करतात, हा प्रश्न कोण विचारणार. आमच्यामध्ये दुर्गुण आहेत आम्हाला मान्य, पण अल्लड वयात आम्हाला ते कळत नसल्यास आमचा कान धरणं ही मोठय़ांची जबाबदारी आहे. चांगल्या गोष्टी आचरणात आणण्याचा आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतच असतो आणि करत राहू, असं हॉटेल मॅनेजमेंटचा विद्यार्थी असलेला विक्रांत म्हणतो.
टीव्ही, इंटरनेट, मोबाइलमुळे आम्हाला व्यक्त होण्यासाठी वेगळी माध्यमं मिळाली आहेत. एखाद्या विषयावर व्यक्त होण्यासाठी आम्हाला कुणाचीही परवानगी घ्यावी लागत नाही. शेजारच्या घरातील व्यक्तीपासून ते थेट पंतप्रधानांपर्यंत आम्ही कोणाशाही संवाद साधू शकतो. फेसबुक, ट्विटरसारख्या माध्यमातून आम्हाला हवं त्या ठिकाणाहून, हव्या त्या विषयावर, हव्या त्या वेळी व्यक्त होतो. आमच्यासाठी हे आमचं स्वातंत्र्य आहे. आम्ही जे काही करतो ते सोशल प्लॅटफॉर्मवर सर्वाना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. ते चूक किंवा बरोबर हा ज्याचा त्याच्या समजुतीचा आणि विचारसरणीचा भाग असल्याचं, कॉल सेंटरमध्ये काम करणारा संदीप करमोकर म्हणाला. आजच्या पिढीकडे मोकळेपणा काळानुरूप आलेला आहे. त्याचा सकारात्मक विचार करण्याची आवश्यकता आहे. एका पिढीतील सर्वच जण चांगल्या (त्याची नेमकी व्याख्या काय?) मार्गाने पुढे जात आहेत, असं कधीच होत नाही. वाईटासोबत आमच्या पिढीतही कितीतरी पटींनी अधिक चांगल्या गोष्टी आहेत. आम्ही आमचे स्वातंत्र्य वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करतो. जुन्या-जाणत्यांकडून नवीन शिकण्याचा आणि त्यांना शिकवण्याचाही प्रयत्न करतो, परंतु अनेकदा त्याला तुलनेने कमी प्रसिद्धी मिळते, असं टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स महाविद्यालयाचा विद्यार्थी दुर्गेश सोळंकीला वाटतं.
सेंट झेवियर्स महाविद्यालयाची विद्यार्थिनी मुक्ताई कुवळेकरला वाटतं, भारत स्वतंत्र करणं ही त्याकाळची, त्या पिढीची गरज होती. पण त्याचं ओझं आत्ता ६७ वर्षांनी आमच्या खांद्यावर टाकणं मागासपणाचं लक्षण आहे. जग पुढे जात असताना, भरलेल्या जखमांची खपली काढणं आणि त्याला कुरवाळत बसणं हे अव्यवहार्य आहे. शाळा-कॉलेजमध्ये केवळ मार्कासाठीच इतिहास शिकवला जात असेल, तर कोणत्या स्वातंत्र्याबद्दल आदर बाळगण्याची अपेक्षा नवीन पिढीकडून केली जाते. आम्ही राष्ट्रगीताचा, राष्ट्रध्वजाचा आदर राखतो, हुतात्म्यांबद्दल आम्हालाही अभिमान आहे. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर, सुट्टीत ट्रेकिंगच्या माध्यमातून गड-किल्ल्यांवर आम्ही जातो, तिथला इतिहास जाणून घेण्यासाठी धडपडतो. पण जो भाग शालेय अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकातून यायला हवा, तो आम्हाला केवळ आवड किंवा छंद म्हणून जोपासावा लागतो. ती आमची जगण्याची सवय न करण्याला स्वातंत्र्योत्तर काळातील शिक्षण कारणीभूत आहे. किल्ल्यांवर जाऊन नशा, चुकीच्या गोष्टी करणारेही आहेत, पण याचा अर्थ संपूर्ण पिढीला दोषी ठरवणे चुकीचे आहे.
व्हीजेटीआयची विद्यार्थिनी सुचेता दडस म्हणते, एका दिवसाचे उसने देशप्रेम दाखवणारी पिढी म्हणून आमच्याकडे अंगुलिनिर्देश केला जातो. परंतु वर्षभर अशा कोणत्या गोष्टी इतर लोक करत असतात, ज्यामधून त्यांचे देशप्रेम व्यक्त होत असते. एवढंच काय प्रसिद्धी माध्यमे आणि सरकारलाही १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीशिवाय देशाची व स्वातंत्र्यलढय़ातील हुतात्म्यांची आठवण होत नाही. पुण्याच्या एम.आय.टी.स्कूल ऑफ गव्हर्न्मेंटचा विद्यार्थी असलेल्या देवेंद्र पैला वाटतं, वाईट गोष्टींची सर्वानीच निंदा करावी, परंतु आमच्या पिढीच्या चांगल्या गोष्टींकडेही कानाडोळा करू नये, ही माफक अपेक्षा आहे. सुशासन येण्यासाठी आजची पिढी विविध उपक्रमांत सहभागी होण्यात आघाडीवर आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. खरंतर आपल्या चुका पुढील पिढीकडे टोलवणे फार सोपे आहे, परंतु चांगल्या गोष्टी कायम राखण्यासाठी तरुणांना मार्गदर्शन करणे आणि त्यांच्या हातात हात घालून काम करणे ही खरी काळाची गरज आहे. नाहीतर आजची पिढीसुद्धा पुढील पिढीकडे त्याच नजरेने पाहील आणि आरोप-प्रत्यारोपांची मालिका कधी संपणारच नाही.